Saturday, April 10, 2010

एकम.

किती वर्षे झाली असतील जुन्या मुंबई-पुणॆ महामार्गावरुन प्रवास केलेल्याला ?

शुक्रवारी राजाभाऊंनी ठरवलं बास झाला हा द्रुतगती महामार्गावरचा निरस प्रवास. काहीच घडत नाही , नुसतं आपल " वेटींग फॉर पुणे ".  खंडाळ्याच्या घाटाची मजा चाखु,  घाटात, वाटेत काय काय फुले फुलवुन वृक्ष राहिले आहेत ते न्याहाळु, लोणावळ्याला उतरु, "निसर्गसुक्‍त " मधे भेटले होते जांभळाचे झाड,.ही जांभळाची झाडॆ लोणावळा स्थानकाबाहेर खुप आहेत, जांभळांनी लगडलेली झाडॆ पाहु. मग घरला जावु.

जणु काय, हे सारे वैभवाचे भांडार त्यांच्यासाठी रात्राच्या प्रकाशात खुलणार होते.

योगायोगाने त्यांना लोणावळ्याला जाणारा एक चालक भेटला.

मिलिंद बोकीलांचे "एकम" सकाळी वाचयला घेतलेले.  ह्या अश्या प्रवासाचा दुसरा फायदा. लोणावळा-पुणे प्रवासात ते वाचता येणार होते.

लतानी नुसते पिडलयं. अचानक ट्रेन मधले दिवे गायब झालेले . एक दोन चार पाच सेकंदच. रात्र किती काळीभोर असते. शांत ,  निव्वळ शांतता. केवळ फक्‍त एकांत, हवाहवासा वाटणारा एकांत.  हे कोलाहलात असुन देखिल असलेले एकटेपण.  आणि मग ती शांतता ढवळुन काढायला लता येते.

"बहारे फिर भी छाये गी मगर हम तुम जुदा होंगे "  , अजुन डोक्यातुन जात नाहीयं.

एकम चे मग दुकम होवुन जाते,  " मै और मेरी तन्हाई "

ही सकाळ श्यामसुंदरनीच उजाडायला हवी होती काय ?

"साजन की गलीयां छोड चली,
दिल रोया आसुं बह ना सके 
जब उनसे बिछडके आने लगे
रुक रुक के चले फिर चल के रुके ( या रुक रुक मधलं लताचे रुकणे,  आ हा जान कुर्बान )
लब कापे आंखे भर आई
कुछ कहना चाहा कह ना सके "

काही बोलायलाच हवे होते का ? काही बोलले गेले नाही, काही ऐकले गेले नाही.
कुछ कहना चाहा कह ना सके "
साजन की गलीयां.

परत "एकंम". "
" दुपार मऊसुत, गरम आणि सुंदर असते "

"देखो देखो रे मुरली बाजे रे कान्हा."  हि दुपार सुंदर तर असतेच पण सुरेलही.  ही दुपार ठुमऱ्या घेवुन आलेली असते, हवेतील उकाडा गायब करणारी असते,  बेगम अख़्तर गात असतात " जब से श्याम सिधारे, श्याम सिधारे, तडप तडप के जीया जाये, श्याम सिधारे, जबसे श्याम " मस्त मुड लागलेला असतो. ती ठुमरी संपते, पण तो मुड तो तर परेशान करुन राहिलेला. अचानक समोर येते ती उल्हास कशाळकरांची " Expressions of Love " ची कॅसेट. 
"कोयलीया कुक सुनाये " 
वैशाखातली ही तपन लागलेली धारा , मग ही शितलता आली कुठुन ? ही टवटवी ? हे ताजेपण ? दुपार एकदम मलमली होत जाते. 
"पिया बीन नही आवत चैन " (पहिल्यांदाच ही ऐकतो आहे की काय ? )
"पिया तोरी तिरछी नजर लागी प्यारी"

मग अचानक सारे सारे केवळ नकोसे होते.

नको तो सुर, तो आर्त सुर, तो तोशीवणारा सुर, रिझवणारा सुर, मखमली सुर, नको तो आनंद देणारा, रडवणारा, हळवा करवणारा, मनाला थुईथुई नाचवणारा सुर.

नकोच

हवे असते ती नुसती शांतता.
हवे असतात ते याच, याच वेळी तुमच्या मनाला फक्‍त तुम्ही.
फक्‍त तुम्हीच.  तुम्ही आणि तुमच्या मनातली ती शांतता.
निशब्द शांतता आणि हवेहवेसे एकाकीपण.

" बोध कशाचा  घ्यायचा याचा बोध " हवा कशाला ?

No comments: