Wednesday, February 24, 2010

हे ही रुप खरे आणि ते ही रुप खरे

रेल्वेस्थानका बाहेर लागलेली रिक्षावाल्यांची रांग.

रिक्षाचालकांपाशी "चकाला ? " , "चकाला ? " , "चकाला ? "  हा एकच शब्द बोलत पुढे सरकत रहायचे, मधे एखादा चुकुन तयार झाला तरी देखिल.  कारण त्यांचा नकार गृहीत धरलेला.

त्यांची मर्जी असेल तर आपण आज लवकर नशिब खुलले करुन खुष व्हायचे.

शिवनेरीचा प्रवास. मुंबईत चेंबुर, सायन येथे बसचा वेग प्रवासी उतरविण्यासाठी थांबायला कमी झाला की केवळ त्यांचीच वाट पहात उभे रहाणारे रिक्षाचालक बसचालकाला हात करुन त्यांच्या जवळ बस उभी करण्याची विनंती करत असतात.

बस मधुन प्रवासी उतरले की उतरले मग त्यांना लाचारभावाने विचारत रहातात , " मुलुंड ? " , " बांद्रा? ".   

रुढी, पध्दत , अंधश्रद्धा इ.

शेजारच्या आजीबाईंचे विचार ऐकुन राजाभाऊंना जबरदस्त धक्का बसला.

पध्दत कशी पडते याचे त्यांनी एक उदाहरण दिले.

लग्नघरात ऐन मांडवात एक मांजर येवुन मेली,  अपशकुन झाला असे उगीचच कुणाला वाटु नये, ते मांजर मेल्याचे कोणाच्या लक्षात न येवु नये म्हणुन वरमायनी त्यावर एक टोपले ठेवले. टोपले ठेवतांना त्यांच्या थोरल्या सुनबाईने पाहिले.

सुनबाईने आपल्या मुलाच्या लग्नात एक मांजर पकडुन आणली, तिला ठार मारले व मंडपात तिच्यावर टोपले ठेवुन तिला झाकुन ठेवले.

लोकांनी विचारले " काय हा प्रकार"

"अहो, आमच्यात तशी पध्दत आहे " , सुनबाईंनी उत्तर दिले.

Tuesday, February 23, 2010

जिहाद - लेखक - हुसेन जमादार

"एखाद्या ध्येयाच्या सिद्धीसाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावणे व जिवाच्या आकांताने प्रयत्न करणे म्हणजे "जिहाद" होय. ’जिहाद’ म्हणजे केवळ धर्मयुद्ध नव्हे." - पुस्तकामधुन साभार

हुसेन जमादार लिखीत "जिहाद " वाचले. हे त्यांचे आत्मचरित्र. हुसेन जमादार हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे पुर्णवेळ कार्यकर्ते. हमीद दलवाईंचे साथी. संपुर्ण आयुष्य प्रबोधनाच्या कार्यक्रमाला विधायक कामाची जोड देत काढलेलं.

एकीकडे लाखोंकरोडो धर्मांध तर दुसरी कडे हे असे मुठभर समाजाचा विचार करणारे.

केवळ या मुठभर लोकांमुळॆच समाजपुरुष आपला तोल सावरुन आहे. हे मुठभर लोक म्हणजे तुला करतांना एका बाजुच्या तागड्यात टाकलेले एक छोटुसे तुलशीपत्र.

Monday, February 22, 2010

"बाय द वे " पुन्हा एकदा

तीन तास ज्या प्रवासाला लागायला हवे तेथे सात तास पुण्याहुन मुंबईला पोचायला लागले. तरी बर मधे शिवनेरीची वाट बघता, बघता वाकडला "सोल करी " ( हे उपहारगृह श्री. विठ्ठल कामतांच्या नावासोबत काही जचत नाही ) मधे साधा डोसा पोटाच्या खळगीत भरुन झाला होता.   

आज माटुंग्याला "रामा नायक " मधे जेवायचे करुन लवकर निघालेल्या राजाभाऊंवर मुंबई सेंट्रलच्या "कल्पना" मधे जेवणाचा घोर प्रसंग यावा ? 

दादा , सांगाना , नाही ना ,  नाही ना ते तिथे जेवले ?

दमलेल्या, भुकेल्या अवस्थेत भरगच्च , तुडुंब गर्दीत आपल्याला कधी जागा मिळेल याची वाट पहात रहाणे या सारखी सजा नसवी, आणि ती देखील येखाद्या रस्तावरच्या उपाहारगृहात, जे मिळेल ते पोटात टाकण्यासाठी ? व ते देखील शांतपणे , निवांत   बसुन चांगले जेवण जेवण्याचे ठिकाण घराजवळच असतांना ? 

मोजुन सातव्या मिनिटाला सहनशक्ती संपलेले राजाभाऊ गावदेवीला "सेवासदन " ही संस्था चालवत असलेल्या "बाय द वे " मधे.  हे एकमेव मॅड क्राउड पासुन वाचलेले ठिकाण आहे. शाकाहरी जेवणाच फक्‍त चार,पाचच भाज्या मिळत असल्यामुळे ते यांच्यापासुन वाचलयं. ते तसच रहावे निदान राजाभाऊंसाठी तरी.

शांतपणे, आरामात जीरा आलु व पोळ्या खाल्यानंतर मग त्यांच्या अंगात चांगली तरतरी आली. 


या उपहारगृहाची अंतर्गत सजावट, रंगसंगती, रचना , मांडणी, वरचे लाकडी भीम असलेले उंच छत , ही जागा राजाभाऊंना फार आवडते.



श्री. वीरकर यांचे फुड पॉईंट - विलेपार्ले.

हं.

राजाभाऊंनी तृप्ततेनी हुंकार भरला.

आहे खरा छान हा बटाटावडा, अस्सल. उत्तम चवीचा, दर्जेदार. चवीला काहीसा वेगळा. खास मराठीमोळा वडापाव.



मजा आली.

विलेपार्लेच्या भ्रमंतीत नवीनवी ठिकाणे गवसत आहेत. सुभाष रस्तावरच्या या "फुड पॉईंट" ची नोंद तशी चालतांना झाली होतीच. येथे आज खाद्ययोग जुळुन आला.



मध्यंतरी एका उपाहारगॄहात मिळणाऱ्या बटाटावड्यांबाबतीत लिहितांना राजाभाऊंच्या हाती अतिशयोक्ती अलंकाराचा काही प्रमाणात का होईना पण उपयोग केल्याचे ते आता प्रांजळपणाने कबुल करतात. अनेक ठिकाणाचे अगदी गाडीवरील सेना पुरस्कृत ते रमाकांत, वडखळच्या नाक्यापासुन दत्तगुरु पर्यंत, दिवाडकर, जोशी वडेवाले, रोहित वडेवाले, कुटुंबसखी, तांबे, विनय, आराम,लाडु सम्राट, मामा काणॆ, एम.एम.मिठाईवाला, छबिलदास, (आणि बायकोच्या हातचा देखिल ) अनेक अनेक ठिकाणचे वडापाव त्यांच्या पोटात रिचवले गेले. पण या "वड्याचे" पाणी काही वेगळॆच.

अपवाद मात्र दिवेआगारला समुद्रकिनाऱ्यावर जातांना एका घराबाहेर लावलेल्या गाडीवरील बटाटावड्याचा. काय पात्तळ आवरण होते त्याचे, तोंडात सारल्यावर जणु तो वितळतच होता. ). फुड पॉईंट मधे अगदी असाच पातळ आवरण असणारा, जरासुद्धा तेलकट नसणारा असा हा वडापाव खाल्ला नंतर वाटु लागले की जणु राजाभाऊंनी आतापर्यंत  दुधाची चव घेतली नसावी व पाण्यात कालवलेल्या पिठालाच ते दुध समजत असावेत.

तर मग " ते गृहस्थ कोथींबीर वडी का काय तरी म्हणत होते." पुढे रस्ताला लागलेल्या राजाभाऊंना अचानक आठवले व एका अनामिक ओढीने ते माघारी फिरले, ते परतले कोथांबीर वडी खाण्यासाठी.


नवरात्र. मुंबईला महालक्ष्मी मंदिराशी भरलेली जत्रा. देवीच्या दर्शनाला जाण्यापेक्षा जास्त आकर्षण असेल तर ते जत्रेचे आणि देवळामागल्या समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलात मिळणाऱ्या गरमागरम मुगडाळ भजीचे , त्या घाण्याचे व त्या भजीसोबत मिळणाऱ्या आंबटगोड चिंचेची चटणीचे.

बाल्य हरपले, जत्राही सुटली, मागे राहिली ती केवळ चव. मनाच्या गाभाऱ्यात खोलवर आत कुठेतरी कोपऱ्यात दडुन राहिलेली. संधी मिळतात झटदिशी मेंदुला संदेश देण्यासाठी.


"कोथींबीर वडी आत्ताच संपली, मुगडाळ भजी  देवु का ? " या एका प्रश्नाने भुतकाळात गेलेले राजाभाऊंचे मन परत जाग्यावर आले , ते समोर आलेल्या गरमागरम मुगडाळ भजी चा आस्वाद लुटण्यासाठी.




"कोणी तिथे मिसळीची ऑर्डर दिली ?"

आता पुढल्या भेटीत काय खायचे याबद्दल आत्ताच ठरावयाचे ?

रे मनवा काहे को.





दिल है छोटासा , छोटीसी आशा



माझ्या मुलाने हा फोटो काढला आहे.

Wednesday, February 17, 2010

नीर डोसा आणि रामाश्रय - माटुंगा

आज राजाभाऊ माटुंग्याला नीर डोसा खाण्यासाठी रामाश्रय मधे पोचले.

पण आज तो नव्हता तेवढा चांगला. फ्रेश वाटत नव्हता.  त्यासोबत मिळते नारळाचे चोय आणि मग चटण्या , सांबार आदी.

घटना दोन बातम्या दोन पण ....

लोकसत्ता -दिनांक २६/०२/२०१०.

मुखपृष्ठावरील दोन बातम्या.

वरची बातमी -

माढामध्ये पूर्ववैमनस्यातून आठ पारध्यांची जाळून हत्या .

पारधी समाजाच्या दोन गटांच्या वैमनस्यातून रविवारी मध्यरात्री वस्तीला लावलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. माढय़ापासून पाच किलोमीटर अंतरावरील निमगावात बेंद शिवारामध्ये मध्यरात्री १२ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

त्याच्या खालोखाल हि दुसरी बातमी.

पवारांच्या मनधरणीनंतरही : वाघाची कांगारूंना नो एन्ट्री

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कोणत्याही स्थितीत खेळू देणार नाही, अशी घोषणा आज  ..........


या दोघांमधला फरक येवढाच की एका घटनेतुन राजकीय हेतु साधता येतात तर दुसरीचा राजकीय लाभ शुन्य.

आपल्याच देशात, आपल्याच राज्यात , आपल्याच माणसांवर नेहमीच हा असा अन्याय होत रहातो पण ...

दुसऱ्या परक्या देशात कुणीतरी कुणाला तरी माराहाण करतो मग त्याचे पडसाद .......


Tuesday, February 16, 2010

स्वादिष्ट मिसळ, हनुमान रोड, परांजपे बी स्किम क्रं. ३ , विलेपार्ले.(पुर्व )

सायंकाळी राजाभाऊ कार्यालयातुन सरळ मार्गाने थेट घरी न जाता " वॉक " घेण्याचे निमित्त करुन विलेपार्ले मधील रस्तातुन, अधल्यामधल्या गल्यांमधुन " पाय नेतील तेथे, वाट फुटेल तसे चालत रहावे " हा मंत्र जपत  फिरत का रहातात याचा उलगडा आज झाला, यातले रहस्य आज ध्यानी आले.

जिव्हेचे, पोटाचे आणि अंतरात्माचे लाड, अती लाड , चोचले पुरवणे, आणखी दुसरे काय ?

एक मात्र खरं की असे चालत रहाण्याचा एक प्रचंड फायदा असतो, ठिकाणॆ कशी नेमकी गवसतात, सापडतात जे वहानातुन फिरत असतांना कठीण असते.

काही क्षणापुर्वी हायपर ऍसीडीटीने त्रस्त झालेले राजाभाऊ आपण Nux Vomika 200 घेतल्या होत्या हे ते क्षणार्धात विसरले आणि त्यांची पाऊले आपसुकच वळाली " स्वादिष्ट मिसळ " च्या दिशेने.


आज खाणाऱ्याला खिलवणारा भेटला.  समासम संयोग जुळुनी आला. ज्या तन्मयतेने, आनंदाने मनापासुन श्री. मंदार  जोशी नादमयतेने मिसळ बनवत होते, जणु रंगमंचावर आपल्या कलेचे प्रगटीकरण करणारा एखाद्या कलावंत की जरीची साडी, त्यावरचे भरतकाम विणणारा विणकरी व त्याचे ते हात?  

त्याच आपुलकीने , प्रेमाने , नजाकतीने ते रसीकांना मिसळ खाऊ घालत होते की बस रे बस.

दिल खुष हुआ.

"पुणेरी मिसळ खाणार की कोल्हापुरी ? "

या मधे राजाभाऊंनी कमी तिखट असलेल्या पुणेरी मिसळीची निवड केली.
चटकदार, मटकदार, जशी हवी अगदी तशीच मिसळ. मग श्री. मंदार जोशींशी झालेल्या संभाषणात त्यानी मिसळचे मर्मस्थान, त्यातली घराणी, खाणाऱ्याची, बनवणाऱ्याची मानसीकता,प्रादेशिकता,  आवडनिवड, मिसळ बनवण्याची कला, शास्त्र, आदी बाबी उलगडुन सांगीतल्या.

आता गुरवारी वसंत व्याख्यानमालेत डॉ. मीना प्रभुंना ऐकायला जायचे आहे त्यावेळी "कोल्हापुरी मिसळ " हा काय प्रकार असतो हे जाणुन घ्यायला हवे.


नक्की केव्हा ?

नक्की केव्हा असे देखणॆ कोरीवकाम असणाऱ्या इमारतींची रचना करणे आपल्या कडॆ बंद झाले असेल ? व ते का बंद झाले असेल ?

एक चोर म्हणे दुसऱ्या चोरांपासुन सावध रहा बर का !

एक चोर म्हणे दुसऱ्या चोरांपासुन सावध रहा बर का !तुम्हाला लुटायची संधी मलाच द्या.
सर्वसाधारणता एका व्यवसायातील व्यावसाईक त्याच व्यावसायातील दुसऱ्यावर टिका न करण्याचे व्यावसाईक भान राखुन असतो.
पण येथे हे शिकंदर बाबा चक्क "गोल्ड मेडालीस्ट " असल्यामुळे त्यांचा अधिकार फार मोठा असावा.

मुंबईमधील लोकल ट्रेन मधल्या या जाहिराती.

Monday, February 15, 2010

१४/०२, मामाकाणॆ यांचे स्वच्छ उपाहारगृह ते क्रीम सेंटर व्हाया मालाडकराची व्हे.बिर्याणी

"याद राख उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवशील तर तंगड मोडुन टाकीन."

राजाभाऊंनी आपल्या बायकोला सज्जड दम भरला. (केवळ या धाडसाबद्द्ल जर का राजाभाऊंना २६ जानेवारीस शौर्य पदक मिळाले तर त्यावर कोणाला आक्षेप घेता येणे नाही )

जन्मभर आपल्या नवऱ्याचे कोणतेही म्हणणे, सांगणे, हे अजिबात ऐकायचे नसते हा ठाम निश्चय असणारी बायको त्यांचा " आज स्वयपाकघरात पाय म्हणुन ठेवायचा नाही " हा आदेश ऐकला की अचानक कशी आज्ञाधारक व्हायला लागते.

"काय गजराबिजरा."
"नको. मी नळाला लावायला फिल्टर घेतेयं. "


शेवटी आपल्या नवऱ्याचा लगाम आपल्याच हाती असला पाहिजे. .

मामा काणॆ यांचे स्वच्छ उपाहारगॄह. स्थापना १९१०.

तुम्ही मुंबई मधे रहात असाल आणि जर मामा काणॆंकडे जावुन बटाटा वडा खाल्ला नसाल तर मग तुम्हाला मुंबईमधे रहाण्याचा अधिकार नाही. ( "कायमचा ठावठिकाणा असल्याच्या दाखल्यात " हे एक कलम असायला हवे, केवळ १५ वर्षे मुंबईत रहाणे हे पुरेसे नाही )

बटाटावडा, मिसळ, कांदा,बटाटाभजी, थालीपिठ आणि कोथींबीर वडी."आपल्या सेवेत आम्हाला आनंदच आहे परंतु वेळॆचे भान ठेवुन अधिकाधिक ग्राहकांची सेवा करण्याचे संधी स्वखुशीने द्यावी. खाद्यपदार्थ फुकट घालविण्याचे टाळा व सामाजिक जाणीवेचे भान राखण्याचे समाधान मिळावा "असा मिळालेला प्रेमळ दम ध्यानी ठेवत या पदार्थांचा आस्वाद घावा.


राजाभाऊ जणु शटर उघडायला मामा काणॆंकडे पोचले. शटर काय उघडले आणि भराभरा इकडुनतिकडुन माणसे काय आत भस्सकन शिरली.

वडापाव, मिसळीवर ताव मारुन झाला.

त्यांच्या नशिबी पुढे काय ताट वाढुन ठेवले होते ह्याची त्यांना पुसटशी देखील कल्पना नव्हती.

बायको जेवु घालेना, मेहुणी उपाशी राहु देइना. यातली गत.

सोमवार बाजार , मालाड मधल्या श्री.मालाडकरांकडची तांदळाची मऊ सुत भाकरी व व्हे.बिर्याणी. सोबत मेहुणीच्या हातची वटाण्याची चटणीची भाजी.



आज पासुन बायकोच्या माहेरच्यांशी चांगले वागायचे.

रात्री तिला परमप्रिय असणारा, अत्यंत आवडीचा असा कोणता पदार्थ व तो कोठे खाऊ घालायचा हा गहन प्रश्न गोरेगावच्या ओबेरॉय मॉल मधे नव्याने सुरु झालेल्या "क्रीम सेंटर " ने चुटकीसरशी सोडवला.



"रशियन सॅलड सॅंडवीज तिच्या साठी व चना भतुरा राजाभाऊंसाठी. गिरगाव चौपाटीवर मुळ स्थान असलेल्या या क्रीम सेंटरनी आता चांगलेच अनेक ठिकाणी बस्तान मांडलयं. अगदी पुण्यात कल्याणी नगरात सुद्धा.

हा खाद्यदिवस होता का व्हेलेंटाइन डे ?



Sunday, February 14, 2010

निषेध

निषेध.

जर्मन बेकरीमधे बॉंम्बस्फोट घडवुन आणणाऱ्या दहशदवाद्यांचा निषेध, दहशदवादी संघटनेचा निषेध, पाकिस्तानचा निषेध. एका चित्रपटासाठी सारे पोलीसबळ पणाला लावणाऱ्या सरकारचा निषेध, राज्यकारभार करायचा सोडुन राजकारण करत बसलेल्या मुख्यमंत्रांचा निषेध, आपली कामंधंदे सोडुन फालतु गल्लाभरु चित्रपट पहायला तीनचार खर्च करणाऱ्या गॄहमंत्रांचा निषेध , आपले अस्तित्व टिकवण्यासाठीची केविलवाणी धडपड करतांना शुल्लक बाबींचा पराचा कावळा करत साऱ्यांना वेठीस धरणाऱ्या नेत्यांचा निषेध, आपला चित्रपट हिट व्हावा म्हणुन जाणुनबुजुन वादविवाद निर्माण करणाऱ्या चित्रपटसॄष्टीचा निषेध, बेसावध पोलीसदलाचा , गॄहखात्याचा निषेध. बारामहिने चोवीस तास घरदार , सणवार विसरुन ड्युटीवर असणाऱ्या अप्रशिक्षित पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल निषेध.

निषेध व्यक्‍त करण्यापलिकडे सामान्य माणुस आणखी काय करु शकतो ? एकादी दुर्घटना झाली की मग तेवढ्यापुरती सर्वांना जाग येते, हालचाली केल्या जातात, अनेक घोषणा केल्या जातात. पण अंमलबजावणी शुन्य. परत ये रे माझ्या मागल्या.

सर्वसामान्य माणुस एक मात्र नक्कीच करु शकतो, आपले डोळे , कान उघडॆ ठेवु शकतो.

संशयास्पद सामानाला हात लावु नका, बेवारसी बॅगा उघडुन पाहु नका , त्याची माहिती पोलीसांना द्या, हे इशारे वारंवार दिले जातात. पण ते गंभीर पणे घेतले जात नाहीत. या वर अधिक जनजागॄती होणाची गरज आहे.

बॅग उघडली नसती तर कदाचित हा विंध्वंस टाळता आला असता.

Saturday, February 13, 2010

सम्राट व काळाघोडा कला महोत्सव

बन मस्का खाण्याच्या नादात काळाघोडा कला महोत्सवाला पोचायला उशीर झाला. तरी नशीब हा सिंफोनी ऑर्केस्टा संपता संपता ऐकायला मिळाला. वदेंमातरम व सारे जंहा से अच्छा हिंदोस्ता हमारा या धुन या परदेशींनी काय सुरेल वाजवल्या. मजा आली.



आज अफाट गर्दी होती. त्यात काही निभाव लागणार नाही व्यवस्थित खाता येणार नाही म्हणुन मग ते सम्राट मधे जेवायला गेले.
सम्राट.

अगणित वेळा येथे जेवायला गेल्याने हे त्यांच्या एवढ्या परिचयाचे झाले आहे की खाण्याबद्दल ब्लॉगवर लिहितांना त्याचा नेहमीच विसर पडायचा.

शुध्द शाकाहारी उपहारगृह. , उत्तम दर्ज्याची गुजराथी थाळी,  चविष्ट गुजराती खाद्य पदार्थ, पंजाबी पदार्थ मिळण्याचे चर्चगेट मधिल एक हुकमी स्थान.  नेहमी यात खुप गर्दी असते.

इराण्याचा बनमस्का-चहा - भायखळा रेष्टॉरंट आणि बेकरी मधे

या कोपऱ्या वरच्या इराण्यांचं हॉटेल्सचं कोणॆ एके काळी तरुण पिढीवर फार उपकार झालेले आहेत. केवळ एक बन-मस्का, खारी, चहा या येवढ्याश्या ऑर्डरवर तासनतास येथे शांतपणॆ बसुन मनमुराद गप्पागोष्टी हाणता यायच्या. कोणीही उठवायला यायचे नाही. बाहेर पडता "दोन इसम बीस रुपया " करुन तो वेटर ओरडुन सांगायचा. काळाच्या ओघात ही संस्कृती लयाला जात चालली. बऱ्याच ठिकाणी इराणी जावुन चिलीये आले.

अजुनही काही तुरळक ठिकाणी चांगला बन-मस्का, ब्रून-मस्का-चहा मिळतो. यांच्या चहाची चव काहीसी वेगळी लागते. ती दुधात अंड घातल्यामुळॆ चव बदलते अशी एक वंदता. एक काळ असा होता की केक फक्त येथेच मिळायचा किंवा मग पंचताराकींत हॉटॆलात. ( मग मॉगींनीस आले आणि हळुहळु तो सर्वत्र मिळु लागला ) इराण्याकडे केक मागवला की ते केकचे जेवढे प्रकार असतील तेवढे डिश मधे घालुन समोर आणुन ठेवत, जेवढे खाल त्याचे पैसे, बाकीचे परत.

भायखळयाला रेल्वेस्थानकासमोरील भायखळा रेस्टॉरंट व बेकरी अजुनही केवळ नुसता टिकाव धरुनच नाही तर स्टील गोइंग स्ट्रॉंग.

राजाभाऊ आज परत राणीच्या बागेत फुले,फळे, भाज्या यांच्या मुंबई महानगरपालिकेतर्फे भरलेल्या सपत्निक प्रदर्शनास गेले होते.

तिला येथल्या या बेकरीत बनमस्का व चहा आवडतो.

मग काय.

"समस्त अखिल भारतीय खवय्येब्लॉगर्स मंडळ "- क्या आयडीया है सरजी

समस्त खवय्ये ( आणि खादाड सुद्धा ) ब्लॉगधारकांचे एक  "समस्त अखिल भारतीय खवय्येब्लॉगर्स मंडळ " स्थापन करायचं राजाभाऊ विचार करु लागले आहेत.

महिन्यातुन एकदा केवळ खाण्यासाठी एकत्र जमणे व फक्‍त खाण्यासंबंधी बोलणे हा या मंडळाचा  उद्देश असेल.

रोहन चौधरी यांना त्याचे नेतृत्व स्विकारायची ते विनंती करु इच्छीतात.

जलेबी की तलाश मे


जिलेब्या आणि मठ्ठा राजाभाऊंना परमप्रिय. लग्नाच्या पंगतीत एक वेळ जिलेब्याची ताट फिरवणारा वाढपी त्यांना वाढुन वाढुन दमेल पण त्यांचे खाणे थांबणे त्रिवार अशक्य.

तर त्यांना विलेपार्लेतील रस्तातुन चालता चालता अचानक जिलेब्या आठवायला, इंन्दौरच्या सराफ्यात धाव घ्यावीशी वाटली. ( येवढे विज्ञान प्रगत झालयं पण एक बटन दाबल्यावर "ड्र्‌र्‌र्र्‌कन इकडुन गायब , तिकडे प्रगट " होणारी सोय काय शोधलेली नाही, नको नाहीतर "फ्लाय " चित्रपटात जे काही झाल त्यासारखं झाल तर खाद्यपदार्थाबरोबर आणखी कशाकशावर जावुन बसावे लागेल).

पाय नेतील तेथे चालत रहायच्या या सवयीने त्यांना "रामकृष्ण" च्या दारात पोचवले. काही उपहारगृहांची तुमचे नाते का कोण जाणे कधीच जुळत नाही. रामकृष्ण हे त्या पैकी एक.

बाहेर चक्क जिलेब्या तळत बसलेले.

टपक, टपक, टप, टप . लाळ गळॆ, लोहचूबका प्रमाणे राजाभाऊ तेथे ओढले गेले.

पण हाय. रामा. जिलेब्या कडक. त्यात जिलेब्या देणाऱ्यानी जमिनीवरती खाली बालदीत असलेले घाण पाणी हाताने शिंपडत, कळकट, मळकट फडक्याने जमिन पुसायला बुट घातलेल्या पायाने सुरवात केली. ते पाणी, त्याचे तो वासवाला फडका हाताळणे, त्या माणसाचा अवतार .

जाम शिव्या दिल्या नंतर त्या जिलेब्यां शेवटी पोटाऐवजी पेटीत गेल्या.

मग काही दिवसात मालाडला बिकाजी मधे जाणॆ ठरले. स्थानका उतरल्या उतरल्या उतरल्या एम.एम. मिठाईवाल्याकडॆ गरमागरम जिलेबी चा आस्वाद घेतला तेव्हा कुठे जीव थंडावला.

खरच जीव थंडावला ? असे असते तर राजाभाऊ चेतनामधल्या जिलेबीच्या ओढीने रातोरात काळाघोडा महोत्सवाला गेले नसते.




संपादकाची टिप - हे लिहित असतांना ते अर्धवट सोडुन भावना अनावर झालेल्या राजाभाऊ मुंबादेवीला "मुंबादेवी जिलेबीवाला " कडॆ जिलेबीपापडी खायला गेलेले आहेत.





आता पुढे काय ?

एकंदरीत लोक आता झुंडशाहीला, हम करे सो कायदा प्रवृत्तीला कंटाळाले आहेत हे मात्र खरे. आणि त्यातलं अर्थकारण त्यांच्या चांगलच ध्यानी आलय हे ही खरे.

सर्वकाळ लोकांनी भाबडंच रहायच काय ?

वा राजाबाबु बढिया है !

वा राजाबाबु , नया कॅमेरा, नया तंदुर बढिया है ! वही पुरानी .... .


"वही पुरानी" नी हा सारा घाट घातला तो त्यांच्या पुतणीसाठी व त्यांच्या मुलासाठी. त्या मुळे जे काही राजाभाऊंच्या वाट्याला आले ते केवळ त्यांच्या दातातल्या कॅव्हेटीत गेले, पोटापर्यंत पोचलेच नाही. 

Friday, February 12, 2010

हम बने तुम बने ...

उपवासाची थाळी

राजाभाऊंच्या बायकोला वाटले होते हे येवढे सारे हादाडल्यानंतर दुपारी राजाभाऊ भुकभुक करणार नाहीत, पण तिची तो गैरसमज होता,

भरलेले राजेळी केळॆ, राजगीऱ्याच्या पुऱ्या, शेंगदाणा लाडु, रताळ्याचा कीस, आणि रताळ्याची खीर

फुले, फळे, भाज्या, वनस्पती यांचे प्रदर्शन - राणीच्या बागेत

काळाघोडा आहे तरी कोठे ?

काळाघोडा , काळाघोड्यात नाही. मग त्याची उणीव भरु काढायला हे सारे प्रकार केले जातात.


मुळाचा देखणा काळाघोडा
बंदिस्तवान झालाय.

काळाघोडा कलामहोत्सव - २०१०




सध्या मुंबईमधे काळाघोडा कलामहोत्सव भरला आहे. पण या वर्षी मन त्यात फारसं रमत नाहीय. त्या महोत्सवाच्या आजुबाजुला पदपाथावर आयुष्य कंठणाऱ्या लोकांनी अस्वस्थ करुन सोडलयं. असे रस्तावर येण्याची पाळी कोणावरही येवु नये.  त्यात परत गरीबांसाठी कामं करणाऱ्या स्वयंसेवी संस्था या कलामहोत्सवामधे सहभागी घालेल्या आहेत. यांच्या कामाबद्द्ल कधीकधी माझ्या मनात संभ्रम निर्माण होतो.

चेतनाची अचेतना . पर्यावरणरक्षण ते भक्षण





काला घोडा कलामहोत्सवात एकीकडे "पर्यावरण"  ही संकल्पना मध्यवर्ती ठेवुन त्या अनुषंगाने कलाकृती सादर केल्या जातात. त्याच महोत्सवात "चेतना " कमवकमव कमवते पण ..




नुसता जबरी दंड पुरेसा नाही. पर्यावरणाची हानी करणाऱ्याला आसुडाचे फटकेच हवेत.

यांनी केलेली घाण काय महानगरपालिकेनी उचलायची ? त्यांना हे सारे त्वरीत साफ करता येत नाही काय ? ताबडतोब तर हे उचलायलाच हवे व त्यातुन उरलेच तर ते रातोरात साफ करायले हवे.