Tuesday, February 16, 2010

स्वादिष्ट मिसळ, हनुमान रोड, परांजपे बी स्किम क्रं. ३ , विलेपार्ले.(पुर्व )

सायंकाळी राजाभाऊ कार्यालयातुन सरळ मार्गाने थेट घरी न जाता " वॉक " घेण्याचे निमित्त करुन विलेपार्ले मधील रस्तातुन, अधल्यामधल्या गल्यांमधुन " पाय नेतील तेथे, वाट फुटेल तसे चालत रहावे " हा मंत्र जपत  फिरत का रहातात याचा उलगडा आज झाला, यातले रहस्य आज ध्यानी आले.

जिव्हेचे, पोटाचे आणि अंतरात्माचे लाड, अती लाड , चोचले पुरवणे, आणखी दुसरे काय ?

एक मात्र खरं की असे चालत रहाण्याचा एक प्रचंड फायदा असतो, ठिकाणॆ कशी नेमकी गवसतात, सापडतात जे वहानातुन फिरत असतांना कठीण असते.

काही क्षणापुर्वी हायपर ऍसीडीटीने त्रस्त झालेले राजाभाऊ आपण Nux Vomika 200 घेतल्या होत्या हे ते क्षणार्धात विसरले आणि त्यांची पाऊले आपसुकच वळाली " स्वादिष्ट मिसळ " च्या दिशेने.


आज खाणाऱ्याला खिलवणारा भेटला.  समासम संयोग जुळुनी आला. ज्या तन्मयतेने, आनंदाने मनापासुन श्री. मंदार  जोशी नादमयतेने मिसळ बनवत होते, जणु रंगमंचावर आपल्या कलेचे प्रगटीकरण करणारा एखाद्या कलावंत की जरीची साडी, त्यावरचे भरतकाम विणणारा विणकरी व त्याचे ते हात?  

त्याच आपुलकीने , प्रेमाने , नजाकतीने ते रसीकांना मिसळ खाऊ घालत होते की बस रे बस.

दिल खुष हुआ.

"पुणेरी मिसळ खाणार की कोल्हापुरी ? "

या मधे राजाभाऊंनी कमी तिखट असलेल्या पुणेरी मिसळीची निवड केली.
चटकदार, मटकदार, जशी हवी अगदी तशीच मिसळ. मग श्री. मंदार जोशींशी झालेल्या संभाषणात त्यानी मिसळचे मर्मस्थान, त्यातली घराणी, खाणाऱ्याची, बनवणाऱ्याची मानसीकता,प्रादेशिकता,  आवडनिवड, मिसळ बनवण्याची कला, शास्त्र, आदी बाबी उलगडुन सांगीतल्या.

आता गुरवारी वसंत व्याख्यानमालेत डॉ. मीना प्रभुंना ऐकायला जायचे आहे त्यावेळी "कोल्हापुरी मिसळ " हा काय प्रकार असतो हे जाणुन घ्यायला हवे.


No comments: