Monday, February 22, 2010

श्री. वीरकर यांचे फुड पॉईंट - विलेपार्ले.

हं.

राजाभाऊंनी तृप्ततेनी हुंकार भरला.

आहे खरा छान हा बटाटावडा, अस्सल. उत्तम चवीचा, दर्जेदार. चवीला काहीसा वेगळा. खास मराठीमोळा वडापाव.



मजा आली.

विलेपार्लेच्या भ्रमंतीत नवीनवी ठिकाणे गवसत आहेत. सुभाष रस्तावरच्या या "फुड पॉईंट" ची नोंद तशी चालतांना झाली होतीच. येथे आज खाद्ययोग जुळुन आला.



मध्यंतरी एका उपाहारगॄहात मिळणाऱ्या बटाटावड्यांबाबतीत लिहितांना राजाभाऊंच्या हाती अतिशयोक्ती अलंकाराचा काही प्रमाणात का होईना पण उपयोग केल्याचे ते आता प्रांजळपणाने कबुल करतात. अनेक ठिकाणाचे अगदी गाडीवरील सेना पुरस्कृत ते रमाकांत, वडखळच्या नाक्यापासुन दत्तगुरु पर्यंत, दिवाडकर, जोशी वडेवाले, रोहित वडेवाले, कुटुंबसखी, तांबे, विनय, आराम,लाडु सम्राट, मामा काणॆ, एम.एम.मिठाईवाला, छबिलदास, (आणि बायकोच्या हातचा देखिल ) अनेक अनेक ठिकाणचे वडापाव त्यांच्या पोटात रिचवले गेले. पण या "वड्याचे" पाणी काही वेगळॆच.

अपवाद मात्र दिवेआगारला समुद्रकिनाऱ्यावर जातांना एका घराबाहेर लावलेल्या गाडीवरील बटाटावड्याचा. काय पात्तळ आवरण होते त्याचे, तोंडात सारल्यावर जणु तो वितळतच होता. ). फुड पॉईंट मधे अगदी असाच पातळ आवरण असणारा, जरासुद्धा तेलकट नसणारा असा हा वडापाव खाल्ला नंतर वाटु लागले की जणु राजाभाऊंनी आतापर्यंत  दुधाची चव घेतली नसावी व पाण्यात कालवलेल्या पिठालाच ते दुध समजत असावेत.

तर मग " ते गृहस्थ कोथींबीर वडी का काय तरी म्हणत होते." पुढे रस्ताला लागलेल्या राजाभाऊंना अचानक आठवले व एका अनामिक ओढीने ते माघारी फिरले, ते परतले कोथांबीर वडी खाण्यासाठी.


नवरात्र. मुंबईला महालक्ष्मी मंदिराशी भरलेली जत्रा. देवीच्या दर्शनाला जाण्यापेक्षा जास्त आकर्षण असेल तर ते जत्रेचे आणि देवळामागल्या समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलात मिळणाऱ्या गरमागरम मुगडाळ भजीचे , त्या घाण्याचे व त्या भजीसोबत मिळणाऱ्या आंबटगोड चिंचेची चटणीचे.

बाल्य हरपले, जत्राही सुटली, मागे राहिली ती केवळ चव. मनाच्या गाभाऱ्यात खोलवर आत कुठेतरी कोपऱ्यात दडुन राहिलेली. संधी मिळतात झटदिशी मेंदुला संदेश देण्यासाठी.


"कोथींबीर वडी आत्ताच संपली, मुगडाळ भजी  देवु का ? " या एका प्रश्नाने भुतकाळात गेलेले राजाभाऊंचे मन परत जाग्यावर आले , ते समोर आलेल्या गरमागरम मुगडाळ भजी चा आस्वाद लुटण्यासाठी.




"कोणी तिथे मिसळीची ऑर्डर दिली ?"

आता पुढल्या भेटीत काय खायचे याबद्दल आत्ताच ठरावयाचे ?

रे मनवा काहे को.





No comments: