Wednesday, September 30, 2009

यांचा जांबाज खेळ होतो पण मुक्या प्राण्याचा जीव जातो


पशु, पक्षी , जलाचर कोणासाठी खाण्याच्या उपभोग्य वस्तु तर कोणासाठी खेळण्याच्या .


कलर चॅनल , खतरों का खिलाडी नामक मालिका, सुत्रधार सिनेअभिनेता अक्षय कुमार.


पोहोण्याच्या तलावात मुस्कट आवळलेल्या (तोंड बांधलेल्या ) लहान सुसरी सोडलेल्या. त्या तलावात जिगरबाज (? ) खेळाडुनी उड्या टाकायच्या , असहाय सुसरींच्यी शेपट्या पकडुन त्यांना बाहेर काढायच्या व तलावाबाहेर असलेल्या माणसाच्या हातात द्यायच्या मग तो माणुस तसेच त्यांच्या शेपट्या पकडुन त्यांना एका पेटीत ठेवणार. जो जास्त सुसरींना पकडॆल तो विजेता.


य अती उत्साही माणसांना काहीच दयामाया नाही का ?
मुक्या जनावरांशी चाललेला हा खेळ घ्रुणास्पद आहे. दुर्दैवी आहे.
अक्षयकुमारजी , आपल्या अंगात येवढी खुमखुमी असेल, शौर्य गाजवण्याची हौस असेल, आपली ताकद दाखण्याची मस्ती असेल तर त्या सुसरींचे तोंड उघडॆ ठेवा ,बांधुन ठेवु नकात आणि मग पाहिले तेवढ्या पाण्यात उड्या मारा.
असहाय्य प्राण्यापुढे कुठेले झालात तुम्ही खतरों का खिलाडी ?

कमीटमेंट म्हणजे कमीट्मेंट

आजच्या दिवशी राजाभाऊंच्या नशिबी दोनदा न्याहारी करणॆ आणि दोनदा सकाळाचे जेवण करणॆ लिहिले होते.

त्यांनी सहका़ऱ्यांना बाहेर उपहारगृहात जेवायला नेण्याचे आज कबुल केले होते. पण भुकेपोटी ते आपला वायदा विसरले व त्यांनी तडक कॅंटीन गाठले. भोजन जवळजवळ संपत आले असतांना त्यांचे सहकारी त्यांना शोधत आले.

मग काय त्यांना घेवुन ते फोर्ट मार्केट जवळील "उडपी बोर्डिंग " मधे दाक्षिणात्य फुल मिल्स खायला घेवुन गेले. तेथे परत जेवण झाले. कारण एकदा ठरले म्हणजे ठरले.

पण ते जेवण कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. सारे नाराज झाले. त्या सर्वांना "मॉडन हिंदु होम " मधे केळीच्या पानावर जेवायला जायचे होते. पण राजाभाऊ नविन काही तरी करत येथे घेवुन गेले.

शुभेच्छा पत्र


Tuesday, September 29, 2009

उंदीर आणि नाग

एक किस्सा वाचल्याचे आठवते.
एका निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराची तुलना नागाबरोबर केली गेली, तो नाग आहे, नागासारखा डुख ठेवेल, उलटेल, तुम्हाला डसेल, वगैरे.
पण त्याच्या परिणाम उलटा झाला. त्या प्रदेशात नागाला अत्यंत पुज्य मानतात, नागदेवतेची नित्यनेमाने पुजा केली जाते. आता प्रतिस्पधी उमेदवारानीच ज्याला "नाग देवता " ठरवले ती व्यक्ती प्रचंड बहुमताने निवडुन येणारच.
आता उंदीर म्हणजे ...

Monday, September 28, 2009

आईना-ए-गज़ल

ख़ामुशी से हज़ार ग़म सहना
कितना दुश्‍वार है ग़ज़ल कहना ।

आईना-ए-गज़ल - प्रत्येक गजलप्रेमीच्या संग्रही हा शब्दकोश असायलाच हवा, त्याला पर्याय नाही. नागपुरच्या डॉ. जरीना सानी व डॉ. विनय वाईकर यांनी अथक मेहनतीने बनवलेला.
आयुष्यात का कोण जाणे पण अनेक गोष्टी करायच्या उगीचच राहुन जातात, त्या गोष्टी अशक्यप्राय असतात, असाध्य असतात, फार महाग असतात, परवडण्यासारख्या नसतात असे ही नसते. पण राहून जातात हे मात्र खरे.
गेली १६ वर्षे राजभाऊ त्या पुस्तकाची झेरोक्स प्रत वापरत होते. पुस्तक आज घेवु, उद्या घेवु करताकरता १६ वर्षे सरली.
पण आज श्री. विवेक पटवर्धन यांच्या ब्लॉगवर http://vivek-uvaach.blogspot.com/2009/09/here-i-go-to-mall-again.html त्यांनी विकत घेतलेले पुस्तक पाहिले आणि राजाभाऊ तडक महंमद अली रस्ता वर पोचले.

किती हा फरक

"फॅबसिल्क " या मध्यंतरी भरलेल्या प्रदर्शनात ( ज्यामधे संपुर्ण देशातुन कारागीर त्यांच्या सहकारी सोसायटी मार्फत साड्या विकायला मुंबई मधे येतात ) राजाभाऊंनी आपल्याच बायकोसाठी "कोसा सिल्क " विकत घेतली. की. रुपये २५००/. आणि हिच साडी काल "त्या" ठिकाणी पाहिली की. रु. ४२६० /= ( साड्यांच्या दुकानात बायका जश्या किमतीत घासाघीस करतांना म्हणतात ना " वो उसके दुकान मे ऐसाच साडी देखा देड हजार मे और तुम क्या बोलताय , देने का है तो देव नाहीतर हम जाताय , या मधला हा प्रकार नव्हे )

या दुकानांचे प्रॉफिट मार्जीन किती असावे ? त्या करागीरांना किती पैसे मिळॅत असावे ?

फॅब इंडीया आणि मोशेज.

उत्तम दर्जेदार कपडे आणि ऑर्गनीक पदार्थ मिळणारे पण जरासे महागडेपणाकडे झुकलेले एक दुकान.

मोशेज - इस्त्रायल, टर्की, लेबनॅम, आदी देशातील खाद्यपदार्थ मिळणारे मुंबई मधील एक सर्वोत्तम दर्जाचे रेस्टारंट. पण भलतेच महागडे. http://www.moshes.in/
पण हे दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक छानसा संगम तयार होते.
कालाघोडा येथे फॅब इंडीया मधे मोशेज चे एक काउंटर आहे.
काल राजाभाऊ आणि त्यांच्या मुलगा तेथे खायला गेले होते.
दरवेळी ते येथे हमुस व पिट्टा ब्रेड मागवत असत पण काल त्यांच्या" Tapenade J, A spread made up of black and green olives, Italian sun dried tomato, oven roasted garlic, fresh basil and olive oil " मुलाने मागवले.
हा पदार्थ पहिल्यांदाच खाल्ला, चव काहीशी आवडॅली काहीशी नाही आवडली.

आजचे निर्माल्य उद्याचा कचरा


काळबादेवी


विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा.

राजाभाऊंचे वडील राजाभाऊंना म्हणाले, राजाभाऊ उठा आता, आज दसरा. कामाला लागा.

मग राजाभाऊ उठले, भुलेश्वरच्या फुलगल्लीत गेले, घराच्या दरवाज्यावर लावायला फुलाचे तोरण घेतले,

आपल्या यामाहाला तोरण घातले. घरी परततांना जिलेबीपापडी नास्तासाठी आणि नानाचौकामधील आदर्श दुग्धमंदिर मधे जावुन बासुंदी घेतली.

वर्षोनुवर्षे ते हेच या दिवशी करत आले आहेतSunday, September 27, 2009

"गोदीचा समुद्र "


"गोदीचा समुद्र " मुळ जपानी लेखक ताजिमा शिंजी - भाषांतर - उष:प्रभा पागे - वाचायला घेतलय.

"आमचं आभाळ आम्हाला द्या

द्या आम्हाला धरती

आमचा समुद्र आम्हाला द्या

जसा तो पुर्वी होता आमचाच "

गोदी , मत्सालयातील एक महाकाय कासव, बंदीवासात सतत अश्रु ढाळत राहिलेले, याद येते आहे तो समुद्र, ते खुला आसमान, तो निसर्ग, ते मुक्तपणे पोहणे.

गोदी माणसांना त्याला समुद्रात परत सोडायला लावायला भाग पाडतो,

पण,

आता तो समुद्र त्यांचा राहिलेला नाही, तो तर मानवाने केव्हाच प्रदुषीत करुन टाकला आहे, त्या पाण्यात त्याला श्वास सुद्धा घेता येत नाही आहे, आणि त्या समुद्रामधली त्याच्या आठवणीतील जलचार, प्राणीसृष्टी, ती तर केव्हाच नष्ट झाली आहे, उरली आहेते ती त्यांची कलेवरं

समुद्रातील सारी सारी जीवसृष्टी प्रदुषणामुळे नाश पावली आहे.

आता पुढे काय ?

कधीतरी


कधीतरी ही थंडाई प्यायला हवी

अनवाणी

आतापर्यंत या नवरात्रीत नऊ दिवस उपास करतात हे ठावुक होते, पण अनवाणी देखील चालतात हे मात्र माहीत नव्हते.

तेवढेच राहिले होते

उमेदवारावर गोळीबार करणे येवढेच या महाराष्ट्रात बाकी राहिले होते।

ती कसरही आता भरून काढली गेली ।

देवी अंबे माता

देवी माते , आम्हाला पक्षाचे तिकीट न मिळो, अपक्ष म्हणुनच मी निवडणुक लढो, त्यात खुप फायदा आहे .

२६०० कोटी आणि ५ कोटी

उत्तर प्रदेशमधे २६०० कोटी खर्च करुन एक उद्यान उभारायचे ठरवले तर केवढा मोठा गहजब उठला , केवढी टीका केली गेली, अगदी कोर्टापर्यंत प्रकरण गेले.

आता येवढे मोठे उद्यान उभारायचे म्हणजे कोटी मधे त्याचा खर्च आलाच.

साधे मुंबई मधे मरीन ड्राईव्ह वरील छोट्याश्या उड्डाण पुला खाली छोटुसे उद्यान उभारायला ५ कोटी खर्च येतो, तेव्हा २६०० कोटी म्हणजे त्या पुढे काहीच नाही।


Saturday, September 26, 2009

राजाभाऊ आज थोडक्यात बचावले, एकदा नव्हे दोनदा.

राजाभाऊ आज थोडक्यात बचावले, एकदा नव्हे दोनदा.

बस पकडतांना बस सुरु झाली, पायरी वर ठेवत असलेला दुसरा पाय सटकला, व ते खाली पडले, दोन्ही हात बसच्या दांड्याला धरलेले, चालत्या बस बरोबर फरफट.
नशीब जास्त मार लागला नाही। मुका मार आता जाणवु लागला आहे.


रात्री ते व त्यांची बायको शिवाजी पार्क वरुन टॅक्सीने येत असता, फिनीक्स मिल समोरील उड्डाण पुलावर मागुन भरधाव वेगात येणाऱ्या एका गाडीने त्यांची टॅक्सी जवळजवळ उडवलीच होती, मोठ्या मुश्कीलीने चालकाने ती कंट्रोल केली. नाहीतर ती पुलावर चांगलीच धडकली असती.

आता परत रात्री घराबाहेर पडायला नको।

दुर्गापुजा - बंगाल क्लब , शिवाजी पार्क , मुंबई
काही काही वेळा


काही काही वेळा एखादी योजना फेल होते ।

दुर्गापुजा
गरीबाताला गरीब पण आपल्याला जमेल तसे उत्सव साजरे करत असतो।

संकृतीरक्षक गायब कुठे झाले ?


काही वर्षापुर्वी मिलींद सोमण व मधु सप्रे यांच्या एका जाहीरातीवरुन केवढे मोठी वादळ उठले होते.
पण आता काळ बदलला.

निवडणुक

राज्यात काय चालले आहे ? मुख्यमंत्रांच्या गाडी वर चप्पलफेक, चिखलफेक, दगडफेक होते , माजी मुख्यमंत्रांच्या घरात घुसून मोडतोड केली जाते ।
यंदाच्या निवडणुकीत एकंदरीत सर्वच घृणास्पद, उबक आणणारया गोष्टी चालल्या आहेत।
जागापाटपाचा महाघोळ, असंतुष्टांची बंडाखोरी, माघारी , बंड, पक्ष बदलणे , हाणामारया , सारे असह्य झाले आहे।
आणि हे असे महाभाग आमच्या वर राज्य करणार ।
ठरवले आहे , यंदा या प्रस्तापितांपैकी कोणालाही चुकुनही मत द्यायचे नाही।
नवा पक्ष , नवीन तरुण उमेदवार यांनाच संधी द्यायची .

मराठी - १

तुम्ही मराठी , तुमचे माजी आमदार मराठी, त्यांचा पक्ष मराठी ।

पण

Friday, September 25, 2009

दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार उघड

दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार उघड.

तुझ्या दारी सारे नाराज, असंतुष्ट, बंडखोर, बंडोबा, थंडोबा, निष्ठावंत, मवाळ, जहाल, तिकिट मिळालेले, न मिळालेले, नेते, त्यांचे सल्लागार, हितचिंतक, त्यांची तिकिटोउत्सुक मुले, मुली, बायको, नवरा, भाऊ, बहीण, काका, मामा, जावयी, सुना, गाववाले, जातवाले, भावकीवाले आले आहेत .
दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार उघड .

आई भवानी तुझा "सदा" "आदेश" यावा
आम्हाला निवडुन देण्याचा कळपाचा "मनसे" विचार व्हावा
खुर्चीचे आम्ही भुकेले, पैशाचे आम्ही लालची.

दार उघड बये दार उघड , सत्तेचे आम्हास दार उघड.

आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही सत्तेचे गोंधळी ,
आम्ही कोटी कोटीचे "माल"करी
आमदारकी आम्हास मिळो ,
आणखीन माया आम्ही जमा करो
तेव्हा बये आता वाट कसली पहातेस
राज्यात गोंधळ घालण्याची आम्हा संधी दे.
दार उघड बये दार उघड. तिजोरीचे आम्हास दार उघड.

तुला सोन्याचे दागीने वाहु, तुझे देऊळ सोन्याने मढवु.
तुला आम्ही हे वाहु , तुला आम्ही ते वाहु.
आमचा अंत नको पाहु
फक्त तु सत्तेचे दार उघड, आणि मग पाच वर्षे गंमत बघ
दार उघड बये दार उघड.

Thursday, September 24, 2009

सीयावर रामचंद्र की जय


नवरात्र आली की गिरगाव चौपाटी वर "रामलीला " सुरु होते.

पण सबंध आयुष्यात तेथे एकदा तरी जावुन पाहाणे झालेले नाही

ललिता पंचमी आणि छोले भतुरा


ललिता पंचमीच्या दिवशी राजाभाऊ चांगलेच दुखावले गेले होते.


मग त्यांनी रात्री आपले दु:ख गिरगाव चौपाटी वरील "क्रीम सेंटर " मधे जावुन चना मसाला व भतुऱ्यामधे बुडवले.


गेली चाळीसएक वर्षे ते येथे हीच एकमेव डिश खात असावे

Wednesday, September 23, 2009

द बे व्यु आणि ललिता पंचमी

आधीच "द बे व्यु , हॉटेल मरीन प्लाझा " व तिथला बुफे राजाभाऊंचा जिव्हाळ्याचा विषय, त्यात आजच्या " ललिता पंचमी " या ख़ास दिवशी त्यांना तेथे जायला मिळावे ।
राजाभाऊंच्या आवडीच्या ठिक़ाणामधे याचा क्रम फार वरचा लागतो। एक तर बुफे मधले चविष्ट खाद्यपदार्थ, त्यात घर व कार्यालय दोन्ही जवळ असल्यामुळे जाणे सोईस्कर आणि एकाचेच तर एकाचेच वेड हा त्यांच्या स्वभाव असल्यामुळे येथे जाणे तसे बऱ्याच वेळा होते.

समोर पसरल्या अथांग महासागरचे दृष्य पहात आत मधे बुफे मधल्या त्याच सागराप्रमाणे अनंत असणाऱ्या चविष्ट खाद्यप्रदार्थाचा रमतगमत आस्वाद घेणे या सारखे सुख नसावे। (एकदा तर त्यांनी जवळजवळ तीन तास या साऱ्यचा उपभोग घेतला।)

मध्यंतरी याचा दर्जा जरासा खालावल्याचा त्यांना संशय आल्यामुळे त्यांचा स्वभाव खट्टु झाला होता, पण गेल्या महिन्यात तेथे गेले असता एक सुखद धक्का बसला। बुफेचे संपुर्ण रुप पालटले होते, बराच रुचकर बदल झाला होता.

कारल्याचे लोणचे

श्रावणातला खासा बेत , आंबेमोहराचा मऊसूत भात , वरण आणि लिंबाचे गोड लोणचे , आणि ते ही केळीच्या पानावर ।

एक मिनीट राजाभाऊ , मला सांगा गोव्याकडे लोणची फार चांगली मिळतात काय ?

का हो ?

नाही म्हणजे मासळी बरोबर लोणचे म्हणजे ज़रा , कसेतरी वाटते

अहो, मासळीचे, कोलांबीचे पण लोणचे घालतात की

तरीच .......

Tuesday, September 22, 2009

कधीतरी धाडस दाखवा

धावत्या ट्रेन मधुन काही मुठभर समाजकंटॅक एका तरुणाला माराहाण करुन चालत्या गाडीतुन बाहेर फेकुन देतात आणि डब्यातले १२५ प्रवासी तो तमाशा बेशरमपणे पहात बसतात।


त्या तरुणाच्या मृत्याला हे मुकपणे बघणारे देखील तेवढेच जबाबदार आहेत.

नशीब

कधी कधी राजाभाऊंना एक प्रश्न पडतो, माणसाचे जसे नशीब असते , तसेच देव, देवळांचे पण असते काय ?

या नवरात्रीच्या दिवसात मुंबादेवी, महालक्ष्मी या देवींचे दर्शन घ्यायला भावीकांची अफाट गर्दी असते।

पण मुंबई मधे आणखीन देवींची पुरातन , प्राचीन मंदिरे आहेत त्यांच्याकडे फारशी गर्दी नसते।

काळबादेवी, गावदेवी, शितालादेवी, प्रभादेवी ।

धारावी येथे देखील एक मंदिर आहे ( देवीचे नाव आठवत नाही )।

असे का ?

कॅटल क्लास

हा कॅटल क्लास पुर्वीच्या काळी रेल्वे मधुन थर्ड क्लास ने प्रवास करायचा. मायबाप सरकारला त्याची दया आली व त्यांच्या दर्जा वाढवण्याचे त्याने ठरवले. थर्ड क्लास चे डबे काढुन टाकले व सरसकट सेकंड क्लास करुन टाकला.

या क्लास बद्द्ल कोठेतरी वाचल्याचे आठवते। त्या काळात गावांमधे सर्वीस मोटार ची वाहतुक चाले. बहुतेक सर्व गाड्या खटाराच असत. तिकीटाचे दर क्लास प्रमाणे. चढणावर त्या हमखास दगा देत. मग फस्ट क्लास वाले त्या गाडी मधे बसुन रहात. सेकंड वाले खाली उतरुन गाडी मागोमाग चालत रहात व थर्ड क्लास वाल्यांनी गाडी ढकलत वर चढवावी लागे.

विमानात काय करावे लागेल ?

Monday, September 21, 2009

अशी गाढ निद्रा सर्वांना लाभावी


वध


पुण्यामधे एक विलक्षण देखणे रंगावाली प्रदर्शन भरले आहे। सुप्रसिद्ध रंगवालीकार श्री जगदीश चव्हाण यांनी "वध " हा विषय घेऊन नीती - अनीती संघर्षातुन विजयश्री मिळवणारया आदर्श महामानावांच्या जीवन प्रसंगावर आधारित ।

कलानिकेतन भरतनाट्यम नृत्यसंस्थातीन दिवस लागुन सुट्या आल्यामुळे राजाभाऊंचा एक चांगला लाभ झाला , त्यांना काल टिळक स्मारकात औंधच्या "कलानिकेतन भरतनाट्यम नृत्यसंस्था " आयोजीत एका भरतनाट्यमच्या अप्रतीम कार्यक्रमास जाता आले।

आधी " पोटोबा "
कोठे काय चांगले खायला मिळते काय याच्या कड़े तसे राजाभाऊंचे बारकाईने लक्ष ।

काल रात्री कोथरुडच्या परिसरात भटकतांना त्यांचे लक्ष एका उपाहारगृहाच्या नावाने वेधुन घेतले , पहाताक्षणी ते नाव आवडले व त्यांनी तिथे जेवणाचा बेत आखला । खर म्हणजे काही वेळापुर्वीच त्यांनी लक्ष्मी रोडवरील "जनसेवा दुग्धालायात" तिखट सांजा, वटाण्याच्या करंजा , व बटाटे वडा हाणला होता , पण या "पोटोबा " पुढे त्यांचा नाईलाज झाला।

राजाभाऊंनी भरली वांगी व भाकरी मागवली तर त्यांच्या बायकोने मसाला पाव व तवा पुलाव ।

पुढच्या वेळीस आता येथे वांग्याचे भरीत , पिठले भाकरी खायला यायचे असे ठरवत ते निघाले ।

पोटोबा, करिश्मा , दशभुजा गणपती जवळ, पुणे।

ब्लंडर

परवाला राजाभाऊंनी आपल्या आयुष्यातली एक फार मोठी चुक केलीएका रुग्णासमोर त्याच प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या आईस किती गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या होत्या तिची अवस्था कशी अतिशय गंभीर झाली होती, तिला कोणत्या कोणत्या परीस्थितीतुन जायला लागले होते, याची सविस्तर अनाहूतपणे माहिती पुरवत गेले

त्यांच्या कडून , ज्यांना रुग्ण आणि रुग्णालयाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांच्या कडून हे वर्तन अपेक्षीत नव्हते

Sunday, September 20, 2009

आधुनीक रामायण

या युगात आपल्याला सिंहासन नव्हे तिकीट मिळावे म्हणुन भरतालाच वनवासात पाठवले गेले।
पण काय हो राजाभाऊ पुढे काय ?

Friday, September 11, 2009

बीना दोष के हे निर्मोही काहे रुठ गया रे .... मेरी दशा दिखलाने को दो नैन मेरे ले जारे रे

लता, लता आणि लता।
पुरती वाट लागुन राहीली आहे, लताच्या मोहमयी आवाजाच्या मखमली जाळ्यात सापडल्याची सुटका नाही। सतत गाणी ऐकत राहील्यावर ती जी मनावर आघात करत रहातात त्या पासुन सुटका करुन घेण्यासाठी एकच उपाय, आणखीन आणखीन लताची गाणी ऐकत रहावे.


त्यात परत श्री. राजु भारतननी लिहिलेले लतावरचे पुस्तक वाचायला घेतले आहे.

काय, यु ट्युब वर लोकांनी लताची गाणी टाकली आहेत। मानले बुवा त्यांना.


वफा चित्रपटातील " कागा रे जा रे जारे मोरे पीयाका संदेशवा ला रे लारे " हे एक अप्रतीम गाणे http://www.youtube.com/user/IMIRZA777

यांच्या साईट वर सापडले.ह्त्त्प्वww।youtube.com/watch?v=HmtSeNtEZZQ
संगीत विनोद यांनी दिलय.

Tuesday, September 08, 2009

कॅफे म्हैसुर, माटुंगा.

तिकडे दिल्लीत एका राजकीय पक्षात "सेंटर ऑफ पॉवर" बदलण्याच्या हालचाली जोरात सुरु होत्या आणि येथे मुंबई मधे राजाभाऊंनी क्षणमात्रही दुसरा विचार न करता त्वरीत " सेंटर ऑफ फुड " बदलुन टाकले.

बऱ्याच वेळा आपण आयुष्यात एखादी गोष्ट आधी का केलेली नसते याला उत्तर मिळणे कठीण असते.
माटुंग्याला "रामाश्रय" मधे रविवारी सकाळी न्याहारीस जाणे हा इतक्या वर्षाचा शिरस्ता , पण हल्ली तेथे खुप गर्दी व्हायला लागली आहे. एका विशिष्ट वर्गाची तेथे मक्तेदारी होत चालली आहे।

भल्या सकाळी "त्यांची" गर्दी बघुन राजाभाऊ चांगलेच वैतागले व त्वरीत त्यांनी आपल्या आवडीचे उपहारगृह बदलण्याचा निर्णॅय घेतला व ते शंकर मठाजवळील "मणीज " मधे इडली, डोसे खाण्यासाठी गेले।

पण


येथे खाल्याने त्यांना तसे समाधान मिळाले नाही. मग ते बायकोला घेवुन "कॅफे म्हैसुर मधे गेले, "नीर डोसा, कोकोनट शेवया खाण्यासाठी "

आणि मग ठरले आता " सेंटर ऑफ फुड " हेच " कॅफे म्हैसुर "

नोकरीत बढती ?

आता पर्यंत चमचेगिरी ते अंगीभुत कौशल्याने, मेहनतीने आदी नोकरीत बढती मिळण्याचे अनेक मार्ग माहित होते।

पण आज नवीन मार्ग वाचनात आला. माणसांना ठार मारण्याचा.

दुर्दैव आपले.

Sunday, September 06, 2009

समांतर

आयुष्य जगायचा कंटाळा येतो हे मात्र खरे ।

Saturday, September 05, 2009

गणपती बाप्पा मोरया , पुढल्या वर्षी लवकर या

द कोर्टयार्ड बाय मँरीयेट - पुणे - The Courtyard by Marriott .

श्री. शंतनु घोष यांनी सांगावे, राजाभाऊंनी ते ऐकावे, त्यांनी लिहावे अमुक तमुक ठिकाणी फार चांगले जेवण मिळते, तेथे तिथे, राजाभाऊंनी आपल्या बायकोला घेवुन जेवायला जावे.

गेले काही दिवस त्यांची बैचैंनी फार वाढली होती. " The Courtyard by Marriott , Pune "याबद्दल वाचल्यानंतर कधी येकदा तेथे बुफे जेवायला जातो असे झाले होते, तो योग अखेर आज जुळुन आला. पुण्यामधे आतापर्यंत झालेल्या भटकंतीमधे येथला बुफे उत्तम, सर्वोत्तम, सर्वोकृष्ट अहे असे त्यांचे प्रामाणीक मत झाले आहे. आणि गंमत म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच त्यांचे व त्यांच्या बायकोचे एकमत झाले असावे.

त्यात त्यांचा कॅमेरा नादुरुस्त झाला असल्याने त्यांचा बायकोला आणखीनच आनंद झाला, आपला नवरा आता फोटो काढत येथे तिथे न फिरता आता आपल्यासमवेत शांतपणे जेवण जेवेल याचा.

सुरवातीलाच टॉमेटो बेसील सुपनीच त्यांचे दिल काबीज केले, असे सुप , कधी मिळालेच नव्हते. मग सॅलॅडस वर जो काय ताव मारला बोलायची सोय नाही.

अश्या ठिकाणी भाज्यांचा नुसदाच आस्वाद घ्यावा, त्या सोबत रोट्या खात बसु नये, त्याने पोट भरते हा त्यांचा सिद्धांत. भाज्या जवळपास ७-८ असाव्यात, सर्वच चविला अप्रतीम.

पोट २/३ रिकामे ठेवायचे असते ते डेसर्टॅस साठी. राजाभाऊंनी आज डेसर्टॅसना उचीत न्याय दिला.

आणि सर्वांत त्यांचे मन जिंकले ते तेथल्या कर्मचारीवर्गांने. येवढी त्यांची उत्तम सरबाई केली की बास रे बास.

आता पुढची भेट येथे पुढच्या महिन्यात , त्यांच्या जन्मदिवशी.

Wednesday, September 02, 2009

पडदा उघडा पडदा

सार्वजनीक गणेशोत्सव मंडळांनी भल्यामोठाल्या उंच उंच श्री गणेशाच्या मुर्त्यांची स्थापना मंडपात करावी, मग तो मंडप तिन्ही बाजुनी झाकुन घ्यावा, समोरच्या दर्शनी बाजुस पडदा लावुन तो बंद करावा.

मग श्रींचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी लांबलचक रांगा लावाव्यात, तासनतास एकाच मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी ताटकळत उभे रहावे, मुठभर बिनडोक कार्यकर्त्यांनी, बालगोपाळांनी, आपल्या मर्जीनुसार, लहरीनुसार रांगेचे नियंत्रण करावे, आपल्या मंडपासमोर भलीमोठी रांग लागली आहे, यात धन्यता मानत.

आता आपलेच मंडळ सर्वाधीक लोकप्रिय असा गोड गैरसमज करु घ्यावा, लोकांचा वेळ, श्रम, त्रास, शारीरीक कष्ट, सोय यांना तुच्छ लेखावे, मागील दाराने खास प्रवेशा साठी पासेस ची विक्री करावी, त्यात पैसा कमवावा. संपुर्ण दिवस भक्तांनी रांगेत केवळ आपल्याच मंडळाच्या गणपतीचेच दर्शन घेण्यात घालवला पाहीजे असा अट्टाहास करावा.

दादांनो, पडदा उघडा पडदा. द्या घेवुन दर्शन भाविकांना मुक्त हस्ते, झटपट, त्यांना बऱ्याच गणेशमुर्तींचे दर्शन घ्यायचे असते हे ध्यानी बाळगा, जरासा विवेक दाखवा, पैसे कमवायला,

आपली मनमानी करायला इतर बरेच मार्ग आहेत की.