Wednesday, September 02, 2009

पडदा उघडा पडदा

सार्वजनीक गणेशोत्सव मंडळांनी भल्यामोठाल्या उंच उंच श्री गणेशाच्या मुर्त्यांची स्थापना मंडपात करावी, मग तो मंडप तिन्ही बाजुनी झाकुन घ्यावा, समोरच्या दर्शनी बाजुस पडदा लावुन तो बंद करावा.

मग श्रींचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी लांबलचक रांगा लावाव्यात, तासनतास एकाच मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी ताटकळत उभे रहावे, मुठभर बिनडोक कार्यकर्त्यांनी, बालगोपाळांनी, आपल्या मर्जीनुसार, लहरीनुसार रांगेचे नियंत्रण करावे, आपल्या मंडपासमोर भलीमोठी रांग लागली आहे, यात धन्यता मानत.

आता आपलेच मंडळ सर्वाधीक लोकप्रिय असा गोड गैरसमज करु घ्यावा, लोकांचा वेळ, श्रम, त्रास, शारीरीक कष्ट, सोय यांना तुच्छ लेखावे, मागील दाराने खास प्रवेशा साठी पासेस ची विक्री करावी, त्यात पैसा कमवावा. संपुर्ण दिवस भक्तांनी रांगेत केवळ आपल्याच मंडळाच्या गणपतीचेच दर्शन घेण्यात घालवला पाहीजे असा अट्टाहास करावा.

दादांनो, पडदा उघडा पडदा. द्या घेवुन दर्शन भाविकांना मुक्त हस्ते, झटपट, त्यांना बऱ्याच गणेशमुर्तींचे दर्शन घ्यायचे असते हे ध्यानी बाळगा, जरासा विवेक दाखवा, पैसे कमवायला,

आपली मनमानी करायला इतर बरेच मार्ग आहेत की.

1 comment:

Narendra Damle, words to speak and a heart to listen said...

अरे देवा, मीसुद्धा भांबावलोय तुमच्या रांगा पाहून. अहो मी सगळीकडेच असतो मग कशाला रांगा लावून स्वतःचाच वेळ खर्ची पाडता ?! तुम्ही रांगा लावल्यावर त्यावर पोळी भाजली कोणी तर त्यात त्यांची काय चुकी!
त्यापेक्षा असं करा . . असल्या जागी डोळे बंद करा, मिटल्या ओठांवर थोडे हसू आणा, शेजारच्या बाळाचा पापा घ्या . . मग बघा माझॆ दर्शन होते की नाही ते . . अगदी असल्या बसल्या जागीच !

- गणेश