Thursday, November 25, 2010

अश्या या ...

राजाभाऊंना अचानक काय झाले ठावुक नाही, कधी नाही ते राजाभाऊ नल्लीमधे आपल्या बायकोसाठी ड्रेस मटेरीयल आणायला गेले.

विक्रेती अगदीच नवशिकी. रडतरखडत जे काही कपडॆ दाखवले त्यातला एक घेतल्यानंतर मग राजाभाऊंची नजर एका छानश्या साडीकडॆ गेली, बघताक्षणी ती एवढी आवडली की घेण्याचा मोह आवरता आवरेना. त्यांना ती दाखवण्यासाठी सांगितले. 
मॅडम म्हणाल्या " ती साडी आहे " ( काय माम्म्या आहे. एवढे सुद्धा या माणसाला कळत नाही ?).

झालं  , राजाभाऊ पुढे काहीही न बोलता, ती साडी न घेता बाहेर पडले.

पुण्यातील कुमठेकर रस्तावरील एक साड्यांचे दुकान. 

"पैठण्या दाखवा. "

 "कसली पाहिजी ? कॉटनची की सिल्कची ?

कॉटन ? सिल्क ?

"दाखवा दोन्ही "
"गढवालची पैठणी चालेल "

तरी बायको म्हणत होती या दुकानात नको म्हणुन.

पु.ना.गाडगीळांचे दुकान. दसरा सण , आनंदा नाही तोटा.

राजाभाऊंना अंगठी घेण्याचे मनात होते, (स्वतःसाठी, रमेश वांजळे भाऊंनंतर राजाभाऊ की काय ? 

दुकानात ही तोबा गर्दी, मुंबईमधल्या लोकल ट्रेनच्या डब्यात ऐन सकाळी देखिल त्यापेक्षा कमी खच्चुन माणसे भरलेली असतील )

" मला एक अंगठी हवीयं, साधी, सरळ, एकदम सिंपल, माझ्या सारखीच "

"एक मिनीट "

जशी हवी तशी, अगदी योग्य मापाची अंगठी त्यांच्या पुढे आली.

जर कर्मचाऱ्यांना ग्राहकांबरोबर कसे वागावे हे शिकवले गेले नाही तर .....  


Tuesday, November 23, 2010

वाई ते भोर - मांढरदेव मार्गे

राजाभाऊंचे पुर्वज नक्कीच भोर मधे रहात असावे व त्यांनी आपल्या वाड्यात गुप्तधन पुरलेले असावे , जे राजाभाऊंनी वारंवार, बारबार लगातार भोर मधे खेचुन घेत असावे असा त्यांना दाट संशय आहे. आणि आल्यामार्गे परत कधी परतु नये, परतांना वेगळा मार्ग धरावा हा राजाभाऊंचा विचार.

मांढरदेवच्या डोंगरात, पठारावर केवळ काळुबाईच्या दर्शनाला जायचे असेल तरच जावे असे कुणीतरी कोठेतरी लिहुन ठेवले आहे काय ?

वाईवरुन परतांना ह्या मार्गे आपण परत पुण्याला जावु असा त्यांनी विचार केला व त्या प्रमाणॆ ते तडक सुटले. गेल्या खेपेस राजाभाऊ भोरकडुन मांढरदेवच्या पठारावर चढले होते, या टोकापासुन ते त्या टोकापर्यंत्चे सारे पठार पालथे घातल्यानंतरही त्यांचे समाधान म्हणुन काही झाले नव्हते आणि त्यावेळी वाईकडे खाली उतरण्याचा बेत वेळेअभावी रद्द करावा लागला होता.  तसेच खालच्या दऱ्यांमधे ,पठारावरती आच्छादलेल्या ढगांमुळे तसे काहीसे निसर्गावलोकन बाकी राहीले होते.

या डोंगराची  उंची चांगलीच  आहे, वाईकडुन चढ चढ चढणारा घाट रस्ता उत्तम, अंमळ वेळ लागतो हे खरे , वर चढतांना आजुबाजुची शोभा बघण्यासाठी मधेमधे थांबावे लागते., मग वर घाटमाथ्यावर गेल्यानंतर मधल्या टप्पात दोन्ही बाजुला दऱ्या व मधे असणारा रस्ता , असे द्रुष्य दुसरीकडे पहाणे नाही.

हा सारा परिसर चवीचवीने उपभोगावा. वाटल्यास वर जरुर रहावे. रहाण्याची व जेवणाची सोय आहे

वाटेवरती

नेमके याच वेळी कॅमेऱ्यामधल्या दोन्ही बॅटऱ्या फुस्स व्हाव्यात ?


कृष्णा व्हिला - पाचगणी

शनिवार उजाडला. राजाभाऊंच्या बायकोने या वेळी राजाभाऊंचा श्रावणबाळ करायचा ठरवला.
आदल्या रात्री घोर वादळात गाडी चालवुन दमलेल्या राजाभाऊंच्या मनात या वेळी अंमळ विश्रांती घ्यायचे ठरत होतं. हे तिने बहुदा जाणले असावे, मग " मी काही म्हणतं नाही हो, त्यांची इच्छा आहे  , नाहीतरी काय तिथे जावुन आरामच करायचा आहे " असे करत मॅडमनी  राजाभाऊंनी प्रवृत केले पाचगणीस जाण्यास.     

राजाभाऊंना ठावुक होतं आपण पाचगणीत  कुठे रहायचे.  अगदी निवांत, शांतपणॆ, जिथे महाबळॆश्वरचा कलकलाट नाही, गर्दी नाही, निरव शांतता, सुंदर लोकेशन,  मस्तपैकी रहाण्यास बंगल्याचा एक मोठा भाग. बाहेर मस्तपैकी बाग, गुलाब फुललेली आणि वरती "झुलवा मै बैठे आज पी के संग झुले ", मंद मंद सुगंधित शीतल चाललेल्या पवनाचा आनंद लुटत.

त्यात परत वर दुधात चांदणॆ, त्रिपुरी पोर्णिमा.




 

Monday, November 22, 2010

जाफरभाई यांची बिर्याणी पाचगणीमधे

आज पासुन अगदी अगदी तोंडावर ताबा ठेवायचा असा राजाभाऊंनी पक्का बेत केला रे केला की कोणीतरी तो हाणुन पाडलाच पाहिजे.

या वेळी त्यास कारणीभुत झाले त्यांचे पिताश्री.  जाफरभाईंकडॆ जावुन बिर्याणी खाण्याची  त्यांची इच्छा पाहुन राजाभाऊंनी त्यांचे मन मोडवेना.




एरवी मुंबईत जाफरभाई फारसे न रुचणारे राजाभाऊ पाचगणीमधे त्यांच्याकडे बिर्याणी खाल्यावर जबात, बहुतही लझीज करत बाहेर पडले.


नातु फार्म्स - वाई- इथेच थांबा, पोटभर खा आणि मार्गस्थ व्हा !

राजाभाऊ गाडी चालवत असतांना नाकासमोर न बघता आजुबाजुला बघत बघत, न्ह्याहाळत,  खुणगाठ बांधत, मनाशी काहीतरी ठरवत ठरवत नक्कीच चालवत असावे , नाहीतर पाचगणीला जातांना आता उद्या परततांना या नातु फार्म्स मधेच जेवायचे असे त्यांचे ठाम मत का झाले असते ?

राजाभाऊंच्या मुलाची इथे जेवणाची फारशी इच्छा नव्हती. त्याची कुरकुर चालली असता राजाभाऊंनी आयुष्यात पहिल्यांदाच " मी येथेच जेवणार, ज्याला जेवायचे असेल त्यांनी जेवावे नाही तर उपाशी रहावे " असे ठणकावुन सांगण्याचे धाडस केले.

त्याने सुद्धा जाणाले पाहिजे मॅकडॉनल्ड्स, पिझ्झा हट, डोमीनोज पलीकडचे जग फार चविष्ट, रुचकर आहे, डेरेदार आंब्याच्या खाली बसुन मोकळ्या वातावरणात जी जेवणात मजा आहे ती आणखी कशातही नाही.  

गरमागरम ज्वारीची भाकरी, पिठले, मिरचीचा ठेचा, भरली वांगी, मटकीची उसळ कोशींबीर आणि ताक. हा बेत पाहि्ल्यानंतर मग कदाचीत त्याला आपल्या बापाचे म्हणणे पटले असावे.




इथं रानफुले फुलतात आणि मुलंही बहरतात



पाचगणीच्या पठारावर सकाळी मजा आली.

याचसाठी केला होता अट्टाहास


कितीतरी वर्षे, देव जाणो, जीव नुसता तहानलेला होता, आसुसलेला होता, जीवाची नुसती  लाहीलाही होत होती. आता तो थंड झालायं.


अमृताहुनी गोड पाणी तुझ्या दारा, केशवराजा.

Thursday, November 18, 2010

पोट एक नारळपाणी तीन

आतापर्यंत वाटत होतं सर्वत्र मिळणारी शहाळी केवळ केरळातुनच येतात, कदाचित नारळपाण्याचा व्यवसाय करणारी मंडळी प्रामुख्याने केरळी असतात म्हणुन की काय . जसे कुठेही जा गाडीच्या टायरचे पंक्चर काढण्याच्या धंद्यात हीच लोक असतात. केरळची  शहाळी किती छान.

हा समज खोटा पडला तो ओझरला. गजाननाचे दर्शन झाल्यावर मग घश्याला कोरड फुटली, बाहेरील गरम वातावरणाची जाणीव  होवु लागली, समोरील दुकानामधली शहाळी खुणवु लागली.
ये की इकडॆ, पी मला,  पी म्हणतो ना. अरे .

मग काय ,  राजाभाऊंनी बाईंना सांगितले 
" एक शहाळे  द्या, कोवळी मलई ".
"अजुन एक द्या , कोवळी मलई हवी, 
अजुन एक द्या अशीच मलई हवी, खुसखुशीत, गोड.  

एका शहाळ्यातील चवदार पाणी प्याल्यांनतंर समाधान होण्याचे काय नाव नाही, मग, दुसरे, त्यानंतर तिसरे आणि मग अंतरात्मा तृप्त झाला, आता बस्स ( का बायकोने  डोळे वटारल्यामुळॆ व वाढत्या पोटाची जाणिव करुन दिल्यामुळे ? )  

बाई म्हणाल्या ही "’शहाळी इथलीच. "

वाटलं नव्हतो ओझरचे पाणी एवढे गोड असेल ते.

लवासाला जाणारे रस्ते

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात "लवासा " येवो जेणॆ करुन राज्यातील सर्व रस्ते कसे चकचकीत,  गुळगुळीत, खड्डॆविरहीत, सुळसुळीत होतील , पोटातील पाणी म्हणुन हलणार नाही.

पुण्यातील कानाकोपऱ्यात "नांदेड सिटी  " सारखे प्रकल्प उभे रहावेत, रस्ते कसे एकदम रुंद होवुन जातील. रस्तारस्तावर उड्डाणपुल होवुन जातील.

Tuesday, November 16, 2010

खतरनाक बुजगावकरीण


कल्पकतेला दाद द्यायला हवी. एकदम फुल्लनदेवीच जणु.

जेव्हा

जेव्हा सेंचुरी मारायला काट्याला फक्त एक चौका हवा असतो,
जेव्हा तुमच्या मापाचे तयार कपडॆ दुकानामधे मिळणे कठीण होत जाते आणि तुमचे जुने कपडॆ तुम्हाला होईनाशे होतात.
जेव्हा तुमच्याच्याने साध्यासाध्या हालचाली पण करवेनाश्या होतात.

राजाभाऊ.

कठीण आहे.

Sunday, November 14, 2010

जान कुर्बान.

गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, मऊसुद तांदळाची भाकरी, सोबत मिरचीचा ठेचा, लसणाची चटणी, कारळाची चटणी, आणखीन कसलीतरी चटणी बहुदा शेंगदाण्याची. जान कुर्बान. स्वःताच्याच शेतात पिकलेले धान्य, इकडे दळले, तिकडे चुलीवर त्याच्या गरमागरम भाकऱ्या करुन भुकेलेल्यांच्या ताटी वाढल्या. भुकेलेल्यांनी समाधानाने त्या रिचवल्या. बढिया. आणि मग तोंडी लावायला सोबत मलई कोफ्ता, पनीर मसाला, डाळ तडका आदी आदी.





खरं म्हणजे राजाभाऊंची आणि बाहेर गावी असलेल्या रस्तांलगतच्या हॉटेलांचे फारचे काही सख्य नाही.(बहुदा येथे दारु पिण्यासाठी येणाऱ्यांमुळे) तरी पण हडशीला श्री. सत्यसाई पांडुरंग क्षेत्राला जातांना सावरगाव मधील "हॉटेल निसर्ग" त्यांच्या नजरेत भरले होते, परततांना येथे जेवायला थांबावे केवळ याच हेतुने.

जेव्हा राजाभाऊंना कळाले की हे हॉटेल सुरु होवुन केवळ तीन दिवसच झाले आहेत तेव्हाच येथे फार चविष्ट जेवण मिळॆल याची त्यांनी खुणगाठ बांधली , आणि वरती त्यांच्या स्वच्छ , चकचकीत स्वयपाकघराकडॆ त्यांचे लक्ष गेल्यानंतर आपला हा समज खोटा पडणार नाही हे त्यांनी जाणले. अन्न तोंडी पडल्यानंतर कधीतरी आपल्याला वाटणारे खरं ठरु शकते याची त्यांना जाणिव झाली.

आणि वरती श्री. संजय ओवळ्यांचे अगत्यशील आतिथ्य.

और क्या चाहिये पेट के लिये.

गंमत म्हणजे राजाभाऊ निघाले होते ते लवासाला जाण्यासाठी. काय करणार, बालहट्ट व स्वःस्त्रीहट्ट. मग कदाचीत बहुदा नशिबी असलेल्या खाण्यानेच त्यांना हडशीकडे खेचुन घेतले असणार. ( येथे येवुन दारु पीत बसणाऱ्या लोकांमुळे "निसर्ग" चा माहोल न बिघडो असे राहुन राहुन वाटते.

एकच गोष्ट वाईट झाली, लवासाला पोचेपोचेपर्यंत अंधारुन यायला लागले होते. जणु घाटरस्ता, मुसळधार पाऊस आणि रात्रीचे त्यात गाडी चालवणॆ त्यांच्या मागेच लागलेले दिसते. लवासाला जास्त वेळ थांबणे त्यांच्याने अवघड होत गेले.

Friday, November 12, 2010

हर्णे बंदर

हर्णे बंदरावर समुद्रात केलेल्या मासेमारीचा होणारा हा लिलाव.

अप्रतिम कोकण आणि पुरती फाटणे.

पुरती फाटणे म्हणजे काय असते याचा आयुष्यातला पहिल्यादा अनुभव राजाभाऊंनी घेतला. दापोली वरुन पुण्याला वरंधा घाटातुन जातांना संध्याकाळ होवु लागली, अंधारुन यायला लागले, वरती चांगलाच पाऊस. टरकणे म्हणजे काय याची चांगलीच कल्पना त्या रात्री राजाभाऊंना आली. एक तर तीन दिवस सतत गाडी चालवुन चालवुन , एक घाट , एक घाटी, एक पाखाडी उतरुन दुसरी पाखाडी चढुन चढुन ते तसे कंटाळायला लागले होते. सर्वच रस्ता वेड्‍यावाकड्‍या वळणावळणाचा, सरळ रस्ता असा नाहीच.



आता पर्यंत आंबेत, मंडणगड, बाणकोट, वेळास, केळशी, आंजर्ले, पाडले, हर्णॆ, मुरुड ,आसुद, दापोली हा असा नयनरम्य प्रदेशातुन प्रवास करतांना त्यांना जी मजा वाटत होती ती हळुहळु कमी व्हायला लागली होती. भोरमार्गे येण्याचा त्यांचा निर्णय चुकला की काय असे वाटु लागले होते, रस्ता संपता संपत नव्हता, त्यात परत रस्तात फारशी वाहतुक नव्हती. पण पोचले ते एकदाचे सहीसलामत रात्री पुण्याला, सहीसलामत, सुखरुपपणे परतलो हे ऐकण्याच्या ऐवजी काय हळु हळु चाळीसच्या स्पीडनी गाडी चालवत होता हे ऐंकुन घेण्यासाठी.

सर्वांत राजाभाऊंना आवडला असेल तर तो आंजर्ले परीसर.
कड्‍यावरचा गणपती. आंजर्ले ते हर्णे रस्ता.
एका बाजुला सतत दिसणारे समुद्राचे रुप डोळ्यात साठवत साठवत , थांबत थांबत, हळुवारपणे गाडी चालवत, निसर्गाची मजा लुटत लुटत पठारावर चढत चढत यायचे, ते ही वळणावळण्याच्या रस्तावरुन. वा. झक्कास. दिल खुष हुवा. पाठीमागे दिसणारी आंजर्ल्याची खाडी, समोरील कड्‍यावरचे गणपतीचे देऊळ. पुढे हजारो सीगल्सनी दिलेले दर्शन . खरं तर त्यांना आंजर्ल्यात मुक्काम करायचा होता, पण रिपरीपत पडत रहाणाऱ्या पावसानी त्यांचा रसभंग केला.

सुरवातीला मंदणगड ते वेळास हा प्रवास करतांना ते हरखुन गेले होते. त्यांना त्यावेळी कुठे कल्पना होती की या पुढचा सारा प्रवास हा असाच मंत्रमुग्ध करुन सोडणार आहे. आत्त्ताचा हा परिसर आत्तापर्यंत गाडी चालवत आलेल्या रस्तापेक्षा सरस आहे असे वाटायला लागायचे तर पुढे सरकल्यावर दिसणारे , भान हरपुन लावणारे निसर्गाचे, रस्तांचे, जंगलांचे, आणि मुख्य म्हणजे सतत सोबतीस राहिलेल्या समुद्राचे रुप अधिक भावायला लावत होता.

खरं म्हणजे राजाभाऊंची पुढे लाडघर , दाभोळ, गुहागर पर्यंत जाण्याचा बेत होता, पण त्यांच्या खिश्यानी त्यांना मजबुर केले. नेहमी प्रमाणॆच दामाजी पंत त्यांच्यावर रुसलेले असतांना, पैशाचा दुष्काळ असतांना प्रवास करण्याचा ते विचारही करु शकत नव्हते. जाण्याची तर तीव्र इच्छा पण सगळाच खडखडाट. दिवाळीचे पार दिवाळे काढलेले. अश्यावेळी जगातील सर्वात मोठी बॅंकर त्यांच्या मदतीस आली. त्यांच्या आई.

खरचं, आयत्या वेळी ठरलेल्या प्रवासाची गोडी काही वेगळीच असते.

सकाळी निघायला जरा अंमळ उशीरच झाला. मग माटुंग्याला कुठेही न थांबता पहिला पडाव केला तो तारा मधील युसुफ मेहर अली सेंटर मधे , केवळ नास्तापाण्यासाठी गरमागरम बटाटे वड्‍यांवर आडवा हात मारण्यासाठी.

वाटेत कुठे जेवायला म्हणुन मिळाले नाही. मग ते बहुदा आंबेत जवळपास कुठेतरी घाटात असलेल्या देशमुख बागेत खाण्यासाठी थांबले. कोकणी माणसांचा स्वभाव कसा असतो ह्याची एक झलक राजाभाऊंना तेथे मिळाली, आपल्याला काय त्याचे ? आपल्याला राग हलवाईशी त्यांच्या मिसळीशी. थालीपिठाशी नाही, आंब्याच्या, श्रीखंडाच्या वड्‍यांशी नाही आणि आलेपाकाशी तर अजिबात नाही हे ते जाणुन होते. येथे बारामाही वहाणाऱ्या झऱ्याचे पाणी फार चवदार आहे आणि बागेचे लोकेशन ग्रेट. सिंपली मार्व्हलस.

कोकणातील टिपीकल घरामध्ये रहाण्याची हौस या वेळास मधे श्री.प्रकाश जोशी यांच्या घरी भागवली गेली. आणि चविष्ट साध्या ब्राम्हणी पद्धतीच्या जेवणानी तर बहारच आणली. आमटीभातावर आडवा हात मारणे म्हणजे काय हे राजाभाऊंनी त्या दिवशी चांगलेच जाणले. तरी संध्याकाळी खोबरे पेरलेल्या पोह्यांचा खातमा झाला होता.
राजाभाऊंच्या बायकोचे आजोबा बाणकोटची खाडी पोहुन पलिकडे आलेले, पुढे मुंबईला येण्यासाठी ( मुंबईला बाणकोटमार्गे येणारा प्रत्येक जण ही खाडी पोहतच ओलांडत असेल ? )
केळशीला श्री. विजय जोशी यांच्याकडॆ जेवणात ताटामधे वांगीबटाटा, मुगाची उसळ मिळणार व ते ही अर्ध्या पाऊण तासाच्या प्रतिक्षेनंतर म्हटल्यावर राजाभाऊंच्या मुलाचे पित्त खवळले, मग वादावादी भडकाभडकी. राजाभाऊंनी कसेबसे त्याला मनावले. ते स्वानुभावावरुन जाणुन होते बापाच्या साध्या साध्या बोलण्यावरुन राग येण्याचे, संतापायचे हे वय आणि माघार ही नेहमीच बापानेच घ्यायची असते. मग भरल्या पोटी सर्वांचीच डोकी जागेवर येत असतात.

आयुष्यभर आजंर्ल्यातील कड्‍यावरच्या गणपतीला जाण्याची राजाभाऊंनी इच्छा मनाशी बाळगली होती, ती या प्रवासात पुरी झाली. आणि देवदर्शनाबरोबर उत्तम, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ आंबापोळी, फणसपोळी खायला मिळाली, गणपती पावला.

हर्णेबंदरातील भरणारा बाजार , ती समुद्रातील पकडलेली मासळी, त्याचा लिलाव, कोळीणबाई, हे सारे संध्याकाळी पहायला मिळाले. होड्‍यांमधुन भरभरुन मासे बैलगाड्‍यांमधे उतरवले जाताहेत, किनाऱ्यावर त्यांचा लिलाव होतोय, गर्दीतील कोणीतरी सांकेतीक भाषेत बोली लावतोय.

मुरुडला त्यांना जेवायला मात्र काही खास मिळाले नाही, एक तर हे सारे गाव फार, अती कमर्शीयल झालेलं, येणारी टोळकीच्या टोळकी, दारु ढोसणे, पी पी पिणे, कर्कश गाण्यांवर वेडेवाकडॆ चाळॆ करत नाच नाच नाचणॆ व जेवणाचा केविलवाणा प्रयत्न करण्यार ओक ओक ओकण्यात धन्यता मानणाऱ्यांची येथे चलती आहे. त्यांच्या साठी मुरुड म्हणजे स्वर्गच.  राजाभाऊंचे नशीब चांगले, त्यांना जरा बाजुला असलेल्या एका हॉटेलमधे रहायला मिळाले जेथे ते व त्यांच्या कुटुंबीयांशिवाय इतर कोणीही नव्हते आणि ते हॉटेलही चांगले होते.

दापोलीमधले जेवण जयंत पद्मजा मधे.

पण...
राजाभाऊंची एक इच्छा मात्र अपुरी राहिली, उकडीच्या मोदकांचे भरपेट भोजन करायची. कोकणात जावुन उकडीचे मोदक खाणे नाही, राजाभाऊ तुमच्या जन्म व्यर्थ. निदान मोदकासाठीतरी कोकणात परत जा. नाहीतरी लाडघरला तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण आहे, खास उकडीचे मोदक सेवन करण्यासाठी. -

यावां कोकण आपलाच आसा.

Sunday, November 07, 2010

समजण्याच्या पलीकडले

राजाभाऊंना एक गोष्ट अगदी सखोल विचार करुन करुन देखिल अजुन पर्यंत समजलेली नाही.

राजाभाऊंच्या बायकोने मरमर मरुन दिवाळीत खाण्यासाठी दिवाळी फराळ करायचा आणि मग तो न खाता " प्रकाशचा साबुदाणा वडा मस्त असतो, आज खावासा वाटतो " अशी त्यांच्याकडॆ फर्माईश करायची.

या बायकांचं लॉजिक ध्यानी येणे महाकठीण, प्रत्यक्ष ब्रम्हदेवाचा बाप खाली आला तरी त्याला त्यांचा युक्तीवाद कधीच कळणार नाही.

फराळाचे पदार्थ करता करता गरमागरम खायला खायला जावे तर " धीरसबुरी आहे का नाही ? थांब जरा देवापुढे अजुन ठेवायचे आहे, त्या आधी खावु नकोस "
देवापुढे ठेवल्यानंतर खायला जावे तर " आत्ताच खावुन सर्व संपवणार आहेस का ? मग दिवाळीत् काय खाशील " करत फायरींग द्यायची.

आणि ऐन दिवाळीत .... 

खरं म्हणजे आज राजाभाऊंना प्रकाश मधे मिसळ खाण्याची इच्छा होती, मस्त पैकी वांगेपोहे , बटाट्याची भाजी घातलेली मिसळ. हि मिसळ मिटक्या मारत मारत खाण्याची त्यांची इच्छा मात्र अपुरीच राहिली, आतल्या छोटेखानी उपहारगृहात बसायला जागा नव्हती आणि रस्तावर गाडी उभी करायला.

एवढ्याश्या छोट्याचा जागेत इतके मस्त पदार्थ बनवुन ते खाऊ घालायचे ! 


राजाभाऊंनी मग आनंदी आणि उत्साही होण्याचे ठरवले.


आता दिवाळीच्या सणावारी मुकेशभाईंच्या घरी त्यांना साल मुबारक करायला रिकाम्या हाताने कसे जायचे ? आदर्श मिठाई मंदिरा मधे बासुंदी फार छान मिळते ती त्यांनी घेतली.


मुकेशभाईंचे नाव, पोट तर  स्वःताचेच 


इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो , इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो

सर्व ब्लॉगधारकांना हे नविन वर्ष ब्लॉगमय जावो, आपण सर्वांनी असेच दर्जेदार लिहीत जावे व आम्हा सर्वांना असेच उत्तम वाचायला मिळो ही शुभकामना आणि प्रभुचरणी पाडव्याची प्रार्थना.




सगण , सगण , सगण घ्या


या पाडव्याची सुरवात मोठी झोकात झालीयं.
धन्यवाद सह्याद्री

Saturday, November 06, 2010

कल्पनादारीद्र, कर्मदळीद्रीपणा इ.इत्यादी.

मणि भवनाची सुंदर, देखणी लावण्यवती वास्तु.
पण साहेबांना त्याचे बाहेरच्या बाजुचे सौदर्य रसग्रहण करता येणार नाही.
रस्ताभर कापडी मंडप, शामियाना घालुन ती वास्तु साफ झाकुन टाकलीयं.

बेडश्याच्या लेण्यात म्हणॆ अजंठामधे आढळतात तस्शीच प्राचीन काळातील भित्तीचित्रे होती.
कलाप्रेमी ब्रिटीश सायबांच्या कानी ते आले. लागलीच ते त्याचा अभ्यास करायला, त्या पहायला निघाले.
ऑर्डर निघाली
साहेब येताहेत. लेण्यांची साफसफाई करुन ठेवा.
कुण्या अडाण्यानी सर्व चित्रांवर चुना फासुन टाकुन लेणी चचचकीत केली.


आंखो देखा हाल

सायबांच्या आगमनाची तयारी जोरात सुरु आहे. लगीन घाई चाललीय, मंडप सज्ज झाला आहे, फक्त घट्का बुडायची बाकी आहे.

सनई, चौघडा आहे की नाही अजुन पर्यंत कळायला मार्ग नाही.  

कामं काय शेवटच्या घटकेपर्यंत संपतासंपत नाहीयं, रस्तांची साफसफाई अजुन पर्यंत सुरु आहे.

नुकतेच कळण्यात आले आहे की साहेबांना मुंबईच्या रस्तांचे, खड्याखुड्यांचे खरेखुरे फिल येणासाठी त्याचावर डांबर मारुन ते गुळगुळीत न करण्याचा निर्णय उच्च पातळीवरुन घेण्यात आला होता.

पण या निर्णयामुळे या कामाचे कंत्राट न मिळालेले व या कामाचे कंत्राट देता न आलेले असे दोन्ही पक्षांचे लाभार्थी नाराज झाले आहेत.

चुना मारणाऱ्यांची दिवाळी,  शुभ दिवाळी झाली, झाली मग आम्हाचाच का "बळी" केला असे त्यांचे म्हणणे असल्याचे समजते.

मस्का लग्गाके

वा व्वा भुजबळसाहेब

भुजबळसाहेब चांगलचं खडसवलं म्हणायचं त्यांच्या वकिलातला, मराठी हिसका दाखवलात हो.

आमच्या मोदीसाहेबांना येवु नका म्हणुन सांगितलं , आम्ही काय बोललो काय ?

खरं म्हणजे अमेरेकीतुन आलेल्या पाहुण्यांनी वांद्र्याला भेटीस प्रथम जायचे हा शिरस्ता, खोटॆ वाटत असेल तर मायकल जॅक्सनला विचारा, एरॉनवाल्या रिब्बेका मार्क बाईंना विचारा, केनीथ लेंना विचारा.

चुना लगाके

सध्याला साहेब मुंबई भेटीस येणार म्हणुन रंगरंगोटी सुरु आहे.
साहेब ज्या रस्तांवरुन फिरण्याची शक्यता आहे केवळ त्यांचेच सुशोभिकरण ( ? ) चालले आहे.

नशिब त्यांचे साहेब काय गाडीतुन खाली उतरणार नाहीत.

उतरलेले तर कळेल ना त्यांना .

कळेल की कसा चुना लावुन काम केलय ते.

Friday, November 05, 2010

रंगावली प्रदर्शन - साईधाम मधले





ट्रीक

आपला नवरा प्राण गेला तरी काय त्या "प्रती" देवस्थानात येणार नाही हे राजाभाऊंच्या बायकोला चांगले ठावुक.

कधी नाही ते धारीष्ट दाखवुन त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिलेला.

"मी येणार नाही"

" अरे, आजच ती आपली ती रे, म्हणत होती, तेथे जेवण म्हणे खुप चांगले मिळते  "

"ऑ, काय म्हणतेस तरी काय?  आता पुण्याला परततांना वळुया की आत. "

गुजराथी थाळी "स्टॆट्स" मधे

" ह्याच्या बरोबर सकाळी कार्यक्रमाला पण जा, परत घरी येवुन जेवणं पण करा,
 (जणु मॅडमनाच ते करावे लागते ) "

राजाभाऊंच्या बायकोचे पुटपुटणे सुरु झाले.

मेणाहुन मऊ राजाभाऊंच्यानी  आपल्या बायकोचे मन मोडणे काही होणे नाही.

पण.

त्यांच्या घरातील एकमेव मर्द गरजला . " आई, आता बास, जरा पैसे वाचवायला लाग, बाहेरबिहेर नको, घरी जेवण बनव, बनव सांगितले ना "

बालहट्ट का स्त्रीहट्ट "

स्त्रीहट्ट का बालहट्ट "

एका नविन कात्रीत राजाभाऊ सापडले.

अनेक हॉटेलांना टेबल आरक्षीत करण्यासाठी दुरध्वनी करुन झाले,
सर्वत्र नन्नाचा पाढा,
फुल्, फुल आणि फुल. शक्य नाही.

शेवटी स्टेटसवाला तयार झाली, दुपारी बारा वाजल्याची लक्ष्मणरेषा आखत.

मग काय, धावपळ, धावपळ.

१२.०१ मिनिटे.



गर्दी, महागर्दी, प्रचंड गर्दी. मरणाची गर्दी. लोक काय घरी जेवणबिवण बनवतात की नाही ?

पण स्टॆस्टसवाल्यानी आपला शब्द पाळला.

यंदाच्या सिझनचा उंध्यो पहिलांदा खाल्ला.

वडवानल

पहाटे साडेचार वाजता उठलेल्या राजाभाऊंच्या पोटात पेटलेल्या वडवानलात पहाटे केलेला दिवाळी फराळ केव्हाच भस्मसात झाला.

भुकेल्या पोटी आता गाण्याचा कार्यक्रमाला कसे बसवेल ? राजाभाऊंना प्रश्न पडला.

पहाटे सहा वाजता त्यांची शोधाशोध सुरु झाली, कोणते उडप्याचे उपहारगृह उघडे असेल या सुमारास ? 

याझदानी बेकरी.  याझदानी बेकरीची दारं नुकतीच किलकिली होत होती.

ओव्हन मधुन बाहेर आलेला गरमागरम पाव.  
पावमस्का खाण्यासारखे परमसुख नाही.  
आणि  सोबत वाफाळलेला चहा, आणि त्यात परत सोबत ....



   

सूरप्रभात

आज जेव्हा राजाभाऊ दिवाळी पहाट निमित्ते उल्हास कशाळकरांच्या गाण्याच्या  कार्यक्रमाला निघाले तेव्हा किती खुश होते. त्यांना कोठे ठावुक होते आजच्या पहाटॆमुळे हा आजचा दिवस किती महाग पडणार आहे.



सूरप्रभात.

रंग स्वर आयोजीत सूरप्रभात,
सखी संग पहाण्यासाठी राजाभाऊ आज शेवटी गेलेच.

(ज्यांना शास्त्रीय संगीताची आवड नाही त्यांना ते आपल्या प्रिय व्यक्‍तीच्या खातीर का होईना पण ऐकायला लागणे या अत्याचाराबद्दल तेच जाणे. )  


"तुला माझं कधीच ऐकायला नको" ते ऐकण्यासाठी.
आज तिचा हा त्याग महानच म्हणायचा.

पण त्या बदल्यात आज दिवसभर ............

आवाज की नवल ?

तर मग मनाची ही अशी दोलायमान स्थिती फार त्रासदायक.

दिवाळी पहाट कार्यक्रमाबरोबर आणखीन एक महत्वाचा कार्यक्रम असतो, वाचनालयात ते उघडण्याच्या आधी जावुन रांग लावायची, हवा तो दिवाळी अंक मिळवण्यासाठी. दिवाळी अंकाशिवाय दिवाळीची रंगत कशी येणार ?

"आवाज " आपल्यालाच पहिला वाचायला मिळायला हवा. 
कधी "आवाज" हाती पडतो आणि त्यातले भलतेचं चावट अर्थ सुचवणारे विनोदचित्रांची मजा लुटतो असे व्हायचे.




पण अलिकडे वाटायला लागले आहे की "आवाज" ची जादु ओसरत चालली आहे, त्याच्यात पुर्वीसारखी मजा राहिली नाही, पुर्वीसारख्या दर्जेदार विनोदी कथा राहिलेल्या नाहीत, काहीतरी ओढुनताणुन केलेले बालीश विनोद, ( की आता आपली आवड बदलली आहे ? ) चित्राविनोदातही फारसा दम राहिलेला नाही आहे का ?

या ऐवजी आपल्याला आवडणारा "नवल" घ्यायला हवा होता का ?

 "नवल" , "हंस" जो काही मिळेल तो अंक आणयला हवा होता.

जरी राजाभाऊंच्या बायको या "नवल" आणण्यावर नाराजगी दाखवणार असली तरी कधीतरी सुद्धा.