Wednesday, April 30, 2008

छुपायी लाख मुह़ब्बत मगर छुपा न सके



किती दिवस अमलताश आपले सौदर्य लपवुन ठेवणार ? एरॉस चित्रपटगृहाबाहेरील बहावा अखेर खुलु लागलाय.

बहुत ही इतजार करवाया इस कंब्ब़ख्तने. अभी तो केवल सुरवात है.



काल बेलापुर ला होतो, रेल्वे स्थानकासमोरील सागर उपवना कडे जाणाऱ्या रस्तावर एक बहावाचे लहानुसे झाड संपुर्ण बहरलय.



कॅमेरा सोबत असता तर ?


निर्वाणा


आजचा दिवस चांगलाच स्मरणात रहाणार आहे. आज आगळीवेगळी भेट मिळाली, सहचारणीकडुन. लग्नाच्या वाढदिवसा निमीत्ते.


प्रियजनांसमवेत कलेचा आस्वाद घेण्यासारखे सुख नसावे. याज ते लाभले या निर्दयी प्रीतमला.


बायको चक्क आनंदाने सोबत आली श्रीमती नंदीनी अशोक यांच्या श्री पवित्र आट्‌र्स अकादमी ने २६ व्या आंतरराष्ट्रीय नॄत्य दिवसाच्या निमीत्ते आयोजीलेल्या नॄत्य महोत्सवाला.


मेरे तो भाग खुल गये. किस्मत का दरवाजा समझो य़ु खुल गया.
त्यात परत नॄत्यांगना माझ्या आवडीच्या. मग काय विचारता.


सर्व प्रथम जयाप्रिया विक्रमन यांनी कुचीपुडी हा नॄत्यप्रकार सादर केला. मग आल्या त्या डोना गांगुली व त्यांच्या शिष्या. ओडीसी सादर करण्यासाठी. वाहवा, क्या बात है. महषासुरमर्दीनी संबधी नृत्य. दिल खुष हुवा. त्यांचा कार्यक्रम गेल्यच वर्षी येथेच म्हणजे नेहरु सेंटर मधे झाला होता, तो बघितल्या पासुन पुनर्प्रत्ययाचे वेध लागले होते. आज योग जुळुन आला.

त्या नंतर मग श्रीमती नंदीनी अशोक आणि त्यांच्या शिष्या.

शेवट पर्यंत काही थांबता आले नाही. हरकत नाही. जे काही मिळाले तेही नसे थोडके.

बदल

काल कॅफे कॉफी डे मधे "व्हीगन शेक" पिण्यास गेलो. आवडला.
बाहेर कोणाकडे नुसता "व्ही " हा शब्द उच्चारला तरी आता आपला बाप व्हीगन डायट वर लेक्चर सुरु करणार या धास्तीने धास्तावलेल्या माझ्या छोकऱ्याने आपल्या बापासाठी एक खबर आणली.
" तुला माहीती आहे का " कॅफे कॉफी डे मधे "व्हीगन शेक" मिळतो, चल पियायला जावु.
ताडकन मी उडलोच म्हणायचो.

Tuesday, April 29, 2008

जगामधल्या सर्वात सुंदर रात्री

मेक्सीको

पॅरीस
नायगरा
लंडन

भारत
ओ, माफ करा ह. पॉवर कट. लोडशेडींग सुरु आहे

टिप. हे सारे फोटॊ व मुळ कल्पना माझी नाही.

रंग केसरिया सिर पागा बंधले । वनवेलरिया रंग लै आयोरे



आपण आयुष्यभर किती गैरसमज उराशी बाळगुन जगतो. आपल्याला वाटते बसंत ऋतु आला म्हणजे, सारी सृष्टी, वॄक्ष, वेली, लता, कसे बहरुन येतात स्वतःहुन, कोणीच काहीच न करता. ही तर सारी निसर्गाची किमया.

चुक. साफ चुक. हा एक भ्रम. त्रिवार सत्य एकच.

खरच हा बहार आपोआप येतो का ? की त्यासाठी काहीतरी करायला लागते ?

लागते ना !

स्त्रीयांनी जी काही वनदेवतेचे व्रते आहेत ती सारी कशी निष्ठेनी पाळायला लागतात. तरच हा बहार प्रगटतो.

महाकवी कालीदासाने हे सारे सुंदर संकेतात जोडलेले. "माविकाग्निमित्र" या आपल्या नाटकात.

सीता अशोक बहरतो तो सुंदर स्त्रीच्या कोवळ्या पावलांचा स्पर्श झाल्यानंतर.
लवंगीची वेल आहे ती स्त्रीचा स्पर्श झाला म्हणजे उमलते.
स्त्री ने मद्य पिऊन त्याची चूळ अंगावर टाकली तरच बकुळ फुलतो,
मंदारवॄक्ष मारुतीचा लाडका, तो तरी ब्रम्हचारी आहे का ? तोही त्याच्याशी कुणी स्त्री हास्य विनोदाने आणि प्रणायचेष्टॆने बोलली तरच उमलतो.
सोनचाफाही तरूण स्त्री त्याच्याशी हासली तर बहरलो.
आंबा तर स्त्रीने त्याला हळूवार फुंकरानी फुलवले नाही तर मुळी मोहरतच नाही.
पुन्नागाचे झाड स्त्रीच्या मुखातुन रागदारीचे सुंदर संगीत ऐकल्याशिवाय मुळी अंकुरणारच नाही.
तिळाचे झाड फुलायला त्या कडे बाईने पाहावे लागते.
आणि कोरंटी फुलण्यासाठी तिला स्त्रीने मिठीत घ्यावे लागते.

"मालविका" - लेखक - आनंद साधले मधुन साभार.

खंत एकच सिमेंट कौंक्रीट च्या जंगलात आपण सारे विसरुन गेलोय. वनदेवतेला, सॄष्टीला आणि स्वतःच्या मनालाही.

Sunday, April 27, 2008

कुहुक कुहुक करे रे कारी कोयलीया


आज तो मेरे भाग खुल गये ! श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे व पं. संजीव अभ्यंकर यांचा बहुचर्चीत जसरंगी जुगलबंदी अर्थातच सहगायनाचा कार्यक्रम ऐकण्याचा मणीकांचन योग अखेरीस जुळुन आला आणि तो ही एनसीपी च्या टाटा थेटर मधे. गाणे ऐकायचे तर ते येथेच. नाही तर ऐकु नये.

गाण्याला जायला निघालो आणि शुभशकुन झाला. बहरलेला. फुलांच्या गुच्छाने लगडलेला सीता अशोक अकस्मात समोर आला, तोही कार्यालयाच्या अगदी जवळ असलेल्या योगक्षेमच्या इमारतीच्या आवारात. युसलेस माणसा, कर्मदळीद्री माणसा, काय करत काय होतास आजन्म ? नजर तुझी नक्की कोठे असायची? सरत्या आयुष्याच्या काळात त्याचा आढावा घेण्याची बुद्धी सुचलीच तर मला आपण ऐकलेल्या मैफीली व त्यात श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे, विणा सहस्त्रबुद्धे, उल्हास कशाळकर, मुकुल शिवपुत्र यांचे कार्यक्रम नक्कीच याद रहातील.

वातावरण निर्मीती. या साठी आधी दोघेही वेगवेगळे गायले. अश्विनीताई गायल्या यमन व चैती. त्यांच्या नंतर संजीवजी गायले रागेश्री व होरी.

मग बारी होती सहगायनाची. बंदीश एक, पण एकाच वेळी ते दोघेही वेगवेगळ्या रागात ती गाणार.

श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे नी सुरवात केली ललीत रागाने व त्यांच वेळी संजीव अभ्यंकर गावु लागले राग पुरीया धनश्री. त्या नंतर अभोगी व कलावती. शेवटी एक भजन.

नाही म्हणजे थोडासा वैचारीक गोंधळ उडायचा होता तो उडलाच. हे असे काही ऐकायची प्रथमच वेळ होती ना.

स्वारी महिकावतीवर, झांझरोळी मार्गे



अस्मादीकांचे पुर्वज बहुदा पापडी, केळवे-माहीम या परीसरातुन फार फार पुर्वी मुंबईस येवुन स्थाईक झाले असावे. आपण दुसऱ्या कोणाचे पुर्वज होण्याच्या आधी हा परीसर पाहुन घ्यावा हा विचार मनी प्रबळ झाला, बरेच वर्षे जावु जावु करत, जाणे लांबबले. आज म्हटले जायचच. फांदी तुटो वा पारंबी. मेरे मुन्नेकी मां. या वाल्या कोळ्याची सहचारणी , त्याच्या या असल्या पापकर्मात नेहमीच आनंदाने सहभागी होणारी.

मग काय कुच केले. विरार वरुन सकाळी ८.३० वाजता सुटणारी शटल पकडुन. केळवे रोड रेल्वे स्थानकावर उतरलो. पुर्वेला एक अप्रतीम स्थळ आहे, पावसाळ्यात तर जन्नतच. झांझरोळी धरण, वरती डोंगरात सुपझरा नामक धबधबा ( फक्त पावसाळ्यात ) , तारुखांड व वरच्या धारमाथावरुन दिसणारा पलीकडचा सूर्या आणि वैतरणा नदयांचा संगम.

आधी विचार केला वर पर्यंत जावुन येण्याचा. पण उन्हाचा तडाखा सहन होईना. रेल्वे स्थानका पासुन आता धरणाकडे जाण्यासाठी चांगली डांबरी सडक झाली आहे, पुर्वी गेलो होतो तेव्हा नव्हती. ऑटोरिक्षा ही उपलब्ध आहेत. पण सध्या फिटनेसचा मौसम असल्या मुळे आम्ही चक्क चार किलोमीटर चालत गेलो. धरण पाहुन मग पश्चिमेला असलेल्या केळवे गावी गेलो.

केळवे, एक नितंत सुंदर , शांत गाव, समुद्रकिनारा प्रेक्षणीय आणि आल्हाददायक असे सुरुचे बन असलेला. नागवेलीच्या पानांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला.

येथे शितळादेवीचे सुंदर, स्वच्छ आणि प्रशस्त मंदीर आहे. देवळासमोर तलाव आहे. आणि हो, दोन चांगली रहाण्याजेवणाची सर्वोत्तम सोय असलेली हॉटेल देखील आहेत.

विसावा मधे रुचकर घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला .चवळीची तोंडाला पाणी सुटायला लावणारी रस्सेदार भाजी बहुदा घोसाळे घालुन केलेली, बटाटा सुकी भाजी, परत परत खावासा वाटणारा, मन व पोट दोघांनाही संतोष देणारा डाळभात व चटकमटक लिंबुचे गोडे लोणचे.

मग सुरुच्या वनातील वामकुक्षी, तबीयत खुश झाली. गावात ऊन व उकाडा मात्र खुप होता. पण समुद्रकिनारी मात्र छान वारे होते.

मग गेलो माहीमला. माहीम म्हणजे प्राचीन काळची महिकावती नगरी. ही बिंब कुलातल्या राजाची राजधानी होती. ( माझे पुर्वज बिंब कुलातले तर नसावे ना ?) बाजारपेठेत हिंडलो, चालत चालत, मजल दरमजल करत येथील समुद्रकिनारी, उन्हाचे चटके सहन करीत, वाटॆत असलेल्या नारळी पोफळीच्या बागा न्याहळत. हा किनारा काही खास नाही हे जाणुन घेण्यासाठी.

आणि हो , कलींगडॆ, शहाळ्याचे पाणी, जाम, व ताडगोळे यांचा दिवसभरात मनमुराद उपभोग घेतला. उन्हात येवढे चालायचे तर टिकाव धरला पाहीजेना.

केळवे ते माहीम रस्ता मस्त आहे.

Thursday, April 24, 2008

अशोक व महाकवी कालीदास.




अमंळ जरा विलंबच झाल, बहरलेले त्याचे रुप न्याहळत डोळ्याचे पारणे फेटुन घेण्यास.

"भोवती वसंत बहरला होता. सारी सॄष्टी रंगली होती. दंगली होती, फुलली होती.गंधली होती.गात होती.झुलत होती.नाचत होती.
मधेच हा अशोक होता -
चांगला डवरलेला. पोसलेला. पण अजुन न फुललेला. मुका. एकटाच. जणु प्रियेची प्रतीक्षा करणारा.
संगोत्सुक !
तो वाट पहात असतो, ऋतुमयीची.
तिने यायचे. आपल्या कोवळ्या पावलांनी त्याला स्पर्श करायचा. अळीत्याने पाय शॄंगारुन, अलंकार घालून पैंजण छुमकवीत होणारा हळुवार स्पर्श.
मग तो रोमांचित होणार. शहरणार. फुलणार.


पाय लावुन झाल्यावर मालविकेने विचारले, ’सये, आपण याचे एवढे लाड केले. आता हा फुलेल ना ?"
न फुलला तर हा उणेपणा तुझा नव्हे.
असे का ?
इतक्या सुंदर पावलांचा स्पर्श होवुनही जर तो फुलला नाही तर तो अरसीक ठरेल. वेडा ठरेल

अग्निमित्राला नशिबाचे नवल वाटले -
- जो अरसिक ठरण्याचा संभव होता त्याला प्रीतीचे समर्पण झाले होते
- मालविकेची ही पावले -
- जणु फुललेली सुंदर लाल जोडकमळे.
- तिचे शेलटे लांब पाय ते या कमलाचे नाल.
- कटितळीचे रूप-वैभव ती या कमलवेलीची कंदमूस.
- नूपुरांची छुमछुम ती जणू तिच्या अंतरीचे जीवनसंगीत
- या साऱ्याचे वैभव या अशोकाला लाभले.
- आणि हा अरसिक शांत उभा आहे.
-अजुन फुलांनी फुटलेला नाही.
-हेच भाग्य माझे असायला हवे होते.
- मी या वेळी फूल फूल फुललो असतो.
- अरसिक अशोका !
-माझ्यासारख्या प्रेमिकाशी तुझी तुलना करतात.
- तूही रमणीच्या स्पर्शासाठी झूरतोस असे म्हणातात.
- ते सारे खोटे आहे.

अशोक आजच फुलला होता. -
अगदी भरभरुन फुलला होता -
आजवर कधी नाही असा उमलला होता.
: याचे हे सौंदर्य अतुलनीय आहे.
: असाधारण आहे.
: सारी वसंतश्री याच्या वरुन ओवाळून टाकावी असे आहे.
: आधी फुललेली झाडे उगाच क्षणाचा दिमाग दाखवून गेली.
त्या सर्वांची एकत्र शोभा आता याच्यावर फुललेली आहे.


ज्या अशोकाचे, महाकवी कालीदासाने "माविकाग्निमित्र" या कादंबरीत मुक्तहस्ते वर्णन केलय. अग्निमित्र व माधवीचे, मालविकेचे मिलन घडुन आणण्यासाठी त्याच्या खुबीने वापर केलाय, त्या अशोकाची आठवण जरा अंमळ उशीराच झाली. ( वरील भावानुवाद - "मालविका " लेखक आनंद साधले मधुन साभार. "


हा अशोक कुलाबा उपवनातील.
गोरेगावला पिकनीक पॉइंट मधे ही एक लोभस अशोक आहे. माझे लग्न जमले होते, तिला घेवुन या उपवनात गेलो. समोर उभा राहीला,
संपुर्ण बहरलेला अशोक

Wednesday, April 23, 2008

पण अस का ?

कधी नव्हे ते एक मराठी माणुस उच्च पदावर बसला, दुसऱ्याच एका मराठी माणसाने त्याला खाली खेचला. त्याच्या जागी अमराठी आला.
पण अस का हो ?
राजकारण मोठे गहन हो, राजाभाऊ.
मागे एकदा लोकसत्तामधे हुकलेल्या बातम्यांविषयी एका जेष्ट पत्रकारानी लेखमाला सुरु केली होती. ती आठवली.
विधानपरीषदेवर निवडुन आल्यानंतर एका नेत्याची मुंबई भर तरफदारी करणारी उत्तुंग पोस्टर्स लावली गेली होती. अगदी अगदी दोन दोन मजले उंचीचॆ पोस्टर मंत्रालयाजवळ लावले गेले होते. ( अश्या रितीने पोस्टर लावुन नेता खरोखरीच मोठा होतो काय ?) तर सांगायच म्हंणजे हा साऱ्यांचे फोटो काढुन बॉगवर टाकणार होतो. राहुनच गेले. कारण काय तर राजकारण बॉग पासुन अलिप्त ठेवायचे.
मग हे सारे मानापमानाचे नाट्य घडले.

कुलाबा उपवन

या मुंबईत कॉक्रीट्च्या जंगलात एक सुंदरसे उपवन साकारलय. कुलाबा उपवन. एक देखणे बोटॅनीकल गार्डन. समुद्र किनारी. शहरांमधले हिरवे पट्टॆ नजरेखालुन घालायचय म्हणतोय.


पाय मुरगळुन घ्यायचा आहे का ? चालता चालता पडायचे आहे का ?




सुरक्षतेबाबत आपण किती बेफिकिर असतो. रस्तातुन चालता चालता एखाद्या बेसावधक्षणी आपला पाय या पदपाथाच्या कडेला खोदुन ठेवलेल्या खड्यांमधे जावुन जायबंदी होवु शकतो. शोभेसाठी खांब रोवण्यास पाडलेले हे खड्डॆ खणुन १५-२० दिवस झाले असतील. परिस्थीती जशी आहे तशीच. वास्तवीक पहाता हे केवळ अर्धा एक तासाचे काम आहे.

आपण कधीही या बाबतीत अंध व्यक्तींचा विचार करत नाही. त्यांच्या साठी हे सापळेच आहेत.

पाय मुरगळुन घ्यायचा आहे का ? चालता चालता पडायचे आहे का ?





सुरक्षतेबाबत आपण किती बेफिकिर असतो. रस्तातुन चालता चालता एखाद्या बेसावधक्षणी आपला पाय या पदपाथाच्या कडेला खोदुन ठेवलेल्या खड्यांमधे जावुन जायबंदी होवु शकतो. शोभेसाठी खांब रोवण्यास पाडलेले हे खड्डॆ खणुन १५-२० दिवस झाले असतील. परिस्थीती जशी आहे तशीच. वास्तवीक पहाता हे केवळ अर्धा एक तासाचे काम आहे.
आपण कधीही या बाबतीत अंध व्यक्तींचा विचार करत नाही. त्यांच्या साठी हे सापळेच आहेत.

बंडोबा थंडोबा झाले

"बंडोबा थंडोबा झाले " हां वाक्प्रचार पहिल्यादा कोणी बरे केला असेल ?
तसाच "औट घटकेच राज्य " किंवा "पंत पडले शेट्टी चढले " या म्हणी हे केव्हा ब़र प्रचलित झाल्या असाव्यात ?

पुणे ओकायामा मैत्री उद्यान

सिंहगड रस्तावर एक अप्रतिम उद्यान साकरलय , पुणे ओकायामा मैत्री उद्यान. जपान मधील ओकायामा शहरातील कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर विकसीत केले आहे. आज अश्या धर्तीवर शहरांमधे बागा विकसीत करणे ही काळाची गरज आहे.

Monday, April 21, 2008

अभिनंदन - शहर नियोजन समितीवर निवड झाल्या बद्दल.

पुण्यात अमुकतमुक यांची शहर नियोजन समितीवर निवड झाल्याच्या अभिनंदनाचे भले मोठाले फलक लागले आहेत.
सरकार. आपले अभिनंदन.
पण काय हो असे भले मोठाले, स्वतःची पाठ स्वतःच थोपटुन घेत, किंवा आपल्या चमच्यांकडुन लावले गेलेले हे फलक आपले हे असे शहर विद्रूप करते का नाही याचा आढावा घेणे हे या समितीच्या कार्यक्षेत्रात येते काय हो ?

यु टर्न व राउंड अबाऊट्स




केवळ योगायोगाने मी तेथे होतो, वळत असलेल्या त्या पी.एम.टी.च्या बस समोर एक बाई आपली पायातुन निघालेली चप्पल उचलण्यास खाली वाकते काय व खाली वाकलेली बाई दिसत नसल्यामुळे बसचालक बस पुढे काय घेतात व मी जोरात बस थांबवा हे ओरडल्याचे ऐकुन प्रसंगावधान राखुन ते बस काय थांबवतात, एक इंच, एक सेकंदाने त्या बाईचा जीव वाचला.


दोष खर तर त्या बाईचा. आपल्या जीवाची पर्वा न करता रस्तातुन कसही चालायचे , कसेही वागायचे. या अफाट बेशिस्त गर्दीतुन बस चालवतांना पी.एम.टी बस वाहान चालकांची खर तर कसौटी लागते. किती म्हणुन व काय काय सांभाळायचे.


हा दोष खरा तर नगर नियोजन, वाहतुक नियोजन शुन्यतेचा.


दुसरा मुदा असा की अश्या रीतीने वहानांनी भर रस्तात, गर्दीत वळणे धोकादायक असते. तसेच सुरळीत वाहतुकीस ही त्याच अडथळा होतो. स्वारगेटला सातारा रोडवरुन कात्रज च्या दिशेनी आलेल्या बस स्वारगेटला माघारी जाण्यासाठ यु टर्न घेतात. परदेशात जगात मला वाटते अश्या रीतीने यु टर्न घेण्याची परवानगी नसते. वळण्यासाठी राउंड अबाऊट्स असतात. तेथेच त्यांनी वळायचे असते.


पण.

मुंबई-पुणे म्हणे फक्त तीन तासात.

नेहमी संध्याकाळी दादर वरुन शिवनेरी पकडुन पुण्याला जाणे हा शिरस्ता. गेल्या शुक्रवार जरा वेगळा प्रयोग केला जो चांगलाच महाग पडला. चर्चगेट वरुन दादरला जाण्यासाठी बस पकडली. महमद अली रोड ट्रॅफीक जॅम. धार्मीक मिरवणुक.
कोणतेही सण, उत्सव साजरे करण्याची आपली संकल्पना एकच. रस्ताच्या मधे मांडव घाला, व्यासपिठ उभारा, स्पिकरच्या भींती रचा, मोठ्य़ामोठ्याने कानठळ्या बसतील ऐवढय जोरात कर्णाकर्कश गाणी लावा व रस्ते जॅम करण्यासाठी मिरवणुका काढा.
मग काय म्हटले रेल्वेने वाशीला जावे, तेथ पर्यंत पटकन पोचु, मुंबईतला ट्रॅफीक जॅम वाचेल. ६.३० वाजता वाशीला पोचलो. आता पुणे काय अडीच-तीन तासावर. पण नियतीला ते मान्य नसावे. वाशीला ही तोबा गर्दी, महामंडळाच्या बसीस मिळण्याचे नाव नाही. अखेरीच कवठे महांकाळ ला जाणारी साधी बस , जी आपण लाल डबा म्हणुन हेटाळतो ती रात्र आठ वाजता मिळाली. अब तेरा ही है सहारा. नशीबाने ती स्वारगेटला जाणार होती. सोन्याहुन पिवळे. पण. हा पण मोठा होता. ती जुन्या महामार्गावरुन प्रवास करणार होती.
मजलदरमजल करत, घाटातला अपघातामुळे झालेला वाहतुक खोळंबा पार करत रात्री १२.४५- १ च्या सुमारास ती अखेरीस स्वार गेटला पोहचली.
चलो आखीर यंहा तक आही पहुंचे. मावळ्या, परतीचे दोर कापलेले आहेत. अजुन गड सर व्हायचा आहे. एका मेहरबान गृहस्थाने फाट्या पर्यंत सोडले, तेथुन ११ नंबरची बस सुरु, तंगडतोड चालु. एकला चलो रे ! सुमसान रस्ता, मी एकटा, वाटॆत सोबत फक्त रस्तावरील कुत्रांची. चालतोय चालतोय. तसे अधुन मधुन एकादे वहान, दुचाकीस्वार जात होते, पण एकानींही माणुसकी दाखवली नाही, अगदी मी हात करुन देखील थांबण्याशी तसदी घेतल नाही. अखेरीस घराजवळ एकानी गाडी थांबवुन मला घेतले.
दिलीपकुमारचा बहुतेक शक्ती (?) मधाला सीन आठवला. रोको, कोई तो रोको.
पण चांदण्या रात्री चालायचा मजा आली. रात्री २.१५ वाजता घरी पोचलो.
आणि मुंबई-पुणे म्हणे फक्त तीन तासात.

वाशी ते पुणे

२५०-३००-४०० रुपये। सुलातानी जिझीया कराप्रमाने, हे मुंबई-पुणे मार्गावर अवैध्य वाहतुक करणारे खाजगी गाड्यांचे चालक आपली मनमानी करत तोंडाला येईल तेव्हढे पैसे मागत होते. व अडलेले प्रवाश्यांना त्यांच्या या बेशरमी मागण्या मान्य करण्यावाचुन गत्यंतरच नव्हते। त्यांना कसेही करुन पुण्याला पोचायचेच होते. हे येथे म्हणे रोजचेच आहे.

स्थळ - वाशी. शुक्रवार संध्याकाळी ६.३० वाजता

येथे एकेका सुमो
त , जीप मधे, गाड़ी मधे क्षमतेचा दुप्पट माणसे जनावारांप्रमाणे कोंबुन बेकायदेशीर वाहतूक अगदी उघडपणे सुरु असते. सरळसरळ लुट. पोलिसांनी नेहमी प्रमाणेच डोळ्यावर गेंड्याचे कातडे ओढुन दुर्लक्ष केलेले. कदाचीत हे असे काय चालत असावे हे त्यांच्या खिजगणतीतच नसावे.

या प्रवाशांमधे , एकट्या, दुकट्या प्रवास करणाऱ्या मुली देखील होत्या. त्या देखील नाईलाजास्तव या धोकादायक, बेभरवश्याच्या, गैरकानुनी प्रवासात सामील होत होत्या. कारण एकच. प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकॄत वाहनांची वानवा. मुंबई कडुन येणाऱ्या शिवनेरी, महाबस, सेमी लक्झरी बसेस तेथुनच भरभरुन येतात.

त्यात परत मुंबई-पुणॆ किंवा पुणे मुंबई अधिकॄत टॅक्सी फक्त दादर वरुनच सुटतात.

या मार्गावर रोज सुमारे २०,००० ते २५,००० प्रवासी प्रवास करत असतात. आपला व्यवसाय वाढवण्याची ही येवढी मोठी संधी असतांना देखील राज्य परीवाहन मंडळ, मुंबई-पुणॆ किंवा पुणे मुंबई अधिकॄत टॅक्सी या संस्था झोपलेल्या असाव्यात.

गरज आहे ती वाशी येथे यांची स्थानके असण्याची. वाशी वरुन बस. टॅक्सी सुरु करण्याची. आपल्या सेवेअभावी आपल्या ग्राहकांचे हाल होतात ही जाणीव करुन घेण्याची.





स्वयपाकघरातील गॅस सिलिंडर




स्वयपाकघरातील गॅस सिलिंडरचा वापर डोळस पणे करावा. शेगडी बंद करताना प्रथम सिलिंडरचा व्हॉल्व्ह आणि नंतर शेगडीचा व्हॉल्व्ह बंद करावा. रात्री झोपतांना तर सिलिंडरचा व्हॉल्व्ह बंद करायलाच हवा, गॅस रबर ट्यब आय.एस.आय. मार्कचीच वापरा. सिलिंडर नेहमी उभा ठेवा. गॅस शेगडी त्यापासुन दुर उंच जागी असावी.


सिलिंडरचा स्फोट झाल्यास त्याची ही अशी अवस्था होते.


सौजन्य - अग्नीशामक दल, पुणे.

Sunday, April 20, 2008

तुम्ही किती रोडावलात ?

अभय बंग आपल्या पुस्तकात लिहितात की " जेव्हा लोक म्हणायला लागतात की तुम्ही किती रोडावलात , काय बरबीर वाटत नाहीय का ? तेव्हा समजा तुमची तब्बेत सुधारलीय। "
मला लोक म्हणायला लागली आहेत " काय झाले काय तुम्हाला ? " प्रकृति बरी आहे ना ?





Tuesday, April 15, 2008

पण अस का ?

काल पुणे-मुंबई प्रवासात, ट्रेन मधे एक कॉलेज मधला जानी, जिगरी दोस्त भेटला. खुप खुप कालावधीनंतर. मला बघुन तो बाहेर आला. स्वःत होवुन तो पुढे आल्या मुळेच मी त्याचा ओळखु शकलो, ते पण स्मरणशक्तीला ताण दिल्या नंतर, पण तेही महत्वाचे नाही. ऐवढ्या वर्षाच्या अंतराने भेटल्या नंतर खर म्हणजे खुप बोलायला पाहीजे, दिलखुलास गप्पा झाल्या पाहीजेत. आनंद झाला पाहीजे.

पण.
पण माझ्या कडे त्याच्याबरोबर बोलण्यासाठी काहीच नव्हत. फक्त त्याची व आमच्या ग्रुप मधल्यांची चौकशी, हा कसा आहे ? तो काय करतो . ते ही दोन चार आठवलेल्यां नावांची, बस्स संभाषण संपले. मग आपली गाडी उगाचाच ओढायची म्हणुन काही बाही बोलत रहायचे.

हे असे का होते ?

त्या आधी बाजुला बसलेल्या जोडप्याने जळव जळव जळवले. लांबच्या सफरीचे त्यांचे बेत सुरु होते. आम्हाला केव्हा जायला मिळणार आहे कोण जाणे ! रजा असते तेव्हा पैसे नसतात, पैसे असतात तेव्हा रजा नसते आणी दोन्ही असते तेव्हा जायला मिळत नाही. आधीच एकट्याने परत मुंबईस परतायचे म्हणजे बोयरींग असते, हा परतण्याचा दिवस उजाडुच नये असे दिवस भर वाटत रहाते , मग दिवसभर वेळ जाता जात नाही. त्यात हा वैताग.

आता प्रतिक्षा शुक्रवारची. प्रियजनांच्या भेटीगाढी होण्याची

Friday, April 11, 2008

द पॉवर ऑफ बॉगर्स

सद्ध्या आमच्या घरात जुगलबंदी चालु आहे. नवरा बायकोत. एकच ध्यास घेतलेल्यांमधे, वजन कमी करुन शारिरीक व मानसीक दॄष्टा एकमद तंदुरुस्त व्हायचे.
९२,८६,२,५,३,८६,८३ , माझे वजन २ किलो कमी झाले, माझे ४ किलो नी. धाकधानीधीन.

चालण्याचा कंटाळा करणारे आम्ही रोजच्या रोज चांगलेच चालायला लागलो आहे, हाणहाण हाणणारे आम्ही खवय्ये आता तोंडावर ताबा ठेवु लागलो आहोत.

या परिवर्तनाचे सारे श्रेय जाते ते दोन बॉगल्सना.

वैशाली (http://lopamudraa.blogspot.com/) व संगीता (http://kasakaay.blogspot.com/) .

वाढत्या वजना बरोबर येणाऱ्या साऱ्या व्याधी सतवत तर होत्याच, काही तरी करायच इच्छा होती पण मुहुर्त सापडत नव्हता.

ती ठिणगी टाकण्याचे काम, मशाल पेटवण्याचे काम केले वैशालीनी. व या मार्गावरुन चालायचे कसे त्या साठी कोणत्या डायटची साथ घेयची याचे मार्गदर्शन केले संगीताने आपल्या बॉग च्या माध्यमातुन. व्हीगन डायट किंबहुना या जीवनशैली बद्दल मोलाची माहीती पुरवुन, वेळोवेळी प्रोत्साहन देवुन.


याची सुरवात झाली ती माझ्या ’मुंबई मॅरेथोन’ या पोष्ट वरुन, ज्यात मी लिहीले होते की "काकाच्या ’लिटील प्रिंन्सेस’ नी आज खुप धम्माल केली. काश आज तीचा काका व काकी फिट्ट असते तर.?"
या वर वैशालींनी विचारले की तुम्ही असे का म्हणता ? मग त्यांनी अनिल अंबानी च्या फिटनेस वर आपल्या बॉग वर लेख लिहीला.
आणि अश्या रीतीने एका प्रवासाची सुरवात झाली.

धन्यवाद वैशाली व संगीता.

Thursday, April 10, 2008

बेस्ट

वाहतुकीच्या नियमांचे पालन , स्वःताच्या व पादचाऱ्यांच्या, व इतर वाहनचालकांच्या सुरक्षीततेसाठी करावा या संबधीची कार्यशाळा बेस्ट च्या संचालकांनी घ्यायला हवी, लाल सिग्नल मोडणॆ, वेगाने बस चालवणे हे तर आता सर्रास व्हायला लागलय.

Wednesday, April 09, 2008

मराठीतुन लिहीणॆ

आज याची ओळख झाली - या वर http://ssandesh.blogspot.com/

paahijen.com/scratchpad

आवडले.

कोण होतास तु काय झालास तु ?



कोणे एके काळी येथे महानगरपालिकेनी प्लॅस्टीकच्या कचराकुंड्या बसवल्या होत्या, फारच थोडया दिवसात काप गेली भोके राहीली ची गत झाली.
शेवटी हा सारा वाया गैलेला पैसा आपलाच, आपण भरलेल्या कराच्या रुपाचा.

चैत्र पालवी




घराजवळील कैलासपती व कार्यालयाजवळील तामण केव्हा बहारला कळलच नाही.

Tuesday, April 08, 2008

आदित्य खांडवे - ट्रिनीटी क्लब, मुगभाट, गिरगाव




यंदाचा गुढी पाडवा मला भलताच महागात पडलाय. घरात चक्क प्रवेशबंदी चा हुकुम पुकारण्यात आला आहे. माझ्या दॄष्टीकोनातुन जरी मी नव्या वर्षाची सुरवात चांगली केली , हा दिवस सत्कारणी लावला असला तरी, धर्मपत्नीच्या मते मी फुकट गेलेली केस आहे. युसलेस माणुस आहे.

सक्काळी सक्काळी गेला गावाच्या उठाठेव्या करायला ,सण नाही वार नाही , घरात बसायचे नाव नाही.

आता शोभा यात्रा काय रोजरोज असतात ? त्यात परत नेमके याच दिवशी पार चांगले कार्यक्रम होते त्याला मी काय करु शकतो ?

सकाळी नेहरु सेंटर मधे ऒडीसी नॄत्याचा फार देखणा कार्यक्रम झाला. मग त्याच्या नंतर चित्रकलेची प्रदर्शने, डोळ्याचे पारणॆ फिटले. मग कान म्हणायला लागले "आम्हाला पण तॄप्त कर ना ! " आता त्यांचे चोचले पुरवायला श्री. आदित्य खांडवे यांचे गायन ऐकायला "ट्रिनीटी क्लब, मुगभाट, गिरगाव " मधे जाणॆ क्रमप्राप्त होते. काय मारवा रंगलाय म्हणुन सांगु.

ही तरुण पिढी खुप गुणी आहे. अलीकडे मी महान, थोर आणी जेष्टांचे गाणॆ ऐकणे जवळ जवळ बंदच केले आहे.

मग काय ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी दिवाळीच्या पाडव्यात फुटतात तसे फटाके व ऍटम बॉंब.


That's too bad. HKG,


आणी माझ्या हातुन नकळत पण कुणी दुखवले जावु नये असे मला वाटत असते.

रस्ते व गटाराची झाकणे


आपल्या कडे रस्ताची पातळी व या गटारांची, त्यांच्या झाकणांची पातळी समांतर करण्याचे शास्त्र बहुतेक विकासीत झालेले नसावे. या खड्यात दोन चाकी वहानांनी प्रवेश करावा, चालकानी पाठीला हिसका बसुन घ्यावा, चारचाकी वहान चालकांनी हादरा जाणुन घ्यावा व पादचाऱ्यांनी लक्ष न दिल्यास पाय मुरगळुन घ्यावा.

हार्मनी शो






उन्हाळ्याची चाहुल

पण सावधान, लालेलाल, लाल कलींगडाचा हा रंग नैसर्गीक असेलच असे नाही. कॄत्रीम रंग त्या मधे इंजेक्शन द्वारे टाकला जातो. तेव्हा सांभाळुन.

एक तुतारी द्या मज आणुन फुंकीन मी ती स्वप्राणाने


बाल शिवाजी


हिरवळ व प्लास्टीकची पाण्याची बाटली,


येवढ्या देखण्या हिरवळीवर बेदरकारपणे अशी प्लास्टीकची पाण्याची बाटली टाकुन जाण्यास मन कसे करवते ?

पेवर बॉक - एक नवे कुरण ????


गल्लांमधल्या डांबरी रस्तांवर हे नित्कॄष्ट दर्ज्याचे पेवर बॉग लावण्या मागचा उदेश काय असावा हे मला उमजेनासे झाले आहे. ज्या ठिकाणी रस्तांखाली कामे करण्यासाठी वारंवार खोदावे लागतात, त्या रस्तांवर हे बसवले तर गोष्ट वेगळी. हे बॉकस बाजुला करा, रस्ता खाली काम करा, परत बसवा. वारंवार डांबरीकरण करण्याचे पैसे वाचतात.

प्रामाणीक करदात्यांनी भरलेल्या करांच्या पैश्याची ही उधळपट्टी आहे असे मला वाटते. या ऐवजी जर खासदार निधी, आमदा, नगरसेवक निधी च्या पैश्यातुन दक्षिण मुंबई मधल्या घरगल्यांच्या दुरुस्तींची कामं केल्यास नागरीकांचे जिवन काहीप्रमाणात का होईना , सुसह्य होईल.

पण ???

Sunday, April 06, 2008

ओडिसी नॄत्य

संस्मरणम






ओडिसी गुरु पद्मभुषण केलुचरण महापात्र यांच्या चौथ्या पुण्यतिथीचा स्मरणोत्सव नेहरु सेंटर मधे सुरु आहे. आज शिष्यांच्या शिष्यांनी नॄत्य सादर केले. उद्या ६.३०० वाजता झेलम परांजपे, शुभदा, देवी बसू, दक्षा मश्रूवाला या नॄत्यंगना ओडिसीतील पारंपारीक निर्मीती सादर करणार आहेत.