Showing posts with label माझे मनोगत. Show all posts
Showing posts with label माझे मनोगत. Show all posts

Sunday, April 15, 2007

वळ्वाचा पाउस

सटासट, सटासट, थडाथडा थडाथड, गारांचा वर्षाव होत होता, अवचित वळवाच्या पावसाने खिंडीत गाठले. आज सायंकाळी चारच्या सुमारास खाली दुरवर क्षितीजावर धुळीचे लोटच्या लोट उसळु लागलेले वरुन दिसत होते, बोलबोलता वातावरण अंधारुन आले, क्षणभरात हे धुळिचे वादळ वरती येवुन ठेपले. आपण डी एस के विश्वात आहोत हा संभ्रम, हा तर आखाती प्रदेशच आहे की काय ? चहुओर धुल आणि मातीचे राज्य पसरलेले. हातापलीकडचे ही दिसु नये हि परिस्थिति.

अकस्मात हे सारे निसर्गाचे भयानक वातावरण गायब झाले, सर्व काही एकदम स्वच्छ झाले. पण ही होती वादळापुर्वीची शांतता.

परत एकदा काही काळानंतर वातावरण अंधारुन आले, गगनात बिजुरिया चमकु लागल्या, विजेचे तांडव नॄत्य सुरु झाले, आता प्रतिक्षा होती केव्हा एकदा सुरु होतो गारांचा वर्षाव ह्याची. जास्त वेळ वाट बघावी लागली नाही, गरजत, बरसत सुरु झाला वळवाचा पाउस, आपल्या आयुधासह, एका हाती भल्यामोठाल्या गारा , दुसऱ्या हाती बोचरे, थंड वारे घेउन बेसावधांची त्रेधातिरपट उडवित. लहानात लहान मुल होत मी लागलो गारा वेचायला, मुबंईच्या माणसांना वळवाचा पाउस, गार म्हणजे नाविन्यच की.

हवेतील गारवा मस्तपैकि वाढला, वातावरणात बेहोशी, मदहोशीचे माहोल, संपुर्ण भिजलेलो मी, त्यात सोबत गिरिजादेवींचे " पिया नही आये, काली बदरीया बरसे "

तुम भी होती अच्छा होता.

Friday, April 13, 2007

आंबा पिकीतो रस गळीतो, कोकणचा राजा झीम्मा खेळीतो.

ज्याच्या मंजिरी कामदेवाच्या पंचबाणापैकी एक आहेत असा हापुस आंबा यंदाला गेला कुठे ?

पिवळसर, केसरी रंगाचे हे डोलदार फळ, फळांचा सम्राट, ज्याचे माधुर्य व सुवास काय वर्णावा ? घरी अर्धवट पिकलेले फळ आणावे, त्याची अढी लावुन पिकण्यासी योग्य समय द्यावा, नैसर्गीकरीत्या, पुर्णपणे पिकल्यावर त्यासी आंजारुन गोंजारुन त्याच्या रंगरुपाचे , सुवासाचे कौतुक करीत लडिवाळपणे, हळुवारपणे, हाताळत, त्याचा योग्य तो मान राखत आस्वाद घ्यावा, कधीतरी छान पैकी आमरसपुरीचा बेत आखावा, पायरी, राजापुरी आंबे रसाला उत्तम.

पण हे क्षण हल्ली दुर्मीळ होत चालले आहेत. बाजारात आंबा विकत घ्यायला गेलात तर दिसते काय तर काळे डाग पडलेले, काळसर, सुरकुतलेले, रसहीन अवकळा आलेले फळ, जे हातात सुद्धा घेववत नाही, आणि किमंती तर काय विचारुच नका. वरुन पिकलेले पण चवीला आंबट असणारे, रसायनामुळे दोन तीन दिवसात संपुर्णपणे पटकन पिकुन चटकन उतरणारे आंब्याची हालत बघवत नाही, हल्ली ह्या फळाची मिजास ओसरत चालली आहे.

ह्या अवनितीस जबाबदार कोण ? निसर्ग की त्यास ओरबडणारा मानव ?
मुबंईत भरणाऱ्या आंबामहोत्सवात बऱ्याच वेळा उत्तम दर्जाचे फळ मिळुन जाते, मी ह्या आंबामहोत्सवात व माझ्या माहितीत दोन कुटुंब आहेत जे विजयदुर्ग व पालशेट वरुन त्यांच्या घरचे आंबे मुंबईत मर्यादित प्रमाणात आणुन विकतात , त्याच्याच कडून आंबा खरेदी करतो.
ता.क. दुबईत पाठवलेल्या आंब्याला दर्जा नसल्यामुळे मागणी अजीबात नाही व तो सर्व माल तसाच पडुन आहे हे वर्तमानपत्रात वाचुन तसे बरे वाटले. आमच्या तोडातला उत्‍तम दर्जाचा माल काढायचा व तो परदेशी पाठवावचा.