"ही एक गॉन केस आहे, या माणसाच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही." , "नाहीतर काय, या बयेची त्यांना फुस काही कमी नाही " - इती माझे साडु व माझी मेहुणी ( दुर्दैवाने मोठी)
"एका बिल्डरची कथा - श्री. सुधीर निरगुडकर " राजाभाऊंनी वाचले व त्यातला काही परिच्छेद आपल्या बयेला वाचायला दिला. पोटात ठिणगी पेटली, रस खदखदु लागले, डोळॆ लकाकले, जिव्हा रसरसु लागली, असा कोणता मजकुर त्यात होता ?
श्रुतिसागर आश्रम, परमपूज्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती, फुलगाव, निसर्गरम्य वातावरणात भिमा नदीच्या तीरी नयनरम्य आश्रम, नव्याने बांधलेले देखणॆ व महाराष्ट्रातील एकमेव "श्री दक्षिणामुर्ती मंदीर" , राजाभाऊ येथे पुर्वी दोन दिवस एकटे जावुन राहिलेले, तेव्हा नियमाप्रमाणॆ तेथे परत जाणॆ होणारच.
तुळापुर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी, संगमेश्वर मंदीर, भिमा, भामा, व इंद्रायणी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगम, श्री.सुधीर निरगुडकरांचा परिसर, त्यांनी कायापालट केलेला, त्यांचे पुस्तक वाचल्यावर परत नव्या ऍंगलने पहाणॆ क्रमप्राप्त.
येथे येणाऱ्या भावीकांची पोटापाण्याची सोय व्हावी ,त्यांना सात्वीक, रुचकर असा आहार मिळावा म्हणुन त्यांनी एका राजस्थानी आचाऱ्याला येथे वसवले. त्या आचाऱ्याची बहुत तारीफ केली त्यांनी आपल्या पुस्तकात. कोडे येथे सुटले.
"चल लवकर ,आपल्याला आत्ता तुळापुर व फुलगावला जायचे आहे."
दुपारी बाराच्या सुमारास मजलदमजल करत ते दोन वीर पोचले थेट उपहारगृहात.
बाहेर दोन बायका उभ्या होत्या.
"काय आहे खायला "
बटाटा भजी, कांदा भजी, बटाटा वडा, मिसळपाव "
"हे माझ्या कामाचे नाही, आम्ही येथे खास सुधीरभाऊंच्या पुस्तकात येथे चंगले जेवण मिळते हे वाचुन जेवायाला आलो आहोत. "
"आम्ही दोन माणसांसाठी जेवण बनवत नाही, मोठा गॄप असेल तरच जेवण बनवतो."
"अहो आता आम्ही जेवणाच्या टायमाला कोठे जावु, आम्ही खुप लांबुन येथे खास जेवायला आलो आहोत "
प्रतिसाद शुन्य.
थोडया वेळाने एक गॄहस्थ काऊंटर वर उभा. त्याच्या कानातली कवचकुंडाले पाहुन मी ओळखले हाच तो. तोच राजस्थानी स्वयपाकी दिसतोय.
मग त्याच्या कडेही अगदी वरील प्रमाणे संभाषण झाले. मग त्या सभ्य गॄहस्थांनी केवळ डाळभात बनवुन दयायचे कबुल केले.
पोटात पेटलेल्या वडवानलापुढे तो लहानश्या डिश मधे आलेला डाळभात केव्हा भस्म झाला कळलेच नाही. त्यांनी ही अगदी मोजकच बनवला होता, अर्धवट उपाशी पोटी दोघ्र उन्हाचे तंगडतोड करत निघाले फुलगावला, आश्रमात.