Saturday, January 22, 2011

स्पाईस किचन , मॅरीयट्स पुणे

सकाळ झाली तशी राजाभाऊंची बायको तणतणायला लागली.
"एक दिवस पण ना जरा. तुझ्याबरोबर एम्प्रेस गार्डन मधे फुलांचे प्रदर्शन बघायला जायचे, परत घरी येवुन जेवण करायचे, तुला काय, तुझे काय ? ."
झाली. सी ९० टेप सुरु झाली.

"अग पण मी काय म्हणतो जरा ऐकुन तरी घेशील का " लढाई सुरु होण्याआधीच पराभव पत्करणे केव्हाही चांगले.
"मला काहीही ऐकायचे नाही सांगीतले ना "
नाटक जरा ताणुन धरायला पाहिजे ना.

"अग आपण प्रदर्शन बघु, कितीतरी वर्षे झाली पाहायच पाहायच करत राहुन जातयं, आणि मग बाहेर जेवायला जावु, आशा डायनींग मधे "

खरं तर राजाभाऊंच्या मनात काहीतरी वेगळॆच होते.

मग राजाभाऊंची दुसरी खडाजंगी त्यांच्या मुलाबरोबर झाली. "बाबा, मी अजिबात आशा मधे येणार नाही, दुसरी कडे कुठेही चल " जराशा वादावादीनंतर मग "इंडस किचन " मधे जेवायला जाण्याची तडजोड करण्यात आली.
खरं तर राजाभाऊंच्या मनात काहीतरी वेगळॆच होते.
आधीच त्या जागेचे नाव सांगीतले असते तर आपल्या नवऱ्याच्या, आपल्या बापाने सांगीतलेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची सवय झालेल्यांनी ते ऐंकले नसते.

खर तर राजाभाऊंच्या मनात सेनापती बापट रोड वर सुरु झालेल्या " मॅरीयटस " मधे ते सुरु झालेल्या पहिल्या दिवसापासुन जेवायला जाण्याची फार फार इच्छा होती, त्यात परत त्यांच्याकडॆ आलेल्या भाच्याला, जो त्यांना नेहमी चांगलेसुरखे खायला घालतो त्याला ही घेवुन चांगल्या ठिकाणी जायचे होते.

पण सरळ "मॅरीयट्स" ला जाणे नाही. इंडस किचन मधे सर्वांना घेवुन जाणॆ, तेथील बुफेचा वाढलेला दर ऐकल्यानंतर मग हळुच पण या पेक्षा मग मॅरीयटस चांगले" करत तेथे घेवुन जाणे, मनाशी योजील्याप्रमाणॆ सारे कसे पार पाडले.

मॅरीयट्स.

एक सुखद अनुभव. एक स्वादिष्ट अनुभव.
आत "स्पाईस किचन " मधे शिरल्या शिरल्या राजाभाऊंची तबीयत येकदम फाईन होवुन गेली, पदार्थ, पदार्थ म्ह्णावे तर किती पदार्थ ? ओरीयटंल म्हणा, इटालीयन म्हणा, अमेरीकन म्हणा, मोघलाई पध्दतीचे म्हणा, जे हवे ते जसे हवे तसेच, अगदी तश्शेच किती प्रकार, हे सारे नुसते चाखायचे म्हटले तरी. माणसाला दोन पोटं असती तर किती बरे झाले असते.

जेवण खुप चांगले होते, आणि त्यांचे आतिथ्य , त्याला तोड नाही.
राजाभाऊंनी एवढे खाल्ले एवढे खाल्ले की आपले वजनदार शरीर त्यांच्याचाने हलवेना, अगदी ताटातील जेवण तोडात जाण्यासाठी जे श्रम करावयास लागतात ते देखिल त्यांना होईना. मग त्यांनी आपल्या बायकोला चमच्याने श्रीखंड भरवायला लावले, एक वाटी, दोन वाट्या, तीन वाट्या, ओरपणे , ओरपणे म्हणजे किती.

शेवटी एक घास श्रीखंडाचा, एक घास काला जामुनचा, एक घास अ‍ॅपल स्टुडल खात जेवणाचा शेवट या पैकी नक्की कशानी करायचा हा निर्णय न घेता आल्यामुळे, तो विचार तसाच अधांतरी ठेवुन ते ताटावरुन उठले.

आता पुढची भेट " शाकाहारी " मधे . त्यांच्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी.

No comments: