दिवस चवथा, भेट पहिली, महालक्ष्मी सरस, वांद्रे रेक्लेमेशन, मुंबई.
धडा क्रमांक एक .
सोबत आपल्याच बायकोला घेवुन अश्या ठिकाणी कधीही जावु नये. एकटॆच जावे.
तोंड मोकाट सुटलेल्या आपल्या नवऱ्याची मुस्कटदाबी करणे , त्याला वेसण घालणे ह्याच्याच कडे त्यांचे बारकाईने लक्ष. नाही स्वःत तबीयतीने खाणार, नाही हे सारे खाण्याचे पदार्थ बघुन वेडापिसा झालेल्या आपल्या नवऱ्याला कशावर ताव मारु देणार. आता फक्त सहा उकडीचे मोदक करायला सांगितले हा काय त्या बापुड्या नवऱ्याचा गुन्हा का झाला ? केवढ्या आपुलकीने त्या देवरुखवरुन आलेल्या बायकांनी राजाभाऊंसाठी परत उकडीचे मोदक करायला घेतले होते.
आजच्या खाद्ययात्रेची सुरवात झाली ती आवळा व मावा पुरणपोळीने. खानदेशी मांडॆ पुरणपोळी अजिबात नही आवडली, बहुदा अर्धीकच्चीच असावी. आज नवऱ्याच्या खाण्यावर कंट्रोल ठेवु पहाणारी बायको साथ असल्यामुळे एकच तांदळाची भाकरी भरल्या वांग्याबरोबर खायला मिळाली, नाचणीच्या भाकरीला नकार द्यावा लागला. असा नकार देणे म्हणजे किती कर्मकठीण काम !
आज सर्वात जास्त आवडलेल्या पदार्थ म्हणजे "हुरड्याचे थालीपीठ, मस्त. एवढे आवडले एवढे आवडले की बोलायची सोय नाही. वटारलेल्या डोळ्याकडे बघुन मग एकावरच समाधान मानावे लागले, अर्थात त्या बाईंना परत परवाला हे खायला येतो असा हळुच वायदा करत.
कधी कधी माफक प्रमाणात अगदीच माफक प्रमाणात बंड करायला मजा येते. बाहेर पडतापडता मासवडीने व त्या सोबत मिळणाऱ्या चमचमीत आमटीने लक्ष वेधुन घेतले. हा क्षण महत्वाचा, तो सोडु नकोस, राजाभाऊ, मासवडी खाल्लाशिवाय आजची खाद्ययात्रा संपवु नकोस, राजेशभाई तुम्हाला माझी कसम.
लालच बोलली.
लालचेला कधीतरी शरण जावे.
No comments:
Post a Comment