वसंत ॠतु मधे अनेकविध रंगाची उधळण करुन काहीसा श्रमलेला निसर्ग , वर्षा ॠतु मधे अगदी ठरवुन केवळ हिरव्या रंगानी सारी श्रुष्टी रंगवुन काढत असावा. पण त्याने त्याचे समाधान होत नसावे, मग त्यात हिरव्या रंगाच्या नाना छटा देत बहरलेल्या सागाच्य़ा पांढुरक्या फुलांनी, फुललेल्या तेरडयांच्या किरमीजी, जांभळ्या, गुलाबी फुलांनी, जांभळ्या रंगाच्या कारवीच्यां फुलांनी काहीशी जाणवणारी उणीव भरुन काढत असावा. आणि हो , मधेच मग हिरव्या रंगाच्या मखमीली गालीच्या वर पिवळ्या जर्द रानफुलंनी नक्षीकाम ही करायला तो विसरत नाही. जेथे नजर जाईल तेथे केवळ हिरवाईच.
निसर्ग साऱ्या धरतीचे हे जे लाडकौतुक या दिवसात करत असतो ते न्याहाळण्यासाठी आज अचानक बेत ठरला, भोर परिसरात फिरायचा. अत्यंत नयनरम्य असा हा परिसर, केवळ नितांत देखणा, जो आता पर्यंत का कोण जाणे पण पहायचा राहुनच गेला होता. आपण भ्रमण प्रेमी, प्रवासाच्या निमीत्ते अनेक परकीय प्रदेश फिरत असतो, पण नेहमीच आपल्या जवळ असणाऱ्या निर्सर्गलेण्याचे आपल्याला एक तर भान नसते किंवा आपण त्याची उपेक्षा तरी करत असतो.
इंगवली गावाजवळ नीर नदीचे चे देखणे रुप, जणु लावण्यवती स्त्री ने परिधान केलेला कंठहार. वळसे घेत ही नदी जो प्रवास करते तो पहाता भान हरपुन जाते.
त्या पुढे लागते ते आंबवडे गाव. पंतसचीवांचे गाव. येथेल्या नागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी ओलांडवा लागतो तो एक छोटुसा झुलता पुल, अगदी लक्ष्मण झुल्याची आठवण करुन देणारा, ओढयाकाठच्या या देवालयाजवळचे पंचगंगा कुंड फार देखणे आहे. देवाच्या दर्शनासाठी येथे खळाखळाणारा ओढा अचानक झेप जो झेप घेतो ते दृश्य ही पहाण्यासारखे आहे.
आता वेध लागले होते ते समर्थांच्या शिवथर घळीच्या दर्शनाचे. आयुष्यात अनेक गोष्ठी नकळतपणे करायच्या राहुन जातात जसे की शिवथर घळीला भेट देणॆ. पण आज हा योग जुळुन आला.
हा पुढील रस्ता अक्षरश्या देहभान विसरायला लावतो, मंत्रमुग्ध करणारी ही वाट नीरादेवघर धरणाच्या, जलाशयाच्या कडेकडेने, काठकाठाने, वळसे घेत घेत हळुवार पणॆ पुढे सरकत रहाते.
वरंधा घाट. वाघजयीच्या ठाण्यापाशी, कडयाच्या पोटात उभे राहुन येथील डॊगररांगा पहाताना आपण किती शुद्र आहोत याची जाणीव व्हायला लागते. कावळ्याजवळी बाळ्या हा सुळाका तर लक्ष वेधुनच घेतो. समोरच्या डोंगर माथावरुन खाली खोल दरीत झेपवणारे धबधबे तर अचंबीत करायला लावतात, किती पाहु की किती नको. काय पाहु नी काय नको ? ह्या साऱ्या परिसराचे हिरवकंच , गच्च भरलेले जंगल, सदा प्रफुल्लीत , सदा सतेज अश्या या घाटातुन पायथ्याला असणाऱ्या शिवथर घळीला जाण्यासाठी उतरावे लागते.
या घळीच्या बाहेर असलेल्या धबधब्याचे वर्णन करतांना समर्थ रामदास स्वामी म्हणतात
गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनी चालली बळे ॥
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥१ ॥
गर्जतो मेघ तो सिंधु । ध्वनीकल्लोळ ऊठिला ॥
कड्याशी आदळॆ धारा । वात आवर्त होतसे ॥२॥
दुपारी गेल्या मुळे येथे प्रसादाच्या खिचडीचे चविष्ट भोजन चाखायला मिळाले, सोबत मस्त पैकी शिराही मिळाला. दुपारी १२ ते १.३०० मधे प्रसादाचे जेवण मिळते.
या परिसरात आता पाऊस थंडावलाय मग त्याची चव घेण्यासाठी परतांना महाबळेश्वर- पाचगणी मार्गे परतण्याचे ठरवले, नाही म्हटले तरी या परिसरात पावसाळ्यात जाणे झाले नव्हते, ते ही आज घडले.
पण त्याच आधी शिवथर घळ ते महाड रस्तावर श्रावणातल्या घन निळ्याने मनमुराद आम्हाला झोडपुन घेतले.
या दिवसात वातावरण फार मस्त असते, बऱ्यापैकी गारवा असल्याकारणाने प्रवास मनाला मोहीवत असतो.
आता वेध लागले आहेत सज्जन गडाचे.
No comments:
Post a Comment