Thursday, May 15, 2008

सोअम




एवढ्या मोठया उपहारगॄहात भोजन करायाला जायचे आणि तेथे जावुन काय तर चक्क पत्रावळीवर जेवायचे ! जळ्ळले मेले ते लक्षण !

माझी म्हातारपणीची काठी (की सोटा ते काळच ठरवेल ) पुण्याला गेला होता. वरळीला कॉपर चिमणी मधे दोघां साठी टेबल आरक्षित केले रात्रीच्या जेवणासाठी. विचार केला आज तिला अवचीत चकीत करु. सायंकाळी कुलाबा उपवन मधे चालता चालता बेत जाहीर केला. पण रस्तात टॅफीक जॅम मधे हळु हळु बेत विस्कटत जावु लागला. मन मागे खेचु लागले, ते उत्तरेकडचे मसालेदार, चमचमीत, तेलकट पदार्थ नकोसे वाटायला लागले. त्यात परत केलेले अनेक निश्चय. मग आता पुढे काय ?

जिथे रुचकर, मधुर, आनंददायक, नाजुक, चविष्ट, रसनेंद्रियांना तॄप्त करणारे असे पदार्थ मिळतील अश्या ठिकाणी जाण्याचा विचार प्रबळ होवु लागला आणि आठवेले ते बाबुलनाथ मंदिरासमोर असलेले ’सोअम’. गुजराती, मारवाडी पद्धतीचे पदार्थ मिळणारे उपहारगॄह. शुद्ध शाकाहारी(?)

आधी जरा किंचीतसा विरोध होता, पण आमरसचे प्रलोभना पुढे तो ढासळत गेला.

सुरवात केली, अमिरी खमण नी, मग पुढे आली डाल ढोकली. ती संपते न संपते तर कॉन पानकी, मस्त पैकी केळीच्या पानात शिजवलेल्या. मस्त मुड बनता चला गया .

मुख्य जेवणासाठी मागवले अलिशान मेथी पिठले आणि भाकरी, आमरस व फुलके लालबटाट्याच्या भाजी सहीत.

मग तिने शर्कराविरहीत डायट (?) आयक्रीम वर सांगता केली.

आणि हो , ह्या साऱ्यांची पेशकश छानश्या पितळी थाळ्यां, वाट्यांमधुन केली जाते.

वेगवेगळ्या प्रकारच्या पानकी खावी तर येथेच. कॅलरी बाबत सावध असणाऱ्यांसाठी तर येथे खास विचार केला आहे. खास त्यांच्या साठी पावभाजी देखील मिळाते.

गट्टॆ का साग, डाल बाटी चुरमा, पुरण पोळी, मसाला फडा खिचडी, मुग डाल खिचडी, पुढच्या खेपेसाठी. केसर जिलेबी, गरम मोतीथाळ, मुगडाळ शिरा, श्रीखंड, आदी पदार्थ नुसते वाचण्यासाठी व आठवण्यासाठी.

सुखाला दुःखाची एक किनार असते, काल मी नजर चुकवुन एकटाच गेलो, व अप्पम चटणी, मागवले. हा पदार्थ येथे मागवल्याचा पश्चाताप झाला. पानकीच मागवायला हवी होती.

No comments: