Monday, May 12, 2008

जव्हार, विक्रमगड व दाभोसा धबधबा


खाजगीतुन फर्मान निघाले, आज स्वारी करायची जव्हारवर. मग काय मना करण्याची काय बिशाद आहे या पामराची. हुकुम शिरसावंद.


अतिलाडाने, अतिपरीचयाने, अतिश्रीमंतीने बिघडलेली बाजारु माथेरान, खंडाळा-लोणावळा व महाबळेश्वर या गिरीस्थानांच्या पलीकडेही जग आहे. हे जग नयनरम्य, सुंदर, शांत, निसर्गरम्य, असुन साऱ्या मानवी कोलहालापासुन, गजबटापासुन,लुटालुटीपासुन दुर आहे. ते जव्हारला आहे.


आता गरज आहे ती चैनीच्या साचेबंद कल्पनांमधुन मुक्‍त होण्याची. वेगळी वाट धारायची.

डहाणु जवळील चारोटी फाट्याजवळ असलेल्या महालक्ष्मीचे दर्शन घेवुन, जव्हारच्या रस्ताला लागलेले लागले की एक वेगळीच अनुभुती येवु लागते, आपण वेगळ्याच विश्वात प्रवेश करतो. हा रस्ता खुप देखणा आहे. दुतर्फा आलेल्या जंगलातुन प्रवास करत आपण केव्हा विनाशीण पोहोचतो ते कळतच नाही. वाटॆत भेटणाऱ्या सुर्या नदीवर धामीणी गावाजवळ तसेच कवडास गावाजवळ धरणे आहेत. तेथे थांबावे, क्षणभर. डोळे भरुन नदीचे दर्शन घावे व पुढे निघावे.


जव्हार मधे सनसेट पॉईंट जवळ रहाण्यास व जेवणास एक छानसे रिसॉर्ट आहे. तेथे मुकाम करुन मग जवळील जयसागर धरण बघायला जावे. घनदाट जंगलातील एक लहानुशी पायवाट या छोटेखानी धरणाकडॆ घेवुन जाते. येथेल्या झाडांवरची जांभळे, आंबे पाडुन किंवा रखवालदाऱ्याच्या सौजन्याने मिळवावीत, खाली तलावाकाठी गर्द झाडीत निवांत पहडुन त्यांचा आस्वाद घेण्यासारखे सौख्य नसावे.

रम्यपणा, शांत पणा तो तरी किती ! काम काय तर एकच. Listen the silence of the nature.

सकाळी हनुमान पॉइंट वर जावे, दुरवर पसरलेला परिसर पाहात बसावे. मग भग्न अवस्थेतला राजवाडा पाहाण्यास जावे, आपल्या पर्यटनखात्याच्या, सरकाराच्या निष्काळजी, बेपर्वा वृत्तीने हळहळत, राजस्थान मधल्या चांगल्या अवस्थेतील पॅलेसची ह्या पडक्या वाडा चिरेबंदीशी तुलना करत दुःखी होत परतावे.


परत येतांना आम्ही दुसरा रस्ता पकडला, विक्रमगड मार्गे परतलो, येथे दिवेकरांचे ’नेचर ट्रेल’ नामक सुंदर रिसॉर्ट आहे त्याला धावती भेट दिली. बर झाले हा रस्ता धरला. मस्त रस्ता आहे. परत परत जाण्यासारखा आहे आणि पावसाळ्यात तर खासच.
पावसाळ्यात मुद्दामुन वाकडी वाट करुन जाण्यासारखे, देहभान विसरुन जाण्यासारखे एक अप्रतीम स्थळ या भागात आहे. अगदी अगदी गिरीसप्पाचा धबधबा देखील विसरुन जाता येईल असे. त्याचे नाव आहे दाभोसा धवधबा. जव्हार पासुन १४-१५ कि..मी. येवढ्याच अंतरावर हा आहे. अलीकडेच येथे दिवेकरांनी रिसॉर्ट काढले आहे.
परतांना पुढे दुसरा रस्ता पकडला. Cross Country Driving. - मनोर-पालघर- माहीम-केळवे-सफाळे-तांदुळवाडी. हा रस्तापुढे वरईला हमरस्तावर मिळतो. अतिशय सुंदर हा रस्ता आहे. श्रावणात तर बघायलाच नको.




No comments: