Friday, May 02, 2008

लढाई महागाई विरुद्ध सुरु

सकाळ झाली मोरु उठला. वर्तमानपत्र वाचायला हाती घेतले. बिग बझारची "लढाई महागाई विरुद्ध सुरु, २०% सवलत " ही जाहीरात वाचुन आनंदाने नाचु लागला. मोरुच्या बायकोला कळेना काय झालय ? आता पर्यंत तर ठिक होता.

मोरु, मोरुच्या बायकोला म्हणाला, चल तयार हो, आत्त्ताच्या आत्ता खाली उतर. नेहमी कोकलत असतेस महागाई , महागाई करुन. पेपर फडकवत पुढे म्हणाला, हे घे, वाच वाच, तेथे लढाई सुरु झाली आहे महागाई विरुद्ध, आणि तु ! तुला काय खबरच नसते. नुसती आरामात लोळत बसली आहेस.

त्या दिवशी फुड बजार मधे खरेदी करतांना कसे मन प्रसन्न होते. कारण ही जीवनमरणाची लढाई होती. २० % सवलतीचा प्रश्न् होता. सदैव कावणाऱ्या, हे कशाला घेतलेस, याची काय गरज ? म्हणणाऱ्या मोरुने त्याच्या बायकोला संपुर्ण स्वातंत्र दिले. कर कर खरेदी कर , अगदी मुक्‍तहस्ते खरेदी कर , मनासारखे काय हवे ते घे, मी तुला कधी काही म्हणालय का ? नको हा शब्द कधीतरी उच्चारला आहे काय ?

मग काय दोघे ही तुटुन पडले महागाई नामक शत्रुपक्षावर. एकेक वस्तु घेतांना जणु काय आपण शत्रुपक्षाचा एक एक सैनीक गारद करी आहोत हा अविर्भाव.

मग वेळ अंतीम वेळ आली. बील बनवण्याची.

मराठे युध्यात जिंकले पण तहात हरले.

संपुर्ण अटी नीट पणे, डोळसपणे न वाचल्यामुळे हाती आलेला २० % सवलतीचा प्रदेश परत करावा लागला.

"बिग बाजार मधे अमुकच तमुकच खरेदी कराल, तर तुम्हाला सवलतीची कुपने मिळतील, ती घेवुन तुम्ही फुड बजार मधे जा व त्या तेथे केलेल्या खरेदी वर सुट मिळवा."

भरल्या हातांनी व रिकाम्या खिश्यांनी मोरु व मोरुची बायको घरी परतली. हरलेल्या मनस्तीतीत.

No comments: