Tuesday, December 30, 2008

ओमर अब्द्दुला


जम्मु आणि काश्मीर मधल्या सर्वांचे अभिनंदन.
त्यांना आता एक तरुण, नव्या विचारसरणीचे नेतृत्व ओमर अब्द्दुलांच्या रुपाने लाभले आहे.
आपले गतवैभव परत मिळवण्याचे दिवस सुरु झाले आहेत. .

कोणीतरी इस्त्रायलला आवरा आता.- Israel presses on with Gaza attacks, toll now 345

दहशदवादाचा मुकाबला करताकरता तेच एक दहशदवादी राष्ट्र झालेले आहे. पैलेस्टाइनींवर जे अत्याकार होत आहेत त्याकडे साऱ्या जगानी आंधळ्याची भुमिका स्वीकारली आहे.

गेले चार दिवसात किडामुंगींना चिरडुन मारावे तसे पाशवी बळाचा वापर करीत निरपराधी नागरीकांना गाझा पट्टीत ठार मारले जात आहे. एखाद्या मुंगीला मारण्यासाठी अणुबौम वापरण्यासारखे हे कृत्य झाले.

Sunday, December 28, 2008

क्या आयडीया है !

काय हो राजाभाऊ, माजी मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख आयडीया मोबाईल वापरतात की काय ?

का हो ? अस का वाटले हो तुम्हाला ?

नाही म्हणजे जाहिरातीत अभिषेक बच्चन नाही का जनतेला आयडिया मोबाईल वरुन विचारतो "खेतो मे मॉल बनवाना चाहीये क्या ? " आणि मग जनता राय देते "ना,ना, ना , ना" , तसेच ह्यांनी जनतेला विचारले व  जनतेनी सांगीतले " आम्ही तुमच्यावर प्रेम करतो, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो".  


बर का राजाभाऊ , ह्यांनाच जनतेच्या रोषाला बळी पडुन काही दिवसापुर्वी खुर्ची सोडायला लागली होती ना ?

अहो चालायचेच, जनतेची स्मरणशक्‍ती फार तोकडी असते ना.  

Saturday, December 27, 2008

Traveller's Tales: The Best of 2008

Traveller's Tales: The Best of 2008

जनाचे अनुभव पुसता - लेखक डॉ.मिलिंद बोकील

आतापर्यंत मिलिंद बोकील यांना मी एक कथालेखक म्हणुन ओळखत होतो, मध्यंतरी त्यांचे "झेन गार्डन " परत वाचले होते. अचानक त्यांची एक समाजशास्त्रज्ञ म्हणुन ओळख समोर आली ती "जनाचे अनुभव पुसता" हे पुस्तक वाचता. 

नैसर्गीक साधन संपत्ती व माणूस यांच्या मधल्या विविध संबधांचे वर्णन करणारे सहा लेख यात आहेत.

"उदक चालवावें युक्‍ति", "प्राण्यांना अभय, माणसांना वनवास ", "लढाई जमिनीसाठी", "किनाऱ्याचा कल्पवॄक्ष ", "भूमिकन्यांचे भालप्रदेश" आणि "भरती आणि ओहोटी’  आदी लेखांमधे त्यांनी पर्यावरण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, आणि पुरातत्त्व, मानवशास्त्र आदी अनुषंगाने नैसर्गीक साधनसंपत्तीची मालकी व तिचे वाटप, प्रकल्पग्रस्थांच्या परत त्यात कोयनेत अभयारणय घोषीत झाल्याने तेथे रहाणाऱ्यांच्या जीवनावर आलेली आपत्ती, मराठावाडयात सरकारी जमीनीवर, गायरानात झालेले अतिक्रमण, घोलवड परीसरात चिकुच्या लागवडीमुळे झालेले परिवर्तन, आर्थीक क्रांती,  मराठवाडयात झालेल्या भीषण भुकंपानंतर विधवा स्त्रीयांचे शेतीच्या आधारे पुनर्वसन, व धरमतरची खाडी, इस्पातच्या कारखान्यामुळॆ पर्यावरणाचा झालेला विनाश, अपार हानी, त्यामुळे आजुबाजुच्यां गावातील लोकांना विस्थापीत व्हायला लागणे आदी विषयांबद्द्ल , स्वानुभवातुन अभ्यासपुर्वक मांडणी केली आहे.

अनेक संस्था, समाजसुधारक, कार्यकर्ते , त्याचे कार्य, त्यांनी घडवुन आलेले परिवर्तन वाचता खोल मनात कुठेतरी एक कळ उमटुन गेली. अरे आपल्यालाही असेच काहीतरी करायचे होते. 

Tata Institute of Social Science मधुन MSW करायचे आपले स्वप्न होते, Govt. Law College मधे कायद्याचा अभ्यास करताकरता MSW करायचे होते. NSS मधुन जोमात काम करता निर्मला निकेतन ,TISS यांचा परिचय बऱ्या पैकी झाला होता, त्याच वाटॆवरुन पुढे चालायचे होते. 

पण जर आपल्याला काय हवयं हे कळत असतें तर.                  

Thursday, December 25, 2008

उपयोग आणि उपभोग

नैसर्गिक साधन-संपत्तीचा वापर जर "उपयोग" या पद्धतीचा न रहाता तो "उपभोग"या प्रकारात मोडायला लागला तर निसर्ग बरबाद होतो, पर्यावरणाचा समतोल ढासळतो. विकास न होता भकास होतो.

हे साधे सुत्र आज मी डॉ. मिलींद बोकील लिखीत "जनाचे अनुभव पुसतां" हे पुस्तक वाचतांना शिकलो.
हे ही शिकलो आपले बरेचसे विचार, आपण करत असलेली टिका, याच्या मागे ज्ञानाची बैठक नसते. हे सारे अपुरे वाचन, बौध्दीक बेशिस्त आणि अर्धवट सामाजिक आकलनापोटी झालेले असते.
तेव्हा आता ...

पदपाथ ? आणि सिंहगड रस्तावर ? भलतच काय तरी काय !

पदपाथ ? छे, काय भलतेच काय बोलता तुम्ही राव ? अस कधी घडलय काय ? नगरनियोजनात हे कधी अस काय बसतय का ? तुम्हाला ठावं नाहि का भाऊ, रस्ते हे फक्त आणि फक्त त्या वर धावणाऱ्या वहानांसाठी असतात.
पायी चालणाऱ्यांचे काय म्हणुन काय वेड्यासारखे विचारता राव , माणसं काय त्यांना कुठुनही कसही , अधुन मधुन रस्त्यामधुन चालायची सवय असते ( जीव मुठीत घेवुन ), ती काय कशीही रस्तातुन चालतील पण वहाने कशी सरळ शिस्तीत सुसाट वेगाने धावायला हवीत की नाही;
अस जर नसते तर नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड ) रस्ता, जेथे रूंदीकरणाचे काम चाललयं, रस्तावरची बांधकामे पाडली गेली , मोकळा केला गेला, क्रौंक्रीटीकरण होणॆ सुरु आहे, ज्या रस्तावरुन लाखो माणसे , पादचारी पाय़ी चालतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांना चालण्यासाठी दोन्ही बाजुला कडॆला पदपाथ नक्कीच बांधले गेले असते की.

काण्या खल्लास.

राजाभाऊ काही खरं नाही बुवा तुमचं, कायाकल्प प्रयोग करुन घेण्याचा आता गंभीरपणॆ विचार करायला लागा, नविन वर्षाचा संकल्पच करा की.

त्याच अस झाल.

परवाचीच गोष्ट. बसमधे तीन मुली चढल्या, पाठोपाठ राजाभाऊ. बस मधे जेष्ठ नागरीकांसाठी राखीव असलेली एकच सीट रिकामी. एक मुलगी खिडकी जवळ बसली, दुसऱ्या जागेवर राजाभाऊंना बसायला त्या तिघींनी सांगीतले. एकतर स्त्रीदाक्षीण्य दाखवायचे म्हणुन राजाभाऊंची बसायची तयारी नव्हती , परत त्यात आपल्या वर जेष्ठ्पणा लाद्ला गेल्याने वाईट वाटणॆ.
काण्या खल्लास. आपण आणि जेष्ठ नागरीक ? अरे देवा ! काय चाललय तुज्या राज्यात ! काय का प्रसंग ?

पण हे काही जणु कमीच होते. जखमेवर मीठ पुढे चांगलेच चोळले गेले.

पुढच्या बसथांब्यावर एक वयस्कर स्त्री बसमधे चढल्या, त्यांनी त्या खिडकीजवळ बसलेल्या मुलीला "जेष्ठ नागरीक ’ सांगुन उठायला लावले. आता आजींबाईंना पण राजाभाऊ जेष्ठ नागरीक वाटले की काय?
असतो एखादा दिवस वाईट. पण ?
पण जेव्हा दुसऱ्या दिवशी देखील.
तेव्हा आता नव्या वर्षाचा संकल्प, परत आपल्यावर हा असा घोर प्रसंग येता कामा नये.

यहा तो बेचने वालो ने

नशेमन ही के लुट जाने का ग़म होता तो क्या ग़म था
यहा तो बेचने वालो ने गुलशन बेच डाला है ॥ -

मुंबईमधे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ला नंतर राजकीय नेते आणि पक्ष यांच्या बेजबाबदार वागणुकीचे प्रदर्शन पहायला मिळाले.
आता तर मुंबईमधे पाकिस्तान वर हल्ला करा, युध्द करा अशी चिथवणी देणारे फलक लागले आहेत, हुतात्मा चौकात आता काहीतरी कार्यक्रम ही होणॆ आहे.
अश्या रितीने वागुन हे नक्की काय, कोणता राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करतात ? यांच्याच राज्यात कारगील मधे आपण मार खात होतो ना ? संसदेवरील हल्ला, अक्षरधाम वरील हल्ला, देशाचे गृहमंत्र्यांचे अतिरेक्याला सोडायला कंदाहरला जाणॆ झाले ना ? मग आत्ताच हा ज्वर निर्माण करण्याचे प्रयोजन काय ? येणाऱ्या निवडणुका ?

ही सर्व नौंटकी का व कशासाठी ?

Sunday, December 21, 2008

क्रोंच वध ते आता भविष्यात होणारे श्वान वध

डॉ.श्रीश क्षीरसागर यांनी आजच्या लोकसत्ता मधे सैबेरीयन क्रेन वर व्यथीत करायला लावणारा लेख लिहीला आहे.
ते लिहीतात " पूर्वी दरवर्षी नेमाने येणारे सैबेरियन क्रेन्स हे राजस पक्षी गेली पाच वर्ष भारतात आल्याचं ऐकीवात नाही. ही हिवाळी स्थलांतराची शतकानुशतकांची परंपरा आता धोक्यात आली आहे. का येत नाहियेत हे पक्षी ? "
युरोप-सैबीरीयातील थंडीच्या कडाक्यापासुन आपला बचाव कसा करुन घ्यायचा हे निसर्गांने त्यांना स्थलांतर कसे करायचे हे शिकवुन त्यांना जगायला शिकवले. पण माणूस म्हणावणाऱ्या दोन पायांच्या पशुंपासुन आपला बचाव कसा करावा हे त्यांना निसर्ग शिकवायला विसरुन गेला. आणि क्रुर माणसांच्या शिकारीला बळी पडत ते आपले अस्तित्व पृथीलोकामधुन संपवत चालले आहेत.
त्यांना बिचाऱ्यांना माहीत नाही ही पृथी केवळ माणसांनाच रहाण्यासाठीच आहे ( निदान आपला तरी तसा समज आहे )
ज्या वाटॆने हे पक्षी गेले त्याच वाटॆने आता कुत्रे जाणार आहेत. तुमच्या परिसरात भटके कुत्रे आहेत, ते भुंकत रहातात काय ? तुम्हाला त्यांचा त्रास होत आहे काय ? मग विचार कसला करता ? त्यांना ठार मारण्याचा रस्ता आता कायद्याने मोकळा झाला आहे.

gappa: Lunch, anyone ? सावकाश जेवा ....ब्लॉगत ब्लॉगत जेवा .....

gappa: Lunch, anyone ? सावकाश जेवा ....ब्लॉगत ब्लॉगत जेवा .....

या ब्लॉगविश्वातील काही अनोळखी ब्लॉगल्स काल एकत्र जमले त्याचा हा वॄतांत. "उगीच कोणीतरी " यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहीलेला.

ब्लॉगवर नेहमी भेटणॆ होतच पण प्रत्यक्षभॆट झाली तर !

मग ती भेट एक अविस्मरणीय अनुभव होवुन रहाते.

आता पुढच्या भेटीत आणखी ब्लॉगर्सना जाणुन घ्यायला मला आवडेल

संगीत मेजवानी

यंदाला नाताळाला सांताबाबा राजाभाऊंसाठी आगळीवेगळी भेट घेवुन आलाय.

"तीनप्रहर", या संपुर्ण दिवसभर चालणाऱ्या या शास्त्रिय संगीताच्या कार्यक्रमाची सुरवात होणार आहे एका अवलिया च्या, मुकुल शिवपुत्रांच्या गायनाने सकाळी दहा वाजता व सांगता होणार आहे वीणाताईच्यां गाण्याने रात्री १० वाजता.

तेव्हा २५ डिसेंबर, मु,पो. नेहरु सेंटर, मुंबई.

वात्सल्यसिंधु आई

Posted by Picasa

दर्द

आपल्याला दर्द होतोय, विरहाच्या वेदना त्रस्त करताहेत, प्रेमज्वर झाल्याने मुश्किल होत चालले आहे हे दिलाने कसे ओळखावे ?"



जर त्याने मदनमोहनचे व लताचे हे गाणे ऐकले नाहि तर त्याला, दिलाला, आपली ही झालेली अवस्था कधीछ उमजायची नाही.



प्रितम मेरी दुनीया मे दो दिन तो रहे होते

हम प्रेमकी सागर मे एक साथ बहे होते ॥



अगर मुझसे बिछडना तुझे ओ जालीम

दो बोल मुहब्बतके हमसे न किये होते

राज ने कर दिया नाराज

चुकुनही खाजगी वाहन वाहतुकीच्या वाट्याला न जाणारे राजाभाऊंनी काल का कोण जाणे पुण्याला जाण्यासाठी "राज ट्रॅव्हल्स" च्या बसमधे जागा आरक्षित केल्या आणि पस्तावले, कदाचीत ते त्या दिवशी दुपारी अंधेरीला होते, सोबत वयस्कर माणसे होती, तेव्हा शिवनेरीसाठी दादरला न जाता जवळच्या वांद्रा येथुन बस पकडणॆ सोईचे वाटले असल्या मुळे, पण झाली दुर्बुद्धी झाली खरी, त्याची फळे आता त्यांना भोगायची होती.

आराम हॉटेल, कलानगर जवळ उभे रहायला त्यांना सांगितले गेले. तेथे गेल्यानंतर नशिबाने कळले आपल्याला राज ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्यानी चुकीची माहीती दिली, बस येथे येत नसुन कलानगरच्या सिग्नल जवळ येते.
बस सुटायची होती २.४५ वाजता. संगितल्या प्रमाणॆ दुपारी २.३० वाजता जागी पोहोचलेले ते व त्यांचे वयस्कर नातलग, भर दुपारी, उन्हात, रस्तात सव्वातास बसची वाट बघत ताटकळत उभे, झक मारले आपण यांच्या नादाला लागलो या विचाराने स्वतःला दोष देत.

संतापुन राजवाल्यांना राजच्या कार्यालयाला दुरध्वनी लावला, एकाकडुन दुसऱ्या कडॆ दुसऱ्या कडुन तिसऱ्याकडॆ असा तो कॉल फिरत राहीला , पारा वरवर चढु लागला, प्रत्येकाला ह्या बसला झालेल्या विलंबाने, दिरंगाईने होत असलेला त्रास सांगण्यात त्याची शक्ती खर्च होवु लागली,

प्रत्येक वेळीस जबाबदार प्रमुख व्यक्तीशी मला बोलायचय, बोलायचय करता करता वेड लागायची पाळी आली. शेवटी राजाभाऊंनी संतापुन " आता या शारीरीक व मानसीक त्रासाबद्द्ल मी आता ग्राहक न्यायालयात जाणार असल्याचे त्या माणसाला सांगीतले.

त्या "जबाबदार" माणसाने "तुम्हाला काय करायचे ते करा, जरुर जा " असे उर्मटपणे सांगुन फोन ठेवला.
राज ट्रॅव्हल्स सारख्या एका मोठ्या प्रतिष्ठीत कंपनी कडुन ही वागणुक त्यांना अपेक्षीत नव्हती.
तेव्हा आता .........

Sunday, December 14, 2008

भाषांतर = http://translate.google.com

Enter text or a webpage URL. Translation: English » Hindi

my son's name is ram = मेरे बेटे का नाम है मेढ़े

English > Hindi

पण एकंदरीत सोय चांगली आहे

हो सोय असल्याचे या http://expressamit.blogspot.com ब्लॉग वर कळले

असं का ?

माझं पुण्यात घर असतं तर नक्की मी दरवर्षी सवाई गंधर्व महोत्सवाला गेलोच असतो.
आता पुण्यात घर झाले
पण ....
या वेळी तरी शनिवार-रविवारी मी नक्कीच जाणार.
पण....

पुढल्या वर्षीतरी नक्कीच जायचे.

कशासाठी ?

आईना देख अपनासा मु़ह लेकर रह गयी
साहिब को दिल न देने पर कितना गुरुर था ॥

काही माणसं स्वतःच्या प्रतिमेच्या इतक्या प्रेमात पडली असतात की मग त्यांना आजुबाजुच्या परिस्थितीचे भान रहात नाही, वेळप्रसंग कोणता काय याचे तारतम्य रहात नाही, ते आपल्यातच मश्गुल असतात, आपण जे काही करु ते दुसरे भजणारच याबद्दल त्यांची पक्की खात्री असते.

काय गरज होती अतिरेक्यांच्या हल्लाच्या वेळी दुर मुंबईमधे येवुन त्या प्रकरणात नाक खुपसायची, करोडोचे इनाम जाहीर करण्याची अन करोडोची मदत देवु करायची ?

भुकेल्या पोटीचि चीडचीड - वैशाली मधे

स्थळ वैशाली, वेळ सकाळाचे दहा. प्रसंग - भरपुर गर्दी , भुकेलेलो मी.

अश्या सर्वात जास्त चीड कोणती येत असेल तर चार माणसांचे टॆबल अडवुन बसलेल्या त्या दोघांची. काळ संथ गतीने त्यांच्यासाठी पुढे सरकत असतो, माणसं खोळंबुन मागे उभी आहेत याचे भान नाही, गप्पा म्हणाजे किती, त्या जरुर माराव्यात , पण या गर्दीच्या वेळी व या उपहारगृहात नव्हे, निवांत तास दोनचार तास बसता येतील अश्या ठिकाणी जावुन जरुर माराव्यात. इतर दोघे त्यांच्या मुळॆ जागा असुन देखील भुकेले उभे आहेत हे जाणुन आपण खावुन खसकायचे असते की.
पण . चला यांचे खावुन झाले, आता आपला नंबर. पण. आता यांचे बील येईल, पण.
दोन कॉफी आणा.
एक घोट घेतला, ग्लास खाली ठेवला, गप्पा, परत एक घोट घेतला, ग्लास ........
माझा धीर संपत चाललेला.
सारे केवळ त्या मसाला डोसा, आणि म्हैसुर डोश्यासाठी आणि अर्थात वैशालीच्या माहोलसाठी देखील

Saturday, December 13, 2008

ग़म -मौजे़ ग़म से किई ना हो मायुस जींदगी डुबकर उभरती है

ग़म कि दुनीया रहे आबाद "शकिल"
मुझ नसींबमे कोई जागीर तो है !

किंवा

मै "शकिल" उनका होकर भी ना पा सका हूं उनको
मेरी तरहा दुनीयामे कोई जीत कर भी न हारे !

शकील कधीतरी झपाटुन टाकतो.

मग कधीतरी लताचे काळीज पिळवटुन टाकणारे स्वर आठवतात

"मुझे ये ग़म है कि मेरी जुबां ने कुछ न कहा "

तर कधी सैगल "गम दिये मुस्तकील कितना नाजुक है दिल ये ना जाना ,हाय हाय ये जालीम जमाना "

पण असं का ?

कालआज कडे चंद्र काय चिकना दिसतोय, बहुदा पॄथ्वीच्या खुप जवळ आला आहे.

कोणे एके काळी ऐन जवानीत खगोल मंडळ शनिवारी रात्री वांगणीला आकाशनिरिक्षणाचा कार्यक्रम आयोजीत करत असे त्याला मी दरमहा जायचोच जायचो. रविवारी माझे कार्यालय उघडे असायचे, साप्ताहीक सुट्टी सोमवारची. शनिवारी कार्यालयातुन थेट वांगणीला जायचे, थंडीवाऱ्यात कुडकुडात रात्रभर जाग्रण करीत आकाश न्याहाळायचे, पहाटेची गाडी पकडुन दिड दोन तासाचा प्रवास करुन घरी व लगेच ९ वाजता कार्यालयात हजर.
वाटे अरे शनिवार, रविवारी सुट्टी असती तर किती बरे झाले असते. आपला हा छंद, गिर्यारोहणाचा छंद चांगलाच जोपासता येईल.

आता शनिवार रविवार सुट्टी असते पण .........

मै भी वही हुं तुम भी वही है
हाय मगर वो बात नही !
तारे वही है चांद वही है
हाय मगर वो रात नही !!

पदरावरती भरजारीचा मोर नाचरा हवा

माणसं !

माणसं !- लेखक - अनिल अवचट.

काही लेखक झपाटून टाकतात, भारावुन टाकतात, मन सुन्न करायला लावतात, विचार करायला लावतात, मन शरमेने खाली घालायला लावतात, वाचकांना आपल्या बरोबर घेवुन जातांना. समाजाबद्द्ल त्यांनी केलेला विचार पाहुन जगण्याचा एक नवा दॄष्टीकोन ते आपल्याला देत रहातात.

पुर्वीचा एक लेखक धरुन त्याची सर्व पुस्तके वाचुन काढण्याचा परिपाठ कालगतीत कोठेतरी हरवुन गेला, या धकधकीच्या, वेगावान, ताणतणावाच्या जीवनात वाचनच होईनासे झाले तसे त्या वाचनाला दिशा मिळाणेही नाहीसे होत गेले. आता मात्र वाटायला लागलय पुन्हा एकदा वाचन सुरु होत चालले आहे.

माणसं !- लेखक - अनिल अवचट.
"एकंदरीत "हाकलले जाणॆ" हेच ज्यांच्या जीवनाचे सूत्र" अश्या कष्टकरी, नाडलेल्या, पिडलेल्या आपल्याच समाजातील "आपल्यांचेच" वर्णन करणारे हे पुस्तक. अनिल अवचटांची तशी ज्वळजवळ सर्व पुस्तक वाचुन झली असतील पण सलग पणे नाही तेव्हा आता परत एकदा अनिल अवचट. एखादे पुस्तक आपण परत एकदा वाचायला घेतो तेव्हा ते आपल्याला जास्तच भावत जाते, अधिक उमजत जाते, त्यातली सौदर्यस्थळ नव्याने जाणवायला लागतात.

आता पर्यंत प्रस्तावना वाचणॆ कधी फारसे जमले नव्हते. पण -

"जगभरचा हा रिवाज पाहून कोणी असेहि अनुमान काढलेले आहे की प्रत्येक देशातील मानवी समाजाला अशी एखादी जमात आपल्यामधे असण्याची गरजच भासत असावीसे दिसत, की जिच्या माथी समाजातील सगळे दोष व सगळी घाण लादता येइल, जिला सतत राबवून घेता येइल, जिची सतत हेटाळणी आणि कॄर थट्टा करता येईल. जिच्यातील पुरुषांना घाण्याचे बैल बनविता येईल व स्त्रियांना भोगदासी म्हणून वापता येईल " हे श्री. नानासाहेब ग. गोरेंनी लिहीलेले वाक्य वाचले आणि मग ती वाचल्यावाचुन राहवले नाही.

केवळ जगण्यासाठी, केवळ हा देह चालता, बोलता, फिरता रहावा म्हणुन, त्यातली धुगधुगी जेवढ्यापर्यंत तेवत रहाता येईल तो पर्यंत. ढोरमेहनत, ढोरमेहनत आणि शेवटी खाटिकखान्यात पोचलेल्या ढोरासारखे मरण हेच ज्यांच्या पाचवीला पुसले आहे ते, मग ते गावाकडॆ मानाने जगणारे पण दुष्काळग्रस्त झाल्याने देशोधडीस लागणारे असोत की जन्मभर कशाकशाची बोझी वहात त्या बोझ्यांखाली पिचत जात रहाणारे हमाल असोत. शहरात उदारनिर्वाह साठी येवुन नरकावस्तेतील झोपडपट्ट्यांमधे रहाणारी असोत की .....

सर्वांची कथा, कर्मकहाणी आणि व्यथा एकच.

हि अशी मनाला आलेली अस्वस्थता घालवण्यासाठी "छॆ , हे असे कधी असते काय ? डॉ. नी जरा अतीच भडकपणॆ, अतिशयोक्ती करीत लिहिले आहे" अशी मनाची वांझोटी समजुत घालत आता रहायला हवे.

Tuesday, December 09, 2008

अशी माणसे - श्री. जयंत सोनाळकर

मनुष्यस्वभावात जर कोणती गोष्ट दुर्मीळ असेल तर ती म्हणजे दुसऱ्याचे कौतुक करणे.

दुसऱ्या व्यक्ती बद्द्ल नुसतेच चांगले बोलणे नव्हे तर मनापासुन त्याचे कौतुक करणे, त्याला प्रोत्साहन देणे, सतत पाठीवर शाबाशकीची थाप मारणे हे फरच कमी लोकांना जमते. या अश्या वेळी माणसे फार कंजुष होवुन जातात.

अश्या कंजुष व्यक्तींना गरज आहे ती श्री जयंत सोनाळॅकरांना भेटण्याची. जीवनात दुसऱ्याला आनंद कसा द्यावा हे शिकुन घेण्यासाठी
श्री. जयंत सोनाळकर, माझ्या वडीलांचे दोस्त. एखाद्याचे कौतुक करावे तर त्यांनीच.

कत्तल की रात

कालची रात्र, आजका दिवस.

धर्माच्या नावाखाली किती बकरे कापले जाणार आहेत हे केवळ अल्ला जाणे.

Monday, December 08, 2008

अशी माणसे.

आम्ही पैसे दिले आहेत. तेव्हा हिशोब मागणे हा आमचा हक्क आहे.

सहा वर्षापुर्वी हाती घेतलेल्या फार मोठ्या स्वच्छता मोहीमेत लोकवर्गणी काढली तेव्हा रहिवाश्यांनी मारुनमुकटुन जेमतेम घरटी दर महा रु. २५ व दुकानदारांनी र.५० वर्गणी दिली, ते ही दोन महिने आणि ते सुद्धा दहा वेळा खेपा मारल्यानंतर.
एका गल्लीत किती रहिवासी, दुकानदार असुन असुन असणार आहेत ? किती वर्गणी जमा झाली असेल ? आणि या दोन महिन्यांच्या जमा झालेल्या तुटुपुंज्या रकमेवर गेली सहा वर्षे नागरीक संघटनेचा कारभार कसा चालवला गेला असेल ? दरमहा सफाई कर्मचाऱ्याला पगार कुठुन देत असतील ? २०-२५ वर्षे तुडुंब घाणीने भरलेल्या घरगल्या , ज्या मधुन जवळजवळ ५०-६० ट्रक भरुन कचरा काढला गेला त्याला किती खर्च आला असेल ? तीन चार महिने काही अतीउत्साही लोकांनी या साठी किती कष्ट उपसले असतील, दिवसरात्र ? हा प्रकल्प पहायला येणाऱ्या मोठमोठ्या लोकांच्या सरबाईत किती खर्च आला असेल ? या तीन-चार जणांनी मिळुन अतिरीक्त खर्चाचा किती भार उचलला असेल ?
कशाचाही विचार न करता ते गॄहस्थ सहा वर्षापुर्वी दिलेले ५० रुपये अजुनही लक्षात ठेवुन होते, ते गॄहस्थ ते शेजारी जे आम्हा सर्वांना आमच्या जन्मापासुन चांगलेच ओळखुन आहेत. अगदी घरचे संबंध. त्यांना सांगणॆ एकच होते जेव्हा आपण गॄहनिर्माण सहकारी संकुलात रहातो तेव्हा आपण दरमहा ५०० रु पासुन कितीही रक्कम देत असतो ना. मेंटेन्ससाठी. ही माफक रक्कम ( जी पुढच्या महीन्यात १५ रु. केली गेली ) आपण आपला परिसर स्वच्छ रहाण्यासाठी देणार आहोत.
तरी बरे एक वर्ष पुरे झाले तेव्हा सर्वांना बोलवुन पै न पै चा हिशोब दिला होता.
मुंबईचे शेरीफ व दोन रहीवासी यांनी या कामाने प्रेरीत होवुन एकुण २१,००० रु. देणगी दिली. ती रक्कम बॅकेत मुदतीची ठेव ठेवुन अजुन पर्यंत आम्ही लोक कारभार खेचत आलो आहोत. तरी बर पैशाचा कारभार एका प्रतिष्टीत जेष्ट नागरीकांच्या ताब्यात सुरवाती पासुन दिला.

त्या रात्री वाईट वाटुन घेवुन रात्र भर झोपलो नाही.

Sunday, December 07, 2008

अलिप्तता

हा असा कसा मी सर्वांपासुन अलिप्त रहायला लागलोय ?
कोणत्याही चांगल्या वाईट प्रसंगात मदतीसाठी सर्वप्रथम धावुन जाणारा मी आता कोणाकडेही जावेसे वाटत नाही, जात नाही , का बरे अशी मनाची अवस्था होत चालली आहे ?
ही अलिप्तता आली कुठुन ? का ? आणि कशासाठी ?

तेव्हा आणि आता

समुद्रमार्गे ब्रिटीश आले, पोर्तुगीज आले, फ्रांन्सीसी आले, सिद्दी , हबशी आले, आपल्यावर राज्य करुन गेले,
आरमाराचे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले, आरमाराची स्थापना केली, जलदुर्ग बांधले.
काळ बदलला.
समुद्रमार्गे अतिरेकी येवु लागले. हल्ले करु लागले. आम्ही चर्चा करु लागलो. दोनचार दिवसांनी येरे माझा मागल्या

"आरामधाम" दैवज्ञ समाजोन्नत्ती परिषद महाजनवाडी व सोलकरी











तर असे अचानक नांगरगावी जाण्याचे ठरले. कोणीतरी दैवज्ञ समाजोन्नत्ती परिषद महाजनवाडी मंडळ ट्र्‌स्ट यांनी नांगरगाव, लोणावळ येथे त्यांच्या ज्ञाती बांधवांसाठी बांधलेल्या "आरामधाम" मधे दोन खोल्या आरक्षीत केल्या होत्या. राजा उदार झाला आणि आम्हाला त्यात रहाण्याचे निमंत्रण मिळाले.

राजाभाऊंनी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली म्हणाजे ती काळ्या दघडावरची रेष. लोणावळ्याला जातांना न्याहारी करायला "सोल करी" मधे जाय्चे म्हणाजे जायचे. मग कोणतीही किंमत द्यावी लागली तरी चालेल.

आरामधाम , खरच काम करुन करुन, ताणतणावाचे आयुष्य जगुन जगुन पराकोटीचा कंटाळा आला असेल, थकवा आला असेल तर अश्या जागी जाणॆ . काहीच करायला नाही सिवाय आराम के.

दै.स.प. महाजनवाडीने खुप उत्तम सोय केली आहे. रहाण्यासाठी चांगल्या मोठाल्या हवेशीर खोल्या, जेवणाची चांगली व्यवस्था.

भल्या पहाटॆ आजुबाजुचा परिसर पहाण्यासाठी निघालो, निवांत. जवळच्या एका वास्तुने आकर्षीत केले. " मानेकलाल सॅनीटॊरीयम" , काय भला मोठा परिसर आहे त्यांचा मग त्य झाडांमधेले रहाण्यासाठी बंगले, जेवणासाठी गुजराती थाळी. परत केव्हातरी जाण्यासाठी मनात लक्षात ठेवायला हवे.

काय मस्त मऊसुत इडली होती, सांबारही छान होते, कांदा उत्तप्पाही आवडला. प्रश्नच नाही.
सोलकरी मधे केव्हातरी परत जेवायला जायला हवे, दाक्षिण्यात्य पद्धतीचे जेवण यथे चांगले मिळावे. अखेरीस श्री. विठ्ठल कामताचे आहे ना. पण घरापासुन खुप दुर पडते ना.

विठठ्ल कामत. यांच्या "इडली ते ऑर्कीड्स " या प्रवासाचा "सत्कार" पासुनचा मी साक्षीदार. तेकदा त्यांना तसे लिहुन पाठवले, उत्तरादाखल त्यांनी पंचधातुचे पेले पाठवले. यातुन पाणी प्या, ते आरोग्याला चांगले असते म्हणुन.

How Thoughtful.

तुळापुर व फुलगाव


"ही एक गॉन केस आहे, या माणसाच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही." , "नाहीतर काय, या बयेची त्यांना फुस काही कमी नाही " - इती माझे साडु व माझी मेहुणी ( दुर्दैवाने मोठी)


"एका बिल्डरची कथा - श्री. सुधीर निरगुडकर " राजाभाऊंनी वाचले व त्यातला काही परिच्छेद आपल्या बयेला वाचायला दिला. पोटात ठिणगी पेटली, रस खदखदु लागले, डोळॆ लकाकले, जिव्हा रसरसु लागली, असा कोणता मजकुर त्यात होता ?

श्रुतिसागर आश्रम, परमपूज्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती, फुलगाव, निसर्गरम्य वातावरणात भिमा नदीच्या तीरी नयनरम्य आश्रम, नव्याने बांधलेले देखणॆ व महाराष्ट्रातील एकमेव "श्री दक्षिणामुर्ती मंदीर" , राजाभाऊ येथे पुर्वी दोन दिवस एकटे जावुन राहिलेले, तेव्हा नियमाप्रमाणॆ तेथे परत जाणॆ होणारच.

तुळापुर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी, संगमेश्वर मंदीर, भिमा, भामा, व इंद्रायणी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगम, श्री.सुधीर निरगुडकरांचा परिसर, त्यांनी कायापालट केलेला, त्यांचे पुस्तक वाचल्यावर परत नव्या ऍंगलने पहाणॆ क्रमप्राप्त.

येथे येणाऱ्या भावीकांची पोटापाण्याची सोय व्हावी ,त्यांना सात्वीक, रुचकर असा आहार मिळावा म्हणुन त्यांनी एका राजस्थानी आचाऱ्याला येथे वसवले. त्या आचाऱ्याची बहुत तारीफ केली त्यांनी आपल्या पुस्तकात. कोडे येथे सुटले.

"चल लवकर ,आपल्याला आत्ता तुळापुर व फुलगावला जायचे आहे."

दुपारी बाराच्या सुमारास मजलदमजल करत ते दोन वीर पोचले थेट उपहारगृहात.

बाहेर दोन बायका उभ्या होत्या.

"काय आहे खायला "
बटाटा भजी, कांदा भजी, बटाटा वडा, मिसळपाव "
"हे माझ्या कामाचे नाही, आम्ही येथे खास सुधीरभाऊंच्या पुस्तकात येथे चंगले जेवण मिळते हे वाचुन जेवायाला आलो आहोत. "
"आम्ही दोन माणसांसाठी जेवण बनवत नाही, मोठा गॄप असेल तरच जेवण बनवतो."
"अहो आता आम्ही जेवणाच्या टायमाला कोठे जावु, आम्ही खुप लांबुन येथे खास जेवायला आलो आहोत "
प्रतिसाद शुन्य.

थोडया वेळाने एक गॄहस्थ काऊंटर वर उभा. त्याच्या कानातली कवचकुंडाले पाहुन मी ओळखले हाच तो. तोच राजस्थानी स्वयपाकी दिसतोय.

मग त्याच्या कडेही अगदी वरील प्रमाणे संभाषण झाले. मग त्या सभ्य गॄहस्थांनी केवळ डाळभात बनवुन दयायचे कबुल केले.

पोटात पेटलेल्या वडवानलापुढे तो लहानश्या डिश मधे आलेला डाळभात केव्हा भस्म झाला कळलेच नाही. त्यांनी ही अगदी मोजकच बनवला होता, अर्धवट उपाशी पोटी दोघ्र उन्हाचे तंगडतोड करत निघाले फुलगावला, आश्रमात.


Friday, December 05, 2008

कॅमेरा जाणकारांची मला मदत हवी आहे.

अती वापराने माझा Nikon coolpix P2 आजारी पडला आहे त्याच्या रोगाचे निदान कुणी मला जाणकार तज्ञ सांगु शकेल काय ? हे त्याचे प्रताप.









परिस्थिती काय याचे कोणासही भान नाही ??

मुंबईवर झालेला अतिरेक्यांचा हल्ला , तो रोखण्यात आलेले अपयश, प्रत्यक्ष हल्ले होत असतांना परिस्थिती योग्य रितीने हाताळण्यात आलेले अपयश या साऱ्या पाश्वभुमीवर राजीनामे दिले गेले.
हे सर्व राहीले दुर, बळी पडलेल्यांच्या, हुतात्मा झालेल्यांच्य वीरमरण पावलेल्यांच्या जीवावर यांचा सत्तासंघर्ष सुरु. निदान या वेळी तरी तो आवरता घा.
ता.क. हा मी असा अस्वस्थ का बरे होत आहे. कोणीही येवो, तुमच्या आमच्या जिवनात याने काय फरक पडणार आहे काय ?
तेव्हा

Just relex.

देव म्हणतो चोरी करा पण मला पुजा

पाण्यात पाय सोडुनी बसलेला वटवॄक्ष


आम्ही असे कसे ?




सांडपाण्यातुन जाणाऱ्या या जलवाहीन्या म्हणाजे रोगांना , मृतॄला आमंत्रण. 

पवनाकाठचा धोंडी



पवनाचा जलाशय, तुंगी,तिकोन्याचा परिसर हा नेहमीच मला भुरळ घालत आला आहे, गेल्या वेळी पावसाळ्यात मी पौड कडुन काळॆ कॉलनी कडे या परिसरात एकट्याने भ्रमंती केली होती. पण खरतर मनापासुनची इच्छा होती लोहगडच्या पोटाशी, कुशीत असलेल्या खिंडीतुन या दिशेने परिसर न्याहळत येण्याची, हा परिसर डोळॆ भरुन पहाण्याची व त्यापेक्षा चल म्हटल्यावर दुसऱ्याच क्षणी बॅगा भरणाऱ्या व तिसऱ्या मिनीटाला खाली उतरणाऱ्या माझ्या अर्धांगनीला हा नितांत सुंदर परिसर दाखवण्याची. ( बरे झाले देवा निदान खाणॆ आणि फिरणे या दोनतरी बाबतीत तु आमची आवड सारखी ठेवलीस नाहितर आयुष्यभर तुला माझ्याकडुन बोल ऐकुन घ्यायला लागले असते.) तर, ज्या ज्या जागी माझे एकट्याचे जाणॆ झाले होते, जो आनंद मी एकट्याने उपभोगला होता त्या ठिकाणी तिला घेवुन जाणॆ हा माझा शिरस्ता, मग या परिसरासाठी तो अपवाद कसा ठरावा ?  
 
या मार्गावर दुधवरे खिडं ओलाडल्यानंतर पलीकडे श्री.बाबामहाराज सातरकर यांनी अप्रतीम विलक्षण  देखणी वास्तु उभारली आहे असे ही ऐकुन होतो, "चैत्यन्य धाम" लाही जाण्याचे मनात होते, वाटेत न्याहारी करायला त्यांना "सोल करी" मधे ही त्यांना घेवुन जायचे होते. 








हे सारे एकदम अकस्मात जमुन आले.   

गंमत जंमत

गेले तीन दिवस देशाचे संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, कॄषीमंत्री, हवाई वाहतुक मंत्री  राज्यातील समस्त मंत्रीमंडळ, आमदार, नेतेमंडळी केवळ या राज्याचे ने्त्रुत्व कोणी करायचे हे ठरवण्यासाठी आपली   बहुमुल्य कामे बाजुला ठेवुन गंभीर चर्चा करत आहेत. 

धन्य आहे. 

क्या कुल है हम ! कौन बनेगा मा.मु.? और कौन मारेगा "फुंक" वेदनांवर?

आपण कोणत्या परिस्थितीत नेता निवडतो आहे याचे ही भान या कौग्रेसी नेत्यांना नसावे ? दिवसभरच्या आमदारांशी चर्चा मग सर्वसंमतीने नेता निवडीचा अधिकार पक्षश्रेठींना देणे ही नेहमीचीच , दरवेळीची नौटंकी निदान या वेळी तरी होणार नाही असे कुठेतरी वाटत होते. 

कोठेतरी वाटत होते तडकातडफी एखादा कणखर नेतॄत्व असणाऱ्याचे नाव ( Oh no. Not him ) कोणताही घॊळ न घालता तत्काळ जाहीर होईल, कारण शेवटी हा जनतेचा गमवलेला विश्वास, त्यांचा आत्मविश्वास परत मिळावण्यासाठीच हे सारे नाट्य घडत आहे.  आता या कालाव्यपयानंतर बदल झाला काय नी नाही झाला काय एकच. उगीच थोडक्या कालाविधीसाठी कसला उगाच ? 
 
या पेक्षा मग होते ते काय वाईट होते असे म्हणायची वेळ आलीय, 
 
खर म्हणजे काल "अखेर गंगेत घॊडे न्हाले" असे आधी शिर्षक ठरवले होते. 
 
प्रगतशिल महाराष्ट्रात कर्तबगार राजकारणी मंडळींच्या कॄपेने, वीज नव्हती, लोडशेडींगच्या अंधारात कोण झाले मुख्यमंत्री हे कळायला वाव नव्हता. काल दुपारी तीन वाजता नाव जाहीर होणार होते. 


आज दुसरा दिवस उजाडला, मागच्या पानावरुन पुढे लिखाण सुरु.     

Wednesday, December 03, 2008

अखेर विलासराव गेले तर

कसे नशीब असते बघा, या अतिरेक्यांच्या हल्ला आधी पदावरुन गेले असते तर नामुष्कीली पदरात पडली नसती, आता त्यांची नोंद इतिहासात फारश्या चांगल्या शब्दात लिहीली जाईल असे वाटत नाही.
 
नविन येणारे मुख्यमंत्री मनात म्हणत असतील, 
 
"बरे झाले रे देवा, या आधी नाही झालो ते. अपयशाचा धनी व्हावे लागले असते."
 
आता असे वाटते की आपल्या राज्याला एक नवीन चेहरा असलेला, कणखर नेता मिळाला हवा ज्याच्या मुळे सामान्य माणसाला आपले जीवन सुरक्षीत वाटॆल. नेहमीचीच तीच तीच आलटुन पालटुन येणारी माणसे आता नकोशी झाली आहेत. 
 
श्री. पॄथ्वीराज चव्हाण यांच्या बद्द्ल, त्यांच्या कार्यक्षमतेबद्द्ल,   मी फार चांगले वाचलेले आहे. ते आपले मुख्यमंत्री बनतील तर मला आवडेल.  
 
पण शेवटी यांचे शहकाटशहाचे राजकारण आहे ना !!

अशी माणसे.

स्मरणशक्ती चांगली असणे हे एक वरदान की शाप हा प्रश्न मला नेहमी पडतो. अनेकदा आलेले कटु अनुभव खुप वेळ मनात रेंगाळात रहातात. 
 
घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य, सरबाई उत्तम रीतीने करणॆ, जेवणात चांगले चांगले नानाविध पदार्थ करुन ते पाहुण्यांना मनोसोक्त खिलवणॆ ही आम्हा उभयंतांची आवडीची बाब. कोठेही कसलीच कमतरता रहाता कामा नये.
 
एकेठिकाणी जवळाच्या माणसाने आम्हाला व आमच्या एका नातेवाईकांना जेवायला बोलावलेले. 
 
सर्वजण आत वातानुकुलीन शयनकक्षेत महफील रंगवत. आम्ही दोघे शाकाहारी, मद्यपान न करणारे, बाहेर दिवाणखान्यात. 
 
मग केव्हातरी दोन ताटे मांडुन गॄहस्वामीनी परत आत निघुन गेल्या. जणु काय आपल्याकडे गडीमाणसांसाठी कसे जेवण बाजुला काढुन ठेवले जाते तसे. कुठल्यातरी उपहारगृहातुन केव्हातरी आणलेली आणि आता थंडगार झालेली, बेचव पंजाबी पद्धतीची भाजी, रस्तावरच्या टपरीतुन आणलेली भजी. सर्व पदार्थ एकाच वेळी ताटात मांडलेले. 
 
काय हवे नको विचारायचे नाव नाही, अन्नाचा अपमान नको म्हणुन जेवलो, परत त्यांच्या कडे जायचे नाही हे ठरवुन. 
 
ता.क. बायकोन मंगला गोडबोलेंच "अशी घर अशी माणसं " हे पुस्तक वाचायला घेतल्यापासुन माझाही डोक्यात अश्या प्रकारचे लिहायचे हा किडा वळवळायला लागलाय. त्यात परत सद्ध्या  रजेवर आहे, ताप भरलाय , पुस्तके, ब्लॉग  आणि चित्रपट पहाणॆ हाच उद्योग राहीलाय.  
    

कॄष्णकमळ


हळुच पानापानातुन डोकावुन पहात होते 

अशी माणसे

ओळखीचा चोर जीवे मारी म्हणतात हे नक्कीच खरे असले पाहिजे. 
 
मुंबईला जाण्यासाठी दोन दिवस भाड्याची इंडीका गाडी ठरवायची होती, म्हटले संकुलातच दुकान असणाऱ्याची ठरवली म्हणजे बर. 
 
"गाडी हवी होती."
"मिळेल ना, केव्हा हवी." 
"पुढच्या शनिवार, रविवार साठी, मुंबईला जायचे आहे, असा माझा कार्यक्रम आहे. 
६ रुपये कि.मी. नी गाडी पडेल, रात्रीचा चालकाचा भत्ता वेगळा, २५० कि.मी. दिवसाला कमीतकमी. टोल तुमचा. गाडी तुमच्या कडे असल्यामुळे मग तुम्ही गाडी कोठेही फिरवा,  आम्हाला कि.मि, प्रमाणे पैसे मिळाल्याचे कारण. जाण्याआधी दोन दिवस अगोदर आगावु रक्कम द्या."
"ठीक आहे. मी गुरुवारी येतो."
 
गुरुवारी पैसे द्यायला गेलो. त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या आपल्या मुलाला बोलवले.
 
"यांना दोन दिवसासाठी गाडी हवी आहे."
 
मुलानी आपला मोबाईल काढुन फोन लावायला सुरवात केली. पुढे काय होणार आहे याची चाहुल लागल्या मुळे मी अस्वथ.
 
"५००० हज्जार रुपये होतील."
 
मी अवाक. काहीही न बोलता दुकानातुन उठुन बाहेर. त्यांच्या वडीलांच्या हिशोबाप्रमाणे ३३०० रु. होत होते.
 
प्रसंग दुसरा.
 
नुकतच लग्न झाले होते. बायकोला सोन्याचा नेकलेस घ्यायचा होता. गिरगावात म्हाप्रळकरांकडे गेलो. 
 
"मी अमुक तमुक यांचा मुलगा. नेकलेस घ्यायचा आहे."
 
"हो ना. ओळखतो मी त्यांना ते नेहमी छोट्या छोट्या वस्तु घ्यायला येतात."(कुठे एखाद्या बारश्यासाठी लहानसे कानातले इं. घेणार) 
 
दोन नेकलेस आवडले.
 
म्हाप्रळकर म्हणाले.
 
"दोन्ही नेकलेस घेवुन घरी जा, घरच्यांना दाखवा, आवडाला तो ठेवुन घा, दुसरा परत करा"
 
"अहो पण माझा कडॆ एवढे पैसे नाहीत."
 
"मी तुमच्याकडॆ पैसे मागतो आहे काय ?"
 
विश्वासाने त्यांनी आम्हा अनोळखी जोडप्यांना दागिने एकही पैसा न घेता घरी न्यायला दिले.    
 
आता बोला. 
 
ओळखीचे बरे की अनोळखी ?  

भीमथडी जत्रा.

जेरी कसा चीजच्या वासाने वेडापिसा होतो व चीज खाण्यासाठी धावतो, अगदी तसाच हा राजाभाऊ वागत असतो. 

भिमथडी जत्रा भरणार म्हटल्यावर त्याला त्याचे वेध लागुन राहीले, जीव वेडापिसा झाला, केव्हा येकदा चुली वरच्या भाकऱ्या खातो असे त्याला झाले.


उद्दघाटनाची फित कापण्याआधीच ते पोहोचले मंडपात, ते ही कसे संयमी पवित्रा घेवुन, येकदमच तुटुन नाही पडले. प्रथम   चहुबाजुने चारी अंगाने सर्व स्टॉलचे निरीक्षण केले गे्ले, कोणाकडे काय मिळाते, ते कुठुन आले आहेत, काय कस काय वगैरे वगैरे. 

मग पुर्ण विचाराअंती त्यांनी इंदापुरवरुन आले्ल्यांकडे मक्याची भाकरी ( ही केवळ त्यांच्याच कडे मि्ळत होती ), मेथीचे पिथले, वांग्याचे भरीत, मिरचीचा ठेचा हा्णण्याचे निश्चीत केले. 

त्रुप्ती. केवळ ब्रम्हानंदी टाळी.

पण या नादात त्यांनी मोठी घोडचुक केली. या प्रदर्शनात उत्तम दर्ज्याचे आंबेमोहोर व इंद्रायणी तांदुळ विकायला होते.  हल्ली वयोपरत्वे ते केव्हाकेव्हा वेड्यासारखे वागतात तसेच तेथे वागले आणि आता रोज सकाळ संध्याकाळ जेवतांना हळहळातात, अरेरे आपण जास्त विकत घेतले असते तर !

आंबेमोहराचा भात शिजत असतांना त्याचा दरवळणाऱ्या सुवासाने तर ही अपराधी पणाची भावना खुपच तिव्र होवुन रहाते.  

त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा. - STAY ALERT STAY ALIVE


१९६२ सालच्या चीन बरोबर झालेल्या युध्दात आपल्याला पराभव पत्करायला लागला. मुंबईत झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्लातही आपण पराभुतच पावलो आहोत. केवढी मोठी किंमत आपण दिली आपण बेसावधपणामुळॆ. 
 
१९६२ साली झालेल्या चुकांबद्दल अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे आर्मीनी हा फलक लावला आहे. तेव्ह्याच्या चुका आणि आत्ताच्या यात फारसा फरक नाही.

साल २००८ , बरोबर ४६ बर्षे झाली, आपण अनुभवातुन काहीच शिकलो नाहीत का ?     

प्रसन्नमुद्रा


राजाभाऊंची तीन दिवस मजा आहे तर.  डॉ. सुचेता भिडे चापेकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त चार ते सहा डिसेंबरदरम्यान "परिक्रमा" हा वि्शेष महोत्सव आयोजीत केला आहे.  

जायच त्याला बर का. 

Tuesday, December 02, 2008

पुनरावॄत्ती ? ? ?


श्री स्वामी अच्युतानंद महाराज की जय हो.

श्री स्वामी अच्युतानंद महाराज की जय हो. 
 
काल स्वतःला स्वानकुळातील एक घटक म्हणुन घोषीत करुन त्यांनी समस्त स्वानांना धन्य केले.     

मी काय म्हणतो किती घाबरायच माणसाने आपल्या बायकोला ?


मी एक आठवडा नव्हती तर सबंध घराची वाट लावुन टाकलीत तुम्ही बापलेकांनी". 
 
बाप लेकांची नजरानजर. या प्रसंगाला सामोरे जाण्याची ते दोघे आठवडाभर तयारी करत होते. 
 
आल्याबरोबर जर कोणती गोष्ट तिने केली असेल तर बापलेकांनी घरात केलेले जरासे बदल रद्दबादल करुन साऱ्या गोष्टी मुळच्या जागेवर, जागच्या जागी नेवुन ठे्वल्या.    
 
त्यात परत एक नवे नाते लाभलय, भाचे सुन आलीना. मग आता ती सासुबाई झाली म्हणायची.
मग सासरेबुवांना धाकात ठेवायला नको का ? 
 
स्वातंत्र संपले म्हणायचे !

Monday, December 01, 2008

युती गेली ढगात

ज्या खगोलशास्त्रीय घटनेची, चंद्र, शुक्र आणि गुरु यांच्या आज होणाऱ्या युती पहाण्यासाठी आतुरतेने वाट पहात होतो ती आज साऱ्या पुणॆ शहरावर ढगाने आच्छादन मांडल्यामुळे पहाता आली नाही, पदरी निराशा पडली. 

आज दिवसभर बऱ्यापैकी उकडत होते मग आता जराशी एक पावसाची सर ही ऐवुन गेली .