Thursday, December 16, 2010

चाल चाल चालवणे

अडीच . अडीच महिने. गेल्या अडीच महिन्यात राजाभाऊंच्या गाडीवर कोणत्या कोणत्या गावातील मातीचे थर साठले गेले असतील ते सांगणे महामुश्कील.

अनेक वर्षाच्या मनाच्या गाभाऱ्यात खाली खोलवर कुठेतरी दाबुन ठेवलेल्या इच्छा या अश्या एकाएकी उफाळुन वर आल्या आणि मग काय गाडीला लागलेले चक्र थांबायचे नाव नाही. आधीच ते भटके त्यात ती सात भटकी. कधीच नवऱ्याची कोणतीही गोष्ट ऐकायची नाही असा पण केलेल्या बाईस नवऱ्याची फक्त एकच आज्ञा कळते " उठ आणि चल"

ऐन तारुण्याच्या नशेत नाशिक परीसरात केलेल्या चांभार लेणी, रामशेज किल्ला ते वाघाड धरण ते पेठ, सुरगाणा " या पदभ्रमंतीत राजाभाऊंना मधुनच वाघाड धरणाकडुन परतायला लागले होते. श्री.सुरेश परांजपे, नाना नित्सुरे हे पुढे गेले होते. तेव्हा पासुन या पेठ, सुरगाणा विभागात फिरायचे होते ( जे वेळेअभावी या वेळीसही राहुन गेले आणि राहुन गेले ते वळण न कळल्यामुळे राजगुरुनगरच्या पेठ अभयारण्यात शिरणे.) नाशकात फिरणे, राजधानी मधे जेवणे, जहागीरदारांकडे बिस्कीटांसाठी जाणॆ, सिन्नरचे गारगोटी संग्रहालय , नाशिक मधले तोफखाना संग्रहालय पहाणे व सापुताऱ्याला जावुन निवांत रहाणे येवढ्यापुरतेच या वेळी सारे सीमीत राहिले.
डांग.
" डांग, बेळगाव, निपाणी आणि कारवार सहीत संपुर्ण महाराष्ट्र झालाच पाहिजे " मधला डांग. गुजराथनी गिळंकृत केलेला डांग व अशी मागणी आपण कधीकाळी केली होती हे मराठी माणसांकडुन विसरला गेलेला डांग.

सापुताऱ्याला दोन गोष्टी फार भावल्या, सापुताऱ्याची मदहोशी थंडी, कचकचुन पडलेली थंडी आणि रात्रीच्या वेळी वीज गेल्यानंतरचे दिसलेले आकाश , खच्चुन ताऱ्यांनी भरलेले आकाश. स्वच्छ आणि निरभ्र. लाखो ताऱ्यांनी उजळुन निघालेले काळोखी आकाश, राजाभाऊ आणि आकाश ह्यामधे कसलाही, अगदी प्रकाशाचा सुद्धा अडथळा नसलेले आकाश आणि ते व त्यांचे आकाश निरीक्षण.

सापुताऱ्यात राजाभाऊंना रहायला एक मस्त जागा सापडली. स्वामीनारायण मंदिराच्या आवारात त्यांनी रहाण्यासाठी बांधलेल्या खोल्या. खोल्या, ज्या मंदिराच्या असल्यातरी त्याचे दर मात्र धर्मार्थ नसलेल्या, चांगल्या प्रशस्त खोल्या. आणि रात्रीच्या थंडीत खाल्लेली गरमागरम मुगाच्या डाळीची खिचडी. अजुन दोन चार दिवस रहायला मिळायला पाहिजे होते. तबीयत एकदम फाईन होवुन गेली असती.


मजा आली.

1 comment:

sonal m m said...

तुम्ही नाशिकला गेला होतात? नशिकबद्दल काहीही ऐकलं की माझे कान टवकारतात :)