Thursday, September 23, 2010

रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !

रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !.

अलिकडे केव्हा तरी कोणत्यातरी पुस्तकात या गौळणीचा ओझरती उल्लेख वाचला होतो, मग ते गाणे तुटक तुटक डोक्यात नुसते भिरभिरत राहिले. याचा अर्थ काय उमजत नव्हता. 

रात्र काळी, हो ती काळी असते, काळीकुट्ट असते, जंगलात, पर्वतमाथावर, दरीत, गुहेत, गुंफात, लेण्यातल्या मुक्कामात अनुभवली होती. पण यमुना काळी ? घागर काळी ? गोऱ्यागोमट्या कृष्णसखीची घागर काळी ? काळे विषारी पाणी , कालीयामर्दनाने ?

ज्या यमुनेच्या तीरी कृष्णाच्या मुरलीच्या नादाने भुलुन जावुन त्या साऱ्या गोपी, गोपीकृष्णासंगे रासाचे नृत्य करायचे त्या यमुनेचे रुप कसे हे असे काळॆ ? मग या अश्या ह्या  नदीकाठी कश्या काय या लीला घडत असतील ? विरहणी कश्या बहाणे काढुन कृष्णसख्याला भेटायला येत असतील ? या यमुनेचे रुप तर कसे साजरे, लाजरे, गोजीरवाणे, देखणे हवे . यमुना काळी ? रात्र काळी ? घागर काळी ? जेथे कृष्ण तेथे तर सर्व कसे आनंदमय असायला हवे.

मग ही यमुना अशी यमुना-कालिंदी का ? का ? का ? 

मग त्याचे उत्तर दुर्गाबाई भागवतांच्या "पैस" मधे सापडले.

"यमुना नि दु:ख याची सांगड परंपरेने घातली आहे. मरण, विरह, निराशा यांचे कल्लोळ तिच्यात सतत परंपरेने उठवत ठेवलेले आहेत . भयाणाची जाण तिला पाहूनच होते. 

पुढे त्या लिहितात,

" यमुना नि मृत्यू यांची सांगड वैदिक यमयमीच्या भग्न प्रेमकथेत आहे. लहानबहिण वडील भावावर प्रेम करते. त्या काळी हे प्रेम  अनोखे नव्हते. पण यम हा नितिधर्माचा नवा पुरस्कर्ता. तो हे प्रेम सफल होवु देत नाही. बहिणीशी लग्न करणे पाप ठरवून तिला निराश करतो. यमी विकल होते. यम हा प्रथम मरण पावणारा माणूससुद्धा होतो. तो सूर्यपुत्र तसाच मानवही आहे आणि म्हणूनच यमी नदीरूपाने मानवलोकी आली, पण यमीची खरी शोकात्मिका यमाच्या मरणात आहे. विरहात ती त्याच्यावर प्रेम करत जगत होती. तो मेल्यावर ती शोकाकुल झाली, वेडी झाली. तिला दु:खाचा विसर पडावा म्हणून देवांनी रात्र केली. यमी झोपली. दु:ख विसरली. काळ्या यमुनेला काळ्या रात्रीचा आसरा प्रथम इथेच मिळाला. ही काळी कालिंदी शोकाने विकल झाल्यानंतर काळ्या रात्रीमुळे स्थिरावली. यमीला साधले नाही ते यमुना नदीने साधले. यमाला भाऊ म्हणून जेवायला बोलावले. बिजेचा काळा रंग उजाळला. "




2 comments:

Ashwin said...

'पैस' हे दुर्गाबाईंचं केवळ अप्रतिम पुस्तक आहे. आत्ता तुमची पोस्ट वाचून मला परत एकदा या सुरेख पुस्तकाची आठवण झाली. दु:खकालिंदी हा ज्ञानदेवांचा शब्दही काय सुन्दर आहे!!
पोस्ट वाचून हे सारे परत एकदा मनात ताजे झाले. धन्यवाद!!

Narendra prabhu said...

क्या बात है।