मधले चार दिवस राजाभाऊ कल के कलाकार संगीत संमेलनामधुन अचानक गायब झाले होते, ते आज शेवटच्या दिवशी उगावले. वेळेवर संगणकावर Turn Off वर उंदीराची टिचकी मारायला किंवा दिवसेंदिवस, रात्र रात्र घरातुन गायब राहिल्याबद्द्ल बायकोच्या रोषाला सामोरे जाण्यासाठी एक जबरदस्त धैर्य अंगी असावयास लागते. ते राजाभाऊंनी आणायचे कुठुन ?
आज शेवटच्या दिवशी त्यांनी एक गंमत केली, ते रंगमंचावर चाललेले भोपाळाच्या आमीर खानचे सरोद वादन सोडुन मागील खोलीत पोचले, तेथे मुंबईचे सोहम मुनीम सतारवादनाच्या कार्यक्रमाच्या आधी सराव करत होते ते ऐकण्यासाठी. ते त्यांनी खुब ऐकले. मजा आली. हे खरे ऐकणॆ.
आज कार्यक्रमाची सुरवात अहमदाबाद वरुन आलेल्या शिवानी पटेल यांनी गायलेल्या चंद्रकौस नी झाली. त्यानंतर बहार आणली ती नवी दिल्लीवरुन आलेल्या रंजन कुमार श्रीवास्तव यांनी व्हायोलीनवर वाजवलेल्या पुरीया कल्याणनी.
राजाभाऊंनी मग मुंबईच्या आशिष साबळॆ यांनी गायलेला बिहाग ऐकला. त्यांच्या आधी एकजण बिहागडा गावुन गेले, पण त्यांचे नाव कळाले नाही.
आज राजाभाऊंच्या बायकोने सुटकेचा निश्वास सोडला, आता उद्यापासुन आपल्या लहरी नवऱ्याचे पाय घराला वेळेवर लागतील या खोट्या आशेने.
आज राजाभाऊंना एक गोष्ट प्रकर्षाने वाटु लागली ती म्हणजे बऱ्याच वेळा गातांना, आक्रमक गातांना, समोरच्याला बरे वाटावे म्हणुन गातांना, चढ्याने गातांना त्या बंदीशेचा मुळ आत्मा हरवुन जातो, त्या बंदिशीला, त्या रागाला काय सांगायचे आहे, किती लडिवाळपणे,लाडात, प्रेमात, प्रेमीकांच्या प्रणयचेष्टा कश्या चालल्या आहेत हे उलगडुन सांगायचे असते. पण "पायलीया झनकारे मोरी " मधे नाजुक पायल निनादण्याऐवजी छनछन छनछन घुंगरु वाजत रहातात. .
लट उलझी सुलजा रे बालम ह्या बंदिशीचे , बिहागचे खरे सौंदर्य उलगडुन सांगितले ते तात्या अभ्यंकरांनी. ती ऐकतांना हा तरुणाईचा प्रणय, ते नादावणॆ, खुळावणे, तो मोहणॆ, सारे सारे डोळ्यापुढे यायला हवे.
लट उलझी सुलजा रे बालम ह्या बंदिशीचे , बिहागचे खरे सौंदर्य उलगडुन सांगितले ते तात्या अभ्यंकरांनी. ती ऐकतांना हा तरुणाईचा प्रणय, ते नादावणॆ, खुळावणे, तो मोहणॆ, सारे सारे डोळ्यापुढे यायला हवे.