आता प्रर्यंत बॄ. म.न.पा ने अनेक स्वच्छता मोहीमा हाती घेतल्या. सर्वच फसल्या. आता चकचक मुंबई ही खाजगी ठेकेदारांच्या मार्फत नवी मोहीम हाती घेतली आहे. अस्वच्घता करणाऱ्यांना मार्शल्स दंड करणार आहेत. तस बघयला गेले तर हा एक फार चांगला उपक्रम आहे म्हणायचा. पण तो किती दिवस टिकतो हे पहाणॆ महत्वाचे.
एक गोष्ट स्पष्ट आहे, ज्यात लोकसहभाग नाही त्या मोहीमा व्यर्थ आहेत. ही सारी तळमळ आपल्या अंतःकरणापासुन आली पाहीजे. अश्या गाजावाजा करत सुरु झालेल्या मोहिमा फक्त चार दिवस टिकतात, शहर आहे तसेच बकाल रहाते.
आपण रहात असलेले शहर, हा परीसर माझा आहे या भावनेने जेव्हा तो परिसर दत्तक घेतला जातो , आपल्या अपत्याप्रमाणे त्याची काळजी घेतली जाते ,तेव्हाच आपले शहर रहाण्यालायक होत असते. शेवटी आपण हे सारे आपल्यासाठीच करत असतो. आपल्या पुढील पिढी साठी करत असतो.
केवळ नकारात्मक द्रुष्टीकोन ठेवत, ही कामे माझी नाहीत म्हणात, या नागरी समस्यांची सोडवण्यासाठी आपण अजुन किती दिवस सरकारी यंत्रणेवर अवलंबुन रहाणार आहोत? या यंत्रणेलाही काही मर्यादा आहेत. जर आपल्याला अस्वच्छता, वाहतुककोंडी, प्रदुषण यांचा त्रास होत असेल तर तो त्रास दुर करण्यासाठी, आपल्या मदतीला दुसरे येतील याची वाट न बघता, स्वःताला स्वःताच मदत करुन त्याचे निवारण करायला हवे. बहुतांशी या समस्या आपणच निर्माण केलेल्या असतात, आपले घर स्वच्छ केल्यानंतर तो केरकचरा ईतरांच्या दारात, रस्तावर, नाल्यात आपणच टाकलेला असतो. वेडीवाकडी वाहने चालवुन, शिस्त न पाळत आपणच वाहतुक कोंडी केलेली असते.
प्रत्येकाच्या मनात आपण काही तरी केले पाहीजे ही भावना असतेच असे नाही, ज्याच्या मनात असते त्यांना आपण नक्की काय करायला हवे त्याची माहीती नसते. मुळात अशी जाणीव सर्वांना करुन देणे महत्वाचे असते. आपण रहात असलेला परीसर अस्वच्छ्तेमुळे किती नरकासमान आहे, त्या मुळे रोगराई पसरली आहे, आपल्या मुलांना खेळण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी आपल्या परीसरात जागा नाही याची जेव्हा जाणिव होते तेव्हा लोकसहभागातुन परीसराचे रुपांतर नंदनवनात होण्यास वेळ लागत नाही.
लोकांना ही जाणीव करुन द्यायची कोणी ?
आता गरज आहे ती म.न.पा. चे अधिकारी, नगरसेवक यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याची. त्यांनी लोकांमधे जावे, परीसरात लोक उपलब्ध असतील तेव्हा, रात्रीच्या वेळी, रजेच्या दिवशी स्थानीक पातळीवर सभा घ्याव्यात, त्यांचे मार्गदर्शन करुन मतपरीवर्तन करावे, त्यांना शपथ घ्यायला लावावी, लागल्यास स्थानीक पोलिस स्थानकाची मदत कायदा मोडणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी घ्यावी.
कचरा रस्त्यावर टाकु नका हे सांगणे सोपे आहे, पण तो कोठे टाकावा या साठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तो घरात रोज दोन वेगळ्या कचऱ्याच्या डब्यात साठवला जावा, हिरवा डबा ओल्या कचऱ्यासाठी व लाल डबा सुक्या कचऱ्यासाठी. रोजच्यारोज ठरावीक वेळेस ओला कचरा गोळा केला जावा, सुका कचरा नेण्यासाठी कचरा वेचणाऱ्या कामगार संघटनेची मदत घेवुन, त्यांच्या माणसांना आपल्या परीसरात नेमुन, तो दिला जावा, जेणे करुन त्यांचे ही पोट भरेल.
एकदाच युद्धपातळीवर सारा परीसर नागरीकांनी मनपाच्या मदतीने, वेळप्रसंगी लोकवर्गणी काढुन साफ करावा, लोकांना शिस्त लागे पर्यंत गस्त घालावी, न ऐकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी, सुरवातीचे हे पथ्य सांभाळले की आपोआपच पुढचा मार्ग सोपा होतो, प्राथमीक गरज असते ती आयुष्यभर जोपासलेल्या वाईट सवयी मोडण्याची.
ही जाणिव आम्हाला करुन दिली ती मुबंई महानगरपालीकेचे अधिकारी श्री. सुभाष दळवी यांनी. केवळ एका , फक्त एका सभेत, लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात घेतलेल्या सभेत, त्यांनी रहिवाश्यांचे मतपरिवर्तेन केले, आयुष्य भरच्या चुकीच्या सवयी केवळ एका रात्रीत सोडवल्या.
आम्ही रहात असलेल्या मुबंईतील एका परीसरातील, नरकासमान असलेल्या घरगल्ल्यांची (दोन ईमारतीतील मोकळी जागा, रहीवाश्यांची केरकचरा, घरात नको असण्याऱ्या सर्व वस्तु हक्काने खाली भिरकवण्याची जागा, त्यात भर पडते ती सांडपाण्याची, डासांची, घुशींची, ) जटिल समस्या लोकसहभागातुन पाच वर्षापुर्वी सोडवली व गेली पाच वर्षे त्या स्वच्छ अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत.
या स्वच्छ्ता मोहीमेस आम्हाला मोलाचे मार्गदर्शन व मदत लाभली ती श्री. सुभाष दळवी यांची. या समस्येचा त्यांच्या कार्यालयीन कामाशी प्रत्यक्षात संबध नसतांना देखील केवळ आपले शहर स्वच्छ व्हावे या सद्दभावनेनी त्यांनी आम्हाला दिवसरात्र मदत केली. त्यांच्या बरोबर म.न.पा.च्या घनकचरा व ईतर विभागाने जी मोलाची मदत केली, केवळ त्या मुळेच आम्ही आज एका स्वच्छ परिसरात रहात आहोत.
1 comment:
अगदी बरोबर आहे. कचरा आपण करणार, मग स्वच्छ करायला सरकारने का पुढे यावे?
पण ही मोहीम यशस्वी होईलही कदाचित. सिंगापूरमधेही सुरूवातीला अशा मोहिमा राबवल्या गेल्या होत्या.
Post a Comment