Wednesday, March 30, 2022

श्री वडोबा

 एकदा का कानफाट्या नाव पडले की मग कितीही स्पष्टीकरण दिले तरी त्याचा काहीच उपयोग नसतो. राजाभाऊंनी कितीही जोरात आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला व तो प्रथमदर्शनी काळेकाकुंनी जरी मान्य केला असला तरी अविश्वासाची छाप काही केल्या लपुन रहाणे नाही. कालच्याला खरंच सकाळी "श्री वडोबा " मधे जावुन मिसळ खाण्याचा राजाभाऊंचा इरादा नव्हता. असे घाईगडबडीत तेथे जावुन उगीचच खायचं म्हणुन जाणे त्यांना नको होतो. "श्री वडोबा" ला अगदी निवांतपणॆ भेट देवुन तेथली मिसळ, बटाटेवडे, चवीचवीने खाण्याचा बेत होता. 

पण त्याचे काय झाले, ते सकाळी घरुन काहीही न खाता गाडी कात्रजला सर्विसला देण्यासाठी निघाले. घाईगडबडीत रस्त्यातही काही खाण्याचे राहुन गेले. (मुद्दामुन राहुन गेले असा एक आक्षेपाचा मुद्दा , जाण्याचे आधीपासुनच ठरले होते हे ठावुक आहे ) पोटात नुसता 'वडा'वानल पेटलेला होतो,   भुकेने काही सुचेनासे झाले, रहावेना. स्वस्थ बसवेना. केव्हा एकदा घरी जातो असे झालेले.

एक तासात गाडी मिळणार म्हटल्यावर मग वर्कशॉप मधे बसुन रहाण्यापेक्षा लगेचच राजाभाऊंनी "श्री वडोबा " मधे मिसळ खाण्यासाठी जाण्याचे ठरवले. सोबत दुसरी गाडी होती, चालकाला घेवुन राजाभाऊंची स्वारी पोचली "श्री वडोबा" मधे.  खवळलेल्या भुकेने त्यांना काहीच सुचत नव्हते, कधी एकदा मिसळ समोर येते आणि आपण ती पोटात ढकलतो असे झाले होते.  त्यात चालकाला परत लवकर घरी पाठवण्याचा जबरदस्त असह्य होत चाललेला तगादा. 

ह्या साऱ्या गड्बडीत काय खाल्ले नी काही नाही काहीच कळाले नाही. 

जे झाले ते योग्य नाही झाले. तेथे जावुन मिसळ शांतपणे खायची होती, बटाटेवड्याचा चवीचवीने आस्वाद घ्यायचा होता. त्या दिवशी राहुनच गेले. 

कळतनकळत आपल्या हातुन खाण्याचा खाण्याचा योग्य तो मान राखला गेला नाही ही ठुसठुशीत राहिलेली अपराधीपणाची भावना दुर करायाची असले तर त्यावर प्रायचित्त एकच.

पुन्हा एकदा "श्री वडोबा " ला फुरसतीत भेट देणे.

REPOST




No comments: