Tuesday, March 15, 2022

राम आश्रय

 कोणाच्या नशीबी कधी , कोठे, कुठले, कसे खाणे असेल ते सांगता येत नाही हा राजभाऊंचा आवडता सिद्धांत आणि आपल्या नवऱ्याला घराबाहेर पडल्या पडल्या प्रचंड भुक कशी लागते हा काळेकाकुंना पडलेला प्रश्न.

संध्याकाळी फाउंटनला कामाला गेलेले राजाभाऊ कसे कोण जाणे ( अर्थात जाणुनबुजुनच ) पोचले ते माटुंग्याला. "राम आश्रय " मधे. 

आज "रामानायक" मधे भोजन करण्याची त्यांची तिव्र इच्छा होती ( जी सकाळी उठल्याउठल्या त्यांच्या मनात आली होती ) , पण त्याला समोरुन काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळॆ अर्धवट राहिली. 

पण कसं नशीब असते. रसमभात नाही तर नाही, पोटात निदान रसम तरी. सांबारभात नाहीतर नाही, निदान डोश्याबरोबर तरी सांबार, पायसम नाहीतर नाही निदान पायनापल शिरा ही सही, ताटात न कळणारी भाजी नाहीतर नाही मिळाली तरी निदान डोश्यातली भाजी , माटुंगा स्टेशन बाहेरचे नाही तर नाही निदान समोरचे "राम आश्रय " तरी मिळाले.

राजाभाऊंच्या पापात सहभागी व्हायचे पण सर्वच पापात नाही . "राम आश्रय" चालेल. पण "रामा नायक" नको, ही कोणाची तरी मानसिकता कधीतरी बदलेलं अशी इच्छा बाळगत मग राजाभाऊंनी आपल्या खाण्याची सांगता "पान"  खात खात केली.









No comments: