गेले कित्येक दिवस, महिने, वर्षे राजाभाऊंची तडफड होत होती. एक साधी इच्छा आणि ती पण पुरी होवु नये ?
आज राजाभाऊ घरातुन बऱ्यापैकी लवकर निघाले, होणारी गर्दी टाळायला, नकोसे होणारे ताटकळत बसण्यापासुन दुर रहायला. पण नियतीच्या मनी काही वेगळेच होते. तिला आजच नेमकी राजाभाऊंची परिक्षा बघायची होती. गाडीत बसले. नवाकोरा टायर भुईसपाट. काय पनवती मागे लागली आहे हे केवळ परमेश्वरच जाणॆ. टायर बदलणॆ, पेट्रोलपंपावर जावुन पंक्चर काढणे ह्यात तासदिड तास गेला. वाटेला लागे लागेपर्यंत पोटात भुक चांगलीच धडका मारु लागलेली. सकाळीच ह्या महामुर्ख माणसाच्या डोक्यात घुसायला पाहिजे होते की आज लालबाग, परळ भागात जाण्यात अर्थ नाही. सार्वजनिक गणपती घेवुन जाण्यासाठी मंडळांची आज लगबग चालु असेल. चिंचपोकळी ट्रॅफिक जॅम. गाडी वळवली , ना.म.जोशी मार्गावर. तेथे ही जॅम. गाडी माघारी वळवली , पण निराश होवुन नव्हे तर नवा मोकळा मार्ग शोधायला. तुळशी पाईप रस्ता, तो पण थोडा काळ जॅम. पुढे परळला वळल्यावर परत रस्ता जॅम. परत वळले. दुसरा रस्ता घेवुन ते मग इप्सीत जागी पोचले. गाडी उभी करायला जवळपास कुठेच जागा मिळेना. एवढ्या अडचणी आल्या पण राजाभाऊंचा धीर तसा खचत चालला होता पण काळेकाकु त्यांचे मनोधैर्य मधुन मधुन वाढवत राहिल्या होत्या. आणि त्यामुळेच मग राजाभाऊंदेखील "दुनिया की कोई ताकद आज मुझे रोक नही सकती " हे आपल्या मनाला संपुर्ण प्रवासात बजावत राहिले.
घरातुन निघाल्यापासुन जवळजवळ तीन तासाने शेवटी ते कसेबसे पोचले "रामा नायक श्री कृष्ण बोर्डींग " मधे जेवायला. पण तेथे गेल्यावर मात्र त्यांचे हातपाय गळले तेथली गर्दी पाहुन. धडपड केल्यावर कधीतरी असा एखादा क्षण येतो की तेव्हा वाटते " लेट इट गो ". पण काळेकाकु परत एकदा ठामपणे मागे उभा राहिल्या. वीसपंचवीच मिनिटाने का होईना त्यांचा नंबर लागला.
जेवतांना राजाभाऊंना आपली ही एवढी धडपड, पोचण्यासाठी जीवाचा केलेला आटापीटा सार्थकी लागल्याचे समाधान मिळाले.
आज पाल पायसमचा बेत. त्यात परत अवीयल, कच्च्या केळ्याची भाजी, बटाटाची रस्सेदार भाजी, ताजेताजे लोणचे, श्रीखंड, घट्ट दही, रसम, सांबार, भाताच्या मुदी, आणि पापडम.
मग काय. यज्ञकुंडात पेटलेला अग्नी चेतवण्यासाठी जसे तुप ओतत रहातात अगदी तसंच राजाभाऊ गरमागरम तिखट तिखट रसम पोटात ओतत राहिले आणि हाणत राहिले. मग शेवटी शेवटी आडवा हात मारत राहिले, भातावर ओतलेले चहुबाजुने धावणारे सांबार आवरण्यासाठी.
खरं तर आज जेवायचे होते केळीच्या पानात. अमर्यादीत. पण ते जेवायचे खुप गर्दी होती म्हणुन नाईलाजस्तव ताटात जेवायला लागले.
आता पुन्हा केव्हातरी केळीच्या पानात भोजन.
No comments:
Post a Comment