आईशप्पथ, राजाभाऊंनी आज फायनल ठरवलं, फायनल म्हणजे फायनल, आता त्यात मुंगीने मेरुपर्वत गिळला तरी तिळमात्र बदल होणार नाही.
ह्या पुढे शिवाजीपार्कच्या "आस्वाद" चे नाव पण काढायचे नाही. तेथे पोळाउसळ खाण्यासाठी म्हणुन मुद्दामुन जायचे आणि उपहारगृहाबाहेरची गर्दी बघुन छातीत धडकी भरल्यागत गाडीतुन बाहेर उतरण्याची तसदी पण न घेता परत माघारी फिरायचे.
ही घटना केवळ आजचीच नव्हे तर गेले कित्येक दिवस असंच चाललय. आता ह्या पुढे मुद्दामुन म्हणुन जाणे नाही.
उपाशी पोटी उपहारगृहाच्या बाहेर ताटकळत बसायला भयंकर नकोसे वाटते.
तिच्यामारी, धर्मसंकटच पुढे येवुन उभे राहिले. "आस्वाद" बाहेरील गर्दी बघुन राजाभाऊंचा मोर्चा "प्रकाश" कडे वळला. बसायला जागाही पटकन मिळाली. समोर एक जोडपे बसले होते, बहुदा पंजाबी होते, मराठमोळं पदार्थ पहिल्यांच खात असावेत.
हा पदार्थ कोणता ? तो पदार्थ कोणता ? विचारुन झाले. मग शेवटी विचारले " वो ग्लासमे येलो येलो क्या है ?
आता यांना "पियुष" म्हणाजे काय हे कसे समजवुन सांगायचे ?
"It's liquid Shrikhand "
ते पिवुन होईपर्यंत राजाभाऊंच्या मनात धागधुग. ह्यांना आवडेल का नाही ?
No comments:
Post a Comment