नेल्सन वॅंग यांचे चायना गार्डन, केम्स कॉर्नरला ओम चेंबर्स मधे असलेले चायना गार्डन. काय दबदबा होता एकेकाळी ह्यांच्या नावाचा , चायनीज जेवणासाठी. जेवणाचे दर ही तसे भरमसाठच, न परवडणारे. चायनीज जेवणाने भारतात प्रवेश केल्याचा व लोकप्रिय व्हायला लागलेला तो हा काळ.
असचं कधीतरी राजाभाऊंच्या बॉसनी रात्री जेवायला जाण्यासाठी रेस्टॉरंट सुचवायला सांगितले, पहिले नाव मनात आले ते चायना गार्डनचे. भले आपल्याला परवडण्यासारखे नसेल म्हणुन काय दुसरे जर का त्या जागी नेणार असतील तर मग काय आपण जावु नये ?
जेवण आवडले, त्यात परत आता नावाच्या दडपणाखाली न आवडुन कसे चालेल ?
मग राजाभाऊंच्या मनाला पार टोचणी लागुन राहिली, आपण येथे जावुन जेवलो पण तिचे काय ? मग ते सपत्निक पुन्हा तेथे जेवायला गेले. जेवण चांगले वाटले.
मग पुन्हा एकदा.
तो दिवस चायना गार्डन साठी आणि राजाभाऊंसाठी सर्वात वाईट दिवस असावा, अफाट गर्दी होती, टेबल मिळाले ते एका कोपऱ्यातले, पावसाळ्याचे दिवस, त्या कोपऱ्यात चांगलीच गळती लागलेली त्यात परत सर्विस भयानक. कोपऱ्यात कुणी ढुंकुन बघायला तयार नव्हते. फ्राईड राईसपेक्षा घरी केलेला फोडणीचा भात शंभरपटीने बरा म्हणावं अशी जेवणाची रीत.
परत मग आयुष्यात पुन्हा केव्हाही येथे जाण्याचे नाव काढले नाही. कोर्टाच्या आदेशाने मग एके दिवशी चायना गार्डन बंद झाले. दोनतीन वेळा दुसरीकडे बस्तान बसवण्याचा चायना गार्डनचा प्रयत्न असफल झाला आणि मग ते पटलावरुन गायब झाले .
No comments:
Post a Comment