Tuesday, January 04, 2022

धुंदुरमास - एक छान मराठी प्रथा. "आस्वाद" शिवाजी पार्क, सेना भवन समोर, मुंबई.

धुंदुरमास - एक छान मराठी प्रथा ही श्री. प्रमोद पाटील यांनी लिहिलेली पोस्ट वाचली, मन ललचावले आणि मनासमोर हे रंगवलेले चित्र उभे राहिले. 


ह्या मोहाला येत्या रविवारी शरण जायचे असे राजाभाऊंनी ठरवले आहे. बघु कसं काय वाटते ते ?


"आस्वाद" शिवाजी पार्क, सेना भवन समोर, मुंबई. आगावु आरक्षण गरजेचे.


"धुंदुरमास .... एक छान मराठी प्रथा !

मकर संक्रांतीच्या भोगी या आदल्या दिवसापर्यंत, म्हणजे एक महिनाभर हा धुंदुरमास पाळला जातो.

*मुंबईतील शिवाजी पार्क, दादर येथील "आस्वाद " उपाहार गृहाच्या कल्पक मालकांनी म्हणजे श्री.सूर्यकांत व सौ.स्मिता सरजोशी यांनी धुंदुरमासाचे पुढील ३ रविवारी खास आयोजन केले आहे.*

रविवारी सकाळी  ८ व ९ वाजता अशा दोन बॅचमध्ये शेकडो रसिक याची मजा घेतात. उपाहार गृहाच्या  दारात प्रत्यक्ष सनईवादन, रांगोळी आणि मराठी संस्कृतीचे लेणे असलेल्या गावाकडील शेताची व दिवाळीतील किल्ल्याची प्रतिकृती पाहायला मिळते. यांत्रिक पद्धतीने फक्त हात हलवून कुर्निसात करणारा, १००% पुतळाच वाटावा अशा तऱ्हेने सलग ३ - ३।। तास उभे राहून स्वागत करणारे कलावंत श्री.चंद्रकांत इंदुरकर म्हणजे चमत्कारच आहे. आत शिरल्यावर मंत्रघोषात गुरुजी ( भटजी ) आपल्याला तीर्थप्रसाद देतात. तसेच गंध, फुल, हळदीकुंकू,अत्तर लावून स्वागत केले जाते. लग्नकार्यातील वऱ्हाडींसारखे फेटे बांधलेले सेवक अगदी आपुलकीने आपल्याला मध घातलेले चविष्ट गरम लिंबूसरबत देतात. नंतर येतो तो खास धुंदुरमास विशेष पदार्थांचा नजराणा ! स्टार्टर्स म्हणून गूळ - शेंगदाणे, उसाचे करवे, रेवडी, बोरे, कोवळे हरभरे, कुरमुरे, कुरडई यांचे बाउल्स व त्याच्या बाजूला गरमागरम आंबोळी, ज्वारीबाजरीचे खमंग थालीपीठ आणि लोणी, लिंबू लोणचे, लसूण चटणी, तीळयुक्त साटोरी, मऊभात-मेतकूट-साजूक तूप, खारकेची खीर ! तुम्ही खाण्याचा आस्वाद घेत असतांना, मंत्रपठण सुरूच असते.  उपाहार गृहाचे मालक, मालकीणबाई यांच्यासह आस्वाद कुटुंब टीम प्रत्येकाची विचारपूस करतात. धार्मिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेली एक वेगळी खाद्यानुभूती लाभल्याचे समाधान मिळते. या 

*महोत्सवाचे हे ५ वे वर्ष आहे. आस्वाद  उपाहार गृहामध्ये अजून २, ९ व १६ जानेवारी २०२२ या तीन रविवारी हा ' धुंदुरमास आस्वाद ' घेता येईल*

धुंदुरमासाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !   

***** मकरंद करंदीकर. "                      

No comments: