Monday, March 01, 2010

जाधवगढ

भविष्यकाळात आपल्या रहात्या वाड्‍याचे काय होणार आहे याची जरासी, पुसटशी कल्पना देखिल पिलाजीराव जाधवांना आली असेल काय ? साऱ्या सासवड परिसरावर दरारा राखुन असलेल्या, दिवेघाटावर नियंत्रण ठेवलेल्या या "जाधवगढी ’ चे रुपांतर कधीकाळी "जाधवगढ " मधे होईल याचा अंदाज त्यांना ओझरता तरी आला असेल काय ?

काळाचा महिमा अगाध आहे.

"कोण आहे रे तिकडे, या राजाभाऊंना काय हवं नको ते बघा, यांची उत्तम सरबाई झाली पाहिजे, त्यात कोणतीही कसुर रहाता कामा नये. "


आखीवरेखीव, नीटनेटक्या देखण्या जाधवगढीत प्रवेश करताक्षणी मग कसे प्रफुल्लीत होता जाहले.



अतिथींच्या आगमनाची वर्दी देण्याची चोख कामगिरी प्रवेशद्वारापाशी असणाऱ्या दोन मावळ्यांनी तुताऱ्या फुंकुन दिली. भल्यामोठाल्या द्वारातुन गढीत पाय काय ठेवला, आणि सुस्वागतम, सुस्वागतम, आपले स्वागत आहे, एक युवती उभयतांचे , त्या दांपत्यांचे स्वागत कपाळी केशरीगंधाचा टिळा लावुन करता झाली, गढीच्या दिलखेचक पायऱ्या चढुन झालेले श्रमनिवारार्थ समोर केले गेले ते सुवासीक लिंबु सरबताचे प्याले. या आपल्या राजेशाही स्वागतांने भारावुन गेलेल्या अतिथींना हळुच "देताहेतना हजार रुपये, प्रवेशशुल्य " हे सांगण्यासाठी मात्र किल्लेदार विसरत नाहीत हो. ( हे माणसी घेतलेले ५०० रु. जेवणाच्या बिलातुन कमी केले जातात.)



भुकेलेले राजाभाऊ तडक पोचले ते त्यांच्या भोजनगृहाकडे. त्यांच्या भोजनाची व्यवस्था "सज्ज्या ’ मधे करण्यात आली होती. ही वसंतामधली दुपार, तापलेली धरती, छानसा मंद, मंद , सुगंधीत शितल पवन बहरलेल्या चाफ्यावरुन वाहणारा, दुरवर पसरलेली शेतं, कोठेतरी दिसणारा फुललेला पळस, एखादा नीलमोहर, ते उघडॆबोडके डोंगर, दुरवर पसरलेल्या डोंगररांगा, निरभ्र स्वच्छ आकाश, सारा सारा सभोवतालचा परिसर , सारे सारे न्याहाळत जेवतांना बहार आली.


बुफे जेवण. पण महागडेपणाकडे झुकलेले. राजाभाऊंना वाटले होते, आता या हजार रुपयात दुपारच्या जेवणापासुन संध्याकाळच्या "पायथा" या गढीच्या पायथ्याशी असलेल्या उपाहारगृहात नास्तापाणी देखिल होवुन जाईल, पण त्यांना वरती आणखी जेवणाचेच अडीचशे रुपये द्यायला लागले. मग त्यांनी सांयंकाळचा बेत रहित केला. पोर्णीमेच्या रात्री चांदण्यात  या ’पायथा’ मधे बसुन जेवण जेवायला मजा आली असती. पण.



श्री. विठ्ठल कामतांनी ही सारी वास्तु खुप चांगली कलात्मक दृष्टीकोन ठेवुन सजवली आहे, त्यांची कलात्मकता, कल्पकता ठाई ठाई आढळुन येते. रंगसंगती, वस्तुंची माडंणी, केवळ लाजबाब. प्रत्येक कोपरा नं कोपरा काही तरी दाखवत असतो, सांगत असतो.


आणखीन एक गोष्ट. पंचतारांकीत रेस्टारंटमधल्या जेवणात जी एक "डेलीकसी, नजाकत " असते किंवा एक जे वेगळेपण असते ते येथे नाही असे त्यांना वाटले. मसालेदार , तेलकट भाज्याची त्यांना अनावड. जेवणात किंमतीच्या वैविध्य कमीच होते, डेझर्ट मधे केवळ दोनच प्रकारचे मुस व एक आईस्क्रीम. मोजलेल्या पैश्याच्या मानाने मात्र जेवणात समाधान मिळाले नाही. कदाचीत राजाभाऊंच्या मनाचे त्या जेवणाची तुलना श्री. विठ्ठल कामत यांच्या "ऑर्कीड " मधल्या जेवणाशी केल्याने असेल. कदाचीत जेवण हे असेच असायला हवे व ते चुकत असतील.

जेवल्या नंतर ते सारी गढी पहात हिंडले. या ठिकाणी श्री. विठ्ठल कामत यांनी एक अप्रतिम संग्रहालय केलयं. खुप छान आहे ते. अगदी आवर्जुन पहाण्यासारखे. गढीच्या मागच्या बाजुला रहाण्यासाठी तंबु ठोकले आहेत, मस्तपैकी हिरवळ केली आहे. ती जागा मस्त आहे. मागे एक पारंबेदार वटवॄक्ष सावली धरुन उभा आहे.

झोप अनावर झाली होती, डोळ्यावर आलेली सुस्ती आवरत नव्हती , या रम्य ठिकाणाहुन पाय उचलवत नव्हता.
मग ते जेजुरीला गेले.


No comments: