Thursday, March 11, 2010

आकाश मार्ग, विक्रम और वेताळ ,

निर्मनुष्य स्काय वॉकच्या दांडीला लटकत वेताळ मस्तपैकी झोके घेत होता. धापा टाकत टाकत , पायऱ्या चढत चढत विक्रम वर चढला. काय करणार, विक्रमला पायऱ्या, जिने चढण्याचा सराव नव्हता आणि वय ही आता वाढत चाललेले.


"ये विक्रमा ये , या आकाश मार्गावर तुझे स्वागत असो " वेताळ वदला. "मला न्यायला आला आहेस खरा पण माझे नियम माहिती आहेत ना. माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शकले होतील ठावुन आहेस ना, आणि बोललास तर .. "

विक्रमाने वेताळाला खांद्यावर घेतले व तो सुखाने, आरामात त्या मार्गावरुन एकटा चालु लागला.

वेताळ बोलु लागला. " बघ विक्रमा खाली बघ जरा, वर तु एकटाच आणि सांग मला या खालच्या रस्तावरुन तुला चालायला तरी जागा आहे का ? आधीच रेल्वे स्थानका बाहेरील माणसांची तोबा गर्दी, त्यात सारा पदपाथ, रस्ताचा बराच भाग फेरीवाल्यानीं बळकावलेला, त्यात त्याच्यामधुन वेडयावाकडया चालणाऱ्या रिक्षा, जणु दुकान कमी पडते करुन मग रस्तावर आपला माल मांडलेले दुकानदार, ते खड्डॆ, ते उखडलेले पेव्हर ब्लॉक, बघ कसे या साऱ्या अडथळ्यातुन जीव मुठीत घेवुन लोक पायी चालताहेत ते बघ. किती तुमची सोय केलीय तुमच्या राज्यकर्त्यांनी, तुम्ही सुखाने, सुरक्षिततेने चालवं म्हणुन.

बर, मला आता सांग हे आकाश मार्ग बांधण्यात प्रामाणिक करदात्यांकडुन कररुपी गोळा केलेले अज्बावधी रुपये का खर्च केले जातात ? त्या ऐवजी रस्तावरुन सुखरुपपणॆ चालणे हा पादचाऱ्यांचा मुलभुत हक्क त्यांना ही सारी अतिक्रमणे दुर करुन, रस्ते व पदपाथ व्यवस्थीत बांधुन का मिळवुन दिला जात नाही ? "



विक्रमाने मंद स्मित केले.

" बा वेताळा, काय योग्य काय अयोग्य, काय बरोबर काय चुक याचा निवाडा कोणी करायचा ? आपल्याला काय हवयं हे धडके ठावुक नसलेल्या कळपाने ? का रस्तावरुन चालणाऱ्या करोडो पादचाऱ्यांनी ? का या जनतेच्या कल्याणाची काळजी घेण्याचा वसा घेतलेल्या लाभार्थींनी ? वेताळा , लोकांचा त्रास दुर करण्यासाठी काय करायला हवं हे यांना ठावुक नाही असे का तुला वाटते ? पण हे कलियुग आहे रे. येथे सारा पैशाच खेळ. "





"विक्रमा अगदी खर बोललास, पण तु बोललास आणि मी हा चाललो, नव्या कुरणाचा शोधात "



1 comment:

रोहन... said...

मुलभुत प्रश्न ... :)