राजभाऊ मोकाट सुटले. त्यांचा ताबा साफ सुटला. उगीच नाही ते स्वतःच स्वताची " आधी पोट येते मग राजाभाऊ " करुन थट्टा उडवत.
भट्ट जेवले टट्ट जाहले , घरी जाऊनी स्वस्थ निजले
बायको म्हणे "काय झाले , अरे रांडॆच्या माजे पोट्ट फुगले.
राजाभाऊंचे डोळॆ लकलकु लागले, जिव्हा वळवळु लागली, मुखी पाचक रस पाझरु लागले. त्यांना राहिवेना, धीर धरवेना , मुखी घास सारल्याशिवाय स्वस्थ बसवेना.
"मला द्या, मला आधी द्या, मला यातले द्या, माझ्यासाठी हे काढले आहेत ना " त्यांचा एकच घोशा.
लाडघर. दोपोलीच्या " भरारी दापोली तालुका बचत गट महासंघ" च्या स्टॉल वर "गरमागरम उकडीचे मोदक पाहुन ते फार बैचैन झाले. पण नुकतेच कुकर बाहेर काढलेल्या मोदकांत त्यांचा नंबर येणे अशक्य होते. त्यांना थोपवुन धरण्यासाठी त्या महिलेने त्यांना आंबोळी व उसळ खाण्याचा सल्ला दिला.
" हे आधी देते, तो पर्यंत मोदक होतीलच "
चलो, ठिक है.
आंबोळी तयार होईहोई पर्यंत त्यांची नजर समोरच्या " श्री. महालक्ष्मी आदिवासी महिला बचत गट - विक्रमगड " च्या बोर्डावर गेली. " काकडी पोळी "
हं. काकडीची काय. कायतरी नवीनच प्रकार दिसतोय. त्यांनी मोर्चा तिकडॆ वळवला.
"ताई , गरमागरम द्या हा, अगदी तव्यावरची " काकडी पोळी खावुन झाली.
मग परत आपल्या दापोली कडॆ. गरमागरम आंबोळी व वटाण्याची उसळ खावुन होईस्तोपर्यंत उकडीचे मोदक तयार झालेच होते. दोन मोदक हाणुन झाले. पुढचे तीन शेवटला खाण्यासाठी राखुन झाले. मोदक लाडु खुप खुप मस्त होते. उगीच नाही गजाननरावांना ते परमप्रिय, अगदी नक्षीदार कळ्या पडलेले असे ते मोदक मुखी सारता जीव कसा तृप्त झाला.
मग त्यांनी सर्व खाद्यपदार्थांच्या स्टॉल वर कायकाय आहे हे नुसतेच पहाण्याचा (?) निश्चय केला
"माझ्या लहानपणी माझी आई मला ही " कवठाची चटणी " करुन देत असे. मला ही खुप आवडते. आता बायकोच्या राज्यात ..... " ( राजाभाऊंची बायको हे वाचणार तर नाही ना ! ) . आणि मग "कुलस्वामीनी महिला बचत गट , गेंडेगाव, श्रीरामपुर येथल्यांनी त्यांना डांगर, भोपळा, हुरडा, गाजर लसुण, कांदा, चण्याचे व गव्हाचे पिठाचे थालीपिठ खायला घातले, सोबत कौठाची चटणी, चक्क त्यांनी ते हातावर घेवुन खाल्ले. ठेवायला डिश आणेपर्यंत देखील ते थांबायला तयार नव्हते.
आता तरी त्यांनी थांबाबे. पण नाही. "क्रांती महिला बचत गट ,शिराणॆ, बारामतीच्या लोकांचा आग्रह त्यांच्याचाने मोडवेना.
पोट भरलय , थोडॆच द्या करत त्यांनी पिठलेभाकरीवर आडवा हात मारला.
सरतेशेवटी परत आधीच सांगुन ठेवलेले उकडीचे मोदक.
पोटाने असहकार पुकारल्यानंतर , मग त्यांनी आपली स्वारी इतर स्टॉलकडे वळवली.
महिला बचत गट हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. अश्या प्रदर्शनात त्यांना काय घेऊ नी काय नाय असे होते. आंबेमोहर, इंद्रायणी, खानदेशी लिंबाचे आंबटगोड लोणचे, पोह्याचे पापड, आंबापोळी, पोहे, किसमीस आणि काय काय.
बायको सोबत नसल्याने त्यांचे वारु चौफेर उधळले होते. मनोसक्त खरेदी केली.
4 comments:
तुम्ही पण आमच्याच राशीचे.. म्हणुनच तुमचा ब्लॉग वाचतांना मजा येते.. जातिच्या खवय्याला काहिही चालतं खायला.. :) इथे पण पाचक रस पाझरणं सुरु झालंय, पण १ वाजे पर्यंत वाट पहावी लागेलच नां लंच टाइम ची!!
हे सर्व कुठे चालू आहे ? मुंबईत का?
राजाभाऊ,
पुढच्या वेळेला जाताना आम्हाला पण सोबत न्या. नुसती वर्णने नकोत.
आम्ही पाहीजे तर पिशव्या उचलू येताना.
आपला,
अनिकेत वैद्य.
महेंद्र, दुर्दैवाने मला अगदी शेवटला ह्या प्रदर्शनाची आठवण झाली. नाहीतर दोन चार फेऱ्या झाल्या असत्या.
उगीच कोणीतरी.
हे वांद्रे रिक्लेमेशनला जवळाजवळ १० दिवस होते.
अनिकेत,
जरुर अगदी आनंदाने
Post a Comment