Saturday, December 18, 2021

स्वीट बंगाल

 दादा, रोसोगुल्ला. सोंदेश ख्वाबेन ? अस्सल, रसभरीत, चवदार, मधुर, बंगाली मिठाई खाण्यासाठी आता मला कोलकोताला जाण्याची गरजच उरली नाही. अरे लालची माणसा, लालच बहुत बुरी बला है! 

व्यंकटेश माडगुळाकरांची अस्वलाची कथा तुला ठावुक आहे ना. पावसाळ्यात बहाव्याची झाडे शेंगानी लगडतात, अस्वलाला या शेंगा फार प्रिय. पण त्या अती खाल्ल्या की पोटात प्रचंड दुखते, वेदना होतात, सतत शी होते, चालण्याचेही बळ राहत नाही.

आदल्या पावसाळ्यात आलेल्या ह्या मरणप्राय अनुभवाने अस्वल शहाणे झालेले असते. आता ह्याच्या पुढे शेंगा न खाण्याचा ठाम निश्चय करते. जंगलातुन भटकताना, बहाव्याचे झाड दिसल्यावर हिरव्यागार, टचटचीत भरलेल्या लांबसडक शेंगा त्याला मोहवु लागता, क्षणभर मनाची चलबिचल होते, पण नाही. निश्चय ठाम असतो. पुढेचे झाड येते, पुन्हा चलबिचल. हळूहळू मनाची समजुत अस्वल घालु लागतं. एखादी शेंग खाल्ली तर ते काही वाईट नाही, हावरेपणा नाही करायचा. तिसऱ्या झाडाशी आल्यावर अस्वल हळुच एक शेंग तोंडात पकडतं. खातं. ही शेंग काही फार मोठी नव्हती, अजुन एखादी खायला काय हरकत, असा विचार करुन दुसरी शेंग खातं, पण खवळलेले तोंड ऐकत थोडच ? मग तिसरी, चौथी. आता मात्र थांबलेच पाहीजे. अस्वल ठरवतं. पण दुसरं मन म्हणते - नाहीतरी आता चार शेंगा खाल्याच आहेत, हौऊ दे काय व्हायचे ते. खाऊ पोटभर. अस्वल पोटभर शेंगा खातं. अगदी खुश हौउन फिरत राहतं. पण संध्याकाळ व्हायला लगते आणि पोटात पहिली कळ उठते. मागचा पावसाळा आठवतो. कळांवर कळ येऊ लागतात, अस्वल गडाबडा लोळतं. संडासाला धार त्यातुन उठून दुसरीकडे जाण्याच त्राणही काही वेळाने अस्वलात रहात नाही. दोन दिवस या नरकात अस्वल लोळत राहतं. पुन्हा पुन्हा निश्चय करतं, की आता पुन्हा म्हणुन शेंगाना तोंड लावणार नाही. छे ! काय या वेदना ! मरुन गेलो तर सुटेन तरी. 

तर सांगायचे म्हणजे, मुबंईत अनेक ठिकाणी "स्वीट बंगाल" च्या शाखा आहेत, बऱ्याचवेळा आम्ही जावुन मस्तपैकी रसगुल्ला, गुलाबजामुन, संदेश, आदी हाणतो.

मग घरी आलो की माझे वाढलेले वजन, चरबी घेवुन चिंता करायला लागतो. आता सांगा अस्वल आणि मी ह्यात काय फरक आहे का ?



No comments: