आमच्या येथे चेंडुफळीचे सामने खेळण्यासाठी संघ भाड्याने किंवा विकत दिला जाईल.
आमची कुठेही शाखा नाही.
कृपया लक्षात ठेवा.
- एकावेळी एकच संघ सामना खेळण्यासाठी मिळेल. तसेच संपुर्ण संघ एकसंघी मिळेल. एखादाच , किरकोळ, फुटकळ खेळाडु हवा असला तरी मागु नये. दिला जाणार नाही.
- दुपारी बारा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आमची वामकुक्षीची वेळ असल्यामुळे त्यावेळेत आम्ही सामने खेळायला येणार नाही.
- आमचा फलंदाजांकडुन एका षटकात फक्त सहा चेंडु खेळले जातील. त्याला अधिकचे चेंडु खेळण्यास लागले तर जास्तीचा आकार घेतला जाईल.
- आमच्या खेळाडुने षटकार मारल्यानंतर जर का चेंडु सापडला नाही किंवा हरवला तर त्यास आम्ही जबाबदार नाही. कोणत्याही परिस्थितीत नुकसानभरपाई द्यायला आम्ही बांधील नाही. तसेच जर का चेंडु टोलावल्यानंतर त्याचा आकार बदलला, तो वेडावाकडा झाला तर त्याची दाद आमच्याकडे मागितली जावु नये.
- प्रत्येक षटकात आमच्या फलंदाजाच्या अंगावर केवळ दोनच उसळणारे चेंडु टाकले जावेत. जास्तीचे चेंडु टाकले गेल्यास सामना खेळायला आम्ही बांधील नाही.
- प्रतिस्पर्धी संघाने प्रत्येक षटकात केवळ दोनदाच चेंडु सीमेपार धाडण्याचा प्रयत्न करावा. तिसऱ्यांदा आमचा खेळाडु सीमेच्या दिशेने धावला जाणार नाही, आणि जर का आमच्या खेळाडुला चेंडु पाठोपाठ धावाने लागलेच तर त्याचा आकार अलग घेतला जाईल.
- प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला जर का वाटत असेल की आम्ही त्याला झेलबाद करावे तर त्याने चेंडु पकडण्यासाठी चेंडु आमचा खेळाडु जेथे क्षेत्ररक्षण करण्यास उभा असेल त्याच जागी टोलवावा व सरळ जावुन त्याच्या हातात पडेल अश्या रितीनेच मारायला हवा. त्याला झेल पकडण्यासाठी धावायला लावले जावु नये. तसे झाल्यास वेगळा आकार पडॆल.
- आमचा संघ केवळ टी शर्ट व अर्धी चड्डी घालुनच खेळ खेळायला येईल. त्यानी चित्रविचीत्र गणवेष घालावा असे वाटत असेल तर तो गणवेष तुम्ही त्यास शिवुन द्यावा, आम्ही आणणार नाही.
- आमच्या फलंदाजाला शुन्यावर बाद केले जावु नये, जर चुकुन तो शुन्यावर बाद झाला तर त्याला परत खेळण्याची संधी दिली जावी.
- सामन्यामधे आम्ही प्रथम फलंदाजी केल्यास जास्तीतजास्त १७५ धावा काढल्या जातील. प्रतिस्पर्धी संघाने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांनी आपली धावसंख्या फक्त दिडशे पुरती मर्यादित ठेवावी. आम्हाला दिडशेपेक्षा अधिक धावा काढण्यास लावले गेले तर त्याच्यासाठी प्रत्येक धावांमागे अधिकचे पैसे आकारण्यात येतील.
- सामना जिंकण्यासाठी आमच्याने शक्य होतील तेवढेच प्रयत्न केले जातील. सामना हरल्यास तसेच प्रेक्षकांना त्यांचे पैसे वसुल न झाल्याचे समाधान मिळाले नाही तर त्यास आमचा संघ जबाबदार मानला जावु नये.
- प्रेक्षकांनी आपले वर्तन सभ्य ठेवावे. वेडेवाकडॆ वागु नये अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या खेळाडुच्या भावना दुखावल्या जातील असे वागु नये. आमच्या खेळाडुचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.
- या सामन्याच्या प्रक्षेपणदरम्यान दाखवल्या गेलेल्या जाहिरातीवरील उत्पनावर दहा टक्के आमचे कमीशन आकारले जाईल.
वरील नियम व अटी मान्य असल्यासच आमचा संघ भाड्याने / विकत घेण्यासाठी आत शिरावे.
लक्षात असु दे आमची गरज तुम्हाला आहे, तुमची गरज आम्हाला नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे जरी आपण आमचा संघ लिलावात विकत घेतला असला तरी प्रत्येक गोष्टीत आमचा निर्णय अंतिम राहील.
No comments:
Post a Comment