"असा हा अक्राळाविक्राळ, दांडगाई करणारा,धुडगुस घालणारा, दांडगोबा पाऊस शांत झाला त्तेव्हा बारा तास पूर्ण झाले होते. महामूर पाऊस. आणि मग ? मग स्वर्गाचं दार उघडल्यासारखी उघडीप. प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी उघडीप. पाऊस थांबला. वाऱ्याचा वेग मंदावला. धावड्याची, ऐनाची उंच झाडं तेवढी शेड्यांतून मंदपणॆ डुलत राहिली. पाय मोकळॆ करायला माणसांनी उंबरे सोडले. भिजून चिंब झालेली, चिंब होऊन गारठलेली आणि गारठुन केविलवाणी झालेली पाखरं झाडामधुन बाहेर पडली. कोतवाल, रानभाई, चाष, मिठू. दयाळ, सुतार, सुभग या पक्षांनी पंख पसरले, राखट-पांढऱ्या आकाशात ." -( "सखा नागझिरा मधुन साभार " )
राजाभाऊंच्या मनाने देखिल पंख फडफडत, पंख पसरवत उड्डाण केले , पोचले ते थेट भिमाशंकरच्या वाटेवर.
ऐन श्रावणात. पेठ उर्फ कोथळीगड मार्गे ते चार जण निघालेले. गच्च हिरवेकंच रान, काहीसा असाच तो पाऊस. जणु माथ्यावर वसलेल्या "सिर पै धरी गंग" वाल्या "पिनाकी महाग्यानि " नी एक बट सैलावत, खाली सोडलेली ती गंगा, अंगावर झेलत, तिचा मारा सहन करत , बेभान, मस्तवाल झालेले ओढेनाले पार करत, मधेच रस्ता चुकल्याने भरकटलेले असे ते, बरोबर दिशा धरुन चालत अंधाऱ्या रात्री मुक्कामी पोचल्यावर चुलीवर शिजलेल्या गरम भाताचा तो भलामोठाला डोंगर, त्यावरची ती वाफाळलेली आमटी. अंतिम सत्य एकच.
घुसमटलेल्या बा मना, ये रे असा जागेवर ये. कोठे आहेस याचे जरासे भान असु दे रे.
समोरच्या नारळाच्या शेंड्यावरती एक घार येवुन बसली आहे. कामं करत असतांना मुद्दामुन टॆबलावर ठेवलेल्या किरण पुरंदरेंच्या या पुस्तकावर मधेच नजर जातेयं. तेवढाच आपला निसर्गाशी जवळीक साधायला सेतु. मन कसे तडफडुन जातयं. येथे तु काय करतो आहेस ? अरे जंगल साद घालतेयं की. कधी बरं तु गेला होतास निसर्गाच्या कुशीत ? धनगड वरुन खाली पाच्छापुरच्या वाडीत उतरलास त्याला किती काळ लोटुन गेला ? आठवतं का रे तुला ते मुळशीच्या तलावातील "सुसाळे बेट " . आणि ती पोर्णीमेची रात्र, ढाकबहिरी वरुन तुम्ही रात्री उतरायला सुरवात केली होतीत. काय टप्पोर चांदण्यानी धरती नुसती खुलुन गेली होती.
वेड्या तु कधी जंगल वाचलसच नाही, नुसताच आंधळेपणाने भटकलास.
जंगलात हे सारे असे असते काय .
2 comments:
राजाभाऊंनी आज बर्याच मनांना मागं नेलं असणार....नागझिर्याबद्द्लची मारूती चितमपल्लींची पुस्तकं वाचुन कधी न पाहिलेलं ते जंगल आपणंच वाचतो असं नेहमीच वाटायचं त्याचीही आठवण आली....
अगदी अगदी. मलाही या जंगलात न जाता येथे फिरत असल्यासारखे वाटतयं. हे किरण पुरंदरेंचे पुस्तक अप्रतीम आहे
Post a Comment