Wednesday, February 03, 2010

इष्टपत्ती

झालेल्या बदलाने सुखासीन आयुष्य संपुन गेले, ट्रेनचा प्रवास नशिबी लागला म्हणुन काय झाले ?
जे काही होते ते चांगल्या करीताच होत असते की. भरल्या शरीराला "इथे टॅक्सीत बसलो तेथे उतरलो" ची जी सवय लागली होती, त्याला आता सक्तीने चालणे भाग पडु लागले, त्या चालण्यामुळॆ चक्क दहा दिवसात नकारात्मक प्रवृती पुन्हा एकदा सकारात्मक होवु लागली. जीवन अचानक आनंदमय वाटु लागले, जीवनातला आटलेला रस पुन्हा रंग भरु लागला. येता जाता ट्रेनमधे बंद पडलेले वाचन सुरु होवु लागले आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज राजाभाऊ श्री.वा.फाटक ग्रंथसंग्रहालय , लोकमान्य सेवा संघाचे सभासद झाले, या ग्रंथसंग्रहालयाच्या ते पहाताक्षणी प्रेमात पडले. त्यांना ते फार भावलय.

त्यात परत पहिल्याच फटक्यात त्यांच्या नजरेसमोर किरण पुरंदरेंचे "सखा नागझिरा" हे पुस्तक आले.

मग काय.

दे धम्माल.

तर. ८.१० ची विरार फास्ट. दिवस पहिला. अंधेरीस फलाटावर दोन्ही दिशेला जाणाऱ्या ट्रेन एकदम आल्या. भस्सकन बाहेर आलेल्या झुंडीतील राजाभाऊ एक हिस्सा होवुन गेले, पुलावरील पायऱ्या चढतांना मस्तपैकी शरीर सर्व बाजुंनी घुसळून निघाले.

अरे देवा , हा असा प्रकार असतो काय.

तर मग  परततांना अंधेरीलाच कशाला जायला हवे ? पार्ल्यापर्यंत मस्त पैकी चालणॆ होते की. पार्ल्यातील शांत रस्तांमधुन, गल्लांमधुन रमत गमत वाट फुटेल तेथे, पाय नेतील तेथे, तो पर्यंत चालायचे.

बदल हवाच. फक्त तो करुन घेण्याची इच्छाशक्ती हवी. जी हळुहळु परत येवु लागली आहे.

5 comments:

Narendra prabhu said...

वा बरं झालं म्हणायचं. तुम्हाला नवे पंख फुटले म्हणायचे. गर्दीत कधी कधी दर्दी पण भेटतात. सुख रोजच झालं की त्याची पण सवय होते, काही वाटेनासं होतं. चालायचच, नवा बदल आपण सकारात्मक रित्या घेतला. अभिनंदन...!

Gouri said...

कधी कधी आपण रूटीनमध्ये इतके बुडून गेलेलो असतो, की असा जबरदस्तीने घुसल्याशिवाय बदल स्वीकारतच नाही! तो तुम्ही सकारात्मकतेने घेतलात हे महत्त्वाचं.

Anonymous said...

शारिरिक व्यायामामुळे हार्मोन्सचे संतुलन सुधारल्याने ही गोष्ट घडून येते

Anuja Khaire said...

बदल हवाच. फक्त तो करुन घेण्याची इच्छाशक्ती हवी.

हे अगदि पटले. साध्या घटनेतुन छान विचार मांडले आहेत.

खरच तुम्ही मुंबईकर ग्रेट आहात. कसे जमते तुम्हाला हे सगले? खूप काही शिकण्यlसारखे आहे तुमच्या कडुन!

Anonymous said...

इष्टापत्ती म्हणायचंय का आपल्याला? इष्टपती म्हणजे चांगला नवरा.


~ खोचक