Sunday, November 09, 2008

स्वच्छ्ता मोहिम, दै सकाळला लिहिलेले पत्र

प्रिय श्री यमाजी मालकर यांसी,

सप्रेम नमस्कार,

आपण लिहीलेला डेटलाईन मध्ये "१६८ पैकी १ तास द्या; आणि मग बोला॥" हा लेख वाचला।

आपण योग्य तेच लिहिले आहेत। सकाळने परीसरस्वच्छता हा एक फार चांगला उपक्रम हाती घेतला आहे। पण आता पर्यंत काढलेल्या अनेक स्वच्छ्ता मोहिमा फसलेल्या आहेत कारण त्या लोकांसाठी काढलेल्या होत्या , लोकांनी नाही।

आपण रहात असलेले शहर, हा परीसर माझा आहे या भावनेने, तो परीसर दत्तक घेतला जावा, आपल्या अपत्याप्रमाणे त्याची काळजी घेतली जावी। शेवटी आपण हे सारे आपल्यासाठीच करत असतो.

केवळ नकारात्मक द्रुष्टीकोन ठेवत, ही कामे माझी नाहीत म्हणात, या नागरी समस्यांची सोडवण्यासाठी आपण अजुन किती दिवस सरकारी यंत्रणेवर अवलंबुन रहाणार आहोत? या यंत्रणेलाही काही मर्यादा आहेत. जर आपल्याला अस्वच्छता, वाहतुककोंडी, प्रदुषण यांचा त्रास होत असेल तर तो त्रास दुर करण्यासाठी, आपल्या मदतीला दुसरे येतील याची वाट न बघता, स्वःताला स्वःताच मदत करुन त्याचे निवारण करायला हवे. बहुतांशी या समस्या आपणच निर्माण केलेल्या असतात, आपले घर स्वच्छ केल्यानंतर तो केरकचरा ईतरांच्या दारात, रस्तावर, नाल्यात आपणच टाकलेला असतो. वेडीवाकडी वाहने चालवुन, शिस्त न पाळत आपणच वाहतुक कोंडी केलेली असते.

प्रत्येकाच्या मनात आपण काही तरी केले पाहीजे ही भावना असतेच असे नाही, ज्याच्या मनात असते त्यांना आपण नक्की काय करायला हवे त्याची माहीती नसते। मुळात अशी जाणीव सर्वांना करुन देणे महत्वाचे असते. आपण रहात असलेला परीसर अस्वच्छ्तेमुळे किती नरकासमान आहे, त्या मुळे रोगराई पसरली आहे, आपल्या मुलांना खेळण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी आपल्या परीसरात जागा नाही याची जेव्हा जाणिव होते तेव्हा लोकसहभागातुन परीसराचे रुपांतर नंदनवनात होण्यास वेळ लागत नाही. लोकांना ही जाणीव करुन द्यायची कोणी ?

सकाळ ने हे देवाचे काम तर हाती घेतलेले आहे, जागतीक पर्यावरण दिवसाचा मुहुर्त ही साजेसा आहे, आता गरज आहे ती म।न.पा. चे अधिकारी, नगरसेवक यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याची. त्यांनी लोकांमधे जावे, परीसरात लोक उपलब्ध असतील तेव्हा, रात्रीच्या वेळी, रजेच्या दिवशी स्थानीक पातळीवर सभा घ्याव्यात, त्यांचे मार्गदर्शन करुन मतपरीवर्तन करावे, त्यांना शपथ घ्यायला लावावी, लागल्यास स्थानीक पोलिस स्थानकाची मदत कायदा मोडणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी घ्यावी. कचरा रस्त्यावर टाकु नका हे सांगणे सोपे आहे, पण तो कोठे टाकावा या साठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तो घरात रोज दोन वेगळ्या कचऱ्याच्या डब्यात साठवला जावा, हिरवा डबा ओल्या कचऱ्यासाठी व लाल डबा सुक्या कचऱ्यासाठी. रोजच्यारोज ठरावीक वेळेस ओला कचरा गोळा केला जावा, सुका कचरा नेण्यासाठी कचरा वेचणाऱ्या कामगार संघटनेची मदत घेवुन, त्यांच्या माणसांना आपल्या परीसरात नेमुन, तो दिला जावा, जेणे करुन त्यांचे ही पोट भरेल.

एकदाच युद्धपातळीवर सारा परीसर नागरीकांनी मनपाच्या मदतीने, वेळप्रसंगी लोकवर्गणी काढुन साफ करावा, लोकांना शिस्त लागे पर्यंत गस्त घालावी, न ऐकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी, सुरवातीचे हे पथ्य सांभाळले की आपोआपच पुढचा मार्ग सोपा होतो, प्राथमीक गरज असते ती आयुष्यभर जोपासलेल्या वाईट सवयी मोडण्याची।

या सर्वासाठी गरज आहे ती १६८ पैकी १ तास देण्याची

No comments: