Thursday, September 04, 2008

Tuesday, September 02, 2008

यांना जंगलाचेच कायदे लागु करा


सिल्लोड मधे १० मोरांची शिकार करण्यात आल्याची बातमी वाचली । हे शिकारी केवढे निर्ढावलेत, यांना आपण गुन्हे करतोय हे ठावुक असून सुद्धा त्यांची वन्य प्राणी, पक्षी मारण्याची हिम्मत कशी होते ?


या दुष्ट प्रवृत्तिच्या दानावांसाठी जंगलाचेच कायदे लागु करा , यांना प्रतिबंध करण्यासाठी मानवाचे कायदे अपुरे पडत आहेत। मनुष्यवधाबद्दल ज्या काही कायदेशीर शिक्षा आहेत त्या वन्य प्राणी, पक्षी यांचा वध केल्यावर लागु व्हाव्यात।
हे शिकारी त्यांच्या मोटरसायकली मागे ठेवुन पळुन गेले आहेत , त्वरित त्यांच्यावर कारवाई केलि जावुन मृत मोरांना थोडातरी न्याय मिळावा।

Sunday, August 31, 2008

भट्ट जेवले टट्ट फुगले बिछान्यावरी जावुनी स्वस्थ निजले, बायको म्हणे काय झाले , अरे ****च्या माझे पोट्ट फुगले.


आपल्या नवरा किती रोडावलाय, बिच्चाऱ्याला आठवडाभर बाहेर जेवायला लागते, किती हाल होत असतील त्याचे ?


आठवडाभरात मेहनत करुन जे काही वजन कमी केले जाते ते दर शनिवार, रविवारी भरुन काढण्याचा चंग तिने बाळगलेला दिसतोय. परत अपिल करण्याची सोय नाही.

ताटात जे काही पडॆल ते मुकाट्याने गिळायचे, भोजनभाऊंनी. पुढे बोलायचे नाही.

आजचा बेत फार फर्मास होता, भरली वांगी, या चा मसाला किती लाजबाब लागतो, त्यात दाण्याचे कुट टाकलेले असले तर वा ! अमॄतानंदच ! पण येवढ्याने तिचे समाधान होत नाही. जोडीला पिठले, शेवगाच्या शेंगा टाकुन केलेले, चव आणखी चविष्ट करण्यासाठी माफक प्रमाणात टाकलेली आमसुले. नवऱ्याला आणखीन खुळावायचे असल्याने मग यासोबत ज्वारीची गरमागरम भाकरी ( तुप, लोण्याचा गोळा व्यर्जीत ), लसणाची, शेंगदाण्याचे चटण्या. इंद्रायणी तांदळाच्या केलेल्या भातासमोर काहीसे तिखट बटाट्याचे भुजणे.


आई ग ! तुझ्या हातच्या स्वयपाकाची चव विसरलो ग !


या साऱ्यांचा आस्वाद घेतांना काय बिशाद आहे जेवतांना मान वर करुन बघण्याची ?


या आळसावलेल्या देहाला आता प्रवास करायला लावायचे ? कसे व्हायचे ?

मुंबईमधे मंडपातील पडद्याआड झाकलेल्या श्री गणॆशाला मोकळा श्वास घेवु द्या

मुंबईस आता वेध लागले आहेत ते गणेशोत्सवाचे.
सार्वजनीक गणेशोत्सव मंडळांनी भल्यामोठाल्या उंच उंच श्री गणेशाच्या मुर्त्यांची स्थापना मंडपात करावी, मग तो मंडप तिन्ही बाजुनी झाकुन घ्यावा, समोरच्या दर्शनी बाजुस पडदा लावुन तो बंद करावा. मग श्रींचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी लांबलचक रांगा लावाव्यात, तासनतास एकाच मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी ताटकळत उभे रहावे, मुठभर बिनडोक कार्यकर्त्यांनी, बालगोपाळांनी, आपल्या मर्जीनुसार, लहरीनुसार रांगेचे नियंत्रण करावे, आपल्या मंडपासमोर भलीमोठी रांग लागली आहे, यात धन्यता मानत. आता आपलेच मंडळ सर्वाधीक लोकप्रिय असा गोड गैरसमज करु घ्यावा, लोकांचा वेळ, श्रम, त्रास, शारीरीक कष्ट, सोय यांना तुच्छ लेखावे, मागील दाराने खास प्रवेशा साठी पासेस ची विक्री करावी, त्यात पैसा कमवावा. संपुर्ण दिवस भक्तांनी रांगेत केवळ आपल्याच मंडळाच्या गणपतीचेच दर्शन घेण्यात घालवला पाहीजे असा अट्टाहास करावा.
दादांनो, पडदा उघडा पडदा. द्या घेवुन दर्शन भाविकांना मुक्त हस्ते, झटपट, त्यांना बऱ्याच गणेशमुर्तींचे दर्शन घ्यायचे असते हे ध्यानी बाळगा, जरासा विवेक दाखवा, पैसे कमवायला, आपली मनमानी करायला इतर बरेच मार्ग आहेत की.

छातीत दुखते, कळ आली ?

काय हो राजाभाऊ, हे पुर्वश्रमाचे व्ही.आय.पी. , यांच्या छातीत अचानक कसे काय दुखायला लागते ? त्यांची तब्बेत अचानक कशी काय बिघडते ? त्यांना मग रुग्णालयात दाखल करावे कसे लागते ?

अहो अटक झाल्या नंतर हो ?

Saturday, August 30, 2008

नवी मराठी "साम" वाहीनी आणि टाटा स्काय

नविन मराठी विनाशुल्क "साम’ नामक वाहीनी सुरु झाली. टाटा स्काय वर ती दिसेल अशी अपेक्षा होती.
अपेक्षा अजुन पुरी झाली नाही.
कदाचीत टाटा स्काय वाल्यांना ती पहिल्या दिवसापासुन सुरु करावी असे मनापासुन वाटले नसेल.

बहार धुंद वेलीवर यावा हळुच लाजरा पक्षी गावा





हाय क़ब्बत तुने इडली नही खायी ! "इडली हाऊस" मधे




आणि एक वर्तुळ पुर्ण झाले.


स्पर्धेत टिकुन रहाण्यासाठी उडपी उपहारगृहांनी आपल्या मेन्युत आतापर्यंत काय काय, अनेक बदल केले, देशोविदेशाच्या नवनव्या खाद्यपदार्थांची त्यात भर टाकली ( फक्त मराठी खाद्यपदार्थ सोडुन इतर सर्वकाही ) पंजाबी म्हणा, चायनीज, मेक्सीकन, इंटरकॉंटीनेंटल, नवे नवे खाद्यपदार्थ आपल्या ग्राहकांना देण्यास सुरवात केली. अगदी त्यात परत " जैंन " व्हर्जन वेगळॆ.


हे सारे करतांना त्यांचा मुळ बाज, आत्मा केव्हाच हरवुन गेला. पण आता एक वर्तुळ पुर्ण झाले आहे. बॅक टु स्वेयर वन.


"इडली हाऊस" मधे फक्त, हो केवळ इडली व तीचे नानाविध प्रकार या आपल्या उपहारगृहात, इडलीप्रेमिकांसांठी, भक्तांसाठी मिळतात.


पंधरा दिवसापुर्वी मी माझा नेहमीचा नियम ,शिरस्ता मोडला. प्रत्येक भेटीत बरेच प्रकार चाखायचे, त्यांचा आस्वाद घ्यायचा हा नियम. पण नेमके त्या दिवशी मला म्हैसुर रवा इडली येवढी आवडली की मी ती खातच सुटलो. मग त्या पुढल्या रविवारी जरासे अपराधी वाटायला लागले.


मग सुरवात केली कांचीपुरम इडलीने. त्यानंतर वाटले आता खोट्टॊ इडली खावी. फणसाच्या पानात लपटलेली ही इडली खाताखाता मुढो इडली खाण्याची तिव्र इच्छा होवु लागली.


केवडयाचा सुगंध आपल्याला नेहमीच मोहवत असतो, मग त्याचा पानात लपेटुन शिजवलेली , केवडयाचा धुंध सुवास लेवुन समोर आलेल्या या इडलीचा रसस्वाद घेतांनाही आपण तसेच बेबंध होत जातो.


आज बकासुराला लाजवायचेच असे मनोमनी ठरवलेले , मग तांदुळ आणि नारळ यांच्या संगतीत खुलुन निघालेली उंडी इंडली आणि त्या नंतर काकडीच्या रसात नटलेली , स्वाद घेवुन बहरलेली काकडी इडली खाण्याचा मोह काहीसा अनावर झाला.


गोड गोड गोड, या गोडावर काहीसा उतारा हवाच . काय खावु, आता काय बरे खावु, हां आत्ता आठवले, पेपर इडली, काळीमीरीचा तिखटसा झणका घेतलेली इडली खावुन मग
"अन्नदाता सुखी भव !"


या साऱ्या इडलींच्या रुबाब, तोरा वाढवावा, लज्जतीत न्यारी भर पडावी म्हणोनी संगतीस मनमुराद मिळाणाऱ्या सांबार, नारळाच्या चटणी बरोबर मोल्गापुडी, लिंबडापुडी तीळाच्या, नारळाच्या तेलाबरोबर दिली जाते.


टिप. येथे अरसिकांसाठी साधी नेहमीची इडली देखील मिळते.

विजेते


परवा दिवशी वर्क आऊट करतांना कोच सांगत होते परदेशातील ऑलिंपिक्स मधील विजेते मायदेशी परतल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी टॅक वर सरावासाठी जातात, आपण कालपरवा पदके मिळावली आहेत हे विसरुन, आणि आपल्या कडले सत्कार समारंभात, भेटी स्विकारण्यात गुरफटुन जातात.


नेमके दुसऱ्याच दिवशी हि बातमी वाचली.


कदाचित माझ्या कोच ना या खेळाडुच्या सत्कार बरोबर आमच्या पुण्यात मुख्य पदाधिकाऱ्यांचा पण कसा सत्कार होतो, उदो उदो होतो, जंगी स्वागत होते हे ठावुक नसावे.

आज सासुनी किती छळले ?


सुखदुःखाच्या गोष्टी करायला या सारखे दुसरे स्थान नसावे.

Sunday, August 24, 2008

लॉ ऑफ डिमीनीशींग मार्जीनल युटीलीटी आणि क्रिकेट

या लॉ ऑफ डिमीनीशींग मार्जीनल युटीलीटी च्या नियमाप्रमाणे आपण एखाद्या गोष्टीचा जसाजसा अधिकाधिक आस्वाद घेत जातो तस तसे त्या बद्दलची आपली आसक्ती, ओढ कमी होत जाते व एक वेळ अशी येते की ती आपल्याला नकोशी व्हायला लागते.

लग्नाची पंगत , जिलेबी, मठ्ठाचा बेत, ताटातली पहिली जिलेबी आपण मठ्ठात बुडवुन मुखी सारतो, अहाहा काय स्वाद आहे, ब्रम्हानंदी टाळी लागते, दुसरी, तिसरी, चौथी , पाचवी जिलेबी , आपण हाण हाण हाणतो, मजा येते, अजुन एक अजुन एक करत जिलेब्यांची थाळी संपवु लागतो, मग हळु हळु वेग मंदावत जातो, पोट व मन तुडुंब भरतो, आत्ता बस्स. आणखी खाणे मुश्किल. मग आग्रहाचे वाढणे. एक वेळ अशी येते की आता आणखी खाल्ली तर वमनच होईल.

पण प्रत्येक नियमाला अपवाद असतातच.
आपल्या देशातले क्रिकेटचे वेड हा या नियमाला अपवाद. पुर्वीच्या काळी फक्त हंगामात खेळला जाणारा हा परकीयांचा खेळ आता दिवस रात्र ,चोवीस तास केळाला जातो व त्याच उत्साहाने भारतीय पहात रहातात, कंटाळा म्हणुन यायचे नाव नाही.

मग ह्या वेडापोटी ऑलींपिक्स मधल्या भारताच्या यशाअपयेशाकडे भारतीयांचे दुर्लक्ष होते. चार वर्षातुन येणारे सामने येवडाच त्याचा अर्थ. मग त्यात आपण भाग घ्यायचा ही औपचारीकता पाळण्या पुरतेच आपला देश हा ऑलींपिक्सकडे बघत असवा.

वर्तमानपत्रही एवढी क्रिकेटमयी झालेली आहेत की परवाच्याला जी दोन पदके कुस्तीत व मुष्टीयुद्धात मिळाली त्याची बातमी देतांना त्यांना त्या बातमीत क्रिकेटचा उल्लेख करण्याचा मोह आवरला नाही. म्हणॆ "या यशामुळे मुळे भारतानी श्रीलंकेवर मिळवलेल्या एक दिवशीय सामन्याकडे म्हणे कोणाचे लक्ष गेले नाही".

आता पुढील ऑलिपिक्स चार वर्षाने.

अग्रलेख, लेख तेच असतील. भारत अपयेशी का ठरतो यांची कारणमिमांसा करणारे.

कारवी फुलली आहेत.


सात वर्ष्याच्या अवधीने डोंगर उतारावरील कारवीची झाडे यंदाला फुलली आहेत. डोंगर उतारांवर या दिवसात कारवी व तेरड्यांच्या फुलांनी सडा घातला आहे.

काश ! असे हे नितळ हास्य माझ्या चेहऱ्यावर सदैव असते

Saturday, August 23, 2008

गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनी चालली बळे ॥ धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥



वसंत ॠतु मधे अनेकविध रंगाची उधळण करुन काहीसा श्रमलेला निसर्ग , वर्षा ॠतु मधे अगदी ठरवुन केवळ हिरव्या रंगानी सारी श्रुष्टी रंगवुन काढत असावा. पण त्याने त्याचे समाधान होत नसावे, मग त्यात हिरव्या रंगाच्या नाना छटा देत बहरलेल्या सागाच्य़ा पांढुरक्या फुलांनी, फुललेल्या तेरडयांच्या किरमीजी, जांभळ्या, गुलाबी फुलांनी, जांभळ्या रंगाच्या कारवीच्यां फुलांनी काहीशी जाणवणारी उणीव भरुन काढत असावा. आणि हो , मधेच मग हिरव्या रंगाच्या मखमीली गालीच्या वर पिवळ्या जर्द रानफुलंनी नक्षीकाम ही करायला तो विसरत नाही. जेथे नजर जाईल तेथे केवळ हिरवाईच.

निसर्ग साऱ्या धरतीचे हे जे लाडकौतुक या दिवसात करत असतो ते न्याहाळण्यासाठी आज अचानक बेत ठरला, भोर परिसरात फिरायचा. अत्यंत नयनरम्य असा हा परिसर, केवळ नितांत देखणा, जो आता पर्यंत का कोण जाणे पण पहायचा राहुनच गेला होता. आपण भ्रमण प्रेमी, प्रवासाच्या निमीत्ते अनेक परकीय प्रदेश फिरत असतो, पण नेहमीच आपल्या जवळ असणाऱ्या निर्सर्गलेण्याचे आपल्याला एक तर भान नसते किंवा आपण त्याची उपेक्षा तरी करत असतो.

इंगवली गावाजवळ नीर नदीचे चे देखणे रुप, जणु लावण्यवती स्त्री ने परिधान केलेला कंठहार. वळसे घेत ही नदी जो प्रवास करते तो पहाता भान हरपुन जाते.
त्या पुढे लागते ते आंबवडे गाव. पंतसचीवांचे गाव. येथेल्या नागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी ओलांडवा लागतो तो एक छोटुसा झुलता पुल, अगदी लक्ष्मण झुल्याची आठवण करुन देणारा, ओढयाकाठच्या या देवालयाजवळचे पंचगंगा कुंड फार देखणे आहे. देवाच्या दर्शनासाठी येथे खळाखळाणारा ओढा अचानक झेप जो झेप घेतो ते दृश्य ही पहाण्यासारखे आहे.

आता वेध लागले होते ते समर्थांच्या शिवथर घळीच्या दर्शनाचे. आयुष्यात अनेक गोष्ठी नकळतपणे करायच्या राहुन जातात जसे की शिवथर घळीला भेट देणॆ. पण आज हा योग जुळुन आला.

हा पुढील रस्ता अक्षरश्या देहभान विसरायला लावतो, मंत्रमुग्ध करणारी ही वाट नीरादेवघर धरणाच्या, जलाशयाच्या कडेकडेने, काठकाठाने, वळसे घेत घेत हळुवार पणॆ पुढे सरकत रहाते.

वरंधा घाट. वाघजयीच्या ठाण्यापाशी, कडयाच्या पोटात उभे राहुन येथील डॊगररांगा पहाताना आपण किती शुद्र आहोत याची जाणीव व्हायला लागते. कावळ्याजवळी बाळ्या हा सुळाका तर लक्ष वेधुनच घेतो. समोरच्या डोंगर माथावरुन खाली खोल दरीत झेपवणारे धबधबे तर अचंबीत करायला लावतात, किती पाहु की किती नको. काय पाहु नी काय नको ? ह्या साऱ्या परिसराचे हिरवकंच , गच्च भरलेले जंगल, सदा प्रफुल्लीत , सदा सतेज अश्या या घाटातुन पायथ्याला असणाऱ्या शिवथर घळीला जाण्यासाठी उतरावे लागते.

या घळीच्या बाहेर असलेल्या धबधब्याचे वर्णन करतांना समर्थ रामदास स्वामी म्हणतात

गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनी चालली बळे ॥
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥१ ॥
गर्जतो मेघ तो सिंधु । ध्वनीकल्लोळ ऊठिला ॥
कड्याशी आदळॆ धारा । वात आवर्त होतसे ॥२॥

दुपारी गेल्या मुळे येथे प्रसादाच्या खिचडीचे चविष्ट भोजन चाखायला मिळाले, सोबत मस्त पैकी शिराही मिळाला. दुपारी १२ ते १.३०० मधे प्रसादाचे जेवण मिळते.

या परिसरात आता पाऊस थंडावलाय मग त्याची चव घेण्यासाठी परतांना महाबळेश्वर- पाचगणी मार्गे परतण्याचे ठरवले, नाही म्हटले तरी या परिसरात पावसाळ्यात जाणे झाले नव्हते, ते ही आज घडले.
पण त्याच आधी शिवथर घळ ते महाड रस्तावर श्रावणातल्या घन निळ्याने मनमुराद आम्हाला झोडपुन घेतले.

या दिवसात वातावरण फार मस्त असते, बऱ्यापैकी गारवा असल्याकारणाने प्रवास मनाला मोहीवत असतो.
आता वेध लागले आहेत सज्जन गडाचे.

Tuesday, August 19, 2008

पारसी नवे वर्षे

आज आमच्या कडेही पारसी नवे वर्षे साजरे करण्यात आले. जेवणाचा झक्कास मेन्यु होता. शाकाहारी धानसाक (खरे तर हा शुद्ध मांसाहरी पदार्थ आहे) व ब्राउन राईस. (टॉमेटो कोशींबर याबरोबर मस्त लागते.)
याचे कारण म्हणजे प्रेमळ पारसी लोकांबरोबर असणारे नातेसंबंध. त्या काळात माझ्या आत्यानी एका पारशाशी प्रेमविवाह केला. (जे त्यांच्या काय किंवा आपल्यासुध्धा धर्मीयांना सहजी पचनी पडणे, स्विकारणे अशक्यच होते. ) तसेच माझ्या बहिणीची सासु देखिल पारसीच.
आज दोघे ही हयात नाहीत. पण त्यांच्या स्म्रुती सदैव काळजात कोरलेल्या आहेत.

નવુ સાલ મુબારક

નવલ, અર્નાજ, કાશ્મિરા, નૌશીર, પિનાજ, જંગલવાલા, પોરસ, ડૉ. બુર્જર બાનાજી, ડૉ. અર્દેશર જાગોશ, તમે બધ્ધાને પતેટી મુબારક.

समर्थ आज पोरके झाले.

अशोक "समर्थ" आज पोरके झाले. चेतननी आता कोणावरच्या अन्याया साठी लढायचे ? आसुड कोणावर उगारायचा ? समर्थांचे पुनरागमन आता व्हायचे नाही. आता आम्ही कशाने भयभीत व्हायचे ?
अंधाऱ्या बखळीमधल्या, तळघरातील त्या दुष्ट शक्ती देखील आज रडवेल्या झाल्या असतील, हवालदील झाल्या असतील. चंद्राची काळी सावली आता कोणाला ग्रासणार ?

नारायण धारप गेले. अजुनही ही अशक्य कोटीतली बाब वाटत आहे. त्यांच्या अजरामर भयकथेप्रमाणे, विज्ञानकथेप्रमाणे नारायण धारपही अमर असतील असा माझा समज. गेले कित्येक वर्षे त्यांच्या कथेनी पछाडलेला मी. एके काळी भारावल्यागत त्यांनी लिहीलेली पुस्तके वाचुन काढली , त्यांची पारायणे केली.

नारायण धारपांना भेटण्याची इच्छा होती. पण भेटणे काही झालेच नाही. आज आपल्या जवळाची, जिव्हाळ्याची एक व्यक्ती गमावल्याचे दुःख झाले आहे.

भयकथा हा नवा साहीत्यप्रकार नारायण धारपांनी मराठी साहित्यात रुजवला, वाढवला.
फायकसची खरी अखेर आज झाली.