ठाकुरद्वार - गिरगाव- प्रार्थना समाज - चर्नीरोड या पट्यात असंख्य भोजनालयं, उपहारगृह होती, काळाच्या ओघत कशी, कधी आणि का गायब झाली कळलच नाही.
ठाकुरद्वारची टेंबेंची खानावळ. राजाभाऊ तेथे कधीच जेवले नसल्यामुळे ह्याच्या बद्द्ल काही बोलु शकत नाही.
गोविंदाश्रम. एकदोनदाच येथे जेवण झाले, आठवण. जेवणानंतर जे पोटात गोंधळायला सुरवात झाले ते भडाभड वांतीपर्यंत.
मॉडर्न - केळेवाडीच्या समोरचे . येथली ओल्या काजुची उसळ , खरवस फार आवडायचे.
कोना - बोरभाट लेन - हे जरा अलिकडेच म्हणावे बंद झाले. आठवण अशी काही खास नाही. कधीतरी काहीतरी उदरभरणासाठी गेलो असणार.
अनंताश्रम - अनंताश्रम. कोळ्यांच्या जाळ्यात गावलेले मासे जेव्हा अनंताश्रमामधे जावुन शिजवले, तळले जात असतील तेव्हा त्यांना आपले जीवन सार्थकी लागल्याचा आनंद होत असावा असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. ह्याची ख्याती खुप दुर दुर वर पसरलली. जातीचे खवय्ये येथे आवर्जुन हजेरी लावायचे.
पण.
हा पण फार मोठा आहे.
ह्याचा शेवट हे ठिकाण बंद पडण्यातच होणार असे जणु विधीलिखीत होते. आणि शेवटी तेच झाले.
पुरोहीत - मसालादुध प्यावे ते पुरोहितांकडॆच, बर्फी, दुधीहलवा खावा तो पुरोहितांकडचाच.
विरकर - दोनएक वेळा विरकरांकडे भोजनाचा योग आला. त्यांची जागा खुप मोठी होती असे अंधुकसे आठवते. पण ज्या अर्थी अजुनही ह्याची आठवण काढली जाते म्हणजे ते खासच असणार. तारुण्यात पदार्पण करण्याच्या वेळी कधीतरी ते बंद झाले. शेवटी शेवटी त्या जागेबद्दल काहीबाही , ऐकायला यायचे. खरे खोटे किती ह्याची कधी राजाभाऊंनी शहनिशा केली नाही.
सेंट्रल लंच होम आणि आशा कॅफे. राजाभाऊंचे येथे वरच्यावर जाणे व्हायचे. उडप्याची उपहारगृह. कॉलेजच्या जवळची.
दिनेश - दरयुष बेकरी समोरचे हे पंजाबी जेवण मिळणारे ठिकाण राजाभाऊंच्या हक्काचे होते, कॉलेजमधे पडीक असल्यामुळे. स्वस्त आणि मस्त.
केळकर- बनाम हॉल लेनच्या नाक्यावरचे अस्सल मराठमोळी उपहारगृह. इमारतीला लागलेल्या आगीत जळाले, मग इमारत नव्याने उभी राहिली, पण केळकर मात्र नव्या जागेत फारचे रुजु शकले नाहीत.
कुलकर्णी - बटाटा भजी आणि बटाटा भाजी. केवळ भजी आणि भाजी
सेंट्रल सिनेमाच्या शेजारी - नाव आठवत नाही.
सुनील शेट्टीनी एक पॉश रेस्टॉंरंट काढले, सेंट्रल सिनेमाच्या शेजारी . मिस्चीफ " खुप चांगले , चवदार पंजाबी, मोगलाई जेवण मिळायचे, डायमंड मार्केट मुळे ते फक्त शाकाहारीच होते, संध्याकाळी सुनील शेट्टी वरती असलेल्या ऑफीस मधे येवुन बसायचा.
मग ते ही बंद झाले, त्याच्या जागी लिटील इटली आणि अश्याच प्रकारचे दुसरे रेस्टॉंरंट आले होते. बंद झाले.
या विभागात चार पाच इराणी होते. आता एकदोनच राहिले आहेत.
इराणी परत केव्हातरी..