Monday, March 08, 2010

श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले

तुळशीबागेत फेरफटका मारायला नक्की कोणाला आवडते ? राजाभाऊंनी का त्यांच्या बायकोला ?

या वेळच्या फेरफटक्याचा राजाभाऊंना चांगलाच फटका बसला.

राममंदिरात गीतरामायणाची रेकॉर्ड लावलीय काय ? का कोणेतरी गातयं ? राजाभाऊ लोहचुंबकाप्रमाणे तेथे ओढले गेले.  आत एक गृहस्थ गात होते " दशरथा घे हे पायसदान "  



" चल जरा थोडेसे गाणे ऐकुया "
"तु ऐक, मी बाहेर फेरी मारुन येते "

ही फेरी फार महागात पडली.
रामा, केवळ तुझ्यामुळॆ.

Thursday, March 04, 2010

वसंत व्याख्यानमालेत मीना प्रभु

मॅजेस्टीक गप्पा. लोकमान्य सेवा संघ. विषय "अस्सल मराठी बिग बॉस." 

श्री. विवेक पटवर्धन, श्री. आपटे व श्री. सरवटॆ यांच्याशी गप्पा. 

या निमित्ते गप्पा, व्याख्यानमाला यांच्याशी ओळख झाली.

काही वाटांवरुन आपण उगीचच चाललेलो नसतो, काही दिशांकडे न जाण्यासाठी  कोणातेही सबळ कारण नसतांना देखिल आपण वळलेलो नसतो. का ?कोण जाणे आपल्याला ती गोष्ट करावीशी वाट्त नाही.   राजाभाऊ ह्याच्या आधी कधीच या अश्या प्रकारच्या कार्यक्रमाला गेले नव्हते. अगदी कुडाळदेशकर वाडीत सुध्दा. 

जेव्हा विलेपार्ले महिला संघात वसंत व्याख्यानमालेत सुप्रसिध्द लेखिका मीना प्रभु यांची मुलाखात आहे हे कळल्यावर राजाभाऊंची बैचैनी वाढली. आपल्या आवडत्या विषयावर लिहिणारी आपली आवडती लेखिका. ऐकायला जायचच. त्यांच्या विषयी वाटणारी आपुलकी, जिव्हाळा त्यांना तेथे बरोबर घेवुन गेली.


अश्या कार्यक्रमाचा दिवस, वेळ आपल्या नवऱ्याच्या कशी बरोब्बर लक्षात रहाते ? आपण सांगितल्येल्या अनेक गोष्टी तो नेमक्या कश्या काय विसरतो ? नेमके याच वेळी त्याला कामातुन कशी काय फुरसत मिळते याचे कोडे त्यांच्या बायकोला नेहमीच पडत आले आहे. 

तर राजाभाऊंनी मीना प्रभु यांना ऐकलं, मग कार्यक्रम संपल्यावर ते त्यांना भेटले,  आणि  मग मीनाताई जास्त बोलल्या का मुलाखात घेण्याऱ्या बाई   याचा हिशोब करत ते घरी परतले.

नऊचा भोंगा

असे का ?

काही काही गोष्टी आपल्या एवढ्या सवयीच्या झालेल्या असतात, इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की त्यांचे जसे अस्तित्व जाणवत नाही त्याच प्रमाणे त्यांचे नाहीसे होणे ही कळत नाही.

फार पुर्वी मुंबईमधे होमगार्डस रोज सकाळी बरोबर दहाच्या ठोक्याला भोंगे वाजवत असत. मग नंतर कधीतरी ती वेळ बदलुन  नऊची झाली. सायरन चांगल्या अवस्थेत आहेत की नाहीत, ते बरोबर वाजताहेत का नाही याची चाचणी रोज घेतली जायची. सायसनचा हेतु शहरावर आलेल्या संकटाची माहिती लागलीच सर्वांपर्यंत पोचावी असा असावा. या भोंग्यावर काहींची दिनचर्या सुरु व्हायची, घडयाळाची वेळ जुळवली जायची .

भारत पाकिस्तान युध्दाच्या काळात शत्रुपक्षाच्या विमानहल्लाची सुचना देण्यासाठी हे रात्रीच्या वेळी वाजवले गेले की बदलणारे वातावरण अजुनही आठवते.

हल्लीच्या काळात होमगार्डस अस्तित्वात आहेत की नाही हेच कळत नाही, मग सायसन गायब झाले त्याचे काय नवल ?


हा सायरन बंद होवुन किती वर्षे झाली असतील ?

कोणास ठावुक.

Wednesday, March 03, 2010

स्मशानात पण ?

मुलुंडमधले स्मशान. फारसे चांगल्या अवस्थेत नाही. त्यालाच घरघर लागलीय की काय ?

एक समाजकार्य करणारा क्लब. आपल्या नावाच्या व क्लबच्या पदाधिकारांच्या नावाच्या पाट्या लागलेल्या. आम्ही या स्मशानाचे सौदयीकरण केले, आम्ही हे बालकांसाठी असलेल्या जागेचे सुशोभीकरण केले.

मग आमदारांनी तरी का मागे रहावे ? यांच्या प्रयत्नाने हे झाले, ते झाले.

या जागीतरी श्रेय घेण्यासाठी आपली नाव झळकवली जावु नयेत असे वाटते.

या भुयारातुन आता फुकटे पाहुणे बील न देता बाहेर पळतात.

जाधवगढ मधले भुयार.
त्याच्या बाहेर लावलेल्या पाटीवर गमतीने लिहिले आहे की " अलिकडच्या  काळात या भुयाराचा वापर फुकटे पाहुणे बील न भरता पळुन जाण्यासाठी करतात "

वहानाचा जीव तो केवढा ?

पुढे तीन अधिक चालक, मधे जाडजुड राजाभाऊ अधिक चार , मागे चौघे . एकुण प्रवासी चौदा. ( एक जण दोघांची जागा अडवणारा )

आणि म्हणॆ सहा आसनी रिक्षा.

Tuesday, March 02, 2010

लक्ष मात्र आपल्या पिल्लापाशी


निवडुंगामधे केलेले घरटे. पण राजाभाऊंसारखे अनाहुतांची नजर त्याच्या कडे वळते.
लगेचच दुसऱ्याच क्षणी from nowhere ,  पक्षीण अकस्मात तेथे हजर होते.

रितु बसंत मे कलि फूलन पै

भंवर मन गेल्यो हो रे हो रे
रितु बसंत मे कलि फूलन पै ॥
रंग-सुरंग छायो बन बन
सज धज बुलायो कलि फुलन पै ॥
राग बहार - कुमार गंधर्व


हि फुललेली फुले पहाणे केवळ डोळ्यांसाठी मेजवानी. आपण  हे पाहुन केवळ सौदर्यरसपान करतो, पण मधमाशी, पक्षी, "भंवर रस लेत फिरत मदभरे "

या पक्षाचे जे लाड चालले होते ते फार पहाण्यासारखे होते, या  फुलावरुन त्या फुलावर, वेगवेगळ्या कोनातुन  , वेगवेगळ्या बाजुने आपल्या लांबलचक चोचीने फुलातला मध आकंठ पिणे चालले होते  

असं का व्हावे ?

आपण एखादे पुस्तक वाचायला घेतो. त्या विषयात आपल्याला गोडी असते , पण त्यातले ज्ञान तुटपुंजे असते त्यामुळॆ थोडेफार तरी त्या विषयी शिकण्यासाठी.

पण ते संपुर्ण वाचुन होतच नाही.  ते तसच अर्धवट बाजुला रहाते व इतर पुस्तके आपण भराभरा वाचत रहातो.

"लहजा" संपवायला हवं.

मुद्राभिनय

भाविक पायऱ्या चढतांना समोर आले की

निलिमा नृत्यालय - बारामती

होळीच्या दिवशी पुण्यामधे बारामतीची निलिमा नृत्यालयने एक अप्रतिम कथक नृत्याचा कार्यक्रम केला,

Monday, March 01, 2010

मानकर डोसा आणि गिरीजा - तानाजी मालुसरे रस्ता

सिंहगड रस्तावर आतापर्यंत चांगले डोसे, उत्तपे आदी खायला मिळण्याबाबत दुष्काळच होता पण तीन आठवड्यापुर्वी सुरु झालेल्या " मानकर डोसा" नी तो संपवला अस म्हणायला हरकत नाही.
रात्री राजाभाऊंना तेथे पोचायला उशीर झाला , दुकान बंद झाले, मग ते समोरील "गिरीजा" मधे झुणकाभाकर खायला गेले. 
पण काही गोष्टींशी तुमचे नाते नाही जुळत. मागे दोनदा न खाता उठुन जायला लागले होते, एकदा त्यांनी आम्हाला कारणाशिवाय बसल्याजागेवरुन ऊठायला लावले होते व वाईटातल्या वाईट जागी बसायला सांगीतले, दुसऱ्यांदा मुद्दामुन पाहुण्यांना घेवुन गेलो असता, नेमके त्याच वेळी सर्वत्र घुपाची उदबत्ती जाळलेली, ती पाहुण्यांच्या पचनी पडली नाही, या वेळी नेमका झुणाका मरणाचा तिखट, घाईघाईत दुकान बंद होण्याच्या वेळीस बनवलेला, त्यात मिरचीचा ठेचा चुकुन दोनदा टाकलेला.
पण फोडणीचे वरण व भात मात्र चांगला मिळाला.




ठण्ण्ण ठण्ण ..

निवांत .

चिंचेचा हा घेर व त्याचा विस्तार पहाता

हा हत्ती असा जमिनीत डोके खुपसुन का बरे आहे ?

पोर्णीमेचा चंद्र

येथे माथा टेकवा, इथे पैसे टाका

उध्वस्थ धर्मशाळा, उध्वस्थ विहीर, आणि

आज सखी ब्रीजमे धुम मचायी

रंग उडत है चहु ओर

जाधवगढ

निसर्गोत्सव

एक साधं बदामाचे झाड. रोजच्या पहाण्यातलं, आणि सवयीने दिसुन सुध्दा न दिसलेलं.


पण हाच बदाम जेव्हा दुर्गाबाई आपल्या "निसर्गोत्सव" मधे भेटतो तेव्हा एक नवी दृष्टी देवुन जातो.

"आणि हे पाहा सडसडीत अंगलटीचे पण तितक्याच डौलदार माथ्याचे बदामाचे झाड. पाने पळसासारखी पण मोठी व लांबट आहेत. ती आता पिकून गळताहेत. पण पिकलेल्या अवस्थेतला रंग किती सुंदर लाल ! त्याचा कोवळ्या पानांनीसुध्दा हेवा करावा असा ! सबंध झाड शेंदरी दिसत आहे. एकीकडे ही पिकली पाने टपाटप गळाताहेत. एकीकडे पांढरा मोहोर बारीक हिरव्या काड‍यांना चिकटलेला तुऱ्यांसारखा अधूनमधून डोकावतो आहे. झाडावर जुन्या बाराचे हिरवे बदाम लटकलेलेच आहेत. फांदया काही ठिकाणी उघडया दिसत आहेत. ठिकठिकाणी गळत्या पानांच्या जागी नव्या पानांचे पोपटी लालसर, निरंजनाच्या ज्योतीप्रमाणे दिसणारे मोठेमोठे कळे जोरात वर येत आहेत. ..... "

पुरती वाट लागुन राहिली आहे. आधीच मनात "सखा नागझिरा " नी वणवा पेटुन राहिला , त्यात " ’निसर्गोत्सव " नी त्यात झाडांची जणु इंधनासाठी नवी भर टाकली.


आदल्या दिवशी रात्रीपर्यंत दाजीपुरला जावुया चा घोष लावलेले राजभाऊ बेतापासुन माघारी (नेहमीप्रमाणॆच ) फिरले आणि जाधवगढीवर पोचले.


एक मात्र बरं झाले. गढीत मोठाली दोनचार कमळं पहायला मिळाली. "सिध्देश्वराच्या तळ्यातील कमळे " हा लेख वाचल्यापासुन कमळ पहावशी वाटत होती. "वडील मंडळीत त्या कमल नयनेला कमलाक्षाने कमळाच्या बीने मारावे असे मला वाटले, पण बी मारायचा अविर्भाव करताच तिने जिभ दातांनी चावुन आणि डोळे फिरवुन मला तसे करु दिले नाही " - हा प्रेमिकांच्या नवथर सलज्ज लिलांचे वर्णन सांगणारा जगन्नाथ पंडीतांचा श्लोक त्यात वाचला .

जाधवगढ

भविष्यकाळात आपल्या रहात्या वाड्‍याचे काय होणार आहे याची जरासी, पुसटशी कल्पना देखिल पिलाजीराव जाधवांना आली असेल काय ? साऱ्या सासवड परिसरावर दरारा राखुन असलेल्या, दिवेघाटावर नियंत्रण ठेवलेल्या या "जाधवगढी ’ चे रुपांतर कधीकाळी "जाधवगढ " मधे होईल याचा अंदाज त्यांना ओझरता तरी आला असेल काय ?

काळाचा महिमा अगाध आहे.

"कोण आहे रे तिकडे, या राजाभाऊंना काय हवं नको ते बघा, यांची उत्तम सरबाई झाली पाहिजे, त्यात कोणतीही कसुर रहाता कामा नये. "


आखीवरेखीव, नीटनेटक्या देखण्या जाधवगढीत प्रवेश करताक्षणी मग कसे प्रफुल्लीत होता जाहले.



अतिथींच्या आगमनाची वर्दी देण्याची चोख कामगिरी प्रवेशद्वारापाशी असणाऱ्या दोन मावळ्यांनी तुताऱ्या फुंकुन दिली. भल्यामोठाल्या द्वारातुन गढीत पाय काय ठेवला, आणि सुस्वागतम, सुस्वागतम, आपले स्वागत आहे, एक युवती उभयतांचे , त्या दांपत्यांचे स्वागत कपाळी केशरीगंधाचा टिळा लावुन करता झाली, गढीच्या दिलखेचक पायऱ्या चढुन झालेले श्रमनिवारार्थ समोर केले गेले ते सुवासीक लिंबु सरबताचे प्याले. या आपल्या राजेशाही स्वागतांने भारावुन गेलेल्या अतिथींना हळुच "देताहेतना हजार रुपये, प्रवेशशुल्य " हे सांगण्यासाठी मात्र किल्लेदार विसरत नाहीत हो. ( हे माणसी घेतलेले ५०० रु. जेवणाच्या बिलातुन कमी केले जातात.)



भुकेलेले राजाभाऊ तडक पोचले ते त्यांच्या भोजनगृहाकडे. त्यांच्या भोजनाची व्यवस्था "सज्ज्या ’ मधे करण्यात आली होती. ही वसंतामधली दुपार, तापलेली धरती, छानसा मंद, मंद , सुगंधीत शितल पवन बहरलेल्या चाफ्यावरुन वाहणारा, दुरवर पसरलेली शेतं, कोठेतरी दिसणारा फुललेला पळस, एखादा नीलमोहर, ते उघडॆबोडके डोंगर, दुरवर पसरलेल्या डोंगररांगा, निरभ्र स्वच्छ आकाश, सारा सारा सभोवतालचा परिसर , सारे सारे न्याहाळत जेवतांना बहार आली.


बुफे जेवण. पण महागडेपणाकडे झुकलेले. राजाभाऊंना वाटले होते, आता या हजार रुपयात दुपारच्या जेवणापासुन संध्याकाळच्या "पायथा" या गढीच्या पायथ्याशी असलेल्या उपाहारगृहात नास्तापाणी देखिल होवुन जाईल, पण त्यांना वरती आणखी जेवणाचेच अडीचशे रुपये द्यायला लागले. मग त्यांनी सांयंकाळचा बेत रहित केला. पोर्णीमेच्या रात्री चांदण्यात  या ’पायथा’ मधे बसुन जेवण जेवायला मजा आली असती. पण.



श्री. विठ्ठल कामतांनी ही सारी वास्तु खुप चांगली कलात्मक दृष्टीकोन ठेवुन सजवली आहे, त्यांची कलात्मकता, कल्पकता ठाई ठाई आढळुन येते. रंगसंगती, वस्तुंची माडंणी, केवळ लाजबाब. प्रत्येक कोपरा नं कोपरा काही तरी दाखवत असतो, सांगत असतो.


आणखीन एक गोष्ट. पंचतारांकीत रेस्टारंटमधल्या जेवणात जी एक "डेलीकसी, नजाकत " असते किंवा एक जे वेगळेपण असते ते येथे नाही असे त्यांना वाटले. मसालेदार , तेलकट भाज्याची त्यांना अनावड. जेवणात किंमतीच्या वैविध्य कमीच होते, डेझर्ट मधे केवळ दोनच प्रकारचे मुस व एक आईस्क्रीम. मोजलेल्या पैश्याच्या मानाने मात्र जेवणात समाधान मिळाले नाही. कदाचीत राजाभाऊंच्या मनाचे त्या जेवणाची तुलना श्री. विठ्ठल कामत यांच्या "ऑर्कीड " मधल्या जेवणाशी केल्याने असेल. कदाचीत जेवण हे असेच असायला हवे व ते चुकत असतील.

जेवल्या नंतर ते सारी गढी पहात हिंडले. या ठिकाणी श्री. विठ्ठल कामत यांनी एक अप्रतिम संग्रहालय केलयं. खुप छान आहे ते. अगदी आवर्जुन पहाण्यासारखे. गढीच्या मागच्या बाजुला रहाण्यासाठी तंबु ठोकले आहेत, मस्तपैकी हिरवळ केली आहे. ती जागा मस्त आहे. मागे एक पारंबेदार वटवॄक्ष सावली धरुन उभा आहे.

झोप अनावर झाली होती, डोळ्यावर आलेली सुस्ती आवरत नव्हती , या रम्य ठिकाणाहुन पाय उचलवत नव्हता.
मग ते जेजुरीला गेले.