Sunday, March 30, 2008

श्री. शशी व्यास व पंचम निषाद




मैफीलीत पहाटेचे, सकाळचे राग ऐकायला मिळणे दुर्मीळ झाले आहे कारण या वेळी कार्यक्रम ठेवणार कोण ? व या वेळी साखरझोपेतुन उठुन शास्त्रीय संगीत ऐकायला श्रोते मिळणार कोठुन ?

ही कोंडी फोडली श्री. शशी व्यास यांनी.

"प्रातःस्वर" या नावाने महिन्यातुन एखादया रविवारी पहाटे ठिक ६.३० वाजता कला अकादमीच्या प्रांगणात, रविद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे पंचम निषाद ही संस्था अतिशय दर्जेदार शास्त्रीय संगीताचे आणि ते ही तरुण गुणी पिढीच्या गायकांचे कार्यक्रम सादर करत आले आहेत. आणि ते ही विनामुल्य.

श्री. शशी व्यास यांचे या उपक्रमाबद्द्ल आभार मानावे तेवढे थोडेच आहे. आणि याला रसीकांचाही तेवढाच भरभरुन प्रतिसाद मिळतो हे ही नसावे थोडके.

चित्रकला




आलिया रशिद - लाहोर- द्रुपद.

राग कोमल रिषभ सावरी.

’झेब्रा क्रॉसींग’ - माय फुट



पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी, बिनघोर रस्ता पार करण्यास ’झेब्रा क्रॉसींग’ या संकल्पनेची निर्मीती करण्यात आली.


आता पर्यंत वाहान चालक कायदा, नियम धुडकावत हुश्शाल या झेब्रा क्रॉसींग वर वाहाने उभी करत आले आहेत पण आता तर पोलीसांनी देखील झेब्रा क्रॉसींग वरुन पादचाऱ्यांनी रस्ता पार करु नये याचा इंतजाम केला आहे. सरळ सरळ ही लोखंडी रेलींग उभी करुन झेब्रा क्रॉसींग पार अडवुन ठेवलय. पादचाऱ्यांनी काय जीव धोक्यात घालत यावे काय ?
आपल्याकडे मुळातच सुरक्षिततेची जाणीवच नाही , त्याचे हे परीणाम.

जेव्हा सरहद्दीच्या सीमा रेषा भेदुन कला आपल्या पर्यंत पोचते तेव्हा


जीस लाहोर नही देख्ये उस दुनीया नही देखी ! ही एक कहावत. मै तो कहु "ज्यांनी लाहोर नाही ऐकले त्यांनी संगीत नाही ऐकले. "

लाहोर निवासी ध्रुपद गायीका ’आलिया रशिद’ यांच्या ध्रुपद गायनाचा आनंददायी कार्यक्रम आज पहाटॆ पंचम निषाद ने "प्रातःस्वर" या त्यांच्या उपक्रमात कला अकादमीच्या प्रांगणात आयोजीत केला होता.

पहिल्यांदाच मुंबई मधे गाणाऱ्या आलिया रशिद यांनी आपल्या मंत्रमुग्ध गायनाने रसीकांना लोभावले हे वेगळे सांगायला नको. पाकिस्तान मधल्या कलावंताचा शास्त्रीय संगीताचा हा पहीलाच कार्यक्रम असावा.

आज त्या भैरव, कोमल रिषभ सावरी, चारुकेसी रागात कबीर भजन, व राग गुजरी तोडी गायल्या. त्यांना पखावज वर साथ केली अखिलेश गुंडेचा यांनी.

Saturday, March 29, 2008

अरे वेडया ही पानगळी नव्हे






"अरे वेडया ही पानगळी नव्हे. कोणी सुंदर युवती श्रुंगारासाठी सिद्ध होतांना आपली आभुषणे उतरवुन ठेवत आहे."

नरेंद्र सींदकरांच्या पुस्तकात वाचलेल्या हा शेराचा अर्थ उमजत नव्हता, तो मग अचानक उलगडला या बसंतात, कोवळ्या, नाजुक, किरमीजी-गुलाबी पालवीने बहरलेल्या पिंपळाची झाडे न्याहळतांना.

या दिवसात आपल्या गुढ गंभीर, रहस्यमय रुपाचा त्याग करुन पिंपळ नवसॄजनाची पालवी धारण करत बाल्यावस्थेत प्रवेश करतो.

चर्चगेट परिसरात पिंपळ वॄक्ष काय मस्त कचकचुन नवी पालवी घेवुन राहील्यात.

रस्ते हे वहानांसाठी व पादचाऱ्यांसाठीच हा भ्रम


महानगरपालीका नावापुरती उरलीय, संबंधित खाती आंधळी झाली आहेत. पोलीस खाते ही डोळ्यावर कातडे ओढुन बसलय.

काही वर्षापुर्वी रस्तावर राडारोडा, राबीट टाकुन निघुन जाण्याची कोणाची हिम्मत नव्हती. पण आता हे सर्वत्र सर्रास चाललय.

मिर्च मसाला


उन्हाळयाची चाहुल लागायला लागलीय.

आश्चर्य



यक्षाने या युगात पांडवांना विचारले असते की सर्वात मोठे आश्चर्य कोणते तर त्यांनी अचुक उत्तर दिले असते.

"या येवढेल्या घाणीत असलेल्या रस्तावरच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल वर खावुनही ही खाणारी माणसे आजारी पडत नाहीत " हेच मोठाले आश्चर्य.

महानगरपालीका झोपलीय. तिला तसेच झोपा काढु द्या.

वॉर्ड


इब्ने-मरियन हुआ करे कोई
मेरे दुख की दवा करे कोई

हॉस्पीटल बाहेरील जग किती सुंदर आहे.

Thursday, March 27, 2008

वॉर्ड

बसलोय शांतपणे
काहीच न करता
की काहीच न करणॆ हे ही काहीतरी करणे आहे
वसंत ऋतु येतो आणि
फुले बहरतात
स्वःताहुन


डॉंक्टरांच्या कंन्सल्टींग रुम बाहेरील प्रतिक्षागृहात बसलोय, वाट पहात आपला क्रमांक केव्हा येतो याची, लांबत चाललेला प्रतीक्षाचा काळ. जीवघेणा काळ, तो ही किती लांबावा ? तीन तास, चार तास ? तो पर्यंत जीव टांगणीला.


महागड्या, अती महागड्या , अत्याधुनिक चाचण्या करुन झालेल्या, रोगापेक्षा रोगाचे निदान करायला लागणाऱ्या या सर्व चाचण्या जास्तच तापदायक रुग्णासाठी.


चाचण्यांचे निदान दाखवायला आणलयं. या भल्या मोठाल्या चाचण्यांचे निदान काय तर ’ नरो वा कुंजरवा’ .
हे ही असु शकते किंवा ते ही असण्याची शक्यता असावी. सगळाच संशयास्पद मामला.


या निदानाचे निदान करण्यासाठी अजुन काही चाचण्या करायला लागतील. ही डॉ. मंडळी रोग्यातला माणसावर उपचार करत असतात का केवळ रोगावरच तेच जाणो !


तो पर्यंत केवळ प्रश्नचिन्हे. बस्स.

Wednesday, March 26, 2008

गैरसमज

काय पण ही आगावु लोक. उगाचच आयुष्यभर भलताच गैरसमज उराशी कवटळुन बसतात. आता बघा ना श्री. अमिताभ बच्चन हे मुळचे खरे शेतकरीच पण आपण त्यांना उगीचच अभिनेता समजत बसलो.
आता ही गैरसमजुत दुर झाली असावी.
"आज मेरे पास बंगला है, गाडी है, दौलत है और मां (धरती मां ) भी है "

Monday, March 24, 2008

गणपत पाटील

गणपत पाटील गेले.
मला आठवतात ते चित्रपटातील तमाश्याच्या दॄश्यात नाच्याचा भुमीकेत एकमय, समरस झालेले गणपत पाटील व त्याच बरोबर बऱ्याच वर्षापुर्वी सह्याद्री वाहीनी वर मुलाखात देताना " ही नाच्याची भुमीका कायमची मागे लागल्यामुळे वाटणारी खंत, नाच्याचाच शिक्का कपाळी बसल्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यात होणारी परवड" हे सारे सांगतांना डोळ्यात पाणी आलेले गणपत पाटील.
पण काही म्हणा ही भुमीका करावी तर गणपत पाटीलांनीच. नाच्या म्हणजे गणपत पाटील व गणपत पाटील म्हणजेच नाच्या हे समीकरण न सुटणारे आहे.
आज ’नाच्या’ पोरका झाला.

Sunday, March 23, 2008

माझा साक्षात्कारी हॄदयरोग - लेखक- डॉ. अभय बंग - मधुन साभार.

माझं कोलेस्टिरॉल का वाढलं असावे ? मांसाहारी, लठठ, बैठया लोकांमधे ध्रुम्रपान करणाऱ्यांमधे, मानसीक तणाव असणाऱ्यांमधे, स्पर्ध्यात्मक जीवन जगणाऱ्यांमधे कोलेस्टिरॉलचं प्रमाण वाढतं. मी या पैकी कुठेही बसत नव्हतो. मी संपुर्ण शाकाहारी होतो. पण आमच्या घरात माझी आई, आजी, मावशी , सगळ्यांना दुधाचं खुप कौतुक; आणि मलाही लहानपणापासनं दुधाची व तुपाची खूप आवड होती.

माझी आजी सांगायची, की माझे पणजोबा दरोरोज सकाळ संध्याकाळ्च्या जेवणामधे एक एक वाटी तूप खायचे. त्या मुळे त्यांची प्रकॄती इतकी मजबूत होती. म्हणून ती आम्हालाही भरपूर तुप खाण्याचा आग्रह करायची.

ती मरणाच्या दोन वर्षापुर्वी मी तिला सहज विचारलं. " का गं आजी, तुझे वडील कोणत्या वयात मेले ? " ती म्हणाली, "बत्तीस वर्षाचे असतांना गेले. जेवता जेवता अचानक छातीत कळ आली, मान टाकून दिली व फटकन मेले !" नक्कीच हार्ट अटॅकनी मेले असणार ! वाटी वाटी तूप खाल्याने काय होतं ते तेव्हा माझ्या चांगलच लक्षात आलं.

तेव्हापासून मी तुप कमी केलं. पण माझी दुधाची आवड मात्र मी काही नियंत्रीत केली नव्हती. शिवाय मिठाई, आईस्क्रीम, देखील मला विलक्षण आवडायचे, जितके काही प्राणिजन्य पदार्थ - दूध, लोणी, तूप, तसचं मांस, अंडी या सगळ्या अन्नामधे, आणि चॉकलेट, नारळाचे तेल, यांच्यामधे कोलेस्टिरॉल असतं. माझ्या वाढलेल्या कोलेस्टिरॉलचं एक कारण कदाचीत या दुधा-तुपात असावं.

- माझा साक्षात्कारी हॄदयरोग - लेखक डॉ. अभय बंग - मधुन साभार.

Saturday, March 22, 2008

वॉर्ड

प्रतिक्षा, निव्वळ प्रतिक्षा, रुग्णालयात आपल्या हाती असते केवळ प्रतिक्षाच. ही प्रतिक्षा करत बसणे हे मोठे जीवघेणे काम असते. आपला रुग्ण कधी एकदा बरा होवुन घरी जातो याची प्रतिक्षा किंवा त्याचे होणारे हाल पहावत नसल्यामुळे आता हाल कधी संपायचे याची प्रतिक्षा.
रुग्णालयाच्या लांबलच्चक कॉरीडॉर मधुन अस्वथपणे फेऱ्या मारत डॉक्टरची वाट बघणे, कधी येतात व काय सांगतात याची प्रतिक्षा, परवा केलेल्या टेस्ट चा रिपोर्ट काय येतो याची प्रतिक्षा. लवकरच घरुन कोणीतरी आपल्याला रिलीव्ह करायला येईल, जरासा मानसीक, शारीरीक ताण सैलावता येईल याची प्रतिक्षा.

शरीराचे भोग हे भोगलेच पाहीजेत या वांजोट्या युक्तीवादावर मनाचे खोटे समाधान करत रात्र संपण्याची प्रतिक्षा.

संपायची कधी ही प्रतिक्षा.

सारे तुज्यात आहे

बदल हाच शाश्वत असतो म्हणतात. पण खरच असतो काय ?

आज सह्याद्री वाहिनीवर सकाळी एक गाण्याचा कार्यक्रम एक गोष्ट जाणावली की आपण तीच तीच जुन्या जमान्यातील गाणी संबंध आयुष्य ऐकणार आहोत काय ? यातून बाहेर पडणार की नाही ? गाणी कोणती तर " नदीला पुर आलेला, कशी येवु मी कशी येवु " व ’ डोलकर डोलकर मी दर्याचा राजा ’. अल्फा मराठी वर ही हाच प्रकार.

अवती भबती, तरुण नव्या उमेदीचे कवी, कवयित्री, संगीतकारांकडुन सर्वोत्तम नवनिर्मीती होत असतांना देखील आम्ही त्या कडे दुर्लक्ष करुन अजुन जुन्या काळातच रमण्यात आनंद मानत कशासाठी असतो ?

Friday, March 21, 2008

व्हिगन

बायको नुसती कावुन राहलीय. तु एक एक नविन खुळ काढत असतोस, आणि मग एकदा का ते डोक्यात भरल की मग बास तेच तुझ सुरु रहात. चहा प्यायचा नाही, पनीर खायचे नाही , चीज, मस्का नको मग खायचे तरी काय ?

मासांहार बंद करुन शुद्ध (????) शाकाहार सुरु करणे फारच सोपे होते, चिकन , मटण, मासे, अंडी खाणॆ बंद केले , झालात तुम्ही शाकाहारी. पण व्हिगन बनणे जरासे जड जात आहे.

स्थळ एक उपहारगृह, बहुतेक पदार्थात पनीर, मस्का, क्रिम, चीज बघुन मी नाकारलेले. शेवटी चना व तेलकट भतुरा वर ( जो मला तब्बेत्तीमुळे खायचाच नाही ) तडजोड केलेली. मग त्यात कहर म्हणाजे सर्व पदार्थ मागवुन झाल्या नंतर तो विचारता झाला "आप लोग जैन है क्या ?" म्हणजे थोडक्यात तुम्हाला कांदा लसण व्यर्ज तर नाही ना ? , त्याला बोललो "भाईसाब जैन नही व्हिगन है !" ह्या ह्या ह्या तो हसायला लागला, त्याला वाटले मी विनोद केला. त्यात त्याची काहीच चुक नाही. ( मग मी त्याला भले व्हिगन म्हणजे काय या वर भले मोठाले लेक्चर दिले व त्याला लेक्चर दिले म्हणुन मुलाने मला, हा भाग वेगळा) ही गलती भले भले करतात. मटा पण त्यातुन सुटले नसावे.

आजच म.टा. मधे बातमी आहे. "शाकाहारातून आथ्रायटिस टाळा , सांधेदुखीचे रुग्ण शाकाहाराचे सेवन करुन अर्धांगवायू किंवा हॄदयविकाराचा झटका येण्याची शक्यता टाळू शकतात असे या संशोधनातून निदर्शनास आले आहे "

पण हीच बातमी चारपास दिवसापुर्वी एका आंग्लभाषीय वर्तमानपत्रात ही आली आहे व त्यात त्यांनी व्हिगन आहारपद्धतीचा स्पष्ट्पणॆ उल्लेख केला आहे. व त्यात व्हिगन म्हणजे काय हे ही सुस्पष्टपणे लिहीले आहे. व या आहारपद्धतीमुळे वर दिलेले रोग टाळता येतात हे म्हटले आहे.

माझ्या मते म.टा. ने शाकाहारी व व्हिगन मधे गफलत केली आहे. पण त्यांचा मांसाहार बंद करा हा निष्कर्ष मात्र अगदी योग्य आहे.

होली की मुबारक


Thursday, March 20, 2008

सारे तुझ्यात आहे.




आभास चांदण्याचा या लाजण्यात आहे ।
जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे ॥
बॉग व मायबोलीवर कविता लिहीणाऱ्या, सदैव हसतमुख सौ. जयश्री कुलकर्णी अंबासकर यांनी लिहीलेल्या अप्रतीम प्रणयगीतांच्या सी.डी. प्रकाशनाचा एक देखणा सोहाळा आज मुंबईत पार पडला.

ग्रेट, जयश्री, हार्दिक अभिनंदन, ही तर केवळ सुरवात आहे. भविष्य उज्जल आहे.

http://maajhime.blogspot.com/
ही सुमधुर गीते गायली आहेत देवकी पंडीत, वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी व स्वरबद्ध केली आहेत अभिजीत राणॆ या अतिशय गुणी तरुण संगीतकाराने.

Wednesday, March 19, 2008

मै चंदा की चांदनी हु , मै तारोंकी रानी

आज चंद्र विशेष खुलुन दिसतोय. सिंह राशीतल्या मघाच्या विळ्याचा कचाट्यात तो रमलाय. हे मोहक दॄष्य पाहायलाच हवे.

मुझे ये ग़म है मेरी झु़बां ने कुछ न कहा.

मेरे लिये वो ग़मे इंतज़ार छॊड गये
एक अनोख़ी बहार छोड गये ।

मुझे ये ग़म है मेरी झु़बां ने कुछ न कहा.

लता नी गायलेले व अनिल बिश्वास नी चालबद्द्ध केलेले हे अनोखा प्यार चित्रपटातले अप्रतीम गाणॆ.

हेच गाणे त्यांनी मीना कपुर कडुन परत का बर त्यांनी का बरे गावुन घेतले असावे ?

हाल, हाल आणि हाल

रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णाला झालेली व्याधी बघितली की त्याची खुप दया येते. माणसाला अश्या प्रकारचे कष्ट, वेदना, यातना सहन करायला लागु नयेत. काल बाजुच्याच बेड वर एक तोडांचा कॅन्सर असलेली बाई दाखल झाली. तिच्या तोंडावर आलेल्या कॅन्सरस ग्रोथ नी चक्क एक बऱ्यापैकी सोंड निर्माण झाली आहे. कस ती हे सहन करत असेल अल्ला जाणो.

मला एक समजत नाही की उदवाहनाची वाट पहाणारी माणसे वर जाण्यासाठी व खाली जाण्यासाठी असणारी दोन्ही बटणॆ उताविळपणे सतत का दाबत रहातात ? आपल्याला जर खाली जायचे असेल तर खालची दिशा दाखविणारेच बटण दाबावे येवढेसुद्ध्या त्यांना कळत नाही. मग कारणाशिवाय उदवाहन प्रत्येक मजल्यावर थांबत जाते. हा येणारा अनुभव सार्वत्रीक आहे.

अजुन पर्यंत निदानच होत नाहीय.

Tuesday, March 18, 2008

वॉर्ड




आता रुग्णाच्या समोरच आलेल्या पाहुण्यांनी तिला झालेल्या आजारपणाची सखोल चौकशी करणे म्हणजे जरा अतीच झाले. समोरच्यांची तारांबळ. जे काही विचारायचे आहे ते खोली बाहेर आल्यावर विचारांना.



भरीस भर म्हणजे घरचे बहुतेक सर्व तापाने आजारी, मला तीन दिवस ताप, वडीलांना ताप , सगळी गंमत जंमतच चालली आहे.




आज रात्रपाळी करायची माझी पाळी. रुग्णालयात दिवस कसातरी निघुन जातो, पण रात्र नुसती खायला उठते, वेळ जाता जात नाही. परत काही वाचायला नेले तर वाचनही होत नाही. जानेवारी पासुन सुरु झालेला हा खेळ कधी बरा संपायचा आहे ? एकदा ती बरी होवुन घरी परतली की देव पावला.



कस व्हायच ?

Sunday, March 16, 2008

वॉर्ड

दोन पाऊले पुढे तर दहा पाऊले मागे .

दुःखावर गालिब म्हणतात.

क़ैदे-हयातो - बन्दे-ग़म अस्ल मे दोनों एक है
मौत से पहले आदमी ग़म से निजात पाये क्यों

’गालिबे’ - खस्ता के बग़ैर कौन-से काम बन्द है
रोइए ज़ार- ज़ार क्या कीजीए हाय-हाय क्यों

रात्री खुप एकाकी, हताश व उदास वाटत होते. बाहेर रात्रभर कॉरीडॉर मधे मी एकटा बसलेलो.
माणसाला मरण कस यावे , वेदनारहीत, शांतपणॆ, आता या जगात आहे पुढल्याक्षणी डोळ्याची पापणी लवते न लवते तोच पुढचा मुक्काम. हाल हाल सहन करीत कणाकणाणे तडफडत जगत रहायचे !
आता सर्व काही आलबेल आहे म्हणतांना नविनच काहीतरी उद्भवते.

पहाता ती बाला कलेजा खल्लास झाला.

यु खुदा के लिये छिनो ना मेरे होशोहवास । ऐसे नजरोसे ना देखो के खुमार आ जाय ।

मधुबाला वर टपाल तिकीट प्रकाशीत होतय.
दिलीप कुमार आणि मधुबालाचा "तराना" हा माझ्या आवडीचा चित्रपट, काय रोमान्स फुललाय या चित्रपटात, जणु ऐन बसंतात बहालेला पलाश. उगीचच नाही त्या दिलीपकुमारला "सीने मे सुलगते है अरमान आंखोमे उदासी छाई है ! दो चार कदम मंझील थी किस्मत ने ठोकर खायी है । " गात उसासे टाकावेसे वाटले. लता नी ही हे गाणे गायलय पण त्याला तलतनी गायलेल्या गाण्याचा खुमार नाही.


राजहट चित्रपटात "आये बहार बनके लुभाके चले गये" या गाण्यात पण का ती दिसली आहे. जान कुर्बान. पण नायक होण तर प्रदीप कुमार, बरसत की रात मधे हिरो कोण तर भारत भुषण, असते एकेकाचे नशीब.


तर, लोकसता, रविवार वॄत्तान्त मधे "मधुबालावर ’शिक्का’ मोर्तब " हा श्रीकांत बोजेवार यांनी लेख लिहीला आहे. त्यात त्यांनी नेहमीच चुक केली आहे. ते म्हणतात "एकुण या तिकीटाने घोळंच होणार आहेत, तिकीट विकत घेतंल तरी ते पाकीटावर चिटकवुन कोणाला तरी पाठवण्याची हिंमत कुणा लेकाला होणार आहे ? मग त्यांचा पुढे कल्पनाविलास सुरु झालाय ’खाकी वर्दीतला एक तरुण पोस्टमन धो धो पाऊस, आणि आडोशाला थांबलेल्या पोस्टमनला हातातल्या पाकीटावर मधुबाला दिसते ... भारत भूषण ला डिलीट करुन तो अख्ख गाणं आठवतो ’जिंदगी भर नही भुलेगी वो बरसात की रात’ , अश्या अंगाने हा लेख पुढे सुरु रहातो.


या प्रकारच्या टपाल तिकीटा बाबतीत अनेकांचा हा असाच गैरसमज आहे , त्यांना वाटते हे तिकीट, टपाला वर डकवण्यात येते, मग त्या वर ’शिक्का’ मोर्तब होते, पोष्टाच्या उदासवाण्या शाईने मग तो चेहरा विद्रुप होणार. त्यांनी हे जाणुन घेयला हवे की हे टपाल तिकीट "फिलॅटलिस्ट " म्हणजे तिकीटे गोळा करण्या संबधीचे आहे. हे तिकीटे गोळा करण्याचा छंद असलेल्या माणसांना संग्रही ठेवण्याकरीता काढले जाते, टपालावर लावण्यासाठी नाही, ते चांगलेच जपुन ठेवले जाते.

तेव्हा काळजीचे कारण नसावे , सुखाने गावे ’पहाता ती बाला कलेजा खल्लास झाला’.

Saturday, March 15, 2008

मदत

काल रात्री ९.३० वाजता सैफीच्या बाहेर टॅक्सीतुन उतरलो. बाहेर एक कुटुंब उभे होते. नवरा, बायको व मुलगा. दोघे जण पंचविस-तीस मधले वाटत होते, मुलगाही ५-६ वर्षाचा दिसत होता. चांगले डिसेंट कुटंब. त्याने सफारी परीधान केला होता. उतरता उतरता माझ्या काना जवळ तो काही तरी पुटपुटल, पुढे हात पसरवत.

मी माझ्याच विवंचनेत होतो, लक्ष न देता पुढे निघुन गेलो, पण एका झटक्यात मनाला कुठे तरी काहीतरी जाणवले ,म्हटले असु शकतात ते संकटात. गेट जवळ उभ्या असलेल्या वॉचमन ला सांगीतले, बाबारे हे काय प्रकरण आहे बघ, माणसे तर भली चांगली दिसताहेत, मग अशी रस्तात हात का बर पसरुन उभी आहेत ?

त्यांना जवळ बोलावले, यवतमाळ वरुन मुंबईला नोकरीच्या शोधात आम्ही आलो आहोत, पाहुणे काही भेटले नाही, जवळचे पैसे सारे संपले, परत जायला पैसे नाहीत, काम कुठे मिळात नाही. दुसरा काहीच मार्ग नाही. त्याच्या बोलण्यातील खरे पणा कुठे तरी जाणवला, शंभर रुपये काढुन त्यांच्या हातात दिले.

मागे एकदा असेच मी एका कुटुंबानी मंत्रालयाजवळ माझ्या कडे पैसे मागीतले होते, तेव्हा ही मी दिले होते.

माझ्या एका पोलीसातील मित्राला हा प्रसंग सांगीतला तेव्हा त्यानी मला वेडयात काढले, फसलास तु.

असेना का फसलो, कदाचीत ते खरच अडचणीत असतील तर ? खर काय नी खोटे काय ? आणि जावुन जावुन कितीसे पैसे गेले ?

आणि ते जर खरोखरीच अडचणीत असतील तर मात्र या पेक्षा जास्त मदत मी त्यांना न करु शकत असल्याची माझी अगतीकता मला जास्तच छळत राहिलीय.

Friday, March 14, 2008

हे काय भलतेच ?

लावणीत भडकला अंगार, नटखट सुंदराफेम कु.प्रतिभा मुंबईकर ,तमाशाप्रधान नाटक. खेळ कश्यासाठी तर ब्रम्हचारी हनुमान मंदिराच्या जिर्णोद्धार मदतनिधी साठी. मारुतीराया काही खर नाही रे.
आता बघा हा खेळ किसनाच्या देउळासाठी असत तर एक वेळ मान्य करता आल असत. तमाश्यात नाही तरी किसनभगवान, मग त्यांचा पेंद्या, मग दुध बाजाराला घेवुन जाणाऱ्या गवळणी, पेंद्यांनी त्यांना अडवणॆ वगैरे वगैरे असतच असत. पण हनुमानाच्या देवळासाठी साठी अस अंगार भडकत नाचणार कोण तर नटखट सुंदराफेम कु.प्रतिभा मुंबईकर, जरा ऑड वाटत. म्हणजे भजन किर्तन असत तर समजल असत पण !



वॉर्ड

आशा निराशाचा खेळ चाललाय.

Thursday, March 13, 2008

गिरगावातील आदर्श घरगल्लीचा एक नमुना




गटारगंगा आली रे अंगणी. भर मुख्य रस्त्तातील , राजा राममोहन रॉय मार्गावरील. मराठी माणसांच्या भरवस्तीतील ही घरगल्ली. दोन इमारतीमधली मोकळी जागा, घरातील नको असलेल्या गोष्टी खाली भिरकावुन देण्याची रहिवाश्यांच्या हक्काची जागा.


पिण्याच्या पाण्याचे पाईप पहा कसे सांड्पाण्यातुन , कचऱ्यातुन गेले आहेत. गंजलेल्या, सडलेल्या या पायपामधे पिण्याच्या पाण्यात सांड्पाणी मिसळते व रोगराई मागे लागते, डास ,घुशींचे हे नंदनवन.


पेन स्केच




Wednesday, March 12, 2008

आणि राजा आज हसला

आणि आईचा राजा आज हसला. आज तिला आयसीयुतुन वॉड मधे हलवलय. परिस्थीती अजुन गंभीरच आहे. पण जरासी, थोडी फार का होईना सुधारणा आहे, धोका अजुनही टळलेला नाही. या सैफीत हलवण्याचा एका झटक्यात घेतलेला निर्णय किती योग्य ठरला.

पेन स्केचींग

आयसीयु रात्र कितवी ? देव जाणे !

दुनियातले सर्वात मनमोहक लुभावणॆ हास्य कोणाचे ? बालकाचे ? तारुण्यात खळखळुन करणाऱ्या युवक, युवतीचे की प्रेयसीचे की आणखी कोणाचे ?

काल रात्री त्या म्हाताऱ्या बाई चा चेहरा फुललेला बघीतला आणि या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

तणावपुर्ण वातावरण, ताण नुसता वातावरणात भरुन उरलेला. जीवघेण्या प्रतिक्षेला अंत नव्हता, नुकतेच तिच्या नवऱ्याला आयसीयुत दाखल केलेले. हार्ट ऍटॅक आलेला. ओळखीच्या डॉ. नी नेहमीच्या रुग्णालयात जागा नसलेल्या मुळे या अनोळखी ठिकाणी पाठवलेले, त्या मुळे आधीच चिंताग्रस्त. कोण उपचार करणार ठावुक नाही. भरवश्याचे डॉ. दुर राहीलेले. आत उपचार चाललेले. आत काय परिस्थीती आहे अल्ला ला ठावुक. भरवसा केवळ त्या रहीमते रहीम, रहमदील परवरदीगार वर.

काही वेळाने आत बोलवणे आले. हे असे बोलावणे आले की ताण असह्य वाढायला लागतो, काय ऐकायला लागेल नी काय नाही ? आत जाई पर्यंत जीवात जीव नसतो.

ही इज आउट ऑफ डेंजर नाऊ. हि इज स्टेबल. त्यांच्या जीवावरचा धोका टळाला, केवळ एक वाक्य, दिलासाजनक शब्द, आणि साऱ्या बसंतातील बहार त्या चेहऱ्यावर सामावला गेला.

मी देखील वाट बघतोय वसंताची.

Tuesday, March 11, 2008

रामायण-महाभारत

एक नवे पुस्तक वाचायला घेतले आहे. श्री.र.भिडे लिखीत रामायण-महाभारतातील आत्महत्या.

प्रस्तावनेत म्हटलय

या महाकाव्यांमधील असंख्य पात्रापैकी ज्यांनी या ना त्या कारणास्तव आत्मनाशाची कास धरली, वाट चोखाळ्ली, त्यांच्या त्या संदर्भातील प्रेरणांचा शोध घेणारे हे वेधक पुस्तक म्हणाजे रामायण-महाभारताचा आगळा धांडोराच आहे. भारतीय जनसामान्यांच्या आदराचे आणि श्रद्धेचे केंद्र असणारे हे पवित्र ग्रंथ आधारभुत मानून आत्मनाशासारख्या निंद्य, निषेधार्ह, अवैध प्रकाराबद्द्ल केलेले हे विवेचन आहे.

मी मुंबईकर


मी "मी मुंबईकर". मी मराठी, ही मुंबई माझी आहे, हे शहर मला प्रिय आहे. माझ्या शहरावर माझे प्रेम आहे, (खरोखरच ? ) ते जसे आहे तसे मला आवडते , मला त्याचा अभिमान वाटतो, ते गलिच्छ असले तरी.

राजकीय कुरघोडी व साठेमारीत रमलेल्यांना या कर्मभुमी बद्द्ल खरोखरीची , प्रामाणिक पणे आस्था केव्हा वाटॆल तेव्हा वाटुंदे ,निदान आपण तरी मनावर घेयला हवे याचे रुप पालटवण्याचे. जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगावी, जगात गलिच्छ शहरात मुंबईचा सातवा क्रम लागल्याचा.



रस्ते , त्यांची कामे व सुरक्षीतता

भर रस्तात या मशिनरी ठेवलेल्या. रात्री याच्या वर एखादे वहान किंवा दुचाकीस्वार धडकला तर ? मरणाला आमंत्रण.




सुशोभीकरण कि विद्रुपता ?






हे सिमेंट्च्या बॉक लावण्यामागचा उद्देश जरी चांगला असला तरी तो पाळला जातो का ? खोदकामानंतरची ही स्थिती. तसेच एक पडला तर बाजुच्यांची पडापड सुरु होते .

Monday, March 10, 2008

तरुणाई


सुशोभिकरण ?


सरदर्द, बदन का दर्द, पेट का दर्द, दाग,खाज,खुजली, सर्व रोगावर अक्सीर एकच उपाय. किंवा आणीबाणीच्या काळात कसा विसकलमी कार्यक्रमात एकच कार्यक्रम राबवला गेला, दिसला पुरुष की धर त्याला, न्या शिबीरात आणि, तसेच हल्ली मुंबईत चालले आहे, दिसला पदपाथ , दिसला रस्ता, दिसली गल्ली, कि घ्या हे बॉकस आणि ठोका त्यांना. या सिमेंट्च्या बॉकचा दर्जा, कामाचा दर्जा , हेतु, कशाबद्दलही काही बोलायचे नाही, काही विचारायचे नाही.



याचे पुढे होते काय ?

आयसीयु

आयसीयुच्या आत असलेले नर्स, डॉ. यांचे आयुष्य जेवढे खडतर असते त्याच्या बऱ्याचश्या कमी प्रमाणात हा होईना पण बाहेर उभ्या असलेल्या सिक्युरीटी गार्डची ही स्थिती वाईटच असते.

या अतिगंभीर अवस्थेतील रुग्णाच्या येथे आलेल्या नातेवाईकांना, हितचिंतकांना, प्रत्येकाला चौवीस तास आत मधे जावुन रुग्णाला भेटायचे असते. त्यात त्यांना अडसर असतो तो या सिक्युरीटी गार्डचा. तो बिचारा त्याचे नेमुन दिलेले काम करत असतो . मग ही माणसे त्याला आत सोडण्यासाठी विनंती, आर्जव करत रहातात, निरनिराळॆ बहाणे, कारणे सांगत रहातात, तो नाहीच बघला तर मग फायरींग, शिव्यागाळी, धमक्या देत रहातात. त्या गरीबाला तु नोकरीत कसा रहातोस ते आम्ही बघुन घेवु इतपर्यंत ऐकुन घ्यावे लागते.

परवा दिवशी एका व्यक्तीला ब्रेन हॅमरेज झाल्याने येथे आणले, त्यांच्या पाठोपाठ त्यांचा सबंध लवजमा येथे गोळा झाला, जवळजवळ ५०-७५ माणसे. प्रत्येक जण वरती रुग्णाला भेटायला येत होता, खालपासुन वरपर्यंत सर्व सिक्युरीटी गार्डसी भांडण करत. सगळा सावळाआ गोंधळ. यांना देव दोन पैशाची अक्क्ल देयला विसरला होता वाटत. एक तर त्यांच्याच रुग्णाला वाचवण्याची धावपळ, धडपड चाललेली त्यात यांचा व्यत्यय, परत इतरांना जिवघेणा त्रास, रुग्णालायावर अतिरिक्त ताण. आसुड हाती घेवासा वाटला दोन फटके मारुन सर्वांना हकलवुन दयायला.

या नातेवाईकांवरुन एक प्रसंग आठवला. मी अठरा वर्षाचा असतांना माझे वडील खुप आजारी होते, कोणत्याही क्षणी कोमामधे जाण्याआधीची केवळ एक पायरी, बाहेर मी चिंताग्रस्त अवस्थेत उभा. एका फार मोठया स्पेशालिस्ट डॉ. ची वाट बघत, एका विद्वान गॄहस्थाने आत खोलीत जावुन वडीलांना सांगीतले "चला आता जाण्याची तयारी करा. तुम्ही लवकरच मरणार आहे, बाहेर तुमचा मुलगा रडत उभा आहे ". नशीब आमचे बलवत्तर त्यांचे हे बोल ऐकुन काही कमी जास्त झाले नाही. बरे होवुन ते घरी परतले.

Sunday, March 09, 2008

ढापुगीरी

उचलेगीरी पकडण्यासाठी, मदत घ्या. http://www.copyscape.com/
एकदा मी देखील "माझीमुंबई" या माझ्या बॉगवर दुसऱ्या एका बॉगवरील त्या विषयाशी सुसंगत असलेला मजकुर कॉपी केला होतो, सुरवातीस त्या बॊगचे नाव लिहीणाऱ्यांचे नाव लिहीले होते व यांनी हे खुप सुरेख लिहीले आहे असा उल्लेख केला होता. पण माझी चुक झाली मी त्यांची परवानगी विचारली नाही. बिनशर्त त्यांची माफी मागीतली.


http://www.copyscape.com/

Defending your rights online, Copyscape is the leading provider of services that protect your content against online plagiarism and theft.
Free Services
Copyscape
The free Copyscape service makes it easy to find copies of your content on the Web. Simply type in the address of your web page, and Copyscape does the rest. Copyscape finds sites that have copied your content without permission, as well as those that have quoted you.
Banners
Place free Copyscape Banners on your website to warn potential plagiarists against stealing your content. Available in multiple colors and sizes.
Resources
Copyscape offers free information on plagiarism and the Copyscape Forum for discussion.
Professional Services
Premium
Copyscape Premium provides more powerful searching than the free service with no monthly limit. You may also search for copies of your offline content by copying and pasting the text.
Copysentry
Copysentry provides ongoing protection for your entire website, monitoring the web automatically and alerting you to new copies of your content.
Both services include integrated case tracking to manage your responses to multiple instances of plagiarism.
More about Copyscape
Copyscape is provided by Indigo Stream Technologies Ltd, a private company co-founded by Gideon Greenspan. For additional information on Copyscape, please see the Frequently Asked Questions. You can also read press on Copyscape, or user testimonials from people like you.
Use of all services is subject to the Terms and Conditions of use. We invite your comments and suggestions for improving the Copyscape service.

Copyscape © 2008 Indigo Stream Technologies, providers of Google Alert. All rights reserved.

Saturday, March 08, 2008

आयसीयु

आज सैफ़ीच्या आयसीयुत आणुन एक आठवडा झाला. प्रकॄतीत किंचीतशी सुधारणा आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हॉस्पीटलचे आलेले बिल बघुन आलेल्या झटक्याने रुग्ण बरा होवुन घरी गेला की त्याचा नातेवायकावर दाखल होण्याची वेळ येत असावी. एकाचे बिल म्हणे तीस-चाळीस लाखाच्या घरात गेले आहे.
आता वाट बघण तेवढेच हातात आहे.
आयसीयु च्या बाहेर प्रतिक्षा करत बसणॆ फार बैचेनीच काम असते. त्यात आजुबाजुचे अतिगंभीर अवस्थतेतील रुग्ण एकापाठोपाठ एक असे दगावत असतांना बघत.

Thursday, March 06, 2008

कॄषी व क्रिकेट

आपल्या कॄषीमंत्रांवर ते कॄषी पेक्षा क्रिकेटमधे जास्त लक्ष घालतात म्हणुन विरोधक टीका करतात पण ते एक गोष्ट लक्षात घेत नाहीत. दोन्ही मधे फारसा फरक नाही.

एकतर दोन्ही "क" पासुन सुरु होतात. दोन्हीला जमीनीची नितांत आवश्यकता असते, एकीकडॆ शेताची तर दुसरीकडे मैदानाची. एकीत जमीनीवरुन नांगर फिरवला जातो तर दुसरी कडॆ रोलर, एकी कडे धान्य उगवते तर दुसरीकडे पैसा. एकात सावकार नाडतो तर दुसरीकडे अंपायर. शेतात माकडे त्रास देतात, तर मैदानात "माकड" म्हटल की त्रास होतो. एकीकडे कर्ज माफी मिळते तर दुसरी कडे टॅक्समाफी. एकीकडॆ शेतकरी आत्महत्या करतात तर दुसरीकडॆ सट्टाबेटींग करणारे बुकी. एकीकडॆ पाऊस पडला नाही तर शेतकरी रडतो तर दुसरीकडे प्रतिस्पर्धींनी धावांचा पाऊस पाडला तर खेळाडु व हरले तर भारतवासी रडतात. शेतीवर लगान आहे क्रिकेट वर ही "लगान" आहे. आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे आपले साहेब इथेही आहेत आणि तेथेही आहेत.

अच्छा म्हणुन ते म्हणाले होय आता शेतीत काही दम उरला नाही, दुसऱ्या व्यवसायाकडे वळा.

आणखी काही साम्य कोणाच्या लक्षात येतय काय ?

सिर पे धरी गंग. पिनाकी महाग्यानी, अजब रुप धारे,

महाशिवरात्री निम्मीते बरफाचे शिवलिंग.


चालता चालता गायब होयचय ? चला मग तर चर्नीरोडला

पॄथ्वीच्या अंतरंगात काय दडलय याचे कुतुहल मानवाला नेहमीच वाटत आले आहे. ती जिज्ञासा शमवण्याची विनामुल्य सोय मुंबई महानगरपालीकेनी केलेली आहे. तरी इच्छुक त्याचा लाभ घेवु शकतात







जवळच पोलीसांची गाडी उभी होती, त्यांच्या निदर्शनास घरी दुपारी परततांना ही बाब आणली, पण बहुतेक त्यांना कायद्याने पंचनामाच करायची परवानगी असावी, आणि कदाचीत त्यांच्या शरीरयष्टीचे व भरल्या पोटाचे माप लक्षात घेता त्यांना तसे स्वःताला वैयत्तीकरीत्या खाली भुयारात उतरणॆ नामुमकीन असल्यामुळे अधिक दखल देण्यात स्वारस्थ नसावे.

पण रस्तावरुन पायी चालणाऱ्या अजाणांना या पाताळगंगेची भेट मी तशी सहजासहजी होवु देणार नव्हतो. या साठी अस्मादीकांना जरासे श्रम पडले. ठिक आहे.


आयसीयु रात्र

भाक्रानंगल, चंदीगड, कसौली, सिमला,कुलु, मनाली. सर्व जागांवर झालेली हॉटेल्सचे, वाहनाचे, रेल्वे चे आरक्षण शेवटी रद्द केली, छोकऱ्याची बारावीची परीक्षा संपल्यासंपल्या त्याच्या श्रमपरीहार्थ सफरीचा मोठा बेत आखला होता. आले देवाजीच्या मनी.

सबंध आयुष्यात रुग्णालयात घालवलेली ही कालची कितवी रात्र देव जाणे. लहानपणापासुन रुग्णालयाची सवयच होवुन गेली आहे. बर प्रत्येक वेळी अवस्था गंभीरच. मी स्वःत, घरातील सर्वच जण, मॄत्युला भोज्या करुन आलेले. जवळचे नातेवाईक, शेजारी यांच्यासाठी देखील रुग्णालयात मी रात्री जागवल्यात. तेव्हा फारसे विशेष जाणवत नाही. पण आता हळु हळु चाळीशीत त्रास होवु लागला आहे.
त्यात रात्री येथला एक रुग्ण अल्लाला प्यारा झाला, दुसरा सिरीयस झालेला. मग त्यांचे भरपुर नातेवाईक वर आयसीयुत आलेले. झोप काही लागेना, मध्यरात्री पर्यंत खाली रस्तावर उभा राहुन टाईम पास करत उभा राहीलो. जुने हिंदुजा कॉलेजचे दिवस आठवत. या जागी ईराणी होता, चहाचा एक प्याला घेवुन रंगलेल्या चर्चा, वादविवाद. फुकटचा मराठी माणासांच्या नेत्यांच्या नादाला लागुन विद्यार्थी नेता बनुन भाईगीरी करण्याऐंवजी प्रामाणीकपणे अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले असते तर ?

वर गेलो, हॉल मधे बऱ्याच जणांचे मोबाईल वर मोठमोठयाने एकाच वेळी बोलणी सुरु होती. बाहेर रडारड, आरडाओरडा.

मग ओशोनी सांगीतलले आवाजाचे ध्यान करायला सुरवात केली, प्रत्येक आवाज वेगवेगळा ऐकायला सुरवात केली. एका वेळी आपण केवढे आवाज ऐकत असतो ! कधीतरी झोप लागुन गेली ती शेजाऱ्यांच्या घोरण्याच्या आवाजाने जाग ऐण्यासाठी.

Wednesday, March 05, 2008

आयसीयु. सकाळ.

आयसीयु. सकाळ. तब्बेत आहे तशीच. फारसा जास्त फरक नाही. किंचीतशी सुधारणा आहे असे डॉक्टर म्हणतात. पण तिचे चाललेले हाल बघवत नाहीत.

काल रात्री घरी झोपायला गेलो, सकाळी लवकर उठुन रुग्णालयात गेलो. वरती आयसीयुच्या बाहेर हॉल मधे बसलेल्या नातेवायकांचे सुतकी, तणावपुर्व चेहरे बघवले नाहीत. सर्वांचेच रुग्ण गंभीर अवस्थेत. सैफी मधे आयसीयु च्या बाहेर नातेवाईकांसाठी एका हॉल मधे झोपण्यासाठी बेडची व्यवस्था आहे. आत गेलो , वातावरणात एक प्रकारचा दर्प भरुन उरलाय. आतापर्यंत सतत तिथेच असल्यामुळे हा वास जाणवत नव्हता.

एसी असल्या मुळे खोलीत सर्व बंद बंद. दिवसरात्रभर येथे राहीलेल्या नातेवाईंकांचे वास सर्व सरमिसळ होवुन राहीले आहेत. घुसमटायला झाले. सर्व खिडक्या दारे उघडुन फ्रेश हवा, वारे आत घ्यावेसे वाटले. मग थोडयावेळाने त्याची सवय होवुन गेली.

हातात फक्त वाट बघणे आहे.

चकाचक मुंबई

मुंबई व दिल्ली या दोन्ही शहरांचा जगातील सर्वात गलिच्छ २५ शहरामध्ये समावेश असल्याची बातमी वाचुन आनंदाने उर भरुन आला.
हा सन्मान मुंबईस मिळविण्यासाठी ज्याचें ज्यांचे हातभार लागले आहेत त्यांचे सर्वांचे मनपुर्वक आभार.
जगामधे मुंबईस गलिच्छ शहरांच्या क्रमात सातवा क्रम मिळवुन दिल्या बद्दल बॄहनमुंबई महानगरपालीका, पालीका आयुक्त, माननीय महापौर, सन्माननीय नगरसेवक, आमदार, खासदार, ही घाण साफ करण्याचे आदेश देण्याऐवजी नको त्या, भलत्याच गोष्टी करत बसलेले तसेच घराकडे दुर्लक्ष करुन, ते साफ करायचे सोडुन राज्य भर संचार करत राहीलेले आपापले, आपले तारणहार नेते मंडळी, व समस्त भुमीपुत्रांचे, उपऱ्यांचे, आपल्या माणसांचे, परक्या माणसांचे सर्वांचे हार्दीक अभिनंदन.

खंत एकच वाटते की कठोर परीश्रमानंतर ही आपल्या क्रम जगात सातवा लागला. ही एक लांछनास्पद बाब आहे.

आपण सर्वांनी अधिक काळजी व मेहनत घेतल्यास आपण नक्कीच पहिल्या क्रमांकावर येवु शकतो.

कठोर परीश्रमास पर्याय नाही. शिस्तीने राष्ट महान बनते.

Tuesday, March 04, 2008

सैफी हॉस्पीटलच्या प्रवेशद्वारावर खुप अर्थपुर्ण वाक्य लिहीले आहे.
" When I fall sick it is he who cures "
किती खरय. जेथे जातो तेथे तु माझा सांगाती ,चालवीशी हाती धरुनीया.
या दिवसात किती जण फुकटचे सल्ले देत रहातात, धार्मीक, वैद्यकीय . ही पोथी वाचा, ते चरीत्र वाचा, हा जप करा हे करा, फोटॊ बेडखाली ठेवा, ही उदी लावा, तुम्ही या डॉक्टर कडे का जात नाहीत ? या ला का कन्सल्ट करत नाहीत , हा डॉक्टर या विषयातला सर्वोतम आहे वगैरे वगैरे. परत वर बोलायला मोकळे आम्ही चांगले सांगत होतो, ऐकायला नको.
जो येतो त्याला वर आयसीयुत जावुन तिला बघायचे असते. काही जण नकार देवुन पण कसे काय कोण जाणे वर जातातच व कारणाशिवाय काहीतरी तिच्या कडे जावुन बडबडतात, हाका मारतात. कसे यांना काहीच कळत नाही ?
रस्तातुन रुग्णवाहीका सायरन वाजवत जात असतांना आपली गाडी तत्काळ बाजुला घेवुन तिला पुढे जावुन द्यायचे येवढे सुद्धा भान आपल्या कडे नाही. निदान आपण तिला अडथळा तरी करु नये ही तरी जाणीव असावी.

आयसीयुतली रात्र.

दुसरे एक डॉक्टर धीर, दिलासा देवुन गेले. मनोबळ वाढले, आशा वाटु लागलीय, मग वाटायला लागले, दळवी हॉस्पीटलमधली तिची काळाबरोबर हरणारी लढत सुरु होती, आता सैफ़ी मधे परमेश्वर कॄपेने, अल्लाच्या मेहरबानीने व सर्वांच्या सदिच्छेने, ती काळाला एकएक पाऊल मागे टाकायला लावत आहे .
नुसतेच डॉक्टर चांगले असुन चालत नाही, त्यांना लागणारी सपोर्टींग सिस्टीम मी दर्जेदार लागते ती आता येथे आहे. अंधारात अंधुकसा उजेडाचा किरण दिसायला लागला आहे. आधीच तिला इथे आणले असते तर ? दळवीत सर्वांचेच तिच्या कडे दुर्लक्ष झाले की काय ? की लढण्याआधीच पराभव स्विकारला होता ? मध्यरात्रीनंतर झालेली केवळ चार-पाच लुज मोशन्स ही सारी अतिगंभीर स्थिती ट्रीगर ऑफ करायला कारणीभुत ठरली. कि जे व्हायचे ते होतेच ?

डॉक्टर आपण सैफ़ी मधे ऍटॅच आहात काय ? एक साधा सरळ सोपा प्रश्न त्यांना आधीच इतक्या वर्षात कोणीतरी विचारला असता तर ? कशाला आम्ही त्या दळवीच्या फंदात पडलो असतो ? नाहीच हे आम्ही गॄहीत धरुन चाललो होतो काय ?

बाहेर हॉलमधे बसलेले सर्व नातेवाईक समदुःखी, एकाच समान धाग्याने बांधलेले, एकामेकाना धीर देत, सावरत, तग धरलेले. वेळोप्रसंगी एकामेकांना सांभाळुन घेणारे. येथे पेशंट्ची ओळख त्याचा नावागावा पेक्षा त्याच्या बेड नंबरनी जास्त. किंबहुना नंबरानेच तो ओळखला जातो. रात्र झाली की मग दिवसभरचा त्यांच्या मनावरचा ताण जरा सैलावत जातो, विचारपुस होयला लागते, गप्पाटप्पा सुरु होतात, पण शेवटी गाडी फिरुन परत पेशंटच्या कंडीशन कडॆ येवु लागते.

सकाळ झाली . परत असह्य चिंता भेसावु लागलीय.

Monday, March 03, 2008

आयसीयु

नातेवाईंकांना आयसीयु मधल्या गंभीर अवस्थेतल्या रुग्णाला भेटुन येण्याची ईच्छा असते, पण आपण आयसीयुत जावु नये त्याने तो डिस्टब होतो याचे भान नसते, आणि जावुन ते करणार तरी काय ?
पहील्या दिवशी चौघीजणी कश्या काय पण तिच्या जवळ पोहोचल्या, दोघींनी तर तिला हाका मारत चक्क हलवत आपण आलो आहोत याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला, नर्स जाम भडकली. परत तिला सेटल व्हायला वेळ लागला, तेव्हा पासुन आता सर्वांनाच सांगीतले आहे , रुग्णालयात येवु नका, आलेच तर खालुनच परत पाठवतो.
या सर्व गडबडीत छोकऱ्याचा आजचा Physics- 1 चा पेपर त्याला कठीणच गेला.

आय सी यु

आपण म्हणतो , परमेश्वर दयाळु असतो, पण त्याचा हा कनवाळुपणा जेव्हा हवा असतो तेव्हा तो तेव्हा तो आखडुन बसतो, जर त्याला एखादी गोष्ट करायचीच असली तर त्याने ती तत्काळ करावी, तडफड, तडफड करत करवुन घेवु नये, किती त्याने हाल करावेत काय मर्यादा आहे की नाही ?
हे सर्व असे मागे लागणॆ सुरु झाले आठ-दहा वर्षापुर्वी, ऍकुट पॅन्क्रियाटीस चा तिला जबरदस्त ऍटक आला होता, जवळ जवळ महीना भर आय सी यु त मग तेवढेच दिवस वॉडात, बरी येवुन घरी येते काय व आल्या आल्या बाथरुम मधे जाते काय व खाली पडते काय ? पाठीचे मणाके फॅक्चर, सहा महीने बिछान्यात आहे त्याच स्थितीत पडुन रहाणॆ. त्यातुन ही ती बरी झाली.
मग कांदीवली रेल्वे स्थानकात ती एका बाजुला उभी असता एकानी तिच्या हातातली पर्स खेचुन घेण्यासाठी तिला जोरात ढकलले व पळुन गेला. उजव्या बाजुचे फॅक्चर,, मग शस्त्रक्रीया, परत बिछाना,
मग दुबईत डाव्या बाजुला फॅक्चर, मध्यतंरी परत घरी पडली, उजव्या हाताची बोटे फॅक्चर. औस्टोपोरायसीस्चे हे प्रताप,
पाठी लागलेली साडॆसाती या वळणावर घेवुन आली आहे.

Sunday, March 02, 2008

आय सी यु

आय सी यु, दळवी हॉस्पीट्ल, नुकतेच तीला आय सी युत हलवलय. थोडया वेळाने मी वडीलांना खाली रुम मधे घेवुन गेलो, थोडयाच वेळात तिला सांभाळायला ठेवलेली बाई धावत धावत खाली आली. सर्वांना बोलवलय. सुन्न अवस्थेत पळतपळत वरतॊ गेलो, नर्स म्हणाली धावु नका, डॉक्टरांचा फोन आहे. मुर्ख बाईनी वेडावाकडा निरोप दिला.

आय सी यु बाहेर, सैफी हॉस्पीट्ल रात्रीचे ११.३० वाजले आहेत, चौघीजण रडत ओरडत पॅसेज मधे गोधंळ घालायला लागल्या,कोणाला तरी आय सी यु, हलवलय. इतर पेशंटचा काहीतरी विचार करा. आय सी यु त खर म्हणजे आत जावु नये, पेशंट डिस्ट्ब होतो, पण लोकांना ते कळत नाही, मग आत सोडण्यासाठी, बाहेर काढायला आलेल्या वॉचमनशी ते भांडत रहातात.

बहुतेकांचे नातेवाईक बऱ्याच दिवसापासुन येथे ऍडमीट आहेत, त्यांच्या साठी हे वातावरण रोजचेच झाले आहे, मग या बायका मोठमोठयाने बोलत बसतात, रात्रीच्या शांत वातावरणात हे बोलण्याचे आवाज किती मोठाले वाटतात.

आत तिचे डायलीसीस चालु आहे. आपल माणुस आपल्याला नेहमीच हवे असते, पण तिचे सफरींग बघवत नाही. परमेश्वर काहीजणांच्या बाबतीत आपला दयाळुपण विसरला असतो, तो फार निर्दयी वागतो. का त्याचे त्यालाच ठावुक

आई

आई माझी, खुप क्रिटीकल अवस्थेत हॉस्पीट्ल मधे आहे. काल सकाळ पर्यंत जगण्याचे चान्सीस खुपच कमी होते, डॉक्टर म्हणायले आहेत जसजसा ती वेळ काढेल तसतसा आम्हाला उपचार करायला मिळेल व जगण्याची शक्यता वाढत जाईल. तिच्रे सफरींग बघवत नाहीत. एकातुन एक त्यातुन दुसरे असे नवे नवे कॉप्लीकेशन्स उदभवत चालले आहेत.

काल सकाळपर्यंत तिची मॄत्युची झुंझ हरणाऱ्या अवस्थेत होती. दळवी नामक एका हॉरीबल हॉस्पीटलात, आमचे डॉक्टर अटॅच असल्यामुळे उपचार सुरु होते, काल सकाळी तीला सैफीत हलवले, तिथे तिच्या वर उत्तम दर्ज्याचे उपचार लगेचच सुरु झाले आहेत. आधीच तिला सैफीत नेले असते तर ही परीस्थीती उदभवली नसती , पण आत या जर तर ला काहीच अर्थ उरला नाहीय. परवा दुपार पासुन ती अचानक सींक होत गेली.

निम्मीत्त झाले तीन वर्षापुर्वी दुबईला गेली असता ती बाथरुम मधे उभ्याउभ्या खाली बसली व हिप जॉईंट फ्रेक्चर झाले, तेथे उपचार परबडणे शक्य नसल्यामुळे तश्या अवस्थेत मुंबईला आणले, शस्त्रक्रीया व्यवस्थीत झाली. पण दैवाला ते मान्य नसावे, दोन वर्षापुर्वी त्याजागी शरीरात फॉरेन बॉडी असल्यामुळे इंन्फेशन झाले, परत मेजर ऑपरेशन करुन तो भाग काढुन टाकायला लागला. मग दोन तिन महीने वजन लावुने झोपुन काढले. ते ही दिवस तीने सहन केले.

दुर्दैवाने जानेवारीमधे तिला असह्य खोकला सुरु झाला होता, म्हणुन तपासायला परत दळवी हॉस्पीटल मधे दाखल केले, तिच्या नशीबी दुःखच होते, परत त्याच जागी इंन्फेक्शन झाल्याचे डॉक्टरांना आढळले, परत शस्त्रक्रीया, तीन आठवडॆ रुग्णालयात. मग हेवी ऍंटी बायोक्टीक्सचे डोसेस, इंजेशन्स, खुप त्रासुन गेली, तरी ती सर्व सहन करत होती.

गेल्या आठवडयात परत खोकला सुरु झाला, जेवण जाईना, ड्रेसींग करायला व ऑब्जरवेशन एक दिवस रुग्णालयात दाखल काय करतो आणी परीस्थीती वाईट वळण काय घेते.

त्यात परत भरीस भर म्हणुन मुलाची बारावीची परीक्षा सुरु आहे.