पुरती फाटणे म्हणजे काय असते याचा आयुष्यातला पहिल्यादा अनुभव राजाभाऊंनी घेतला. दापोली वरुन पुण्याला वरंधा घाटातुन जातांना संध्याकाळ होवु लागली, अंधारुन यायला लागले, वरती चांगलाच पाऊस. टरकणे म्हणजे काय याची चांगलीच कल्पना त्या रात्री राजाभाऊंना आली. एक तर तीन दिवस सतत गाडी चालवुन चालवुन , एक घाट , एक घाटी, एक पाखाडी उतरुन दुसरी पाखाडी चढुन चढुन ते तसे कंटाळायला लागले होते. सर्वच रस्ता वेड्यावाकड्या वळणावळणाचा, सरळ रस्ता असा नाहीच.
आता पर्यंत आंबेत, मंडणगड, बाणकोट, वेळास, केळशी, आंजर्ले, पाडले, हर्णॆ, मुरुड ,आसुद, दापोली हा असा नयनरम्य प्रदेशातुन प्रवास करतांना त्यांना जी मजा वाटत होती ती हळुहळु कमी व्हायला लागली होती. भोरमार्गे येण्याचा त्यांचा निर्णय चुकला की काय असे वाटु लागले होते, रस्ता संपता संपत नव्हता, त्यात परत रस्तात फारशी वाहतुक नव्हती. पण पोचले ते एकदाचे सहीसलामत रात्री पुण्याला, सहीसलामत, सुखरुपपणे परतलो हे ऐकण्याच्या ऐवजी काय हळु हळु चाळीसच्या स्पीडनी गाडी चालवत होता हे ऐंकुन घेण्यासाठी.
सर्वांत राजाभाऊंना आवडला असेल तर तो आंजर्ले परीसर.
कड्यावरचा गणपती. आंजर्ले ते हर्णे रस्ता.
एका बाजुला सतत दिसणारे समुद्राचे रुप डोळ्यात साठवत साठवत , थांबत थांबत, हळुवारपणे गाडी चालवत, निसर्गाची मजा लुटत लुटत पठारावर चढत चढत यायचे, ते ही वळणावळण्याच्या रस्तावरुन. वा. झक्कास. दिल खुष हुवा. पाठीमागे दिसणारी आंजर्ल्याची खाडी, समोरील कड्यावरचे गणपतीचे देऊळ. पुढे हजारो सीगल्सनी दिलेले दर्शन . खरं तर त्यांना आंजर्ल्यात मुक्काम करायचा होता, पण रिपरीपत पडत रहाणाऱ्या पावसानी त्यांचा रसभंग केला.
सुरवातीला मंदणगड ते वेळास हा प्रवास करतांना ते हरखुन गेले होते. त्यांना त्यावेळी कुठे कल्पना होती की या पुढचा सारा प्रवास हा असाच मंत्रमुग्ध करुन सोडणार आहे. आत्त्ताचा हा परिसर आत्तापर्यंत गाडी चालवत आलेल्या रस्तापेक्षा सरस आहे असे वाटायला लागायचे तर पुढे सरकल्यावर दिसणारे , भान हरपुन लावणारे निसर्गाचे, रस्तांचे, जंगलांचे, आणि मुख्य म्हणजे सतत सोबतीस राहिलेल्या समुद्राचे रुप अधिक भावायला लावत होता.
खरं म्हणजे राजाभाऊंची पुढे लाडघर , दाभोळ, गुहागर पर्यंत जाण्याचा बेत होता, पण त्यांच्या खिश्यानी त्यांना मजबुर केले. नेहमी प्रमाणॆच दामाजी पंत त्यांच्यावर रुसलेले असतांना, पैशाचा दुष्काळ असतांना प्रवास करण्याचा ते विचारही करु शकत नव्हते. जाण्याची तर तीव्र इच्छा पण सगळाच खडखडाट. दिवाळीचे पार दिवाळे काढलेले. अश्यावेळी जगातील सर्वात मोठी बॅंकर त्यांच्या मदतीस आली. त्यांच्या आई.
खरचं, आयत्या वेळी ठरलेल्या प्रवासाची गोडी काही वेगळीच असते.
सकाळी निघायला जरा अंमळ उशीरच झाला. मग माटुंग्याला कुठेही न थांबता पहिला पडाव केला तो तारा मधील युसुफ मेहर अली सेंटर मधे , केवळ नास्तापाण्यासाठी गरमागरम बटाटे वड्यांवर आडवा हात मारण्यासाठी.
वाटेत कुठे जेवायला म्हणुन मिळाले नाही. मग ते बहुदा आंबेत जवळपास कुठेतरी घाटात असलेल्या देशमुख बागेत खाण्यासाठी थांबले. कोकणी माणसांचा स्वभाव कसा असतो ह्याची एक झलक राजाभाऊंना तेथे मिळाली, आपल्याला काय त्याचे ? आपल्याला राग हलवाईशी त्यांच्या मिसळीशी. थालीपिठाशी नाही, आंब्याच्या, श्रीखंडाच्या वड्यांशी नाही आणि आलेपाकाशी तर अजिबात नाही हे ते जाणुन होते. येथे बारामाही वहाणाऱ्या झऱ्याचे पाणी फार चवदार आहे आणि बागेचे लोकेशन ग्रेट. सिंपली मार्व्हलस.
कोकणातील टिपीकल घरामध्ये रहाण्याची हौस या वेळास मधे श्री.प्रकाश जोशी यांच्या घरी भागवली गेली. आणि चविष्ट साध्या ब्राम्हणी पद्धतीच्या जेवणानी तर बहारच आणली. आमटीभातावर आडवा हात मारणे म्हणजे काय हे राजाभाऊंनी त्या दिवशी चांगलेच जाणले. तरी संध्याकाळी खोबरे पेरलेल्या पोह्यांचा खातमा झाला होता.
राजाभाऊंच्या बायकोचे आजोबा बाणकोटची खाडी पोहुन पलिकडे आलेले, पुढे मुंबईला येण्यासाठी ( मुंबईला बाणकोटमार्गे येणारा प्रत्येक जण ही खाडी पोहतच ओलांडत असेल ? )
केळशीला श्री. विजय जोशी यांच्याकडॆ जेवणात ताटामधे वांगीबटाटा, मुगाची उसळ मिळणार व ते ही अर्ध्या पाऊण तासाच्या प्रतिक्षेनंतर म्हटल्यावर राजाभाऊंच्या मुलाचे पित्त खवळले, मग वादावादी भडकाभडकी. राजाभाऊंनी कसेबसे त्याला मनावले. ते स्वानुभावावरुन जाणुन होते बापाच्या साध्या साध्या बोलण्यावरुन राग येण्याचे, संतापायचे हे वय आणि माघार ही नेहमीच बापानेच घ्यायची असते. मग भरल्या पोटी सर्वांचीच डोकी जागेवर येत असतात.
आयुष्यभर आजंर्ल्यातील कड्यावरच्या गणपतीला जाण्याची राजाभाऊंनी इच्छा मनाशी बाळगली होती, ती या प्रवासात पुरी झाली. आणि देवदर्शनाबरोबर उत्तम, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ आंबापोळी, फणसपोळी खायला मिळाली, गणपती पावला.
हर्णेबंदरातील भरणारा बाजार , ती समुद्रातील पकडलेली मासळी, त्याचा लिलाव, कोळीणबाई, हे सारे संध्याकाळी पहायला मिळाले. होड्यांमधुन भरभरुन मासे बैलगाड्यांमधे उतरवले जाताहेत, किनाऱ्यावर त्यांचा लिलाव होतोय, गर्दीतील कोणीतरी सांकेतीक भाषेत बोली लावतोय.
मुरुडला त्यांना जेवायला मात्र काही खास मिळाले नाही, एक तर हे सारे गाव फार, अती कमर्शीयल झालेलं, येणारी टोळकीच्या टोळकी, दारु ढोसणे, पी पी पिणे, कर्कश गाण्यांवर वेडेवाकडॆ चाळॆ करत नाच नाच नाचणॆ व जेवणाचा केविलवाणा प्रयत्न करण्यार ओक ओक ओकण्यात धन्यता मानणाऱ्यांची येथे चलती आहे. त्यांच्या साठी मुरुड म्हणजे स्वर्गच. राजाभाऊंचे नशीब चांगले, त्यांना जरा बाजुला असलेल्या एका हॉटेलमधे रहायला मिळाले जेथे ते व त्यांच्या कुटुंबीयांशिवाय इतर कोणीही नव्हते आणि ते हॉटेलही चांगले होते.
दापोलीमधले जेवण जयंत पद्मजा मधे.
पण...
राजाभाऊंची एक इच्छा मात्र अपुरी राहिली, उकडीच्या मोदकांचे भरपेट भोजन करायची. कोकणात जावुन उकडीचे मोदक खाणे नाही, राजाभाऊ तुमच्या जन्म व्यर्थ. निदान मोदकासाठीतरी कोकणात परत जा. नाहीतरी लाडघरला तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण आहे, खास उकडीचे मोदक सेवन करण्यासाठी. -
यावां कोकण आपलाच आसा.