Sunday, January 31, 2010

सेराइकेल्ला छाऊ नृत्य गुरु गोपालप्रसाद दुबे आणि त्यांचा परिवार, त्रिनेत्र छाऊ डान्स सेंटर , सेराइकेल्ला.

जेव्हा खावु का नको असा संभ्रम मनी उत्पन्न होतो तेव्हा न खाणे केव्हांही चांगले , हाच नियम लावायचा झाला तर जेव्हा जावु का नको जावु अशी मनाची दोलायमान स्थिती निर्मांण होते तेव्हा जाणे केव्हाही उत्तम.

पश्चिम उपनगरामधल्या जिवघेण्या गर्दीवर , तुंबलेल्या वाहतुकीवर मात करीत रेंगाळलेल्या स्कायवॉक नामक नव्या कुरणाच्या कामाने सत्यानाश होवुन राहिलेल्या रस्तातुन मार्गक्रमण करीत, परत मागे फिरण्याचा विचार मागे सारत, थकल्या जिवास घरी पोचवण्याची उर्मी दाबत , राजाभाऊ ऐन वक्ती झारखंड मधील " सेराइकेल्ला छाऊ(उच्चार चुकीचा असावा ) नृत्य पहायला अखेरीस "पृथ्वी" मधे पोचले. मनात धाकधुक, वेळेवर पोचतो की नाही याची.

कार्यक्रम सुरु झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत आत मधे प्रवेश दिला जात नाही या कडक शिस्तीचे पालन करणारे पृथ्वी थियेटर. नाही तर आमचे टिळक स्मारक. कार्यक्रम सुरु होवुन तास दिड तास उलटलाय, लोक अजुनही आत येत आहेत, या बाजीरावांसाठी इतरांना उभे रहायला लावुन त्यांच्या परिचीतांनी अडवुन ठेवलेल्या जागी बसायला जात , आजुबाजुला बसलेल्या दुसऱ्यांचा रसभंग करत.

 छाऊ नृत्याच्या तीन घराण्यामधे  झारखंडमधील "सेराइकेल्ला" जे चैत्रपर्वच्या उत्सवात सादर केले जाणारे नृत्य सर्वात सुंदर, देखणॆ  मानले जाते, ते या मुंबईत भरलेल्या "छाऊ नृत्य महोत्सवात " सादर केले गेले.

या मधे मुखवटॆ ( जो सर्वात महत्वाचा भाग ) लावुन नर्तक पशुपक्षी, निसर्ग जसे की समुद्र किंवा मग शिकारी, नाविक यांच्यावर किंवा मग रामायण, महाभारत, पुराणे आदीं मधल्या प्रसंगावर आधारीत ८ ते १० मिनीटाचे नृत्य सादर करत असतात.

मुखवट्यांमुळे जे हावभाव, भावभावना चेहरा प्रगट करु शकत नाही, दर्शवु शकत नाही ते शरीराच्या, देहबोलीच्या द्वारे दर्शवले जाते.

आज एकंदरीत १२ नृत्ये सादर केली गेली.

रंगभुमीवर पाठच्या बाजुस आडव्या रांगेने बसलेले आठ वादक, शहनाई, व्हायोलीन, बासुरी. तीन ढोल , नगारा व झांज घेवुन नर्तकांना साथसंगत करत होते.

सुरवात झाली ती "जारताघट " नी. वादनानी वातावरण निर्मीती झाली. मग समोर आले ते "हरपार्वती " कुमारसंभवमच्या जरासा आधीचा तो प्रणयाचा काळ .

पावसाच्या आगमनाचे मोहरुन गेलाला मयुर, राधाकृष्णाचे प्रेम , हंसचे ती ग्रेसफुल वागणे, डौलदार चाल हे झाल्यानंतर मग "चंद्रभागा " सादर केले गेले. कोणार्क मधल्या सुर्यमंदिराची कथा. चंद्रभागा आणि सुर्यदेव यांचे नृत्य संपल्यानंतर मग फुलपाखरु समोर आले. दुर्योधन आणि भीमाचे गधायुध्द, सागर , बरसा रिमझीम ( जे राजाभाऊंना खुप भावले वर्षाऋतुच्या आगमनाने प्रफुल्लीत झालेले लव्हबर्डस निसर्गाशी एकरुप होत, त्याची मजा लुटत, पावसाच्या पाण्यात क्रिडा करत एकामेकांच्यात भान हरपत ) तलवारबाझी, शिकारी आदी नृत्य झाल्यानंतर मग शेवटला क्रवेदातील "रात्रीसुत्र " वर आधारीत "रात्री" सादर केले गेले.

भारलेल्या मनांनी त्या साऱ्या कलावंतांसाठी जे टाळ्यांचे वादन केले गेले त्याची तोड नाही.

Chhau is a dance-drama from prevalent in Eastern India, There are thee major forms of Chhau, each known by it's geographic location. These are Purilia Chaau of West Bengal , Mayurbhanj of Orissa and Seraikella Chhau of Bihar (now, Jharkhand ) The complexity of this form lies in the fact that it represents the folk-classical continuum, considerably influenced by the trible, ritualistic, martial and classical traditions of region.

Chhau is traditionally danced during the annual Chaitra Parva ( Spring ) festival dedicated to Ardhanareeswara as prayer for abundant harvest .It is a particularly strong form in which the sinuous and fluid body movements are animated by raw and primal energy. Associated with Lord Shiva , it is the dance of the warrior and the ascetic, traditionally performed only by men.  


Saturday, January 30, 2010

अभिमन्यु चक्रबॄह (सप्तर्थी ), मयुरभंज छाऊ नृत्य आणि पृथ्वी.

गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनासाठी चक्रवॄह रचला पण जो भेदला गेला अभिमन्युकडुन. यातुन तो बाहेर मात्र पडु शकला नाही. सात कौरव रथीं बरोबर एकेट्यांशी लढतांना त्याने सर्वांचा पराभव केला खरा , पण जेव्हा ते सातीजण एकदम त्याला घेरुन भ्याडसारखे त्यावर वार करु लागले तेव्हा मात्र ....

कौरवांनी चक्रवॄहात त्याला आत शिरायला जागा करुन दिली परंतु सर्वांना पराभुत केल्यानंतर तो त्या चक्रवॄहातुन बाहेर पडायला तो पहात होता, ते नाही जमले. अभिमन्युचे सारे मार्ग बंद होत होते.

त्याला घेरलेल्यांच्या जागा सरसर वेगाने बदलत होत्या, फटी बुझवल्या जात होत्या. शेवट पर्यंत तो लढत होता एकटा, साऱ्या शत्रुयोद्धांबरोबर, केवळ त्यांच्याकडुन वध करुन घेण्यासाठी.

हे सारे नाट्य जेव्हा का नर्तक आपल्यासमोर सादर करत असतात तेव्हा नकळतपणे आपणही त्यात गुंतत जातो, जणु साऱ्या मुळच्या प्रसंगाचे आपणच साक्षीदार असतो.

याच्या आधी सुरवातीला नटराजाचे नृत्य झाले व कार्यक्रमाचा शेवट झाला तो पंचलिंगेश्वरांनी.  पाच नर्तक शंकराचे रुप धारण केलेले समोर नृत्य सादर करत होते.

असे पाच पाच शंकर कधी पाहिले नव्हते.

हे सारे रंगमंचावर पहातांना.

पृथ्वी थियेटर. मस्त आहे. बसायला चक्क सोफे , तिन्ही बाजुने आणि मधे खालच्या बाजुला रंगंमंच.

शशी कपुर खुप थकलाय. बघुन वाईट वाटले. त्याची जवानीतली रुपे आठवत राहिली.

अर्धे आयुष्य ( काय हा विश्वास. धर्माने यक्षाला उत्तर बरोबर दिले ) सरल्यानंतर का होईना राजाभाऊ अखेरीस पृथ्वीत पोचले. निमीत्त "केली" आयोजीत छाऊ नृत्य महोत्सव. यंदाला "केली" केरलाच्या बाहेर पडले. पण राजाभाऊंनी यंदाला थंयंबक्कम ( उच्चार साफ चुकीचा )मात्र खुप मिस केले.

राजाभाऊंचा केंद्रबिंदु आता पश्चिम उपनगरात सरकलाय. आता उपनगरात होणाऱ्या चांगल्या कार्यक्रमाला जाता येइल ( काय पण आशा ) , जे आतापर्यंत होत नव्हते.

एक मात्र गोष्ट हुकली. आवारातील पृथ्वी केफे मस्त आहे. परत कधी तरी त्याचा फिल घ्यायला जायला हवे.

बघु आजच्या छाऊला जायला मिळते का मग काहीतरी कॅफेत खायला मागवुन छानपैकी बसता येइल.


Mayurbhanj Chhau belongs to the Mayurbhanj district of Orissa. Of the three traditions of Chhau Mayurbhanj Chhau is the only form that does not use masks.  Even so , this tradition like the other two styles of Chhau, relies principally on the language of the body movements to capture and project emotions and sentiments. The absence of the masks only allows greater freedom of movements.

Traditionally Mayurbhanj dance has never been a solo dance. Performances are predominently group items interspersed with short solos. The repertoire extends from simple themes such as hunting and fishing to annimal dance like Mayur Nritya and to dances of deities like Hanumanand Nataraja. It also includes episodes from Hindu mythology and legends.

Thursday, January 28, 2010

आणि तरीही राजाभाऊ जिवंत राहिले.


१९८०-८१ चा काळ.

प्रस्तरारोहण आपल्याकडॆ चांगले बाळसे धरु लागले होते. राजाभाऊ एका गिर्यारोहण संस्थेचे सभासद. त्या संस्थेने प्रस्तरारोहण शिकवण्यासाठी मुंब्राला "फस्ट स्टॆप पिनॅकल" ला शिबीर आयोजलेले.

सुळका चढतांना कमरेला सुरक्षतेसाठी दोर लावलेला. आपला प्राण बीले देणाऱ्या नेत्याच्या हाती सुखरुप आहे हा विश्वास. आणि त्याच विश्वासाच्या बळावर बिंधास्तपणॆ राजाभाऊ चढाई करत होते.

बरेच वर चढुन झाले. मधे काही ठिकाणी , जेथे मार्ग खुंटला होता तेथे ,पिटॉन्स ठोकलेले. वर चढाई परत सुरु करण्यापुर्वी त्या पिटॉन्सचा आधार घेत , जेमतेम दोन तीन बोटांवर शरीर पेलवत आडवे सरकायचे होते. आडवे सरकता सरकता हाताची पक्कड सुटली व क्षणार्धात राजाभाऊ वेगाने खाली पडु लागले ते थेट जमिनीवर दाणकण येवुन आदळले. चांगले ५०-६० फुटाचे अंतर असावे.

अश्या वेळी ज्याची हाती आयुष्याची दोरी त्याने काय केले असावे ?

त्या बहाद्दराने सरळ शिस्तीत हातातला रोप सोडुन दिला. बहुदा त्याने वरती स्वतःला सेफ करुन घेतले नसावे, कदाचित तो बेजबाबदारपणॆ बेसावध असावा.

या घसरगुंडीत ते चांगलेच रक्तबंबाळ झाले, कपड्यांची तर लक्तरे झालीच पण अंगावरच्या सालटी चांगलीच सोलवटुन निघाली. दोन्ही पायातले हंटर शुजचे सोल विभक्त झाले.

पण ते जखमांपलेकडॆ आर्श्चय म्हणजे इतर काही गंभीर दुखापत झाली नाही हे विशेष.

पण त्याहुन वाईट गोष्ट म्हणजे त्यांना तश्या अवस्थेत त्यांच्या साथीदारांनी गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेन नी आणुन घरी सोडले.

या घटनेने त्यांनी जो रॉकचा धसका घेतला, अनेक वेळा ते मधेच अडकुन त्यांचे हातपाय कापायला लागत.

आणखीन दुसरी वाईट गोष्ट म्हणजे अजुनही त्यांच्या सोबत, बरोबर  ट्रेनमधे प्रवास जे कोणी असतात त्यांना मुंब्राला हा सुळका दिसल्यानंतर " मला हा सुळाका चढतांना  अपघात झाला होता  याची सुरस गोष्ट ऐकावी लागते (झाली याची सी ९० ची टेप शुरु झाली )  

Tuesday, January 26, 2010

व्यसन

राजाभाऊंनी लागलेले ब्लॉगचे व्यसन परवडले असे राजाभाऊंच्या बायकोला वाटायची वेळ का आली ?

तळ गाठला म्हणुन काय झाले ?


एक रात्र नाखिंड्यावर

१९८३-८४ चा पावसाळा. गिर्यारोहणाचा प्रसार आपल्याकडे चांगलाच होवु लागलेला. एका गिर्यारोहण संस्थेचे आम्ही पाच-सहा जण निघालो , वांगणी रेल्वे स्थानका समोर दिसत असलेल्या नाखिंड्यावर, "क्ष" च्या नेतॄत्वाखाली.(ज्याने पुढे कोकणकड्यावर आपले जिवन संपवले )

त्या वर्षी कारवी छानपैकी फुलली होती, सर्वत्र हिरवेगार गवत माजुन राहिलेले पण त्याचबरोबर  बऱ्याच पायवाटा गवतामुळॆ  गायब झालेल्या. रमतगमत वर चढता चढता मधेच केव्हातरी वर चढता चढता आडवा आला तो एक रॉकपॅच, सोबत रोप बहुधा नसावा, शेवाळलेली, निसरडी ती खडकांची भिंत चढुन वीर वर सरकले खरे , पण परत त्या मार्गाने उतरणॆ नको करत, ते धाडस त्यांच्यात जरा अंमळ कमीच होते.

नाखिंड्यापर्यंत ते मस्तपैकी मग पोचले. जेवण, विश्रांती वगैरे झाल्यानंतर आमच्या नेताजींनी निर्णय घेतला वरची धारेवरुन ट्रॅवर्स मारुन पेब कडे उतरायचे.

पावसाची चांगल्या पैकी संततधार लागलेली. बऱ्याच वेळ चाल चाल चालल्या नंतर देखील त्या धारेवरुन खाली उतरलेल्या वाटा काही सापडॆनात. त्यात परत मधे मधे ती धार अरुंद झालेली त्यात निसरडी वाट , वेळ भरभरा पुढे सरकु राहिलेला, संध्याकाळ जवळ येवु लागलेली. 

या धारेवर रात्री अडकलो तर ?

नेताजींनी परत मागे फिरण्याचा निर्णय घेतला. पण फार पुढे जावुन परत मागे फिरेपर्यंत चांगलाच कालव्यपय झालेला. परत त्या नाखिंड्याला पर्यंत जाणे वर चढुन जावुन आलेला रस्ता धरुन खाली उतरणॆ, हळुहळु अंधारुन येवु लागले. सर्वात वरच्या धारेवरुन परत खाली उतरायला वाट गवसेना. बऱ्याच वेळ शोधाशोध केल्यानंतर अंधाराने आपल्या सर्व मार्ग बंद केले आहेत हे जाणवले. जेवणखाण सकाळीच संपलेले, निदान पटकन नाखिंड्यात खाली उतरुन त्या कपारीत मुक्काम केला असता तर तेही नाही.

मग काय शिलेदार बसले रात्रभर अंधारत तसेच चिखलात, निवंडुंगाच्या जाळीजवळ पावसाचा मारा , असह्य थंडीने कुडकुडत, उपाशी पोटी , आपल्या घरचे आपली काळजी करत असतील या विचाराने काळजी करत.  मधेच केव्हातरी खेकडे अंगावरुन फिरत असावेत. बसल्याजागी बसल्याबसल्या झोप तर शक्यच नव्हती. पाऊस रात्रभर झोडपुन राहिलेला.


दुसऱ्या दिवशी मग सकाळी केव्हातरी ती वाट सापडुन गेली.


Sunday, January 24, 2010

मोबाईल् मुळॆ "जे मन चिंती ते वैरी न चिंती "


मोबाईल मुळॆ आता माणुस चोवीस तास आपल्या संपर्कात रहायला हवा असा एक अत्याग्रह , समज मनात निर्माण झाला आहे.  मोबाईल वर संपर्क होत नसेल तर "काय झाले असेल : करत मनात उगीचच भिती वाटायला सुरवात होते.

फणासाडच्या अभयारण्यात गेलेला छोकरा, परत पुण्यालाच जायचा होता, रात्रीचे १०.३० वाजले तरी अजुन त्याच्याशी मोबाईलवर संपर्क होत नव्हता,  शेवटी त्याच्या मित्राला फोन केला व तो मुंबईला यायला निघाला आहे हे कळाले. काळजीत आणखीन भर.

आत जंगलात रेंज नसावी पण बाहेर आल्यानंतर तरी का मिळत नाही ? का ? हा आहे कुठे ?

राजाभाऊ वाट बघत गच्चीत उभे. इमारती खाली रात्री ११ वाजता मोटर सायकल वर दोन पोलीस येवुन उभे राहिले.

छातीत धस्स.

५-१० मिनी्टॆ त्यांचे वॉकीटॉकी वर बोलणॆ सुरुच.

अरे , काय पाहिजे तुम्हाला ? येथे तुम्ही काय करत आहात ?

धीर खचत चाललेला.

"येथे कोठे येवढ्या रात्री सुतारकाम सुरु आहे, तक्रार आहे.

हुश्श.

पाठोपाठ , छोकरा हजर. मोबाईलची बॅटरी डेड .

राजाभाऊंना आपले तारुण्यातले दिवस आठवले. किती दिवस, किती वेळा ते गिर्यारोहणाच्या निमित्ते जंगलात , किल्लावर फिरत असत . तेव्हा तर साधी दुरध्वनीची पण धडकी सोय नव्हती.

आणि ते एकदा पावसाळ्यात नाखिंडाला वरच्या रेंज वर रस्ता न सापडल्यामुळॆ अडकुन पडले होते, सारी रात्र त्यांनी जंगलात मुसळाधार पावसात चिखलात बसुन काढली होती, त्या रात्री घरच्यांचे काय झालेले असेले ?

छाऊ नृत्यमहोत्सव




मुंबईमधे "केली " नी २८ जानेवारी ( यशवंतराव चव्हाण सेंटर ) , २९ व २० (पृथ्वी ) मधे छाऊ ( Chhau ) नृत्यमहोत्सव भरवला आहे.

हा प्रकार राजाभाऊंनी गेल्या वर्षी N.C.P.A  नी भरवलेल्या नृत्यमहोत्सवात पाहिला होता. हे नृत्य मुंबई , पुण्याकडॆ सहसा पाहायला मिळत नाही.

हा सारा प्रकार काही तरी वेगळाच आहे.

तिन्ही दिवस जायलाच पाहिजे.

(फोटॊ नेट वरुन )


अभिनंदन " जोगवा " , "गंध " आणि " हरिश्चंद्राची फॅक्टरी " चे

सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वश्रेष्ठ अभिनेता, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन, पार्श्वगायिका आणि संगीतकार असे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याबद्दल "जोगवा" चे अभिनंदन.

हा चित्रपट पाहिल्यानंतरचा प्रभाव येवढा होतो  की दुसऱ्या दिवशी महोत्सवात "मेड इन चायना " बघायला राजाभाऊ गेले होतो , त्यांच्याच्याने तो चित्रपट बघवेना. दहा मिनिटात ते बाहेर उठुन आले. जोगवाने जे अस्वस्थ करुन सोडले होते, हादरवुन सोडले होते, येवढ्या लेव्हलचा चित्रपट पाहिल्यानंतर दुसरा कोणताही चित्रपट पहाणे नकोसे झाले होते.

१७/०२/२००९ रोजी लिहिलेले.

भयापासुन मुक्ती मिळावी या साठी मनुष्याने परमेश्वराला जन्माला घातले आणि याच परमेश्वराने "आई यल्लम्मा " बनुन त्याचे आयुष्य उध्वस्थ केले.

आज "जोगवा" पाहिला, नुसताच चित्रपट पाहिला नाही, तर माणसे , माणसांना कश्या प्रकारचे नरकासमान जिणे जगायला लावतात ते पाहिले, निव्वळ अंधश्रद्धेपोटी सख्खे आईबाप आपल्या पोटच्या पोरांच्या आयुष्याचे कसे धिंडवडे काढतात ते पाहीले ,आपल्या स्वार्थासाटी आपल्या कळपात दुसऱ्यांना ओढणारी माणसे पाहिली आणि हे ही पाहिले की वाट चुकलेल्यांना मार्ग दाखवणारेही कोणी तरी असते, गरज असते ती मनाला बळ देण्याची, बंड करण्याची, आपला मार्ग आपण शोधण्याची, नरकातुन बाहेर पडण्यासाठी.

जी जी गावे, जी, जी माणसे या आई यलाम्माने पछाडलेली आहेत, त्या त्या गावात, त्या त्या माणसांना हा चित्रपट अवश्य दाखवला जावा, कळुद्या त्यांना आपण काय करुन बसलो आहोत, मिळुन द्या त्या नाडलेल्या, पिडलेल्या जोगती आणि जोगतीणींना त्यांचे हिरावुन घेतलेले स्वातंत्र, जगु द्यात त्यांना माणुस म्हणुन परत येकदा।

अप्रतिम चित्रपट, अप्रतिम कलाकारांची कामे, अप्रतिम दिग्दर्शन, अप्रतिम छायाचित्रण, अप्रतीम प्रकाशाचा, सावल्याच खेळ, अप्रतीम लोकेशन , अप्रतीम मुक्ता बर्वे, जबरदस्त उपेंद्र लिमये, किशोर कदमांनी तर कमालच केली आहे.

Saturday, January 23, 2010

देशी असो वा विदेशी .... तुम्ही बोला मराठी

परवाला पुण्यात झालेल्या ब्लॉगर्सच्या स्नेहमेळाव्यात "मराठी आठवडा संयोजन समिति " चे २१/०२ (जागतिक मातृभाषा दिन )ते २७/०२ (जागतिक मराठी दिन ) या कालावधीत सर्वांनी "मराठी आठवडा" साजरा करावा या संबंधीचे पत्रक मिळाले.

आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधे वाचनात आले की "राज्याचे मंत्री, प्रशासकीय प्रमुख, विभाग प्रमुख यांनी सरकारी, सार्वजनीक कार्यक्रमात शक्यतो मराठीतच बोलावे, इतकेच नव्हे , तर परदेशी सरकारी पाहुणे , प्रतिनिधी यांच्यांशीही दुभाष्यामार्फत मराठीतून संवाद साधावा, असा आग्रह राज्य सरकारच्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुद्यात धरण्यात आला असुन त्यामुळे सरकारी वर्तुळात नवा वाद उभा ठाकण्याची चिन्हे आहेत. या मसुद्यावर मंत्रिमंडळाने मंजुरीची मोहर उमटल्यानंतर , महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी "सांस्कृतिक धोरण " जाहीर केले जाईल."

जर का सरकारची हा मसुदा स्विकारण्याची तयारी असेल तर त्यांनी १ मे ऐवजी २७/०२, जागतिक मराठी दिनाचे औचित्य साधुन , या दिवशी ते जाहिर करावे.






इतिहास आणि कल्पित - सेतुमाधवराव पगडी

काल http://disamajikahitari.wordpress.com/ यांच्या ब्लॉगवर सेतुमाधवराव पगडी यांनी लिहिलेल्या "मिर्झा गालीब आणि त्याच्या गजला " या पुस्तकाचा उल्लेख वाचला आणि राजाभाऊंना आपणाकडुन हे पुस्तक व सेतुमाधवराव पगडी वाचायचे राहुन गेलेले आहेत याची प्रकर्षाने जाणीव झाली.

गालीब वरचे पुस्तक काही त्यांना मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मिळाले नाही ( पुर्वी ज्या वेळी त्यांच्या समोर हे पुस्तक आले होते तेव्हा त्यांनी ते वाचायला घेतले नव्हते, त्या नंतर ते कधी परत दिसले नाही, वेळाच्या वेळी न केलेल्या शुल्लक गोष्टींचे किती दुरगामी परिणाम असतात).

मग त्यांनी "इतिहास आणि कल्पित " हे पुस्तक वाचायला घेतले.

चितोडची पद्मिनी अशी व्यक्‍ती मुळातच नव्हती हे ठावुक होते पण सोळाव्या शतकात म्हणजे चितोडच्या पाडावानंतर दोनशे वर्षाने मलिक मुहंमद जायसी यांने आपल्या हिंदी रुपककाव्यातुन निर्माण केलेले हे काल्पनिक पात्र आहे हे माहिती नव्हते.

अश्या अनेक गैरसमजुती हळु हळु दुर होत चालल्या आहेत.

अभ्यासकांनी , संशोधकांनी लिहिलेली पुस्तकं वाचायला घेतली की मग जाणवते किती अपुऱ्या ज्ञानावर आधारीत आपण अनेक विधाने बेधडकपणॆ करत आपले म्हणणॆ बिंधास्तपणॆ रेटुन नेत असतो.

Friday, January 22, 2010

" बाय द वे " - ચાલો જમવા , લગન નુ ભોનુ.




राजाभाऊंचे आणि पारशी लोकांचा घनिष्ट संबंध. त्यांच्या आत्याने "त्या" काळात पारश्याशी लग्न केलेले. त्यांच्या बहिणीची सासु देखील पारसी.

आपणो टाटा समुहाच्या "वेस्टसाइड" मधे जंगी सेल लागलेला. आधीच सेल त्यात परत सेल असलेल्या कपड्यांवर एकावर एक मुक्त. मग काय सोन्याहुन पिवळॆ. आठ शर्ट आणि दोन पॅंट ( दोनच कारण त्यांच्या मापाचे तयार कपडॆ आता सहजासहजी मिळणॆ मुश्किल झाले आहे )

सेवासदन सोसायटी. गावदेवी, ग्रॅंटरोडला असणारी एक सेवाभावी संस्था. अनाथ मुली आणि ज्यांना आधाराची गरज आहे अश्या स्त्रियांसाठी शाळा, वसतीगॄहापासुन, आपल्या पायावर उभे रहाता यावे यासाठी व्यवसायिक प्रशिक्षण देणे, ते गरजुंना स्वतात खाणॆ मिळावे म्हणुन कॅंटीन चालवणॆ , जेवणाचे डबे पुरवणे आदी समाजपयोगी कार्ये करत आली आहे.

तर

"आता अजुन मला घरी जावुन जेवण करायचे आहे, काय करु सुचत नाही "

( त्यांच्या बायकोला कोणी आणि किती वेळा सांगायचे , बाहेर पडतांना जेवण काय करायचे हे सांगुन निघत जा .)

आपल्या प्रियेला घेवुन एखाद्या अश्या ठिकाणी जेवायला जायचे की जे विशिष्ट मॅड गर्दी पासुन लांब राहिलेले , चावचाव करणारे , मोठमोठ्या आवाजात शोरगुल करत शांती भंग करणाऱ्यांना जेथे जेवणात स्वारस्थ नाही. ते येथे चुकनही फिरकत नाहीत.

जेथे शांतपणे , फार चांगल्या वातावरणात, आल्हाददायक डेकॉर असलेले ठिकाण (लाकडी भीम असलेले सिलींगचा रुबाब काही औरच ) , जेथे तुम्ही शांतपणे, आनंदात , मोकळेपणानी तिच्याशी गप्पागोष्टी करु शकाल, मजेत चांगले , रुचकर , चविष्ट जेवणाचा आस्वाद घेत घेत, ( आता या वयात आंखों मे आंखे डालके ? , काय तरीच काय ) असे एकमेव रेष्टारंट मुंबईमधे "सेवासदन सोसायटी " त्यांच्या आवारात चालवत आहे, जेथे राजाभाऊ ते सुरु झाल्यापासुन अनेक वेळा जात आहेत,  विशेषता जेव्हा त्यांना पारसी जेवण जेवणाची हुक्की येते, धानसाक , ब्राउन राईस आणि त्या सोबत व्हेज, कबाब खावेसे वाटतात तेव्हा तेव्हा.

या "बाय द वे " मधे जेवण फार चांगले मिळते. पारशी जेवण ही त्यांची स्पेशालिटी.

लगन नु कस्टर्ड, साली बोटी, साली चिकन, मटन कटलेटस विथ ग्रेव्ही आणि हो पात्रानी माछी देखिल.

पण हे केवळ पारशी पदार्थ मिळण्याचेच ठिकाण नाही. अनेक वेळा त्यांनी तिथे कढई पनीर, जीरा आलु, व्हे.बिर्याणी, सुनहरी डाल तडका पासुन पकोडाज, (भजी ) , सॅंडवीज, पापडी चाट, सेव पुरी, दही बटाटा पुरी ऍपल पाय विथ आईसक्रीम, मिस्ती दोही, चॉकलेट ब्राउनी वर ही ताव मारला आहे.

आज भरपेट खरेदी झाल्यावर मग ते " बाय द वे " मधे जेवायला गेले.

" बाय द वे " चालो जमवा लगन नु भोनु.

ब्लॉग वाचन

्सकाळचे सव्वासहा वाजले आहेत, राजाभाऊ आज भल्या पहाटे उठुन बसले आहेत.

वेळेचा सदुपयोग करण्यासाठी त्यांनी दुसऱ्यांचे ब्लॉग्स व्यवस्थित , संपुर्णपणे वाचुन काढण्याचे ठरवले.

ज्या ज्या गोष्टी त्यांच्या आवडीच्या आहेत, ज्या सर्व विषयांमधे त्यांना रुची आहे, ते सारे काही असणारा एक ब्लॉग त्यांना आज गवसला. या ब्लॉगनी त्यांना दिवाना करुन सोडले आहे.

http://disamajikahitari.wordpress.com/

आजचा दिवस खुप चांगला जाणार.

Thursday, January 21, 2010

"हिंदी मे बोलो"


"हिंदी मे बोलो" हे काय फक्त मराठी माणसांनाच मुंबई मधे ऐकाव लागतं ?

उडप्यांची उपहारग़ृह.
सारा कर्मचारीवर्ग हा त्यांच्या गावाकडुन आलेला.

पण आता मात्र चित्र बदलत चाललयं.

परवाला एक उडपी वेटर दुसऱ्या वेटरशी त्याच्या भाषेत बोलायला गेला , तर त्या दुसऱ्याने त्याला " हिंदी मे बोलो " करुन सांगितले. तो बहुधा बिहार किंवा ओरीसाचा असावा

Tuesday, January 19, 2010

मनाली -श्री. मकरंद कुलकर्णी यांचे - मेहंदळॆ गॅरेजच्या पुढे, कमिन्स जवळ, पुणे


राजाभाऊनां पुण्यामधे झालेल्या १७ तारखेला ब्लॉगर्स मेळाव्याला पोचायला जरा अंमळ उशीर झाला, आणि ह्या मेळाव्यात तसे ते सुस्तावलेले होते,  डोळ्यावर जराशी झापडही येत होती.

मेळाव्याला जाण्यापुर्वी "मनाली " मध्ये झालेल्या आकंठ भोजनाचा हा सारा परिणाम.

वेळॆवर हजर रहाण्यासाठी ते किती आतुर झालेले होते ते त्यांचे त्यांना व संभाव्य विलंबाच्या कल्पनेने त्यांच्या संतापाला बळी पडलेल्या त्यांच्या बायकोला व मुलाला ठावुक.

पण जेव्हा का  चविष्ट, रुचकर काजुच्या भाजीचा , मका रोटीचा, जीरा राइस आणि डाल फ्रायचा स्वाद त्यांच्या पोटापासुन ते मेंदुपर्यंत झिरपत जावु लागला तेव्हा मग त्याचे चीत्त हळुहळु थाऱ्यावर येवु लागले आणि मग  समाधान पावलेले , तृप्त जालेले राजाभाऊ मेळाव्याला पोचले.




http://harekrishnaji.blogspot.com/2009/02/blog-post_2420.html

Monday, January 18, 2010

पुणे येथे - मराठी ब्लॉगर्स चा मेळावा

पुणे येथे - मराठी ब्लॉगर्स चा मेळावा यशस्वी पार पडला .

अधिक वृत्तांत श्री अनिकेत यांच्या अनुदिनीत इथे पाहू शकता )

http://manatale.wordpress.com/ )

http://sureshpethe.wordpress.com/

http://72.78.249.125/Sakal/18Jan2010/Normal/PuneCity/page5.htm

http://epaper.dnaindia.com/newsview.aspx?eddate=1/18/2010&pageno=7&edition=40&prntid=108754&bxid=30791488&pgno=7

Sunday, January 17, 2010

मराठी ब्लॉगर्सचा स्नेह मेळावा



ब्लॉगर्सचा स्नेह मेळावा - पुणे

आज पुण्यात मराठी ब्लॉगर्सचा स्नेह मेळावा भरला होता. इंटरनेट वर आपण नेहमीच भेटतो, पण प्रत्यक्षात भेटुन एकामेकांशी ओळख करुन घेण्यासाठी, या माध्यमातुन आपले विचार मांडण्याच्या या प्रकाराला एक दिशा देण्याच्या उद्देशाने, हे ब्लॉगविश्व अधिक समृद्ध करावे, ते अधिक लोकांपर्यंत पोचवायचे आदी साऱ्या विचाराने.

या उपक्रमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला, जेवढी ब्लॉग लिहिणाऱ्यांची उपस्थिती होती त्याच्या जास्त पट या विषयी जाणुन घेण्यासाठी जमली होती.

अनिकेत समुद्र व सुरेश पेठे यांनी हा सारे कशासाठी हे सांगीतल्या नंतर "स्टार माझा " चे श्री. प्रसन्न जोशी यांनी मार्गदर्शन केले.

आज अनेक जाणकरांची, मान्यवरांची या संमेलनामधे ओळख झाली.

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही हे, तिचा दर्जा इतर भाषाप्रमाणेच आहे हे सत्य वर्तमानपत्रात अनेक लेख लिहुन लोकांपुढे आणणाऱ्या श्री.सलील कुलकर्णी यांच्याशी परिच झाल्याने खुप आनंद झाला.

"शब्दबंध" चे श्री.प्रशांत उदय मनोहर यांनी अमेरीकेवरुन हा मेळावा सुरु असतांना दुरध्वनीवरुन या मेळाव्याला शुभेच्छा दिल्या, व पुढील "शब्दबंध" चा उपक्रम येत्या जुन मधे होणार असुन त्यात अधिकाधीक ब्लॉगर्सनी सहभागी व्हावे असे आवाहान केले.

रन कवी रन

आमचे ब्लॉगर दोस्त श्री. कवी यांनी विक्रमी वेळात मुंबई मॅरेथान पुरी केली.


Saturday, January 16, 2010

पुण्यामधे आयोजीत अखिल वैश्व्विक ब्लॉगर्स स्नेहसंमेलन


काय म्हणता काय राजाभाऊ ?

वाद नाही, विवाद नाही, रुसवे नाही, फुगवे नाहीत, कसली कसली नाटके नाही, नाट्य नाही, झगडे नाहीत, हाणामाऱ्या कुटाकुट्या नाहीत, कोणाचा म्हणुन विरोध नाही, जाग ठरवण्यावरुन विसंवाद नाही, असच का तसच का ? नाही,  मी म्हणेन तेच खरे, म्हणणे नाही,

मग हे कसले संमेलन ? हा कसला स्नेह मेळावा ब्लॉगल्सचा ?

सारे ब्लॉगर्स कसे आनंदाने उद्याला पुण्यात एकत्र येणार आहेत, श्री. सुरेश पेठे व अनिकेत समुद्र यांनी नुसती साद घालण्याचा अवकाश.

या दोघांचे सारे ब्लॉगविश्व आभारी आहे, या कल्पनेबद्द्ल आणि ती प्रत्यक्षात साकार केल्याबद्दल.

साहित्य संमेलन, नाट्यसंमेलन आयोजले जातो तेव्हा केवढा डुरळा उडत असतो, त्या वातावरणाच्या बरोब्बर विरोधी असे हे वातावरण आहे. सारे कसे अगदी मजेत जुळुन आलेले आहे.

शिका या ब्लॉगर्स संमेलनापासुन, या नवोदितांकडुन.

कधी एकदा या स्नेह मेळाव्याला जातो असे झाले आहे.

विमान कंपन्या आणि वाद्ये




एयर इंडियाने निष्काळजीपणे हाताळुन उस्ताद अमजद अलीं खांसाहेबांचे सरोद मोडुन टाकले.

उदारमनाने उस्तादांनी त्यांना मुआफ केले.

विमानकंपनीला डेव कॅरलनी मात्र फार छान धडा शिकवला

Friday, January 15, 2010

पण का ?

एखादी सुंदर कलाकृती तुम्ही पहाता, एखादी गाण्याची अगदी रंगलेली जमलेल्या महफिलीचे तुम्ही साक्षीदार असता, एखादे छानसे नाटक पाहिलेले असते, चित्रपट पाहिलेला असतो, उत्तम पुस्तक वाचलेले असते,  एखाद्या निसर्गरम्य प्रदेशात तुम्ही भटकंती केलेली असते, धबधब्याखाली तुम्ही मनमुराद बागडलेले असतात, उल्कावर्षाव न्हाहाळाला असतो.

तुम्हाला झालेला आनंद तुम्हाला कोणाबरोबर तरी वाटावासा वाटतो,  कदाचीत ती व्यक्‍तीनी देखील तो चित्रपट पाहिलेला असतो, त्या प्रदेशात प्रवास केलेला असतो. ती गोष्ट त्यानी पण केलेली असते , पण तो  कोरडाच राहीलेला असतो, तो तसाच रुक्ष असतो.

कशाला आपण त्याच्याकडॆ रसरसुन बोलायला गेलो आणि आपलाच रसभंग करुन घेतला ?

सुर्याची चंद्रकोर होतांना


सुर्यग्रहण, एक अद्वितीय, विलोभनीय, खगोल शास्त्रीय घटना.  ह्या देखणा खेळाचे निरीक्षण करणे किती सुखद अनुभव असतो.

पण,

ग्रहणाबाबत जेवढे अज्ञान , अंधश्रध्दा आहेत तेवढीच ते दृष्य पहाण्यासाठी लोकांची अनिच्छा.  आजुबाजुच्या किती तरी जणांना आज संगुन झाले, हे नाट्य पहा, पहा,  या सोलार गॉगल मधुन.

पण प्रतिसाद जवळजवळ शुन्य.

काही जणांना थट्टा करण्याचा विषय मिळाला, तर काही जणांनी ग्रहण पहायचे नसते हे सांगीतले., दोन चार जणांनी डोळ्याजवळ गॉगल नेवुन सुर्याकडॆ न बघता, दुसऱ्या सेकंदाला "यातुन काही दिसत नाही " करुन परत केला.

आम्ही २१ व्या शतकात. 

Wednesday, January 13, 2010

मराठीतूनच ब्लॉग लेखन करणाऱ्या मराठी ब्लॉग धारकांचा मेळावा

लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तच्या सौजन्याने , आजच्या मुंबई वृत्तान्तमध्ये आलेली बातमी

प्रतिनिधी

आपल्या मनातील विचार, विविध विषयांवरील मते आणि भावभावना व्यक्त करण्यासाठी सर्वसामान्यांनाही आता ब्लॉगचा पर्याय उपलब्ध आहे. अमिताभ बच्चन शाहरुख खान यांच्या ब्लॉगप्रमाणेच ज्याला लिहिण्याची आवड आहे अशी कोणीही व्यक्ती आपला स्वत:चा ब्लॉग तयार करुन लेखन करु शकते. मराठी भाषेत आज सुमारे दीड हजारांन अधिक व्यक्ती आपले ब्लॉग चालवत असून त्यांचा एक मेळावा येत्या १७ जानेवारी रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.
गुगल आणि अन्य संकेतस्थळांच्या माध्यमातून आज सर्वसामान्य माणसालाही ई-मेल प्रमाणे जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यावर कोणीही आपला ब्लॉग सुरु करु शकतो. मराठी ब्लॉगनेटच्या माध्यमातून सध्या १ हजार ६४७ व्यक्ती विविध विषयांवर मराठातून ब्लॉगलेखन करत आहेत. केवळ मराठीतूनच ब्लॉग लेखन करणाऱ्या मराठी ब्लॉग धारकांचा हा मेळावा दुपारी ४ ते ७ या वेळेत पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रस्ता, बिग बाजारजवळ, पुणे येथे येत्या रविवारी आयोजित करण्यात आला आहे.
ब्लॉगलेखक सुरेश पेठे, अनिकेत समुद्र यांच्यातील चर्चेतून या पहिल्या मराठीतून लेखन करणाऱ्या ब्लॉग लेखकांच्या मेळाव्याची कल्पना पुढे आली. पेठे यांनी आपल्या ब्लॉगवर त्याविषयी सुतोवाच केले आणि ब्लॉगविश्वातून अनेकांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे पेठे व समुद्र यांचा उत्साह वाढला.
या ब्लॉगमेळाव्यासाठी जगभरातील मराठीतून ब्लॉगलेखन करणारी लेखक मंडळी अपेक्षित आहेत. केवळ ब्लॉगच्या माध्यमातून किंवा प्रतिक्रियांमधून नेहमी भेटणाऱ्या या सर्व मंडळींनी एकत्र यावे, सर्वाचा प्रत्यक्ष परिचय व्हावा, आपापले ब्लॉग, त्यावरील लेखन, नवीन कल्पना, भविष्यातील कार्यक्रमांची रुपरेषा यांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला
आहे.
येत्या रविवारी होणाऱ्या या मेळाव्यास मराठीतून ब्लॉगलेखन करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी पेठे यांच्याशी sureshpethe@gmail.com वर संपर्क साधावा.

बीकाजी - लिंक रोड - मालाड

तीनचार जणाच्यां ब्लॉगवर मालाडच्या बिकाजी वर लिहिलेले वाचले . ही सर्व मंडळी आपल्या सासुरवाडी जाऊन हाणतात आणि हे राजाभाऊ, मालाडचे जावई, ते अजुनपर्यंत बिकाजी मध्ये खायला गेलेले नाहीत म्हणजे काय ? राजाभाऊंनी हे चांगलेच बोचत होते.

बायको कधी नाही ते माहेरी गेलेली.

मला एकटीला आता तरी सोड, मी एक रात्र रहाणार आहे हा आदेश धुडकावुन अचानक मिळालेले स्वातंत्र उपभोगायचे सोडुन हा  "तुळशीदास " रात्री मालाडला  पोचला, कारण काय तर बीकाजीत जेवायला जायचे.

काय हा  लिंक रोड वरचा टॅफिक , २२ वर्षापुर्वी हा रस्ता निर्मनुष्य असायचा, रात्री यामाहा वरुन राजाभाऊ निघाले की त्यांचे सासरेबुबा त्यांना घाबरुन सांगायचे " मागुन जावु नकात हो, तेथे रात्रीच्या वेळी लुटमार होते " , जणु काय राजाभाऊ त्यांचे ऐकणार आणि आता ....

तर बीकाजीत गेल्यावर पहिल्यांदा "राज कचोरी " मागवली.  पण फारसी नाही आवडली, ऑपेरा हाऊसला " तिवारी मिठाईवाला " कडे ही सॉलीड मिळते , त्या पुढे ही काहीच नव्हती.

मग "राजस्थानी गठ्ठा " आणि "लच्चा परोठा" मागवला.  पण कालचा दिवस राजाभाऊंचा नव्हता. "राजस्थानी गठ्ठा" मधे जणु अख्या राजस्थानमधल्या मिठाचे भांडार रिकामे झाले आहे की काय , इतपत तो महाखारट होता.  आणि लच्चा पराठाही काही खास नव्हता.

काउंटर वरच्या माणसाला त्या गठ्ठाची चव घ्यायला लावली, नशिब माझे त्याला ही ते पटले , त्याबदली त्यांनी "डाल माखनी " दिली, जी राजाभाऊंच्या बायकोला आवडली.

पण एकंदरीत याबद्दल मत प्रतिकुल झाले.

Monday, January 11, 2010

मेनलॅंड चायना


या "मेनलॅड चायना" ची जवळुन ओळख राजाभाऊंना जेव्हा का श्री. शतंनु घोष यांच्या ब्लॉगवर झाली तेव्हापासुन त्यांनी सेनापती बापट रोडवर त्यात जेवायला जाण्याचा धडाका लावला होता. त्यात त्यांना मेनलॅंड चायनानी मुंबईमधे त्यांच्या घराजवळील सोबो सेंट्रल मॉल मधे शाखा उघडल्याचे कळल्यापासुन त्यांचे पोट आणि जिव्हा नुसते वळवळत राहिले होतो.


आपल्या बायकोबरोबर कधीही वाद (वादविवाद नव्हे, जेथे दोन्ही बाजुंनी युक्तीवाद केले जातात ) घालण्याच्या फंदात पडु नये हे २१ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतही राजाभाऊंनी शिकु नये म्हणजे फारच वाईट, हे वाद घालणे आपल्याला किती चांगलेच महागात पडते याची का त्यांना जाणीव नाही ? का पण का त्याचे त्यांना सदैव विस्मरण होते ? कदाचीत असे विस्मरण करुन घेणे हे अखेरीस त्यांच्याच फायद्याचे असावे म्हणुन तर नव्हे ?

मग ते तिला घेवुन "मेनलॅंड चायना " मधे जेवायला गेले.

जर चायनीज जेवण जेवायचे असेल तर या जमान्यात "मेनलॅंड चायना " ला पर्याय नाही. येथे मिळणारा प्रत्येक पदार्थ खुप चविष्ट, रुचकर असतो आणि तो खुप चांगल्याच मोठ्या, जास्त, प्रमाणात दिला जातो, एका डिश तिघाजणांना सहज पुरावी.

आज रात्री त्यांनी Crispy Veg. in Chilly Plum Sauce, Sweetand Sour Veg. with Crispy Noodles and Lotus Leaf wrapped rice with corn kernals and almonds मागवले.

हा कमळाच्या पानात शिजवलेला , मक्याचे दाणॆ, बदाम घातलेला फ्राइड राईस मस्त लागतो. आणि प्लम सॉस मधे शिजवलेले क्रिस्पी व्हे. तर बहारदार.

पण मागवण्यामधे परत त्यांनी तीच चुक केली. जेवण फार सुके होवुन गेले.

बायको खुश तर जिंदगी हसीन.

Sunday, January 10, 2010

बिंब प्रतिबिंब


निर्माल्य - एक खुळचट कल्पना

मुळातच येथे या खाडीचे पाणी एवढे घाण आहे की त्यात "निर्माल्य" टाकतांना भक्तांनी दहांदा विचार करावा, आपण देवाला कोठे सोडतो आहोत त्याच्याविषयी.






पण खरे दुर्दैव असे की माणसाला आपल्या ह्या पोटासाठी या घाणीत उतरावे लागते. लोकांनी टाकुन दिलेल्यात काही मौल्यवान सापडते का शोधण्यासाठी, तेवढेच दोनपाच रुपये सुटावेत. डोक्यावरुन मैला वाहुन नेण्याची पद्धत बंद झाली पण मानवाचे घाणीशी नाते अद्यापी सुटलेले नाही.

या पोटासाठी मानवाला हे येवढ्या खाली उतरायला लागु नये.







कस काय जमते ?

या कामगारांची खरोखरीच कमाल आहे, येवढ्या उंचीवर जावुन कामं करणॆ कसे काय जमते ? आपल्याला या उंचीवर जावुन नुसते खाली पाहिले तरी चक्कर यावी.



कस काय जमते ?

एक सफर पॅगोडा बघण्यासाठी गोराईची













मुंबईत एक अद्वितीय शिल्प साकार होतयं आणि ते पहायला जाण्यासाठी मिळु नये. आज कोणत्याही परिस्थितीत जायचेच जायचे करुन राजाभाऊ निघाले गोराईला "पॅगोडा " पहाण्यासाठी.

कधी कधी - "निवडक अग्रलेख"


कधी कधी रद्धीवाल्याकडच्या फेरफटक्यात अचानक हाती रत्न लागुन जाते.

मध्यंतरी हाती आतापर्यंत ज्या दिग्गजांची नावे केवळ ऐकण्यात होती, ज्यांचे अग्रलेख अद्यापी वाचले नव्हते अश्या थोर संपादकांच्या अग्रलेखाचे एकत्रीकरण करुन काढलेले "निवडक अग्रलेख " हे पुस्तक हाती पडले. आणि ते ही केवळ पाच रुपयात (दुर्दैव पुस्तकाचे )

यात

"बाळशास्त्री जांभेकर - दर्पण १८३२,
गोपाळ गणॆश आगरकर - सुधारक
बाळ गंगाधर टिळक - केसरी - १९०५
शिवराम महादेव परांजपे -काळ - १९०२
नरसिंह चिंतामण केळकर - केसरी - १९२२
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर -नवाकाळ - १९२३
अच्युत बळवंत कोल्हटकर -
श्रीपतराव लक्ष्मणराव शिंदे -विजयी मराठा १९२२
भीमराव रामजी आंबेडकर - बहिष्कृत भारत - १९२८
कृष्णाजी गणॆश लिमये -ज्ञानप्रकाश
गजानन त्र्यंबक माडाखोलकर - तरुण भारत - १९४६
आनंद कृष्ण वाघमारे - मराठवाडा - १९३८

आदींचे निवडक अग्रलेख आहेत.



Thursday, January 07, 2010

क्षणभंगुर

रात्रीचे सव्वादहा वाजले आहेत.

अर्धा तास विलेपार्ले रेल्वेस्थानकावर राजाभाऊ ट्रेनची व फलाटावर आलेल्या ट्रेनमधे आपल्याला कधी शिरायला मिळेल याची वाट बघत उभे.

आलेली प्रत्येक गाडी माणसांनी ओसांडुन वाहिलेली. दरवाज्यात हवा खात उभे रहाण्याऱ्यांनी निष्कारण दुसऱ्याचे आतबाहेर येणेजाणे चांगलेच अडवुन ठेवलेले.

सोबत "भटकंती " मासीकाची. वाचनात रमल्याने वेळ सुसह्य झालेला.

चार गाड्या सोडल्यानंतर आलेले पाचवी गाडी चांगलीच रिकामी आणि ती देखील नवी.

चला, आता प्रवास चांगला होईल.

गाडी खार स्थानकावरुन सुटली आणि अचानक त्यांच्या डब्यात प्रचंड आरडाओरडा, रडणे, किंकाळ्या, विव्हळणे,  बोंबाबोंब सुरु झाली, धडाधड चेन खेचायला सुरवात.

गाडी सुरु होत असतांना चार स्त्रिया सहासात लहान मुलांसह चालत्या गाडीत चढताचढता त्यातील एक बाई व एक मुल खाली पडलेले , फलाटावर पडले की गाडीखाली परमेश्वराला ठावुक.

माणसे किती निष्काळजी असतात.

गाडी मधे कुठेही न थांबता तिने वान्दे स्थानक गाठलेले.

दादर स्थानक आले. काही मिनिटापुर्वी आपल्या समोर एक हादसा झालेला, दुर्दैवी घटना घडलेली याचा जरासुद्धा मागमुस नाही, जो तो आपल्या तालात.

क्षणार्धात सर्वकाही विसरुन गेलेले प्रवासी.


क्षणभंगुर आयुष्याच्या क्षणभंगुर आठवणी.

ले लो भाई खिलोना ले लो



भातुकलीचा खेळ


इटुकली, मिटुकली, चिटुकली, लहानुशी खेळणी ताईला न भावतील तरच नवल.

सुन्नावस्था

नववर्षाच्या सुरवातीपासुन सकाळी वर्तमानपत्र उघडले की मन सुन्न होते, बधीरता येते, शालेय, महाविद्यालयीन मुलांचे हे असे आत्महत्याकरुन आपले भावविश्व उध्वस्थ करणे .

समाज कुठेतरी खुप मोठ्याप्रमाणावर चुका करत आहे.

स्वाद भोजनालय , व्हीवा पश्चिम व खोपोलीचे स्टड,

काही रेस्टॉरंट बंद पडतात तेव्हा मनाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात बरं वाटत असते. खरं म्हणजे असा आसुरी आनंद होवु नये पण त्याच्या आपल्याला फारसा चांगला अनुभव आलेला नसतो, अवाढव्य पैसा मोजल्यानंतर देखिल न मिळालेल्या समाधानामुळे कुठेतरी आपण नाराज झालेले असतो, उगीचच त्याचे नाव झालेले असते.

पण मं.गांधी क्रास रोड, विलेपार्ले ,येथे असणारे "स्वाद भोजनालय" चा काल बंद दरवाजा पाहिली व गेल्याच महिन्यात ते महागाईमुळॆ बंद पडले हे कळल्यावर खुप खुप हळहळायला झाले. खुप  वाईट वाट्ले, या ठिकाणी अतिशय रुचकर, चवदार, उत्तम गुजराथी थाळी अगदी माफक किमतीत मिळत असे. बऱ्याच वर्षापुर्वीची जेवलेल्या भोजनाची चव अजुनही जिव्हेवर रेंगाळात राहीलेली आहे.

आज जावु , उद्याला जावु करता करता मधे अनेक वर्षे निघुन गेली

आता स्वाद भोजनालय फक्त आठवणीत राहिले.  

स्वागत (स्वागथ ) रिफ्रेशमेंट - मुंबई

सेट डोसा


उदंडु डोसा

साधा डोसा





"तुला भुक लागलेली दिसत नाही " . राजाभाऊंच्य बायकोनी राजाभाऊंना विचारले.

आपल्या बायकोच्या बोलण्याकडॆ सोईस्कररीत्या, जाणीवपुर्वक कसे दुर्लक्ष करावे यात ते माहीर. ऐकुन न ऐकल्यासारखे करावे.

तिची जरासी गंमत करायची होती ना, तिच्या आवडीच्य कोकोनट शेवया खायला तिला न्यायचे होते ना. बोरीबंदर पासुन , फोर्टमधल्या गल्लीबोळातुन चालवचालव चालवल्यानंतर ते अचानक फिरोझशहा मेहता रस्तावरील "द मुंबई स्टोर " समोरील गल्लीत बाहेर निघाले.

"हं, आता बोल मघाशी काय म्हणत होतीस, भुक लागली आहे काय, चल मग तुला जे आवडते ते खावुया "

(नेमका हा पदार्थ फक्त सकाळीच मिळतो )

या जमान्यात जेव्हा लोकांच्या चवीत, खाण्याच्या आवडीनिवडीत झपाट्याने बदल होत चालले आहेत , त्या फेऱ्यात अनेक उपहारगृहांनी आपल्या माना टाकायला सुरवात केली आहे, पण पारंपारीक, अस्सल चवीचे पदार्थ खावु घालणारे काही उपहारगृहे अजुन पर्यंत तग धरुन आहेत, त्या पैकी " स्वागत " हे एक.


चला चला चला जत्रेला चला, प्रभादेवीला जत्रेला चला

प्रभादेवीला जत्रा भरली आहे.

Monday, January 04, 2010

पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळावा




पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळावा

श्री.सुरेश पेठे यांच्या ब्लॉगवर http://sureshpethe.wordpress.com/ "पुणॆ ब्लॉगर्स स्नेह मेळावा "संबंधी वाचनात आले.

जर राजाभाऊ पुण्यात असतील तर याला जाणार आहेत.


मराठीब्लॉग्स नेट वर नोंदलेल्या व मराठीत नियमीत लिहिणाऱ्या पुण्यातील ब्लॉगर्सचा एक स्नेहमेळावा येत्या रविवारी दिनांक १७ जानेवारी २०१० रोजी संध्याकाळी ४ वाजता , सिंहगड रोड येथील पु. ल. देशपांडे उद्यानात ठरविला आहे.
पु. ल. देशपांडे उद्यान संध्याकाळी ४ ला उघडते. उद्यानाची प्रवेश फी रू ५/- आहे.
पहिल्या भेटीचा उद्देश एकमेकांचा परिचय करून घेणे हा्च मुख्यत: असेल, तरीही ह्या भेटीत पुढील कार्यक्रमांची रूपरेषा व वारंवारिता ठरवणे, त्याचे ठिकाण, आपापल्या ब्लॉग्स ची माहीती व इतर आवश्यक बाबींवर चर्चा करता येईल.
तरी ह्या स्नेह मेळाव्याला आपण उपस्थित रहावे, तसेच आपल्या माहीतीतल्या सर्व ब्लॉगर्स ना ह्याची कल्पना देऊन त्यानाही येण्यास उद्युक्त करावे अशी मी नम्र विनंती करीत आहे. आपण खात्रीने येणार असल्याची नोंद, आपले नाव व फोन नं. सहीत येथेच आपल्या उत्तरात करावी म्हणजे त्याचेशी संपर्क करणे सोयीचे होईल. ह्या पुढील कार्यवाही आपल्या प्रतिसादावर अवलंबून असेल.
आपले,
सुरेश पेठे
अनिकेत समुद्र

Sunday, January 03, 2010

नरेन्द्र प्रभू: 'भ्रमंती हिमालयाची’ छायाचित्र प्रदर्शन

नरेन्द्र प्रभू: 'भ्रमंती हिमालयाची’ छायाचित्र प्रदर्शन

नव्या वर्षाची सुरवात मोठी झोकदार झाली आहे , काल समीर रावचे बासुरी वादन व आज श्री. नरेन्द्र प्रभु व त्यांचे साथीदार यांनी भरवलेल्या "भ्रमंती हिमालयाची " हे छायाचित्र प्रदर्शन.

हे प्रदर्शन पाहिल्यानंतर आत्ताच्या आत्ता उठुन तडक हिमालयाचा मार्ग धरावा ही इच्छा फार प्रबळ व्हायला लागते. उत्कृष्ट छायाचित्रे, हिमालयाची , हिमालयाच्या कुशीत रहाणाऱ्यांची नाना रुपे यांनी आपल्या कॅमेरार बंदिस्त केली आहेत.

या साऱ्या फोटोग्राफरनी त्यांना मिळालेली ही दिव्य अनुभुती आपणा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी अपार मेहनत घेतली आहे.  प्रत्त्येकानी हे प्रदर्शन जावुन पहायलाच हवे.

आज श्री, नरेन्द्र प्रभुंची प्रत्यक्षात भेट झाली, आता पर्यंत ते त्यांच्या ब्लॉगमधुन भेटत होते. अत्यंत परखडपणॆ, निर्भयपणे ते समाजातील अपवृत्तीवर प्रहार त्यांच्या ब्लॉगवर करत असतात.  जेव्हा दोन अपरिचीत ब्लॉगर्स असे भेटतात तेव्हा फार गंमंत येते.  ब्लॉगवर भॆटणॆ व प्रत्यक्षात भेटणॆ. वा, मजा आली.

श्री. समीर राव -ज्यांची बासुरी ऐकुन प्रत्यक्ष श्रीकृष्ण देखील भुलतील




ज्याच्या नववर्षाची सुरवात सुरमयी होते, ज्याची संध्याकाळ सुरांनी भारावलेली , मोहुन जात असते , ज्यांना सुरांची धुंदी चढते, ज्यांना ते सुर गुंगावुन टाकतात, ज्यांच्या मनाला ते शांतावस्थेत घेवुन जातात ते मोठे भाग्यवान असतात.

आणि ज्या प्रतिभावंत कलावंतामुळे त्यांना जीवनाचा आस्वाद घेण्याची उर्मी , जीवन जगण्यासाठी उर्जा मिळते त्या कलावंतांचे दिव्य अनुभवाची प्रचिती दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात.

ज्यांची बासुरी ऐकुन प्रत्यक्ष श्रीकृष्ण देखील भुलतील अश्या तरुण आणि अप्रतिम, सुरेख आणि सुरेल बासुरी वाजवणाऱ्या म्हैसुर निवासी श्री. समीर राव यांचे बासुरीवादन काल "स्वरांगण " या संस्थेंने विलेपार्ले येथे आयोजीत केले होते.

पंधराएक दिवसापुर्वीच श्री. समीर राव यांचे बासुरीवादन स्वामी हरीदास संगीत संमेलनात राजभाऊंनी ऐकले होते. पण तेथे कलावंतांना कला सादर करण्यासाठी मर्यादीत कालावधी दिला जातो , त्या मुळे मन कसे अतॄप्त होते.

काल मन कसे बासुरीवर हेमवती, मालकंस व आसाममधील एक गीत ऐकतांना तृप्त झाले.

मजा आली.

Saturday, January 02, 2010

शतरंज के खिलाडी

नवे वर्ष उजाडले आणि राजाभाऊंनी http://www.playchess.com/ वर जे बुद्धीबळ खेळायला सुरवात केलयं, ते आत्तापर्यंत , ३६ घंटॆ, सपाटुन हरण्यासाठी, जवळजवळ जिंकणारा प्रत्येक डाव ते दोन दिवस सातत्याने हरत आहेत, जेव्हा तुम्ही विजयाच्या जवळ असता तेव्हा त्यात कुठेतरी पराभवाचा क्षण दडलेला असतो याची प्रचिती घेत.

त्यांचा लॅपटॉप संतापलेले राजाभाऊ आता आपल्यावर केव्हा राग काढतात व आपली तोडफोड करतात याच्या प्रतिक्षेत. 

Friday, January 01, 2010

नायब राज्यपालांचे आभार


१९८४ मध्ये शीखविरोधी उसळलेल्या दंगलीतील आरोपी सज्जनकुमार यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यास २५ वर्षानी का होईना पण एकदाची परवानगी दिल्याबद्दल दिल्लीच्या नायब राज्यपालांचे आभार व अभिनंदन.

या नववर्षात तरी पिडीतांना न्याय लवकर मिळावा ही इच्छा।