अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Thursday, June 30, 2022
फडके उद्योग मंदिर
राजाभाऊंचा मोबाईल खणखणला.
संध्याकाळचा दुसरा प्रहर सुरु होता. आज उशिरापर्यंत बसुन कामाचा फडशा पाडण्याचा त्यांचा मानस.
"उद्या सकाळी नास्ताला मिसळ करणार आहे "
"ठिक आहे "
पुढे काय करायचे हे राजाभाऊंना ठावुक होते.
शट डाउन आणि पावले आपसुकच वळली फडके उद्योग मंदिराकडॆ.
पोह्याचा चिवडा, फरसाण, शेव इत्यादी इत्यादी.
फडके उद्योग मंदिर, ताजे घरगुती पदार्थ मिळण्याचे ठिकाण- विलेपार्ले.
आता मालकांच्या गोड बोलण्यामुळे येथे येणे होते की येथे मिळणाऱ्या , संतुष्ट करुन सोडणाऱ्या पदार्थांमुळे की या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे ?
कधी उपवासाचा फराळी चिवडा, कधी जरासा तिखट बटाट्याचा चिवडा, मधेच डिंकाचा , मुगाचा लाडु, बटाट्याची शेव, साधी शेव, एखादे भेळीचे पाकीट, तर कधी आलेपाक , कधी हे तर कधी ते. अनारसे मात्र राहुन गेली आहेत आगावु मागणी न नोंदवल्यामुळे आणि अजुन येथे मिठाई देखील खायची आहे.
विलेपार्लेच्या खाद्यभ्रमंतीत सापडुन गेलेले एक चविष्ट ठिकाण.
अश्या ठिकाणी राजाभाऊ गेले की त्यांना काय खरेदी करु नी काय नाही असे होत रहाते आणि मग त्यांच्या बायकोला त्यांच्यावर भडकायला आणखीन एखादे निमित्त मिळते.
गरमागरम, बटाटा भजी. भजी खाणे.
शिवाजी पार्क मैदान.
कट्टावर बसणे, गप्पा मारणे, बोलणे, विचार ऐकणे, रमणे, हसणे , खेळणे, पोहणे, गणेशाला पाया पडणे, दोरीवर, मल्लखांबावर चढणे, व्यायाम करणे, मैदानाभोवती चालणे, धावणे, आणि हो बघणे देखील.
अशी एक ना अनेक कारणे घेवुन इथे येणे.
पण राजाभाऊ.
त्यांच काय आपलं, एकच मक्सद घेवुन पार्कात जाणे.
गरमागरम, बटाटा भजी.
भजी खाणे.
केवळ हाणणे. मनोसोक्त हाणणे. हा असा घाणा आणि त्यातुन भज्यांचे बशीत पडणे.
आणि मग काय.
हाणा काळेकाका हाणा
Saturday, June 04, 2022
Thursday, June 02, 2022
सखी उद्योग गृह
काळेकाकु उगीचच नाही कावत, भडकत.
"काय रे तुला घराच्या बाहेर पडल्यापडल्या भुका कश्या लागतात? "
आता लागते खरी, त्याला काय करायचे !
आज पुन्हा एकदा "सखी उद्योग गृह " . गिरगाव चर्च शेजारी.
उत्तम ढोकळा आणि अळुवडी खाण्यासाठी. सोबत मस्तपैकी चटणी.
या ठिकाणी चविष्ट गुजराती खाद्यपदार्थ मिळतात.
हे सारे खाल्यानंतर लक्ष सफेद ढोकळ्याकडे गेले.
पुन्हा केव्हातरी त्यासाठी.
योको सिझलर्स
कालचीच गोष्ट.
दुपारी राजाभाऊंना एक पदार्थ खाण्याची अनावर उर्मी झाली होती. कॅंटीन मधे तो पदार्थ बनवण्यात आला होता. पण त्यांनी मन कठोर करतं तो मोह टाळला. डब्यातली गवारीची भाजी जर का खाल्ली नसती ना तर मग कठीण होते.
काही काही वेळा एखादी इच्छा झाली असेल तर ती नंतर का होईना पण ती अनपेक्षितरीत्या अवचीत पुर्ण होते खरी.
संध्याकाळ. चायनीज जेवायला " फॅंट कॉंग "मधे जायचे ठरलेले. मधेच कधीतरी मग जागा बदलली. "डायनेस्टी "मधे मग चायनीज जेवायला जाण्याचे ठरवले. काळेकाकूं खुष झाल्या. येथले जेवण त्यांना आवडते, मग या बाबतीत आपल्या नवऱ्याशी त्यांचे मतभेद का असेना.
पण ही जागा अनेक वेळा त्यांना हुलकावण्या देत आली आहे.
बिच्चारी,
काल पण "डायनेस्टी " च्या दारात पोचुन पण आत जाणे झाले नाही, जाणे झाले ते बाजुच्या "योको सिझलर्स " मधे दुपारी न खालेले "सिझलर्स " खायला.
युवराजांनी राजाभाऊंना बेक्ड बिन्स असलेले सिझलर्स मागवले.. मजा आली.
गंमत म्हणजे ह्या योकोचा बेत त्यांनी ठरवला नव्हता.
हिन्दु विश्रांती गृह
मेरे प्यारे घरवासीयों , मै आज आपको एक मेरे "मन की बात कहने" जा रहा हुं.
रविवार सकाळ. राजाभाऊ नऊ वाजता उठले. उठल्याउठल्या त्यांनी घरच्यांना आपल्या मन की बात सांगायला सुरवात केली.
"चलो आज चलते है , एक नयी राह पर, एक नई दिशा लेकर, एक नई मंझील की तलाश मे , एक ऐसी जगा जहां पर कोई भी आदमी भुकाप्यासा ना रहेगा. उसे समाधान मिलकर ही रहेगा "
"चल आज सकाळी पोळा मिसळ खायला जावु , मग दुपारी कोठेतरी बाहेर जेवु , संध्याकाळी मग "विनय हेल्थ होम " मधे उसळपाव, पातळभाजी पाव खावु "
जरा भावनेच्या भरात वहावुन गेलेल्या राजाभाऊंना मग उमजले, अरे आज आपण जरा जास्तच आश्वासने देत बसलो आहे. आपल्या ट्रेझरी मधे तर खडखडाट आहे आणि आपण तर काकुंच्या अपेक्षा भलत्याच वाढवुन ठेवल्या.
काकुंनाही हा सारा दिवसभराचा बेत ऐकुन तेवढे बरे वाटले असेल, आजचा दिवस अच्छा दिन आहे म्हणायचे. चलो आराम करते है.
मग हळुहळु काकुंचा चांगल्या दिवसाच्या स्वप्नांचा चक्काचुर होवु लागला. पैश्याचे निमित्त पुढे केले गेले. त्यांनी ही मग ते समजुन घेतले. होता है. होता है. असे तर नेहमीच होत असते, आता तर त्याची सवय झाली आहे.
पण आज राजाभाऊ फार दुष्टाव्याने वागले. ते एकटेच आज "हिन्दु विश्रांती गृह" मधे पोळा मिसळ खायला गेले, काकुंना "मिस्ती" ला सांभाळण्यासाठी बाहेर गाडीत बसवुन..
अखेरीस "पेट की बात" खरी.
सखी उद्योग गृह
अबकी बार
पाव किलो खांडवी चटणी सोबत आणि दोनच थेपले.
थेपले एका मिरची बरोबर.
मिरची बरोबर खाल्याचा परिणाम आज नाही जाणवणार.
बार बार लगा तार, हर बार
"सखी उद्योग गृह "
गिरगाव चर्च शेजारी.
कामदार स्विट्स
तसं बघायला गेले तर राजाभाऊंचे गुजराती खाण्याबद्दलचे प्रेम पार पुर्वीपासुनचे , पण अलीकडच्या काळात हे प्रेम जरा जास्तच, फार फार उतु लागले आहे ही ही गोष्ट तेवढीच खरी.
काल संध्याकाळी त्यांनी ऐकायचे ठरवले, आपल्या मनाचे ऐकायचे ठरवले , आपल्या जाग्या झालेल्या मराठी बाण्याचे ऐकायचे ठरवले, बास झाले हे बार बार , रोजचेच गुजराती खाणे , यंदाच्या वेळी , येणाऱ्या उद्याच्या रविवारी "मी मराठी ,असावे माझे खाणे मराठमोळं, असा मनसे विचार केला.
रविवार उजाडला, सकाळ झाली . मनाच्या सिंहासनावर, पोटावर राज्य करण्यासाठी राजाभाऊंनी आज विनयच्या उसळपाव व मिसळपावचा घाट घातला खरा पण त्याला मोडता घातला तो एका मराठी माणसांनेच. त्यांच्या अगदी जवळच्या माणसाने, त्यांच्या एका नातलगाने. खुद्द काळेकाकुंनी. कधी नव्हे ते त्यांचे जिलेबी फाफडा विषयीचे प्रेम अती उफाळुन आले.
आता वरुनच हुकुम आल्याने मग राजाभाऊंचा नाईलाज झाला, ते जे म्हणतील तेच करायचे ठरवले पाहिजे.
जिलेबी पापडयाच्या युतीलाच आज त्यांनी आपले मत देण्याचे ठरवले आणि मग ते पोचले " कामदार स्विट्स " मधे. पपईची चटणी नेहमीच सोबत असते खरी पण आज या युतीमधे आणखीन एकाची भर पडली, पातळ पातळ चटणी, जी काय आहे हे त्यांना कळलेले नाही.






















































