आषाढात फिरायला जावे, ज्यावर चढण्याची हिम्मत ही केवळ वाऱ्यालाच होते व झेप घेण्याची तुफानी पावसांच्या धारांना, ह्या अश्या कडेकपारींच्या या प्रेमळ सह्याद्रीच्या डोंगररांगात. मनमुराद पावसाचे रौद्ररुप उपभोगायला जावे ह्या सह्याद्राची अंगाखांद्यावरील अलंकार असलेल्या किल्यांवर. मुसळधार पावसात किल्यांवर जावे, कुठेतरी घळीत, लेण्यांमधे, गुहेत रात्री मुक्काम करावा, कोसळ कोसळ कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने तुडव तुडव तुडवलेल्या ,झोडप झोडप झोडपलेल्या, भिज भिज भिजवलेल्या या क्लांत देहास जरासा आराम द्यावा इतिहास जागवत पुन्हा पुढच्या हवे हवे हवेसे वाटणारे कष्ट, श्रम करण्यासाठी लागणाऱ्या झेप घेण्याच्या पुर्वीचा.
श्रावण मास. हा गरजुन , बरसुन, उमढघुमढ करुन शांत झालेला घन निळा हळुवारपणॆ, लळीवारपणे, लाडिकवाण्या सरींने धरतीला न्ह्यावु घालत असतो. अश्यावेळी सह्याद्रीचे रुप पालटुन जाते, त्याचा जो कायापालट होतो तो न्हाह्याळायला जावे ते पठारांवर, त्या उग्रस्वरुपी, बेलाग, उभ्या कड्यांच्या माथ्यावरील विस्तीर्ण पठारावरील हिरवेगार कुरणांवर. पठारांवर जावे पहुडायला, बागायडाला, बिलगायला, डोळे भरभरुन, भरभरुन त्याचे हे हिरवेसाजरे रुप मनात साठव, साठव, साठवायला, ज्यावरुन नुसतेच चालचाल चालायला जाणॆ हे एक सुंदरसे, सुखद स्वप्न असते, ह्या शिदोरीवर, आठवणीवर पुढील सारे वर्ष कंठायला. असे हे लुसलुशीत गवत, त्यावर बहरलेली ती लाघवी रानफुले, ओत तोत ओतुन निवांत झालेला. श्रमलेला पाऊस, त्या हिरव्यागार धरित्रीवरल्या नानाविध हिरव्या रंगाच्या अनेक छटा, ती त्रुप्त झालेलेली धरा, मग दर्याखोऱ्यांमधुन अलगदपणे वर येत राहाणारे, रिक्त झालेले, हलकेसे कापसासारखे घन, आणि ह्या साऱ्या देखाव्यावर मायेचे देखणॆ पांघरुण घालणारे सुरेखसे इंद्रधनुष्य. सारे सारे केवळ अप्रतीम , नितांत देखणॆ रुप. जणु शब्दांच्या पलीकडले. त्याचे वर्णन करणॆ महाकठीण, हे सारे , सारे केवळ अनुभवायलाच हवे, ह्या सोहळ्याचा भरभरुन आनंद लुटायला हवा.
अश्या पठारांवर जावे जेथे केवळ निसर्गाचा आणि फक्त निसर्गाचाच सहवास असावा, वेड्यावाकड्या वागणाऱ्या माणसांचे जंगल नसावे , आणि अशी ठिकाणे बघण्यासाठी नेणाऱ्या श्री. सुरेश परांजपेंची सोबत साथ असावी आणि दिलाच्या राणीचा सहवास.
काल राजाभाऊ माढंरदेवच्या पठारावर भटकंतीस गेले. त्यांना जायचे होते निसर्गदेवतेच्या प्रांगणात, निसर्गदेवतेच्या डोळे भरभरुन घेतलेल्या दर्शनाने मंत्रमुग्ध होवुन जाण्यासाठी, त्यांना जायचे नव्हते काळुबाईंच्या मंदीरात, त्यांचा पडाव होता तो या पठाराच्या टोकाला असलेल्या बालेघरच्या आणखीन पुढे असलेल्या, खोगीराप्रमाणॆ आकार असलेल्या "चौऱ्या" वर.
चौऱ्याला जावुन परत यायल्या लागलेल्या चारपाच तासाच्या सुखद पायपिटीनंतर जेव्हा ते येरुळी आणि डुयीची वाडीला जाणाऱ्या रस्ताला लागेल तेव्ह्या निसर्गाचे एक अनोखे रुप त्यांची वाट बघत होते, बोलबोलता सारा परीसरावर ढगांनी पांघरुण घातले, सारे सारे ढगांत विरघळुन गेले, बघबघता पुढची सारी वाट धुक्यात हरवुन गेली, दाट धुके, भर दुपारी तीन-चारच्या सुमारास.
मधेच उघडदीप होत होती, समोर पसरलेला पांडवगड व खाली दरी दिसणाऱ्या धोम धरणाचे दृष्य काय विहंगम दिसत होते.
वाटेत लागण्याऱ्या अंबाडी खिंडीत एका वाड्याच्या आवारात बारा महिने वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी अडवले गेलेले आहे ते पहाणॆ झाले.
प्रत्येक आल्हाददायक अनुभवांचा शेवटही तसाच अविस्मरणीय व्हायला लागतो, भल्यामोठाल्या इंद्रधनुष्याने ते भारावलेले क्षण सीलबंद करुन टाकले.
मेरे नामुराद जुनुन का, है इलाज कोई तो मौत है.
मौत अ हं, ही तर नवसंजीवनी मिळालेले एक नवीन जिंदगी.
2 comments:
वा.. पंत वा... काय लिहिलंय.. खरे तर मी आपल्या जुन्या भटकंतीवरचे लिखाण वाचायला उत्सुक आहे.. बघा जरा विचार करा.. :)
रोहन ,
आपली दाद मिळाली आणखी काय हवयं ?
Post a Comment