Sunday, April 19, 2009

वीटभट्टी, आणि अनिल अवचटांचे. "प्रश्न आणि प्रश्न "


आज पहाटे फिरायलो निघालो. वाटॆत वीटभट्टी पाहिली आणि दोन पुस्तके आठवली. मिलींद बोकील यांनी कातकरींवर लिहीलेल्या पुस्तकात कात तयार करण्याची कामे बंद पडल्यावर कातकरी या व्यवसायात वळले हे लिहीले आहे आणि दुसरे पुस्तक अनिल अवचटांचे. "प्रश्न आणि प्रश्न " . या मधल्या पाणी आणि माती " या लेखात त्यानी लिहीलयं - 
 
 
"ही वाहुन जाणारी माती म्हणाजे हजारो वर्षाच्या नैसर्गीक प्रक्रियेतुन बनलेला अतिशय मुल्यवान थर. माती म्हणजे केवळ खडकांची भुकटी नव्हे. त्यातल्या बॅक्टेरिया, जीवजंतु, किडे वनस्पती या सर्वांनी ती जिवंत बनलेली असते. 
 
आपण माणसं ही अशी बेजबाबदार की इतका किमती थर आपण खरवडून काढतो. भट्टीत घालून त्यातले जीवजंतू मारून त्याची वीट , म्हणजे थोडक्यात परत दगड बनवतो. 
 
मागे पुण्यातील वीटभट्टी-कामगारांची मी माहीती घ्यायला फिरत होतो. तेव्हाचे आठवले : वीटभट्टीवाले मुळशी तालुक्यातुन माती आणायचे. विटेला कधी नित्कॄष्ट, मुरमाड माती चालत नाही. ती उत्कॄष्ट पोयट्याची लागते, जिथे माती घायला यांचे ट्रक यायचे तिथे गेलो. शेतकऱ्यांना विचारायचो. त्यांनी काही आर्थीक अडचण म्हणुन जमीन "खणायला" काढलेली असायची. कुणाच्या घरी लग्न निघालेले किंवा कुण्याच्या गळ्याची कर्ज आलेले. जिथे हजारो वर्षे शेतीने भरभरुन उत्पन्न दिले , तिची हजार-दोन हजार रुपयांसाठी कायमची हत्त्या होत होती. गावेच्या गावे मुरमाड झालेली पहायला मिळाली. पुण्याच्या विठ्ठ्लवाडीजवळाच्या वीटभट्टांवर अशा मुलायम, चाळलेल्या मातीचे डोंगर उभे राहीलेले. माती तुडवुन, मळून लोण्यासारखी होत होती. माती नावाच्या निसर्गातील चमत्काराच्या चिता तिथे अहोरात्र फुललेल्या दिसल्या.   

No comments: