Sunday, June 15, 2008

श्री शंकर पापळकर



आज मी बेहद्द खुश आहे म्हणण्यापेक्षा जास्तच उत्तेजीत झालो आहे. आज मी श्री. शंकर पापळकरांशी दुरध्वनीवर संभाषण केले. श्री शंकर पापळकर यांची ओळख तशी संगीताच्या बॉगवर झालीच होती.

आजच्या फादर्स डे चे औचीत्य साधुन सुधीर जोगलॆकरांनी चतुरंग, लोकसत्ता मधे "सव्वाशे मुलांचे बाप" हा त्यांच्या महान कार्याची माहीती देणारा अप्रतिम लेख लिहिला आहे.


आपल्या समाजपुरुषाचा गाडा केवळ या अश्या थोर विभुतीच्या जोरावर चालला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरु नये.



जन्मदात्यांनी ज्यांना लाथाडले, अव्हेरले अशा दुर्दैवी मुलांना जवळ करीत त्यांना मातेची ममता आणि पित्याचा पितृवत आधार देणारे दोन समाजपिता .. त्यांनी जपलेल्या आगळ्यावेगळ्या माणुसकीची ही कहाणी.



ही कहाणी वाचल्यावर मला असा प्रश्न पडला की या मुलांना दुर्दैवी का बरे म्हणावे, ज्यांच्या नशिबी श्री शंकर पापळकर यांच्या छत्रछायेखाली नुसतेच वाढणॆ नव्ह्ते तर त्यांचे योग्य ते पुनर्वसनही लिहीले होते ती मुले तर नशिबवानच म्हणायला पाहीजेत. जे सख्खे आईवडील त्यांना देवु शकत नाहीत, ज्या योग्य प्रकारे त्यांची काळजी घेवु शकत नव्हते ते त्यांचा केवळ श्री शंकर पापळकर यांच्या मुळे लाभले.



आईवडीलांनी टाकुन दिलेली भिन्नमती, मूकबधीर बहूविकलांग अशी ७३ मुले पापळकरांच्या संस्थेत रहात आहेत. या मुलांना श्री शंकर पापळकर नुसतेच घर देवुन थांबत नाहीत तर त्यांची लग्नं लावुन, त्यांना नोकरीढंदा देऊन आयुष्यात उभं करण्याचा प्रयत्न करतात.


श्री शंकर पापळकर यांना लाख लाख सलाम.


श्री शंकर पापळकर यांचे मागणे एकच आहे.


आज भारतात अनेक नामवंत संस्था आहेत ज्या नियमाच्या चौकडीत बांधल्या गेल्यामुळॆ १८ वर्षावरील

भिन्नमती, मूकबधीर बहूविकलांग मुलांसाठी काही करु शकत नाहीत. त्यांना १६ वर्षे पुर्ण झाली की बाहेर काढले जाते.


आज गरज आहे ती सरकारनं विधानसभेत पुढाकार घेवुन १८ वर्षावरील भिन्नमती, मूकबधीर बहूविकलांग मुलांसाठी त्यांचा पुनर्वसनासाठीचा कायदा करावा.


हे "लोककल्याणकारी" दावा मिरवणाऱ्या सरकारला सहज शक्य आहे. गरज आहे ती केवळ इच्छाशक्तीची. ज्यातुन राजकीय लाभ मिळवता येतील अश्या गोष्टींच्या पलीकडला विचार करायला शिकण्याची.


1 comment:

A woman from India said...

हा लेख लिहील्याबद्दल धन्यवाद.
खरंच सरकारने अशा विशिष्टं गरजा असलेल्या मुलांसाठी वेगळे कायदे करायला हवेत. सर्वांना एकाच मापात तोलण्याचा आंधळेपणा करू नये.
पापळकरांचे काम अगदी सुरूवातीपासून बघण्याचे आणि आपल्या परीने होईल तेव्हढा खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य मला व माझ्या कुटुंबाला लाभले आहे.
खरं तर त्यांच्याविषयी जास्तं माहिती लिहीण्याची खूप इच्छा होती, पण ते प्रसिद्धीपासून दूर रहाणे पसंत करत असल्याने त्यांच्या इच्छेला मान देत लिहीण्याचे टाळत राहिले.
अर्थात कस्तुरीचा गंध फार काळ लपून राहू शकत नाही, तसेच झाले.
त्यांच्या कार्याची माहिती लोकसत्तेच्या माध्यमातून इतरांना झाली ही आनंदाची गोष्ट आहे.