Wednesday, June 04, 2008

चवीनं खाणार त्याला देव आंब देणार, अन्नदाता सुखी भव !


कधीतरी अचानक, अकस्मातपणॆ एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची ओळख व्हावी व जन्मभर अकॄत्रीम स्नेह, प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याच्या रेशमी धाग्याने ते बांधले जावेत.

सहासात वर्षापुर्वी मी, बायको, मुलगा वाट वाकडी करुन वरळी परिसरात भटकत असता, एका झाडाच्या पारावर एक लहानुसा मुलगा हौशेखातीर थोडेसेच आंबे विकतांना नजरेस पडला. तोच कारणीभुत ठरला जन्मोजन्मीचे संबंध जुळवायला, प्रसंगी स्वतःच्या तोंडचा आंबा काढुन आम्हाला खायला देणाऱ्या गिरकर कुटुंबीयांशी. बाजारु आंबा न खाणाऱ्या या वेडया माणासासाठी काय वाट्टेल ते करुन एखादी तरी पेटी आणण्याऱ्या देवमाणसांशी.

विजयदुर्गातील कातळावरच्या आंब्यांची चव न्यारीच .अस्सल , सुमधुर. येथले नैसर्गीकरित्या पिकलेले फळ जो कोणी एकदा चाखेल तो परत दुसऱ्या कोणत्याही आंब्याकडे ढुंकुनही पहाणार नाही.

दरवर्षी आम्हाला वेध लागतात ते अक्षयतृतीयेचे. या दिवशी ते गावाला जातात व न चुकता आमच्यासाठी आंबे घेवुन येतातच येतात. आम्ही अगदी आतुरतेने वाट बघत असतो या घडीची. याच्या चवीवर मग पुढल्या वर्षापर्यंत कळ कशीबशी सहन करत काळ कंठत असतो.

बाजारात आंब विकत घेवुन खाणे हे मग आमच्यासाठी महापाप असते. ज्याने अस्सल चीजेचा आस्वाद घेतला आहे तो चोखंदळ माणुस मग कशाला कॄत्रीमतेच्या नादी लागेल.

आम्हाला फक्त दोघे जण आंबे देतात. आम्ही विकत घेतो असे म्हणण्यापेक्षा ते आम्हाला आंबे देतात असे म्हणणे अधीक संयक्तीक ठरेल.

गिरगावात रहाणारे श्री. कवळे जे पालशेट वरुन आणलेले त्यांच्या घरचे आंबे देतात व गिरकर कुंटुंब.

आणाखीन एकाजणांकडच्या आंब्याची चव अजुनही मनात रेंगाळतेय. पेडांब्यांचे श्री. धनंजय बापट. ८-१० वर्षापुर्वी शेकडयाच्या भावाने (डझनाच्या नव्हे) घेतलेले आंबे. एकही आंबा खराब निघाला तर संपुर्ण पैसे परत देईन असे छातीठोक पणे, प्रामाणीक पणे सांगण्याऱ्या श्री. बापटांना आवर्जुन दुरध्वनी करुन त्यांचे आभार मानल्याचे संभाषण अजुनही आठवतयं.

गेल्या वर्षापासुन नाही म्हटले तरी आंबा महोत्सवात आलेल्या देवगडच्या सौ. कार्लेकर यांच्या कडेही अगदी दर्जेदार व चोख आंबा मिळतो, तो देखील मी अगदी हात, तोंड, कपडे बरबटत ओरपुन खातो. खोटं कशाला म्हणु.

No comments: