Saturday, July 21, 2007

"ओमियागे" व "सानिया"

सध्या डोक्यात "सानिया" संचारली आहे. साऱ्या विचारावर पगडा बसत चालला आहे. "सानियाचा". आत कोठेतरी खोलवर झिरपत, भिनत चालली आहे "सानिया" .

"ओमियागे" त मी कसे हळुहळु डुंबत चाललो आहे. नवे विचार गवसताहेत, नवी वाक्ये सापडताहेत, जीवनाचा अर्थ नव्याने जाणवतोय. मग अश्यावेळी इतर कोणाशीच संवाद साधणे नकोसे असते, आपला आपल्याशीच संवाद सुरु असताना बाहेरील व्यत्यय नकोसा होत असतो. हि अस्वस्थता कसली असते ? या कथेमधे कधीतरी कोठेतरी आपल्याला आपणच सापडत असल्याची भावना की अगदी याच अश्याच परिस्थितीत आपण असेच का वागलो नाही याची खंत ?

काही लेखक , लेखिका आपल्याला असेच झपाटुन टाकत असतात, आधी व पु, मग गौरी देशपांडे, सानिया, मिलींद बोकील, मेघना पेठे, आशा बगे.

हेच पहा ना -

"या साऱ्या आकृतीबंधात एक विशिष्ट गोष्ट आहे; प्रत्येक चित्रात मोकळी सोडलेली जागा. मात्सुची विलक्षण सुंदर आकाराच्या फांद्या पसरलेली झाडं, साकुराचा बहर, उमेची बहरलेली एकच फांदी, असं सगळ रेषांतून काढल्यावर प्रत्येक चौकटीत आकाश होतं, मोकळे सोडलेलं, काहीच नसलेलं." "किंवा तिथे काही नसण्यालाच एखादा अर्थ असेल. नुसता मोकळा अवकाश. आवश्यक. महत्वाचा. "

"तेवढंच कधी केलं नाही. सतत आपल्यातच राहिलो, स्वतःचं तेवढ खरं, बरोबर मानून. तिथल्या तिथंच घुटमळल्यासारखा प्रवास झाला. आपण समजलो, नुसता काळाचा प्रवास. त्यात आपणही चालायचं असतं हेच कधी लक्षात नाही आलं."

"पाऊस पडला की असा मातीचा ओलाकच्च वास वेढून येइ"

"कुणास ठावुक. त्या विषयावर मात्र तिच्याशी कधी आतलं नाही बोललो. तिच्याशीच का, स्वतःशीही नाही कदाचीत. वेळच नाही मिळाला. काळ फार भराभर गेला. वाटायचं, आयुष्य पडल आहे समोर. अमुक एक गोष्टी कधीही करता येतील . पण नाही. तस घडल नाही. म्हणजे त्या करायच्याच होत्या असं नव्हे, पण आयुष्य आणि काळ भराभर गेला की तो आता गेल्यावर असं वाटतं आहे ? "

"सानियाची" चढलेली झिंग काही उतरायला मागत नाही. "ओमियागे" तसे बघायला गेले तर एका बैठकीत वाचुन संपवले, मग त्यात ट्रेन मधील प्रवासात, मधेच चालताना, रांगेत उभ असतानाचे वाचन आलेच.

मग त्याच एका विलक्षण धुन्दींत संध्याकाळी परत वाचनालयात जावुन सानियाचे दुसरे पुस्तक आणले. "अवकाश". नामक कादंबरी.

आयुष्य जान्हवीला कोठुन कुठे घेवुन जाते. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या जान्हवीच्या वाट्याला येते ते केवळ एक सामान्य गॄहीणी होवुन जगण्याचे काम.

पण मला कादंबरी पेक्षा कथाच जास्त भावल्या.

No comments: