खुद्द मडीकेरीत फारसे पहाण्यासारखे जास्त काही नाही, येथे गरम मसाल्याचे पदार्थ, कॉफी, मध मस्त मिळतात. वाटेत जातायेताना लागणारी अमाप निसर्गसंपदा पहाण्याजोगी, येथुन जवळच तलकावेरी येथे कावेरी नदीचा उगम आहे, पण वेळे अभावी तेथे जाण्याचे टाळाले. आडवाटकरुन नागरहोळे या अभयारण्यात ही जाणे जमले नाही. काबीनी नदी काठी असलेले हे अभयारण्य मस्त आहे. पण आमचे ते पहायचे राहुनच गेले. परत केव्हातरी.
आजचा पल्ला लांबचा होतो. मडीकेरी ते कुन्नुर - या साठी परत म्हैसुरला यावे लागले, आमचा प्रवासाचा मार्ग चांगलाच चुकला, आम्ही उलट्या मार्गे सुरु केला, मडीकेरीला शेवटी येवुन मंगळुर मार्गे परतायला हवे होते. पैश्याअभावी धडक नियोजन केलेले नव्हते. परत म्हैसुरला परतलो, चामुंडादेवीचे दर्शन घ्यायचे राहीले होते , ते गर्दी, रेटारेटीत, घेवुन झाले. आपल्या सर्वच देवस्थानात हीच परीस्थीती का असते ?
आता वेध लागले होते ते बांदीपुर अभयारण्यावे, कसले भरगच्च जंगल या परीसरात आहे, आम्ही या परीसरच्या प्रेमात पडलो आहोत. येथे पर्यटन खात्याचे निवास ही मस्तच आहे, भर जंगलात, अशी ठिकाणे आयुष्यात एकदा जावुन पुरत नाहीत, परत तेथे जावेसे वाटते. या भर जंगलात आम्ही रहायला हवे होते. पर्यटन निवासाजवळ गाडी थांबवली, आता अभयारण्यात पर्यटनखात्याच्या बसने, गाडीने, किंवा हत्तीवरुन फेरफटका मारायचा होतो. सहज आजुबाजुला पाहिले एका हरीणाने दर्शन दिले, हळुहळु नजर विस्तारत गेली तशी हरीणांचे कळपच्या कळप दॄष्टिस पडु लागले, रात्री हजारो हरणे या निवासात मुक्कामाला येतात म्हणे. मग बस मधुन अभयारण्यात प्रवेश केला, पहील्या गजराजाचे दर्शन झाले, मग दुसऱ्या, मग तिसऱ्या, मग चौथ्या, किती हत्ती पाहु नी किती नाही, सोबतीला वानरे होतीच, रानडुक्करे, हरणे, बहार आली. खर म्हणजे अभयारण्य बस मधुन भटकण्याची ही पद्धत खरी नव्हे, पण शेवटी ! येथे दोन-चार दिवस रहायला हवे, निसर्गाशी समसस होत, चवीचवीने त्याचा आस्वाद घेयला हवा. निघण्याचे मन करीत नव्हते, पण रात्र पडायच्या आत कुन्नुर गाठायचे होते. मधे मधुमलाईच्या अभयारण्यात ही फेरफटका मारायचा होता.
हा संपुर्ण रस्ता मस्तच आहे, कधीही संपु नये, वाटेत येवढे मोर पाहिले की बस्स. परत वाटेतल्या मधुमलाईच्या अभयारण्यात बस नी फेरफटका मारला, जवळच्या हत्तीशाळेत जावुन आलो. किती रम्य संध्याकाळ होती ती. अश्या वेळा खुप थोडयाच वेळा आपल्या नशिबी का येतात ?
आमची गाडी आता मुख्य रस्ता सोडुन उजवी कडे वळली, हा एक नवीन रस्ता झाला आहे. वाटते एक छानसे गाव लागले. "मसीनागुडी". अरे. हे नाव परीचीत वाटते ? कस काय बर ? हा ! आपल्या पुण्याचे श्री कॄष्णमेघ कुंटे हे या गावात रानकुत्रांच्या विष्टेतील पॅरासाईटस वर संशोधन करण्यासाठी राहीले होते. त्यांनी यावर "एका रानवेडयाची शोधयात्रा" हे अप्रतीम पुस्तक लिहीले आहे. त्यात त्यांनी केवळ पैश्यासाठी लालची हैवान टस्करच्या (मोठा सुळेवाला हत्ती) होणाऱ्या कत्तली बद्दल जे काही लिहीले आहे ते वाचुन मन सुन्न होते. श्री. कुंटेच्या प्राध्यापकांनीही (बहुधा प्रा. आपटे, नाव बरोबर आठवत नाही ) या परीसराविषयी चांगले पुस्तक लिहीले आहे. या गावात दाट जंगलात अनेक रिसॉट्स आहेत. संध्याकाळी हा रस्ता वाहनांना बंद होते,
रमतगमत केलेल्या या प्रवासामुळे फार उशीर झाला होता, रात्र जंगलातच सुरु झाली होती, मग ऊटीलाच रहायचे ठरवले. अती पर्यटकांमुळे अती लाडावलेले हे गाव आहे. आम्ही बेमौसमी गेल्या मुळे तसे रिकामेच होते. आम्हाला कुन्नुरला जायचे होते, जुन्या स्मॄती उजाळण्यासाठी.
माझे वडिल एका फॉरेन बॅंकेत कामाला होते तेव्हा त्यांना रहाण्यासाठी बंगले मिळत, कुन्नुरला चहाच्या मळातच फार अलिशान बंगल्यात आम्ही पुर्वी राहीलो होतो. मग आम्ही कुन्नुरला गेलो, सिम्स पार्क मधे भटकलो, संध्याकाळी परत उटी ला परतुन मुक्कामाला म्हैसुरला आलो. हे शहर चवीचवीने पहायचे राहीले होते, येथली बाजारपेठ पालती घालायची होती, गुरु मधे म्हैसुरपाक ही खायचा राहीला होता, ते सारे पुरे केले व धरली वाट रहाटगाडग्याची.
No comments:
Post a Comment