Saturday, July 28, 2007

म्हैसुर, मडीकेरी, दुबारे कॅप

दरवर्षी एक लांबची सफर करणे हा आमचा शिरस्ता. आमचे आम्हीच. जेव्हा लोक विचारतात कोणाबरोबर जाणार तेव्हा मला त्यांची कीव येते. आपलेआपण प्रवास करु शकतो हे ते विसरुनच गेले आहेत. ट्रेनची टिकिटे कोण काढत बसणार ? परक्या शहरात रहायला हॉटेल कोठे शोधणार, आपल्यासारखे जेवण मिळणार नाही, एक ना अनेक अडचणी.
टॅव्हल कंपन्यांबरोबर जाणे आम्ही नेहमीच टाळले. एकतर त्याच्या प्रत्येक माणसी असलेल्या दरात आम्हा तीन जणांची भ्रमंती होते म्हणुन व स्वतंत्र गेलो की आपण आपले राजे असतो, कसेही कोठेही मनमुराद भटका, ठिकाण आवडले तर एखादा दिवस जास्त रहा, नाहीच आवडले तर चालु पडा. जे वहान मिळेल ते घेवुन आपल्या मार्गावर पुढे सरकत रहा, लांबची दिशा आधी पकडा मग मागे सरकत या, शक्यतो जेवणाचा जास्त बावु करु नये, स्थानीक खाद्यपदार्थ खाण्यावर आमचा भर असतो. वेळ प्रसंगी काहीच खायला मिळाले नाही तर फळे, केळी खावुन राहीलेलो आहोत.
जाण्याआधी मात्र त्या प्रदेशांची सर्व माहीती आम्ही करुन घेतो, म्हणजे त्याच्याशी मानसीकद्रुष्ट्या समरस व्हायला होते व प्रवासाची रंगत वाढते. आतातर अनेक उत्तम पुस्तके उपलब्ध आहेत, इंटरनेट च्या माध्यमातुन घरबसल्या संपुर्ण माहीती मिळते, पुर्वी फार तुटपुंजी माहीती मिळायची. आपल्या पर्यटक कचेरींवर अवलंबुन रहायला लागायचे, तेथेही काय मिळायचे तर छापील पाने आणि अज्ञान.
बंगळुर व म्हैसुरला मी लग्नाआधी तीनदा जावुन आलेलो, पण जोडीने जाणे जमत नव्हते , अनेक वेळा या शहरांनी आम्हाला हुलकवण्या दिल्या. दोनदा कुन्नुरला आम्ही गेलो असताना पण कोईम्बतुर मार्गे व एकदा चेन्नई मार्गे परतावे लागले होते. छोकरा एसीसी पास झाला तेव्हा त्याला घेवुन या परीसरात भ्रमंती करायचे ठरवले. खरतर खुप फिरायचे होते ,पण दामाजीपंतांनी घोडा अडविला होता. दोन दिवस बंगळुर व दोन दिवस म्हैसुर पाहुन परतायचे बस्स येवढाच बेत होता. पण नियतीच्या मनात ते नव्हते.
एकतर माझे चिरंजीव शहरात यायला व रहायला तयार नव्हते. कसाबसा त्याला तयार केला. माझ्या बंगळुरमधल्या सहकाऱ्यानी जे हॉटेल रहाण्यासाठी सुचवले होते त्यात न रहाता मी कामत यात्री निवास मधे राहीलो. माझी निवड चुकली होती. एकतर ते उगाचच महागडे होते व त्याला आता अवकळा येत चाललेली आहे. प्रथम घासे मक्षीःकाप्रात (?). प्रथमभेटीत त्या दोघांनाही हे शहर फारसे भावले नाही, मलाही पहील्या दिवशी दाक्षिण्यात्य पदार्थांची मनोजोगती चव चाखायला मिळाली नाही, नाराज मनाने पहाटेच आम्ही म्हैसुरला प्रस्थान केले. प्रवासाची सुरवात झकास झाली. काय तो त्यांचा बस अड्डा नाहीतर आपल्या कडची बस स्थानके. लाज वाटते, या दोन शहरा दरम्यान सर्वोत्तम वोल्वो बससेवा आहे. दर फक्त रु. १३५.००
पैसे वाचवायचे करुन आधी पर्यटन खात्याच्या हॉटेलात गेलो. वाडा चिरेबंदी, ढासळत चाललेला. तडक सामान उचलले व हॉटेल सिद्धार्थ वर धडकलो. पुर्वी या मधे मी राहीलो असल्या मुळे हे माझा माहीतीतले होते. मस्त हॉटेल आहे, परीसरही सुंदर आहे. व उपहारगॄह तर सर्वोत्तम आहे. मस्त बागा, उद्याने, हे शहर मला खुप आवडते.
सायंकाळी वॄंदावन गार्डन पहायला निघालो, म्हटले बाहेरुन टॅक्सी करु, हॉटेलच्या ट्रॅवलडेस्क वर महाग मिळेल. पण ते काही जमले नाही, मग हॉटेलच्या ट्रॅवलडेस्क वरुन गाडी केली. आमचा "कांता", गाडीचा सारथी खुप कुशल होता, गाडी चालवण्यात व बोलण्यातही, हळुहळु आम्ही वहावत गेलो, गुंगत गेले, मन चलबिचल होत गेले,
रम्य सायंकाळ, मी, बायको आणि कुलदिपक, वॄंदावन गार्डन, मदहोशी वातावरण, कारंजे, दुसऱ्या दिवशीचे बेत ठरु लागले. त्यांनी मला पटवलेच, उटीला जाण्यास राजी केलेच. अतीपरीचयाने मला परत तेथे जायचे नव्हते, पण शेवटी मान तुकवावी लागली. आता पुढे पैश्याचा विचार करायचा नाही, घरी परत गेलो की कुठुनतरी पैसे उभे करु असे मनाशी योजले. परतल्यावर दोन दिवसासाठी गाडी ठरवली, वाटेत मधुमलई, व बांदीपुर करत उटिला जाण्यासाठी.
खर म्हणजे गेले अनेक वर्षे मी कारवार, शिरशी, दांडेली अभयारण्य, मुरडेश्वर, मंगळुर, उडिपी, गोकर्ण, व मडीकेरी या प्रदेशात जाण्यासाठी तडफडतो आहे. पण जाणे होत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे अचानक चार वाजता जाग आली मनात विचार आला , अरे आपण मडीकेरीच्या येवढ्या जवळ आहोत तर जावु का नये ? दिवस व पैसे वाढतील खरे पण आता त्याची पर्वा कुणाला ? बायको माझीच, अश्या बेताला तीचा होकार एका पायावर असतो, निघालो, सोबत कांता व इंडिका गाडी. ठरवुन केलेल्या गाडीने फिरण्यासारखे सुख नाही. प्रथमच मला जाणवले, त्यात कांता सारखा सदैव तत्पर असलेला सारथी. त्याला सांगीतले बाबारे आता पुढचे चार दिवस तु आम्हाला नेशीले तेथे आम्ही येणार.
हॉटेल सिद्धार्थ मधे चवदार डोसे रिचवले व निघालो, आधी राजवाडा बघीतला मग लागलो मडिकेरीच्या रस्ताला. किती सुंदर असावे एखाद्या प्रदेशाने. या रस्तावरुन प्रवास करताना बहार आली. मस्तपैकी जंगलच जंगल या साऱ्या परीसरात आहे.
या रस्तावर एक खुप मोठी तिबेटी लोकांची वसाहत आहे, त्यात त्यांच्या मॉनेस्टीज पहायला आम्हाला कांता घेवुन गेला. यात एका प्रशस्त हॉल मधे देखण्या व भव्य मुर्त्या आहेत. सारा परीसरही खुप छान आहे. पुढे गेल्यानंतर वाटेतच मधे आमवी गाडी मधेच आडवळणावर वळली. एका जंगलात आम्ही शिरलो. ती जागा होती दुबारे येथील जंगली हत्तींना माणसाळावयचा कॅप. संध्याकाळची वेळ, वाटेतली नदी ओलांडुन पलीकडे छोट्याशाच लॉंचनी गेलो, हत्तींची जेवणाची वेळ होत होती, हळुहळु एकेक हत्तींना घेवुन त्यांचे माहुत नदीवर येत होते, जवळपास हत्ती फिरताहेत, नदीत हत्ती पोहत आहेत, जवळपास, अगदी नजदिक, जंगलात हत्तीच हत्ती, आमची उत्तेजकता फारच वाढली होती. हे सारे पहाण्याची संधी आम्हाला कांतामुळे मिळाली. हे खुप रम्य ठिकाण आहे, नदी किनारी रहाण्यासाठी खुप चांगले हॉटेलही आहे. जवळपासच्या गावात रहाण्यासाठी घरेही मिळतात, येथे आम्ही रहायला हवे होते. पाय निघवत नव्हता. पण मुक्कामाला जायचे होते ते कुर्ग ला.
लहानसेच हे हिल स्टेशन आहे, या बद्द्ल मी खुप वाचले होते, येथील लढवय्ये कुर्गी लोक, मेजरजनरल करीअप्पा, येथील कॉफीचे मळे, निसर्गसौन्दर्य. कांतानी आमच्या मुक्कामासाठी एक मस्त बंगला शोधुन काढला, राजाज सीट या पॉइंट जवळ, माफक भाडे,
सकाळी नाष्ट्याला समोर आली ति कोरी रोटी व चटणी.

अपुर्ण.

No comments: