आज मी हे मु.पोष्ट. "इस्तिकलाल कादेसी ", इस्तंबूल, तुर्कस्तान मधुन लिहीत आहे. नुकताच केप्ते (कोप्तें) व पिलाफ (पुलाव) चा स्वाद घेवुन झालेला आहे, अक्रोड, बदाम पिस्ते, बेदाणे, हेझनट्स, खारका आदींवर मुठमुठ भरुन ताव मारुन झालेला आहे, आईस्क्रिम, बक्लावा हादडुन होत आहे.
हल्ली माझा मुक्काम तुर्कस्तानमधे आहे. सुप्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभु यांच्या बरोबर मी आज या देशात आलेलो आहे, आता पुढचे दिवस मी तुर्कस्तानात मनमुराद भटकणार आहे. मी मीना प्रभुंनी लिहिलेले "तुर्कनामा " हे तुर्कस्तान चे प्रवास वर्णन वाचायला घेतलेले आहे. नुकतेच "ग्रीकांजली " वाचुन संपवले, सबंध ग्रीस त्यांच्या बरोबर फिरुन झाले, आता पुढला मुक्काम तुर्कस्तानात.
मीना प्रभुं नी लिहिलेल्या प्रवासवर्णानांची हिच तर खासीयत आहे, त्यांचे प्रत्येक पुस्तक वाचतांना त्यांचा वाचक त्यांच्या बरोबर हे सारे प्रदेश अनुभवत असतो, तो शरीराने आपल्या घरी जरी असला, तरी मनाने तो केव्हाच त्या जागी, परदेशी पोचलेला असतो.
"माझ लंडन", दक्षिणरंग", मेक्सिकोपर्व", "चीनी माती " "इजीप्तायान" "ग्रीकांजली " व आता "तुर्कनामा". ही त्यांनी लिहीलेली प्रवासवर्णने.
जर आपण त्या देशाचा इतिहास, संस्कॄती, भौगोलीक रचना, रीतीरिवाज, माणसे यांची काहीही माहीती न करुन घेता, परदेशात गेलो तर परत येताना आपण कोरडेठाक असतो. कोणताही प्रदेश पहाताना त्याच्याशी मानसीकरीत्या सहभागी होण्याची गरज असते, तसच आपण त्यात डुंबुन जावु शकतो. अगदी हेच मीना प्रभु आपल्याला जाणवुन देतात.
गालीबचा "क्या वो नमरुद की खुदाई थी । बन्दगी मे मेरा भला न हुआ ॥" हा शेर माझ्या आवडीचा. या नमुद केलेला नमसुद हा राजा इथलाच. स्वतःला प्रतीपरमेश्वर मानणारा, व त्या मुळे त्याचा सर्वनाश झाला. (मी तर तसे स्वतःला समजत नाही तरी माझा का नाश व्हावा ? असे मी नेहमीच मला विचारत असतो). हा राजा इथलाच, हे मला आज कळले. सोन्याचा हव्यास असलेला मिडास राजा ही इथलाच. आणि हो आपला नाताळबाबा, सेंट निकोलस उर्फ सांताक्लाज सुद्धा इथलाच.
आपल्याच शहरात, आपल्याच देशात प्रवास करताना लोक इतके बिचकतात, प्रवाशी कंपन्यांवाचुन त्यांचे पानही हलत नसते. साधे रेल्वेचे आरक्षण, हॉटॆल निवडणे या सारख्या बाबी देखील त्यांच्या साठी कठीण असतात. परक्या देशात या मीना प्रभुंनी एकटीने , तर कधी आपल्या मुलीबरोबर कसा काय प्रवास केला असेल ? हे सारे जाणुन घ्यायचे असेल, व ते देश सुद्धा समजवुन घ्यायचे असतील तर मीना प्रभुंनी लिहिलेली प्रवासवर्णन वाचण्यावाचुन दुसरा योग्य पर्याय उपलब्ध नाही.
"येथे बसा येथे उतरा", "कोणतीही तोशीस नाही", "निश्चींत मनाने चला", "घरचेच जेवण", "सर्व सुखसोयी", पुरवणाऱ्या "यात्रा कंपनी" बरोबर नव्हे, तर जसे जमेल तसे, जसे आहे तसे, वाट्टेल त्या परिस्थितीत प्रवास, मुक्काम करत भटकंती करणाऱ्या मीना प्रभुंचे येत्या रविवारी "गुरुपौर्णिमेच्या " दिवशी दर्शन घ्यायलाच हवे.
एकट्याने प्रवास करण्यामागचे सुख एकच असते. आपले आपण राजे असतो. आपली कोणत्याही गटाबरोबर फरफट होत नाही, आपल्याला आपल्या मनाप्रमाणे हिंडताफिरता येते. हवे ते खाता येते. आम्हीही नेहमी असेच स्वतंत्रपणॆ प्रवास करत असतो, व या कारणे डॉ. मीना प्रभु यांच्या बद्द्ल आमच्या मनात नितांत आदर आहे.
आता वाट पहाणे त्यांच्या पुढील प्रवास वर्णनाची.
No comments:
Post a Comment